मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥३६॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३६॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥३६॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगा श्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय देवा सद्गुरुराया । काय वर्णन करावें सदया । तूंचि जगीं भरलास म्हणोनियां । न सुचे वर्णाया अणुमात्र ॥१॥ तूं मी एक असतां निश्चयें । कैसा विसरूं तुजला माये । आपुल्यासी आपण विसरूनि जाये । ऐसा कवणही ना जगतीं ॥२॥ आणिक प्रभो देवाभा सदया । तुज स्मरणेंही नाहीं गुरुराया । तूं मी एक म्हणोनियां । स्मरण विस्मरण कैंचें हो ॥३॥ परी देवा हें सद्गुरुप्रेम । नावरे कवणाही असे निरुपम । अहा देवा असे तें परम । कठिण प्रेम अनिवार ॥४॥ तुझ्या प्रेमीं माझें प्रेम । मिळतां तद्रूप रूपनाम । अगाध तुझी महिमा परम । वर्णाया अशक्य मजलागीं ॥५॥ जैशी तुझी इच्छा बापा । तैसेंच वर्ततां आम्हांस सोपा । मार्ग लाभेल मोक्षाचा, ही कृपा - । महिमा तुझी किती वर्णूं ॥६॥ तुझी इच्छा ही कीं एक । आनंदाची खाणीच सकळिक । रिता ठाव त्यावीण आणिक । नाहीं साऱ्या ब्रह्मांडीं ॥७॥ सूर्य उगवतां धरणीं । प्रकाशचि पडे साऱ्या स्थानीं । तैसी इच्छा उद्भवतां तव मनीं । आनंद पसरे चोहोंकडे ॥८॥ कसलीही असो आपुली इच्छा । आनंदचि तींत भरला साचा । तेव्हां वाईट बरवा कैंचा । गुणदोष तियेमाजीं ॥९॥ इच्छा आम्हां मानवांची। बरी वाईट असे साची । परंतु सद्गुरुमाउलीची । इच्छा गुणदोषविहीन ॥१०॥ देवा तूं गुणदोषातीत । नाहीं तुजला द्वैताद्वैत । सारा आनंदचि दुमदुमित । भरला तुझ्या इच्छेमाजीं ॥११॥ म्हणोनि देवा सद्गुरो दयाळा । तूं ठेविसी जैसें या तव बाळा । त्यांतचि आनंद मानोनि ये वेळां । रहाया बुद्धि दे बापा ॥१२॥ आतां देवा तूं जें करिसी । तें करीं बा रे मजसी । आनंदत्रि त्यांत निश्चयेंसीं । त्यावीण कांहीं ना अन्य ॥१३॥ सुखदुःखांमाजीं एक । केवल ब्रह्मानंदचि देख । मग कैंचें भय बा आणिक । बोलाया वाव ना उरला ॥१४॥ म्हणोनि तुझी इच्छा देवा । बाधक न होय कवण्याही जीवा । उद्धारचि होईल बरवा । सर्वांचा हो गुरुराया ॥१५॥ या जैसी तुझी इच्छा असे । तैशीच तव आज्ञा होतसे । तुझ्या प्रेमळ आज्ञेंतही वसे । आनंदचि खरा बा देवा ॥१६॥ म्हणोनि देवा सद्गुरुवचन । हेंचि आम्हां श्रेष्ठ जाण । आज्ञा पाळितां समाधान । होय आम्हां अज्ञांचें ॥१७॥ श्रीगुरो आतां तेंचि कथन । वदवीं देवा मजकडोन । नच धिक्कारीं अज्ञ म्हणोन । तूंचि उद्धरी या दासा ॥१८॥ असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । गणपत - मानेचे संकष्ट - निवारण । केलें स्वामींनीं कृपाबळें ॥१९॥ पहा कैसी सद्गुरुमूर्ति । काय त्यांची महिमा अपूर्व ती । मुखांतुनी शब्द जे निघती । तेणेंचि उद्धार होतसे ॥२०॥ यावरी सांगूं कथा एक । चित्त देऊनि ऐका सकळिक । स्फुरविती सद्गुरु जैसें देख । तैसें कथितों आतां पैं ॥२१॥ शिर्शीमाजीं एक ब्राह्मण । आमुचा सारस्वतचि जाण । रंगप्पय्या गोकर्ण । म्हणती त्यासी जन सारे ॥२२॥ त्यासी दोघे असती पुत्र । दत्तात्रेय आणि शंकर । या नामें बाहती समग्र । ऐका कथा त्यांचि हो ॥२३॥ ती कथा सांगूं सुंदर । धाकुटा पुत्र गोकर्ण शंकर । याचा कैसा केला उद्धार । श्रीस्वामींनीं तें सांगूं ॥२४॥ दत्ता शंकर यांचें जाण । केलें पितयानें मौंजीबंधन । आणिक लावी भजनीं जाण । पुत्रांसी आपुल्या प्रेमानें ॥२५॥ रंगप्पय्या ईश्वरभक्त । ईश्वरदेउळीं पूजा सतत । षोडशोपचार विधियुक्त । करी प्रेमळ चित्तानें ॥२६॥ पुत्रासीही सांगे कधीं कधीं । भक्ति करा देवाची आधीं । तोचि हरील आधि - व्याधी । परी न रुचे हें शंकरासी ॥२७॥ म्हणे मानसीं हा काय खेळ । लागलें माझ्या पितयासी खुळ । पूजेमाजीं व्यर्थचि वेळ । रात्रंदिन घालवी हा ॥२८॥ यासी सांगणें नव्हे उचित । आमुचा पिता असे हा निश्र्चित । म्हणोनि राहे तो स्वस्थ । न बोलतां अणुमात्र ॥२९॥ कां करावी पूजा व्यर्थ । तेणें काय होय आम्हां प्राप्त । यांत कांहीं नाहीं अर्थ । ऐसें वाटे शंकरासी ॥३०॥ त्याच्या चित्तीं वाटे जाण । कैंचा देव कैंचें भजन । ऐसें म्हणुनी रात्रंदिन । काल व्यर्थ घालवी तो ॥३१॥ ऐसें असतां एके काळीं । कुलदेव मंगेश या स्थळीं । शंकर रंगप्पय्या आदि मंडळी । गेली यात्रेसी हो जाणा ॥३२॥ तेथील सारा उत्सव नयनीं । बघतां शंकर हरुषे स्वमनीं । सिंहनाद ऐकुनी कर्णीं । आश्चर्य करी तो बहु ॥३३॥ म्हणे मानसीं शंकर तेव्हां । खेळ नव्हे हा निश्चयें देवा । सत्यचि अससी तूं करुणार्णवा । नव्हे खूळ पितयाचें ॥३४॥ मीचि असें परम मूर्ख । माझ्या चित्तीं नाहीं विवेक । म्हणोनि शब्द ठेविला देख । माझ्या प्रेमळ पितयासी ॥३५॥ क्षमा करीं बा मंगेशा । अज्ञ मूर्ख पामर ऐशा । बाळालागीं दावीं दिशा । उत्तम खऱ्या मार्गाची ॥३६॥ मग धरोनि मनीं दृढभाव । त्यांनीं गांठिला आपुला गांव । शिर्शींत येऊनियां सर्व । पोंचले देवकृपें निजसदना ॥३७॥ ऐसें असतां तेथें एक । नाडघर शांताबाई नामक । होती परम सात्त्विक भाविक । ब्रह्मज्ञानी ती पाहीं ॥३८॥ ती असे सारस्वत आमुची । प्रख्याति तेथें बहुत तियेची । भजन पुराण श्रवण यांतचि । घालवी काल आपुला ती ॥३९॥ जन जाती ऐकाया बहुत । शंकरही ऐकाया तेथें जात । वेदेश्वरी - शिवगीताटीका प्रख्यात । हंसराजस्वामींची वाचिती ॥४०॥ ऐकतां ती शंकरा वाटे आपण । सद्गुरु करावा येथोन । तेव्हां रात्रीं देखिलें स्वप्न । परम सुंदर तयानें ॥४१॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमस्वामी । आले शांताबाईच्या धामीं । म्हणती ऐक शंकरा सांगतों तें मी । पाळीं तूं आज्ञा आमुची ॥४२॥ शांताबाईसी विचारीं प्रश्न । ती सांगेल तुजला खूण । धरोनि हृदयीं त्यापरी जाण । करीं तूं वर्तन प्रस्तुत ॥४३॥ ऐसें बोलोनि मृदुवचन । सद्गुरुस्वामी न लगतां क्षण । पावले जाण अंतर्धान । जागृत झाला शंकर ॥४४॥ विस्मय पावूनि आपुल्या चित्तीं । गेला त्वरित धांवूनि निश्चितीं । शांताबाईच्या सदनाप्रती । बैसला तिष्ठत त्या समयीं ॥४५॥ तेव्हां बधूनि शंकरासी । शांताबाई म्हणे त्यासी । काय कारण बैसलासी । सांग बाळा ये वेळीं ॥४६॥ शंकरें निवेदिला तिजसी देख । स्वप्नाचा वृत्तांत सकळिक । उपजला त्याच्या पोटीं विवेक । पाहुनी शांताबाई तुष्टली ॥४७॥ तिनें प्रेमें पंचीकरण । विस्तारें कथिलें तयालागून । ऐकतां आनंदला चित्तीं जाण । शंकर गोकर्ण तेधवां ॥४८॥ आनंद उचंचळे त्याप्रत । घडीघडी त्यासी हंसूं येत । खूळ त्या लागलें ऐसें बोलत । जन सारे त्या समयीं ॥४९॥ घालिती डोक्यावरी पाणी । आप्त सारे त्यालागोनि । अधिकचि हांसे खदखदोनि । बोले मुखानें अणुमात्र ॥५०॥ अंतर्भाव न कळे कवणा । बेडचि लागलें म्हणती जाणा । परी लागला ध्यास त्याच्या मना । निजस्वरूपाचा हो पाहीं ॥५१॥ मग तो श्रीचित्रापुरास । पांडुरंगाश्रम - परमहंस । त्यांच्या संनिधीं दर्शनास । गेला लगबगें धांवोनि ॥५२॥ भेटला सद्गुरुस्वामींसी । आणि हेतु उद्भवला जो मानसीं । निवेदिला तो प्रेमें तयांसी । कर जोडोनि नम्रपणें ॥५३॥ तेव्हां बोलती सद्गुरुराज । सांगतों वचन एकचि तुज । तैसें करितां आत्मज्ञान सहज । होईल बापा निश्चयेंसीं ॥५४॥ वेंकटराय निलेकणी । यासी जप दिधला ये स्थानीं । लिहूनि घेतला तेणें येथूनि । तूं घे तयाकडूनि तो ॥५५॥ करीत असतां संसार - धंदा । तो जप वाचूनि करीं सदा । अर्थावरी लक्ष ठेवूनि, त्या पदा । पोंचशील तूं तत्काळ ॥५६॥ इतुकें सांगूनि सद्गुरुनाथ । ठेविते झाले मस्तकीं हस्त । तेव्हां शंकर प्रेमभरित । झाला सद्गदित त्या समयीं ॥५७॥ मग तो गेला आपुल्या ग्रामा । पुढें ऐका सद्गुरुमहिमा । ऐकतां येईल भाविकां प्रेमा । श्रोते हो तुम्हां सकलांसी ॥५८॥ त्यावरी तो शंकरराय । गुरुआज्ञेपरी करीत जाय । दृढविश्वासें करितां होय । आत्मज्ञान त्यालागीं ॥५९॥ लिहुनी घेतला वेंकटाकडुनी । जप चालविला दिवसरजनीं । लाविलें मन अनुसंधानीं । 'मी ब्रह्म' ऐशा हो पाहीं ॥६०॥ मग ऐसें करितां करितां । झाले त्या लयसाक्षीज्ञान तत्त्वतां । तोचि अभ्याम करीत असतां । पावला पूर्ण समाधान ॥६१॥ पहा कैसी सद्गुरुमहिमा । परम अगाध न वर्णवे आम्हां । अणुमात्र सांगूं आतां तुम्हां । गुरुकृपेंचि श्रोते हो ॥६२॥ स्वामींनीं नाहीं केला उपदेश । वाक्यचि त्यांचें असे विशेष । तेणेंचि आत्मसाक्षात्कार खास । झाला शंकर यासी पहा ॥६३॥ गुरुआज्ञेपरी वाक्य लिहोनी । घेतलें वेंकट याचेकडोनी । तेंचि पाळिलें तेणेंकरोनी । झालें समाधान पूर्ण तया ॥६४॥ गुरुमुखांतुनी निघे जें वचन । तें असत्य न होय कदापि जाण । सद्गुरुमहिमा कथाया कठिण । असे सत्य सत्य पहा ॥६५॥ सद्गुरुमूर्ति केवल ब्रह्म । नाम घेतांचि पावन जन्म । ऐशा मूर्तीचें काय तें वर्म । न कळे कवणालागींही ॥६६॥ चरणीं ठेवितां दृढ विश्वास । होय निश्चयें आत्मज्ञान खास । त्यांची आज्ञा हेंचि आम्हांस । मुख्य साधन हो पाहीं ॥६७॥ पाहूं नये त्यांचे गुणदोष । गुणदोषातीत असती ते खास । केवल ब्रह्मानंद निर्विशेष । निर्गुण निराकार ते पाहीं ॥६८॥ त्यांसी नाहीं विधि - निषेध । ते जें करिती तेंचि सिद्ध । त्यांच्यापरी श्रेष्ठ प्रसिद्ध । धुंडितां त्रिभुवनीं मिळे ना ॥६९॥ म्हणोनि ते जें करिती कार्य । त्याहुनी श्रेष्ठ नाहीं अन्य । बरें वाईट नसे हा निश्चय । त्यांच्या कार्यामाजीं हो ॥७०॥ पाप - पुण्य नाहीं त्यांसी । अधिक वर्णवेना मजसी । जें जें येईल त्यांच्या मानसीं । तें तें उत्कृष्टचि होय पहा ॥७१॥ यावरी कवणही करील प्रश्न । ज्ञानियां कां ना पाप - पुण्य । जरी केलें यथेष्टाचरण । तरीही पाप ना कैसें हो ॥७२॥ तरी ऐका सावधान । ज्यासी होय पूर्ण ज्ञान । त्यासी 'मी कर्ता' ऐसा अभिमान । नाहीं निश्चयें अणुमात्र ॥७३॥ ‘मी कर्ता भोक्ता' वाटे ज्यासी । पाप-पुण्य बाधे त्यासी । दोन्ही नाहीं ज्ञानियासी । अकर्ता अभोक्ता तो जाणा ॥७४॥ ज्ञानी न करिती यथेष्टाचरण । अवतारचि त्यांचा असे जाण । जन उद्धरायास्तव कृपाघन । करिती सत्कार्यें निरभिमानें ॥७५॥ प्रारब्धानुसार जरी हातुनी । घडलें दुष्कर्म समजा धरणीं । तरीही पाप ना त्यांलागोनि । पुण्यही न लगे त्यांसी पैं ॥७६॥ त्यांसी जे स्तविती भक्त । पुण्य सारें जाय त्यांप्रत । पाप घेती निंदक समस्त । ऐशी शास्त्रव्यवस्था असे ॥७७॥ ज्ञानी होती पापपुण्यरहित । 'संचित क्रियमाण' त्यांचे दग्ध होत । 'प्रारब्ध' एक भोगणें त्यांप्रत । परी तेंही मिथ्या तयांसी ॥७८॥ ज्ञानियांच्या दृष्टीसी प्रारब्धभोग । मिथ्याचि सारा देहसंग । म्हणोनि विषयसुखाचा त्याग । करिती आनंदें ते जाणा ॥७९॥ प्रारब्धापरी सुख-दुःख । भोगिती ते भोग अनेक । परी सामान्य जनासम सम्यक । लिप्त न होती त्यांमाजीं ॥८०॥ सुख येतां हरुष न मानिती । दुःख येतां खेद नसे चित्तीं । सुख-दुःख दोन्ही तयांप्रति । समचि वाटे सर्वदा ॥८१॥ असो, ऐसा जो ज्ञानी पुरुष । त्याचे न पहावे गुणदोष । तो जें करील त्यांतचि हरुष । मानावा आम्हीं अज्ञ जनीं ॥८२॥ तरीच होईल उद्धार आमुचा । धरितां विश्वास गुरुचरणीं साचा । पाठिराखा आपुल्या भक्तांचा । सदा सर्वदा तोचि असे ॥८३॥ सकलही असे त्याच्या स्वाधीन । तोचि सर्वां अधिष्ठान । ऐसा स्वामी कृपाघन । पांडुरंगाश्रम जाणा हो ॥८४॥ एवं सद्गुरु पांडुरंगाश्रम । मुखींचें वाक्य श्रेष्ठ परम । मुखांतुनी निघतांचि उत्तम । होय तें कार्य निश्रयेंसीं ॥८५॥ पुढील अध्यायीं आणिक बहुत । सांगूं वाक्याची महिमा अद्भुत । ऐका सावधचित्तें समस्त । तुम्ही प्रेमळ श्रोते हो ॥८६॥ आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें षट्त्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥८७॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां ब्रह्मज्ञान दृढावे साचार । षट्त्रिंशाध्याय रसाळ हा ॥८८॥ अध्याय ३६ ॥ ओंव्या ८८ ॥ ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥ इति षट्त्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP