मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥१८॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१८॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरसस्वत्यै नमः ॥ श्रीशंकरा श्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥
जय जय सद्गुरो सद्गुणसांद्रा । परमार्थाची वाट यतींद्रा । तूंचि दाखवीं मजला उदार । नेईं मोक्षपदा मज बापा ॥१॥
जगामाजीं तूंचि एक । वससी सर्वांमाजीं देख । तुजवांचोनि नाहीं आणिक । वेगळा विषय बा देवा ॥२॥
ऐसें तुझें स्वरूप असतां । कैसें न कळे माझिया चित्ता । हाचि अचंबा वाटे ताता । माझा मजचि दयाळा ॥३॥
अससी व्यापक तूं बा त्रिभुवनीं । नामरूप हें सोडून दोन्ही । अस्ति-भाति-प्रियत्वेंकरुनी । अससी जगतीं तूं देवा ॥४॥
नामरूपाचा होय कीं नाश । परी नाहीं नाश तव स्वरूपास । स्पष्ट दिसे तव स्वरूप खास । साऱ्या ब्रह्मांडीं बा देवा ॥५॥
ऐसें तुझे स्वरूप अगाध । परी नकळे त्याचा आम्हां आनंद । खरा गुरुपुत्र असे जो प्रसिद्ध । तोचि जाणे तें पाहीं ॥६॥
आतां माझ्या सद्गुरुनाथा । किती आठवूं तुजला ताता । तूंचि आकर्षुनी माझिया चित्ता । तव स्वरूपीं स्थिर करीं ॥७॥
जैसा चुंबक आपुल्या स्थानीं । सुईसी घेई आकर्षोनी । तैसें तूं बा मजलागोनी । निजस्वरूपीं आकर्षीं ॥८॥
काय दयाळा अवर्णनीय । स्वरूप असे तुझें रमणीय । कैसें कथावें तूंचि सदय । स्फुरवीं आतां मजलागी ॥९॥
असो आतां परिसा सज्जन । तुम्ही श्रोते हो सावधान । शंकराश्रमस्वामींचें महिमान । असे अगाध बहुतचि ॥१०॥
मागील अध्यायीं निरूपण । श्रीशंकराश्रमस स्वामींसी जाण । पेज न वाढिल्याकारण । क्षमा मागितली भक्तांनीं ॥११॥
त्यांसी सांगितला उत्तम मार्ग । कांहीं दिनांती मल्लापुरीं मग । घेतली समाधि, सोडोनि जग । राहिले व्यापक ते होऊनि ॥१२॥
जरी न दिसे त्यांचा देह । ब्रह्मात्मयाचा न होय विरह । तो असे सर्वव्यापक यांत संदेह । अणुमात्रही न धरावा ॥१३॥
नाम - रूप सारें जाय । अस्ति - भाति आणि प्रिय । यांचा मात्र लोप न होय । कल्पांतींही जाणा हो ॥१४॥
सद्गुरु हे असती व्यापक । अस्ति-भाति-प्रियरूपें देख । जरी गेला देह सुरेख । तरी न जाय अस्तित्वादि ॥१५॥
न कळे आम्हां वेदान्तविचार । तरीही पाहूं सगुणचि सुंदर । न लोपे कधींही साचार । अस्ति-भाति-प्रियत्त्व पैं ॥१६॥
आहे यासी 'अस्ति' म्हणती । आहे तें जाणणें हेचि 'भाति' । जगतीं उपजे जी त्यावरी प्रीति । तेंचि 'प्रिय' समजावें ॥१७॥
एवं अस्ति - भाति - प्रियरूप असती । सद्गुरुस्वामी हे निश्र्चितीं । विचार करितां येई प्रचीति । त्यांच्या स्वरूपाची आपणां ॥१८॥
सद्गुरूचें अस्तित्व हें कधीही न जाय । जरी गेला देहादि समुदाय । तरीही उरे अस्तित्वें सदय । कैसें सांगूं तें अवधारा ॥१९॥
सद्गुरु असो कोणत्याही स्थानीं । 'आहे' हें न जाय कुठेंही धांवुनी । आहे ऐसें जें कळे स्वमनीं । तीच 'जाणीव' राहे पैं ॥२०॥
जाणिलें म्हणोनि तेथ 'प्रियता' । सहजचि उपजे आपुल्या चित्ता । एवं अस्ति - भाति - प्रियही सर्वथा । नच जाय तें कदापि ॥२१॥
कांहीं केल्या अस्तित्व जाईना । हें आपुल्या मानसीं तुम्ही जाणा । 'आहे' ऐसें 'भासे' मना । सद्गुरुराणा तो पाहीं ॥२२॥
असल्यावांचूनि न भासे कधीही । भासल्यावीण प्रियत्व ना पाहीं । म्हणोनि सद्गुरुमाउली राहे ही । अस्ति - भाति - प्रियत्वेंचि ॥२३॥
पहा प्रपंचीं विषयीं सतत । असे आपुली प्रीति बहुत । परी सद्गुरूपुढें ती कसपट । भासे कैसी ती अवधारा ॥२४॥
विषयसुखाचा असे जो आनंद । तो असे खचितचि अंध । म्हणोनि अविचारें होऊनि धुंद । बुडोनि जाय विषयांतरीं ॥२५॥
तया प्रेमामाजीं देख । नाश असे म्हणोनि अनेक । भोगीतसे तो सहज दुःख । सुख क्षणिक तें पाहीं ॥२६॥
येथे सद्गुरुप्रेमापासून । आनंद जो होय उत्पन्न । तो नव्हे अंध खचितचि जाण । नष्ट न होय कदापि ॥२७॥
अंध म्हणजे अविचारयुक्त । खरें तत्त्व न कळे तेथ । विषयचि गोड म्हणोनि रमत । परी नाश होय क्षणें त्यांचा ॥२८॥
सद्गुरुप्रेमाचा जो आनंद । तोचि खरा परमानंद । येर जो विषयानंद । त्याचा नाश होय सदा ॥२९॥
विषय सारे असती फोस । म्हणोनि आनंदाचा होय नाश । स्वरूप हें सत्यचि खास । तेथील आनंद न नासे ॥३०॥
जें असे खरें स्वरूप । त्यांचा न होय कधींही लोप । राहे तें सदा सुखरूप । असत्य तें सारें जाय ॥३१॥
श्रीसद्गुरु यांचें स्वरूप । सत्य म्हणोनि न होय लोप । 'अस्ति-भाति-प्रिय' रूपें समीप । असे तें जाण निर्धारें ॥३२॥
एवं सद्गुरुरूपेंचि बघतां । कळे अस्ति-भाति-प्रियता । नलगे त्यासी ब्रह्मज्ञान सर्वथा । सहज बघतां कळतसे ॥३३॥
देह जरी गेला त्यांचा । 'आहेपणा' न जाय साचा । तैसें 'भाति प्रिय' ही याचा । नाश न होय निर्धारें ॥३४॥
एवं 'आहे' हें राहे सतत । कैंच्याही रूपें असो तेथ । तैसेंचि 'भातिप्रियत्व' हेंही असत । त्याचाही नाश न होय पैं ॥३५॥
म्हणोनि त्यांची महिमा ऐसी ही । न जाय कुठेंही खचितचि पाहीं । देह मुक्त जरी होई । तरीही नच जाय महिमा ती ॥३६॥
असो श्रीशंकराश्रम - गुरुमाय । मुक्त जरी झाले सदय । त्यांची महिमा कुठेंही न जाय । अद्यापिही असेचि ती ॥३७॥
जे असती खरे संत । त्यांची लीला परम विख्यात । सांगाया मी असें असमर्थ । खचितचि जाणा निर्धारें ॥३८॥
तरीही गुरुकृपें कथा एक । सांगूं आतां चमत्कारिक । शंकराश्रम यांची देख । महिमा अगाध ती पाहीं ॥३९॥
कोल्हापूर संस्थानीं एक । 'नरसोबावाडी' या नामें देख । क्षेत्र असे परम सुरेख । जाणती सकळही त्या स्थाना ॥४०॥
श्रीनृसिंहसरस्वती - स्वामी । त्यांची कीर्ति बहुत नामी । हेंही जाणतों सकल आम्ही । तेथील देवाची महिमा ती ॥४१॥
श्रीगुरुचरित्रामाजीं केलें । वर्णन अपार तयांच्या लीले । जेथें तेथें करिती भले । पारायणादि सेवा ती ॥४२॥
किती जनांचा केला उद्धार । संकट येतां धांवुनी सत्वर । देउनी तयांलागीं धीर । करी सांकडें निवारण ॥४३॥
ऐसी ती सद्गुरुमूर्ति । साक्षात् दत्त - अवतार जगतीं । झालासे नृसिंहसरस्वती । नाम हें विख्यात सर्वत्र ॥४४॥
ऐशा त्या देवाचा अर्चक । नरसोबावाडीमाजीं एक । होता परम भाविक । पुजारी तो सज्जन ॥४५॥
एके काळीं तया अर्चका । आणि त्याच्या पुत्रासी देखा । व्याधि लागली बापलेका । प्रारब्धें दारुण ती पाहीं ॥४६॥
पुत्राची व्याधि वाढली फार । केले नाना औषधोपचार । अधिकचि वाढे तेव्हां तो पुत्र । झाला क्षीण बहुतचि ॥४७॥
भिऊनि आप्तइष्ट समस्त । म्हणती आतां काय उपाय येथ । मायबाप चिंताक्रांत । होऊनि आळविती देवासी ॥४८॥
प्रभो देवा दत्तात्रेया । श्रीपाद - श्रीवल्लभराया । तुजवांचोनि कवणही पुत्रा या । रक्षिता नसे अन्य जगीं ॥४९॥
आतां नच करूं कांहीं उपचार । संपलीं देवा औषधें समग्र । घातला सर्व तुजवरी भार । तूंचि रक्षीं दयाळा ॥५०॥
यापरी प्रार्थना करुनी । झोंपलीं मायबापें रजनीं । दृष्टांत झाला तयां स्वप्नीं । परम सुंदर तो ऐका ॥५१॥
काषायांवर केलें धारण । भाळी भस्म विलेपन । दंड कमंडलु हाती धरोन । घातल्या पायीं पादुका ॥५२॥
गळां रुद्राक्ष स्फटिकहार। विलसे मूर्ति अति मनोहर । काय स्वरूप - लावण्य सुकुमार। रतिमदनाहुनी सुंदर बातें ॥५३॥
ऐसी मूर्ति येऊनि बैसे । श्रीनृसिंहसरस्वतींची संतोषें । अर्चकाजवळी, म्हणे तूं ऐसें । करीं आमुच्या वचनापरी ॥५४॥
कुमठा तालुकीं 'मल्लापुर' । या नामें एक खेडें साचार । तेथें सारस्वतांचा मठ सुंदर । असे जाण निर्धारें ॥५५॥
तेथें असे समाधि थोर । तो असे माझाचि अवतार । तुझ्या पुत्रासी घेउनी सत्वर । जाईं तेथें तूं पाहीं ॥५६॥
करीं सद्गुरुसमाधीची सेवा । तुझा पुत्र होईल बरवा । आणिक बरें होईल सर्वां । सत्य वचन हें आमुचें ॥५७॥
इतुकें बोलुनी श्रीस्वामी नरहरी । अदृश्य जाहले क्षणाभीतरी । प्रारब्धरेषा त्यांची बरी । म्हणोनि भेटला तो देव ॥५८॥
मग होऊनि ब्राह्मण जागृत । सांगे पत्नीसी सकल वृत्तांत । जाहला होता जो स्वप्नीं दृष्टांत । निवेदन केला तो पाहीं ॥५९॥
ऐकतां तिजला जाहला हरुष । म्हणे आम्ही घेउनी पुत्रास । मल्लापुर या ग्रामास । येचि दिनीं जाऊं पैं ॥६०॥
ऐसें बोलुनी निघालीं सत्वर । जावयासी मल्लापुरा आतुर । घेऊनि संगें आपुला पुत्र । अर्चक आणि पत्नी पैं ॥६१॥
जाऊनि तया ग्रामाभीतरी । देखिली शंकराश्रम-समाधि बरी । आनंदली अंतर्यामीं भारी । राहिलीं प्रेमें त्या ठायीं ॥६२॥
करोनि प्रार्थना समाधि - संनिध । धरोनि तेथें भाव अति शुद्ध । प्रदक्षिणादि नानाविध । सेवा करुनी राहती पैं ॥६३॥
यापरी करितां कांहीं दिन । जाहले बरे दोघेही पूर्ण । आनंद झाला सकलां जाण । तेव्हां निघाले तेथोनि ॥६४॥
गेलीं आपुल्या ग्रामालागुन । नरसोबावाडी येथें जाण । बघतां यांसी तेथील जन । करिती आश्चर्य त्या समयीं ॥६५॥
म्हणती काय केलें यांसी । औषधोपचार सांगा आम्हांसी । यावरी म्हणे अर्चक तयांसी । तीर्थप्रसाद सद्गुरूचा ॥६६॥
कुमठा तालुकीं 'मल्लापुर' । या नामें एक खेडें सुंदर । तेथें समाधि असे थोर । एक सारस्वत गुरूंची ॥६७॥
साक्षात् दत्तात्रेय - अवतार । 'शंकराश्रम' या नामें यतिवर । होउनी केला जनांचा उद्धार । महिमा अगाध त्यांची पैं ॥६८॥
आम्हां स्वप्नीं सांगितली खूण । श्रीनृसिंह - सरस्वतींनीं येऊन । त्यापरी आम्हीं तेथें जाऊन । सेवा केली समाधीची ॥६९॥
तेव्हां म्हणती जन सकल । काय महिमा त्यांची विपुल । घेतां तीर्थप्रसाद केवल । गुण जाहला दोघांसी ॥७०॥
असो ऐसे नानापरी । भजती लोक मल्लापुरीं । मुक्त झाले म्हणुनी ईश्वरी - । महिमा न जाय कुठेंही ॥७१॥
आणिक ऐका महिमा तयांची । शंकराश्रम - सद्गुरुरायांची । पुढील अध्यायीं सांगूं साची । अद्भुत चमत्कार तयांचा ॥७२॥
परी आम्हीं येथे रहस्य काय । घ्यावें सांगा जेणें सार्थक होय । महिमा म्हणोनि बोलतां भवभय । न चुके आमुचें तें पाहीं ॥७३॥
महिमा तयांची म्हणोन । पूर्ण ज्ञानी ते समजून । भक्ति-प्रेम ठेवुनी चरण । धरावे दृढतर स्वमनीं ते ॥७४॥
आणिक त्यांचे शांत सगुण । चित्तीं आठवोनि रात्रंदिन । त्यापरीच वर्तावें आपण । तरीच होईल सार्थक तें ॥७५॥
नातरी उगीच बडबडतां काय । होईल प्राप्त कीं सांगा निश्चय । दुजा 'श्रीमंत' बोलतां न येय । आम्हांलागीं श्रीमंती ॥७६॥
आपणचि करितां नाना यत्न । मिळेल पैसा आपुल्यालागुन । जनांची श्रीमंती मुखानें वदोन । काय उपयोग होय तयां ॥७७॥
तैसा येथें सद्गुरुमहिमा । बोलुनी उपयोग न होय आम्हां । त्यापरीच करोनि क्रोध-कामा । जाळुनी टाकावें सर्वस्वीं ॥७८॥
मग येईल सहजचि अंगीं । स्वसुख-समाधान तें वेगीं । म्हणोनि सद्गुरुवीण न पहावें जगीं । अन्य विषय निर्धारें ॥७९॥
आनंदाश्रम - पुण्यपुरुष । शिवानंद तीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें अष्टादश । अध्याय गुरुदासें संपविला ॥८०॥
स्वस्ति श्रीचित्रपुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां गुरुरूपचि होऊं समग्र । अष्टादशाध्याय रसाळ हा ॥८१॥ अध्याय १८ ॥
ओंव्या ८१ ॥
ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति अष्टदशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP