मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥२॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥
ॐ जय जय भवानीशंकरा सदया । सारे दुर्गुण नेसी तूं विलया । धांव झडकरी दे मज अभया । वदवीं चरित्र मजकडुनी ॥१॥
बालकहस्त धरूनि जनक । लिहवी आपण स्वतः सुबक । तैसा तूं मजकडूनि देख । लिहवीं ग्रंथ सकलही ॥२॥
येऊनि अवनीं जगदोद्धार । केला पाहूनि भक्तनिर्धार । आतां ऐका हो श्रोते चित्रापुर - । गुरुपरंपरा चरित्र हें ॥३॥
ऐकतां समूळ  अज्ञान । क्षण न लागतां होय निरसन । परी दृढतर निश्चय पूर्ण । धरावा तुम्हीं निजमनीं ॥४॥
ज्याच्या अंतरीं दृढतर निश्चय । त्यासीच संकटीं तो प्रभुराय । रक्षी येऊनि करी निर्भय । नाहीं आक्षेप यामाजीं ॥५॥
 बहुत ग्रंथ मुखोद्गत । जनांप्रति बडबडे वेदान्त सतत । परी नसतां निश्चय चित्तांत । निष्फल होय सकलही ॥६॥
धनी शिकवी जे जे शब्द । राघू बोले ते ते विविध । बरवे वाईट विधिनिषेध । न कळे त्यासी अंतरीं ॥७॥
तैसें आपण पुस्तकें वाचून । शिकलों वेदान्त बहुत दिन । परी सद्गुरूवांचूनि त्याची खूण । न वाणेचि कदापि ॥८॥
म्हणोनि या काया वाचा आणि मन । प्रेमें अर्पूनि जावें शरण । मग धरावे त्यांचे चरण । श्रीसद्गुरूचे दृढभावें ॥९॥
तरी तो सद्गुरु भक्तांलागुन । करी उद्धार न लागतां क्षण । परी असावा निश्चय पूर्ण । तरीच कार्य साधेल ॥१०॥
निश्वयें कवणा कसें होय प्राप्त । तेचि कथा सांगू अद्भुत । ऐकतां विश्रांति पावे चित्त । निजानंदीं सहज तें ॥११॥
मागील अध्यायीं निरूपण । गुरुदेव यांचे वंदन । आतां बोलूं चरित्रकथन । चित्त देऊनि अवधारा ॥१२॥
आम्ही ब्राह्मण सारस्वत । चित्रापुर-मठीं आहों भजत । देश आपला काश्मीर प्रख्यात । मूळस्थान तें आमुचें ॥१३॥
असती ऋग्वेदी स्मार्त ब्राह्मण । शाकलशाखा, सूत्र आश्वलायन । पुढें काय तें वर्तमान । सांगूं आतां लवलाहीं ॥१४॥
कांहीं दिवस लोटल्यावरी । आपुले पूर्वज एके अवसरीं । पंजाब प्रांतीं सरस्वती-तीरीं । करिती वास येवोनि ॥१५॥
पुढें बहुत दिवसांउपरी । परशुरामें क्षत्रियांचा स्वकरीं । नाश करोनियां निर्धारीं । दिलें ब्राह्मणां भूदान ॥१६॥
आणिक विचार केला मानसीं । दान दिलें ऐशा प्रदेशीं । योग्य नव्हे राहणें मजसी । म्हणोनि गेला दुज्या स्थळीं ॥१७॥
सह्याद्रि-पर्वत दिशेसी प्रयाण । करूनि समुद्रराजाकडोन । घेतली भूमि बहुत विस्तीर्ण । परशुरामें त्या समयीं ॥१८॥
तया भूमीसी 'कोंकणपट्टी' । आणि म्हणती 'परशुरामसृष्टी' । तेथें परशुरामें करोनि वस्ती । आरंभिला यज्ञ महाथोर ॥१९॥
तेव्हां त्यासी योग्य ब्राह्मण । असावे म्हणोनि सारस्वतांलागुन । भिन्न भिन्न गोत्री मिळवोन । आणिलें कांहीं कोंकण देशीं ॥२०॥
इष्ट देवादिकांसहित । पाचारिले ब्राह्मण समस्त । यज्ञ आरंभोनि त्वरित । संपूर्ण केला आनंदें ॥२१॥
मग सारे सारस्वत । येऊनि गोमांतक-देशांत । राहिले ते सुखानें शांत । वास करोनि आनंदें ॥२२॥
पुढे गेले बहुत दिन । गोमांतक प्रांतीं राज्याधिकरण । पोर्तुगीजें केलें येऊन । घातला गोंधळ त्या प्रांतीं ॥२३॥
लागती हिंदुजनांच्या पाठीं । ख्रिस्तीधर्मा बलात्कारें नेती । बहुत ब्राह्मण पळोनि जाती । कर्नाटक प्रांतीं त्या समयीं ॥२४॥
गोकर्णादि-ग्रामांतरीं । जिकडे तिकडे राहती सत्वरी । नगर प्रांतींचे अधिकारी । श्रेष्ठ झाले कांहीं ते ॥२५॥
ऐसें असतां तेथील जन । अधिकारी इतर ब्राह्मण । सारस्वत ब्राह्मणांलागोन । म्हणती तुम्हां नाहीं गुरु ॥२६॥
सद्गुरु नसतां तुम्हीं हीन । ऐसें बोलूनि दाविती हांसून । आणिक करिती मत्सर पूर्ण । जाऊनि सांगती नृपाप्रति ॥२७॥
नगर संस्थानींचा राजा । त्यासी म्हणती इतर प्रजा । सारस्वत करिती मौजा । गुरुविण ब्राह्मण वृथाचि ॥२८॥
ऐकूनि रायें त्यांचें वचन । बोलाविले सारस्वत ब्राह्मण । म्हणे तुम्हांसी गुरु कोण । आहे कीं नाहीं सांगावें ॥२९॥
कुठे असती स्वामी तुमचे । मजला करवा दरुशन त्यांचें । नातरी तुम्हां सकलां साचें । योग्य शासन करितों मी ॥३०॥
ऐकूनि रायाचें कठोर भाषण । म्हणती आमुच्या सद्गुरूचें स्थान । काश्मीर देशीं असे जाण ॥ असती सगुणी बहुत ते ॥३१॥
ब्रह्मज्ञानी असती पूर्ण । दरुशनें होय पाप दहन । मान्य करोनि आपुलें वचन । प्राधूनि आणनूं स्वामींसी ॥३२॥
ऐसें बोलूनि जाती सदनीं । विचार करिती सारे मिळोनी । धाडिती पत्र तत्क्षणीं । गोकर्णीं प्रमुख वडिलांसी ॥३३॥
पोंचतां पत्र गोकर्णासी । सारस्वत चिंताक्रांत मानसीं । आतां उपाय कोणता यासी । ऐसें बोलती परस्पर ॥३४॥
देश असे आमुचा काश्मीर । नाहीं विदित समाचार । आपुल्या पूर्वजें येऊनि फार । दिवस झाले या देशीं ॥३५॥
कुठें राहती कोणत्या ग्रामीं । आम्हां सारस्वतांचे सद्गुरुस्वामी । आतां उपाय पां कोणता आम्ही । कैसा करूं समजेना ॥३६॥
दुजा उपाय न दिसे कांहीं । म्हणती देवचि आतां पाहीं । तोचि संकटीं रक्षी लवलाहीं । जाऊं शरण त्यालागीं ॥३७॥
ऐसें बोलूनि सत्वर । तेथील आपुल्या जनांसी समग्र । बोलावूनि सांगती विचार । आपुला सारा तयांतें ॥३८॥
म्हणती  गोकर्ण - महाबळेश्वर । देवासी जाऊनि प्रार्थं सत्वर । मनीं धरोनि दृढ निर्धार । बैसूनि ध्याऊं दिनरजनीं ॥३९॥
ऐसें म्हणोनि जाती सर्व । पूजिला सद्भावें महादेव । विधिपूर्वक सकल वैभव । अर्पिलें देवासी प्रेमानें ॥४०॥
मग देवासंनिधीं समस्त । बैसूनि लाविती आपुलें चित्त । श्रीशिव-ध्यानामाजीं सतत । निमग्न झाले त्या ठायीं ॥४१॥
सारा दिवस उपवास । अन्न उदक नाहीं तयांस । म्हणती शंभो तूं आम्हांस । रक्षीं रक्षीं जगत्पते ॥४२॥
आतां ऐका श्रोते हो सकल । तयांची प्रार्थना अति प्रेमळ । ऐकतां दगडही विरोनि जाईल । क्षण न लागतां पाहीं पां ॥४३॥
असो तेव्हां प्रार्थिती देवा । म्हणती आम्हां आतां सर्वां । अभय देऊनि सद्गुरु दावा । आलों शरण तव पाया ॥४४॥
जय जया जी महाबळेश्वरा । येई झडकरीं उद्धरीं कुमरां । नेदी कोणी आम्हां थारा । तुजवांचोनि या जगतीं ॥४५॥
तूंचि देवा आम्हां आतां । भेटवी स्वामी सद्गुरुनाथा । गुरुवांचोनि नाहीं त्राता । जगतीं देवा दयाळा ॥४६॥
आमुचे स्वामी असती कोण । हें नाहीं विदित आम्हांलागून । मानिती सकळ आम्हां हीन । देवा दीनदयाळा ॥४७॥
म्हणोनि आलों तुला शरण । तूंचि आमुचें करीं रक्षण । न सोडूं हे आतां चरण । सद्गुरुदर्शनावांचोनि ॥४८॥
न कळे आम्हां भजन कराया । नाहीं सेविलें तुझिया पाया । नको धिक्कारूं बा तूं सदया । क्षमा करीं अपराध ॥४९॥
नाहीं केले दान धर्म । कर्मउपासनादि नेम । स्मरलों नाहीं तुझें नाम । सतत विषयीं रत झालों ॥५०॥
निंदिलें सकलां साधुसंतां । आणिक धरूनि देह-ममता । पुराण श्रवण कानीं पडतां । घातलीं बोटें तिरस्कारें ॥५१॥
नाहीं केला नमस्कार । देखिली नाहीं मूर्ति सुंदर । सेविला नाहीं प्रसाद थोर । ऐसे पापी आम्हीं असूं ॥५२॥
मी कोण कैसा आलों कोठूनि । नाहीं कळलें आम्हांलागोनि । मोहमदानें धुंद होऊनि । पडलों दुर्धर प्रपंचीं ॥५३॥
ऐसे अनंत अपराध । किती सांगूं अंगीं क्रोध । मानसीं होतो बहुत खेद । कवणा सांगूं दुःख हें ॥५४॥
धिक् धिक् जिणें झालें व्यर्थ । साधिला नाहीं बा परमार्थ । अंतरीं धरोनि बहुत स्वार्थ । पशुसम काल दवडिला ॥५५॥
अपराध सारे घालूनि पोटीं । देई आम्हांसी सत्वर भेटी । धांवूनि येईं ऐशा संकटीं । दीनबंधु म्हणती तुज ॥५६॥
जरी बालका अंगीं दुर्गुण । तयाचें पाहूनि म्लान वदन । माय प्रेमें पोटीं धरोन । देई स्तनपान झडकरी ॥५७॥
तेवीं तूं आम्हांसी जाण । रक्षिसी ऐसा भाव धरोन । आलों धांवूनि तुजला शरण । नको आतां उपेक्षं ॥५८॥
माता जरी टाकी बाळा । जाईल कुठें तें सांग दयाळा । पृथ्वीनें ढकलिलें जरी वृक्षाला । कोण आधार त्या सांगें ॥५९॥
असो आतां येईं झडकरी । हेतु पुरवीं तूं या अवसरीं । किती आळवूं तुज त्रिपुरारी । कठोर कां वा तूं होसी ॥६०॥
प्रल्हादें बाहतां तुजला अंतरीं । स्तंभीं प्रगटलासी सत्वरी । नारसिंह होऊनि त्या अवसरीं । वधिलें हिरण्यकशिपूसी ॥६१॥
कौरखें द्रौपदी-वस्त्रहरण । करितां आलासि लगबगें धांवून । एक ओढितां दुजें त्या क्षण । निर्मून लाज राखिली ॥६२॥
नक्रें धरितां गजेंद्रासी । आलास झडकरी हांकेसरसी । उशीर कां बा आतां करिसी । किती पाहूं वाट तुझी ॥६३॥
मीराबाईसी जनकें दिधलें । विष कालवूनि त्वां त्या वेळे । शोषूनि आपण परम कृपाळें । दाविला सकलां चमत्कार ॥६४॥
कबीरें आपुली दिधली कांता । वाणियालागीं संतांकरितां । फौजदार होऊनि ताता । सोडविली त्वां तिजलागीं ॥६५॥
दामाजीचा ऐकूनि धांवा । विठू महार होऊनि तेव्हां । बेदररायासी भेटूनि बा त्वां । रसीद भरली सकलही ॥६६॥
चोरिलें म्हणुनि घालूनि आळ । जनाबाई भक्त प्रेमळ । सुळीं चढवितां तूं घननीळ । तात्काळ आलासी धांवुनी ॥६७॥
सुळाचें तैं जाहलें पाणी । तुझिया कृपाकटाक्षंकरुनी । वाटलें आश्चर्य सकलांलागुनी । असाध्य कैंचें तुजलागीं ॥६८॥
रावणें स्तुति करितां त्यासी । दिधली पार्वती आपुली कैसी । येऊनि राहिलास गोकर्णासी । जनांच्या उद्धाराकारणें ॥६९॥
पार्वतीसंगें सारीपाट । खेळतां रुसोनि येसी थेट । घोर काननीं बैसलास त्वरित । गुप्तरूपें तेथेंचि ॥७०॥
मग आक्रोशें धांवे गिरिजा । श्रमली शोधितां हिमनगात्मजा । व्याघ्ररूप धरोनि माझा । तूंचि शंकर आलासी ॥७१॥
बघूनि फोडिली उमेनें किंकाळी । महांगिरीशा म्हणण्या बोबडी वळली । मंगीशा ये सत्वर जवळी । म्हणतां प्रगटलासि त्या क्षणीं ॥७२॥
आतां कैसी लागली झोंप । कीं तुज आला सांगें कोप । अथवा नाहीं आम्हां अमूप । श्रद्धा ऐसें भाविसी कां ॥७३॥
किती विनयूं शिवहरसांबा । श्रमलों आतां पुरे बाबा । रडवितां आम्हां नाहीं शोभा । भक्तवत्सल तुज म्हणती ॥७४॥
रडतां बालक माता त्यासी । जरी ना घेई आपुल्यापाशीं । म्हणती निष्ठुर जन हे तिजसी । दोष पाहें कवणाचा ॥७५॥  
ऐसा तूही निष्ठुर होतां । स्तवील न कोणी तुजला ताता । नको नको बा उशीर आतां । लावू येण्या दयाळा ॥७६॥
खचित दया अंतःकरणीं । नसे वाटे आम्हां झणीं । झाला कोरडा घसा बाहुनी । 'वाहवा वाहवा' म्हणसी तूं ॥७७॥
नाहीं आम्हांसी लाज कांहीं । म्हणुनी विनवणी केली तुज ही । ऐकुनी कीर्ति बहुत पाहीं । आलों  धांवत तव चरणीं ॥७८॥
भक्त म्हणती तुजला भोळा । परी तूं दिससी अंतरीं काळा । नातरीं ऐशा समयीं बाळां । नेदिसी कां तूं आसरा ॥७९॥
बुडत्यासी पाहुनी मानिती मौज । तैसेंच तुवां केलें आज । कळलें सकळही आम्हां सहज । बहुत कपटी अससी तूं ॥८०॥
पुरे आतां तुझी संगति । स्तवितां खुंटली आमुची मति । परी करुणा न ये तुजप्रति । नवल वाटे आम्हांसी ॥८१॥
किती तरी बघसी अंत । हंसतील भक्तजन समस्त । तोडीं क्लेश येऊनि धांवत । आणिक नाहीं मागणें ॥८२॥
निंदक सारे म्हणती तुला । महाबळेश्वर आतां मेला । उगीच तुम्हीं कां हो बैसलां । लोक म्हणतील आम्हांसी ॥८३॥
ते म्हणती नाहीं देव । लागलें खूळ म्हणोनि भाव । धरुनी मानसीं घेती नांव । शिव शिव शंभो शंकरा ॥८४॥
जन्म वायां घालुनी अंतीं । देव देव करुनी मरती । कवणा मिळाला देव तो जगतीं । देव सद्गुरु फुकाचि ॥८५॥
ऐसें आतां म्हणतील सकल । उशीर न करीं धांव तत्काळ । तुझें ब्रीद तूंचि राखीं येवेळ । सांगाया लाज वाटतसे ॥८६॥
देवाधिदेवा करुणासागरा । तुजविण आतां चित्तासी थारा । द्यावया समर्थ नाहीं दुसरा । धांव माये दयाळे ॥८७॥
तूंचि आम्हां दाता त्राता । सत्वर सद्गुरु होऊनि ताता । येउनी सकलां बोधुनी आतां । करीं सारस्वतां पावन ॥८८॥
नगर राजासी दिधलें वचन । करवितों सारस्वत-सद्गुरुदर्शन । नातरी होईल सकलां शासन । विदित सर्वही तुजलागीं ॥८९॥
नाहीं देवा तुझा दोष । न प्रारब्ध आमुचें असे खास । म्हणोनि श्रमलों आम्ही विशेष । तरी न करिसी समाधान ॥९०॥
कवण भक्ता भेटाया गेलासी । अथवा मांडिलें सारीपाटासी । कीं सवड नसे येण्यासी । गुंतलासि कां जगसंहारा ॥९१॥
किंवा गणेश-षण्मुख बाळां । धरुनी खेळविसी तूं वेल्हाळा । न समजे बा तव लीला । अज्ञ पामरां आम्हांसी ॥९२॥
अथवा कुणीकडे धराया अवतार । गेलासी तूं लगबगें भूवर । निजभक्तांचा कराया उद्धार । नोळखूं आम्ही तव महिमा ॥९३॥
तुझे असती अगणित भक्त । परी तूं नटसी स्वरूपें अनंत । असाध्य केंचें आहे तुजप्रत । येई देवा झडकरी ॥९४॥
न येसी तूं म्हणुनी तुजला । बहुविध बोलुनी दोष दिधला । क्षमा करोनि भक्तवत्सला । महाबळेश्वरा ये वेगीं ॥९५॥
असो आतां करितों नमन । सद्भावेंसीं तुजलागोन । आतां तरी येसी धांवून । ऐसा भाव धरियेला ॥९६॥
जरी आमुचा गेला प्राण । नच करूं अन्नउदकपान । दाविल्यावांचुनी श्रीगुरुचरण । न जाऊं आम्ही सदनासी ॥९७॥
 ऐसा निश्चय करोनि समस्त । बैसले प्रेमें होउनी ध्यानस्थ । उपवासी राहिले दिवस सात । कळवळला तो  महादेव ॥९८॥
बालका नाहीं मातेवांचुनी । विदित दुजा या अवनीं । म्हणोनि धांवे ती कळवळोनि । रडतां वेगें बालक ॥९९॥
तद्वत अनन्य जो येई शरण । त्यासी रक्षी स्वर्ये आपण । यांत किमपि नसे अनुमान । असावा दृढतर निश्चय तो ॥१००॥
निश्चयेंचि मिळतसे फल । निश्वय नसतां सकलही फोल । केव्हां येईल न्यावया काळ । हें कोणाही कळेना ॥१०१॥
तस्मात् सत्कार्यासी लावितां वेळ । झिजवावा आपुला देह निर्मळ । तरीच पावे मोह सोडुनी सकळ । निजस्वरूपासी निश्चयें ॥१०२॥
असो आतां सारस्वत ब्राह्मण । स्तवितां जाहले ध्यानीं निमग्न । मग काय करिता झाला उमारमण । कळवळोनि तेधवां ॥१०३॥
तें सांगूं सविस्तर । पुढील अध्यायीं साचार । शिव-पार्वतीसंवाद थोर । ऐकतां संतोष होईल ॥१०४॥
आनंदाश्रम-सद्गुरुराय । शिवानंदतीर्थ एकचि उभय । यांच्या कृपाप्रसादें द्वितीय । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०५॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें नासती थोर । द्वितीयाध्याय रसाळ हा ॥१०६॥

अध्याय ॥२॥
ओव्या ॥१०६॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP