मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥
ॐ जय जय आद्य श्रीगुरुनाथा । परिज्ञानाश्रम-गुणातीता । विशुद्धसत्त्वा परम विख्याता । त्राता सकलां तूं एक ॥१॥
जय जय श्रीगुरु करुणासिंधु । भक्तवत्सला मी मतिमंदु । न कळे मजला निज आनंदु । प्रेमें बंदू पदकमलां ॥२॥
जय जय सद्गुरो करुणासागरा । देईं सुमति ग्रंथविस्तारा । नातरी या अज्ञ - पामरा । कैसें समजेल कथाया ॥३॥
मी बालक कांहीं नेणें । तूंचि दावुनी पंथ कृपेनें । पार करोनि नेई त्वरेनें । निजसुखधामी कृपाघना ॥४॥
जाहले अपराध सहस्र कोटी । ते घालोनि आपुल्या पोटीं । देउनी सत्वर दिव्य दृष्टी । लिहवीं देवा ग्रंथ हा ॥५॥
काय करावें न कळे चित्ता । तूंचि स्फुरवीं श्रीगुरुनाथा । पार घालीं यांतूनि आतां । हेंचि मागणें दयाळा ॥६॥
आतां करितों तुजला नमन । तूंचि करवीं ग्रंथ संपूर्ण । न विसंबें तुजलागोन । देवा सद्नगुरो दयाळा ॥७॥
देईं मजला श्रीगुरुराया । प्रथम 'श्रवण' - भक्ति सदया । हेचि प्रार्थना करितों पायां । प्रभो देवा कृपाघना ॥८॥
आतां ऐका श्रोते हो सादर । आद्य सद्गुरु धरी अवतार । 'परिज्ञानाश्रम' यांचें चरित्र । परम अमृत घ्या प्याया ॥९॥
महिमा त्यांचा अपार । नाम गातां येतो धीर । सांगूं आतां सविस्तर । सकल वृत्तांत या समयीं ॥१०॥
सद्गुरु हाचि एक समर्थ । त्यावीण दुजा नाहीं आप्त । तोचि देतसे निजभक्तांप्रत । शाश्वत सुख निर्लोभें ॥११॥
न पावे कुणाही सद्गुरुवीण । कदापि स्वयें ब्रह्मज्ञान । म्हणोनि त्यासीच जावें शरण । मानवें जाण निर्धारें ॥१२॥
हें जग सारें नश्वर । नाहीं सुख यांत अणुमात्र । म्हणोनि गुरुमुखेंचि विचार । सारासार करावा ॥१३॥
लक्ष चौऱ्यांशीं फिरूनि योनी । आलों नरजन्मासी अवनीं । करावा आतांचि विचार स्वमनीं । निजरूपाचा त्वरित पैं ॥१४॥
एकदां गेला हातींचा निसटोन । पुनः न मिळे आम्हांलागोन । येर जन्मीं आत्मज्ञान । मनुष्यावीण नोहेचि ॥१५॥
परी करावा विषयासक्तीचा त्याग । तरीच लाभेल मोक्षाचा मार्ग । करितां श्रीसद्गुरूचा संग । होय हें सारें सहजचि ॥१६॥
असो आतां सद्गुरु एक । तोचि दाता सकल विवेक । दुजें नाहीं त्याहुनी आणिक । श्रेष्ठ कुठेंही त्रिभुवनीं ॥१७॥
ऐका श्रोते हो सावधान । मागील कथेचें अनुसंधान । श्रीसद्गुरूच्या कृपेनें जाण । पुढें सांगेन सकलही ॥१८॥
गोकर्ण - ग्रामीं महाबळेश्वर । देउळामाजीं बैसले जे नर । सारस्वत ब्राह्मण समग्र । ध्यानीं निमग्न जाहले ॥१९॥
तेव्हां जाहला चमत्कार । जा काय तो सांगूं साचार । अंगीं उठती रोमांच थोर । शरीर कांपे थरथरां ॥२०॥
असो इकडे  कैलासीं शंकर । मागील अध्यायीं निघाला भूवर । नंदीवरी बैसुनी सत्वर । आला गोकर्णग्रामासी ॥२१॥
पंचवदन दशहस्त कृपाळ । अंकीं धरिली उमा वेल्हाळ । मस्तकीं शोभे गंगा सोज्ज्वळ । भोळानाथ दयाघन तो ॥२२॥
भाळीं भस्म त्रिपुंड्र - टिळा । गळां घातली नररुंडमाळा । रुद्राक्ष नाग हींचि तयाला । भूषणें जाणा शोभती ॥२३॥
ऐसें सुंदर रूप साजिरें । आला धांवुनी देवस्थानीं त्वरें । जेथें बैसले ब्राह्मण आतुरें । तेथें ठाण मांडियलें ॥२४॥
ब्राह्मणांमाजीं प्रमुख एक । ध्यान करितां समरसला देख । दिसे प्रकाश परम सुरेख । त्यामाजीं विलसे  श्रीसांब ॥२५॥
बघतां नयन दिपले सारे । आले ब्राह्मणा - अंगीं शहारे । मग श्रीशंकर बोले बा बारे । इच्छित काय असे तुझें ॥२६॥
नको भिऊं, अभय तुम्हांला । द्याया आलों सांगें मजला । हेतु काय असे तो आपुला । शीघ्र सांगें ये समयीं ॥२७॥
ऐसे बोलुनी ठेविला हस्त । भक्तमस्तकीं प्रेमभरित । ब्राह्मण जाहला सद्गदित । प्रेमाश्रु नयनीं लोटले ॥२८॥
ओठ  थरथरां कांपती । घर्मबिंदु कपाळीं चमकती । ऐसें पाहुनी त्या भक्ताप्रती । आलिंगिला प्रेमानें ॥२९॥
म्हणे सदाशिव भक्तालागीं । कवण दुःख जाहलें तें वेगीं । बोल वत्सा तूं मजलागीं । भिऊं नको बा सर्वथा ॥३०॥
ऐसें ऐकतां अभय वचन । बोले मंजुळ शब्दें ब्राह्मण । ना विदित सकलही तुजलागोन । सर्वकर्ता सर्वज्ञ तूं ॥३१॥
बालकहेतु माता जाणे । परी कौतुकें बालका दावी नेणे । तैसें हें बा तुझें बोलणें । कळलें देवा मजलागीं ॥३२॥
परी आतां सांगतों देवा । पुत्र पौत्र दारा अथवा । नको मजला धनाचा ठेवा । नको कांहीं इतर तें ॥३३॥
एक सद्गुरुस्वामीराव- । दरुशनावांचुनी तळमळे जीव । म्हणुनी धरूनियां दृढभाव । प्रार्थिलें आम्हीं तुजलागीं ॥३४॥
नगर-संस्थानींचे जन । गुरुवीण आम्हां म्हणती हीन । एवं सकल वर्तमान । सांगे ब्राह्मण देवासी ॥३५॥
यावरी बोले पिनाकपाणी । होईल दर्शन तुम्हांलागुनी। श्रीस्वामींचें या गोकर्णीं । उदईक जाण सकलांसी ॥३६॥
उत्तर हिंदुस्थानापासुनी । येईल एक संन्यासी सद्गुणी । धरा तयाचे चरण दोन्ही । करा प्रार्थना त्याजवळी ॥३७॥
जावें तुम्हीं त्यासी शरण । तोचि सद्गुरु होय कृपाधन । अवतार असे तो माझाचि पूर्ण । ज्ञानसंपन्न होय पां ॥३८॥
कोटितीर्थासमीप गुरुजी । येईल खचितचि शंका ना दुजी । उदईक सायंकालामाजीं । भेटतील ते निश्चयेंसीं ॥३९॥
इतुकें सांगुनी उमाकांत । अदृश्य जाहला तो क्षणांत । मग ब्राह्मण उत्थानीं येत । ध्यानांतुनी तेधवां ॥४०॥
चकित झाला बहुत चित्तीं । मग येई सत्वर गती । ब्राह्मण सकल ध्यानस्थ बैसती । तेथें जाउनी उठवी तयां ॥४१॥
जी शंकरें सांगितली खूण । ती सकलां करी निवेदन । ऐकतां हर्षती तेव्हां ब्राह्मण । उठती लगबगें त्या समयीं ॥४२॥
म्हणती आतां आम्ही सकल । जाऊं तेथेंचि बैसूं प्रेमळ । अंतःकरणें आठवूं पदकमल । श्रीसद्गुरूचे सुकुमार ॥४३॥
ऐसें बोलुनी प्रातःकाळीं । गेले कोटितीर्थाजवळी । स्नान संध्या सारुनी त्यावेळीं । मार्गप्रतीक्षा करिती ते ॥४४॥
केव्हां येतील ते संन्यासी । दरुशन होईल कधीं आम्हांसी । उत्सुक होउनी निजमानसीं । बैसती सायंकाळवरी ॥४५॥
आतां ऐका श्रोते हो सज्जन । श्रीशिवशंकर - अवतार जाण । देईल त्वरेंचि सारस्वतां दरुशन । नसे संशय यामाजीं ॥४६॥
जे साधु ब्रह्मज्ञानी । ते देवचि असती या धरणीं । मुकती जन्ममरणालागोनी । म्हणोनि धन्य धन्य ते जगीं ॥४७॥
असो आतां सारस्वत ब्राह्मण । श्रीसद्गुरूचें करिती ध्यान । पुढें काय जाहलें वर्तमान । अवधारा सावध होवोनि ॥४८॥
दंड-कमंडलु न घेउनी हस्तीं । पायीं पादुका मधुर वाजती । आणि शुभ्र लाविली विभूती । काषायांवर धरियेलें ॥४९॥
कंठीं शोभे रुद्राक्षमाळा । भाळीं झळके चंदन - टिळा । मुखें उच्चारी वेळोवेळां । 'नारायण' शब्द मंजुळ ॥५०॥
आजानुबाहु भव्यमूर्ति । असे गौरवर्ण अंगकांति । ब्रह्मतेज परम शांति । विलसे सुंदर मुखावरी ॥५१॥
कोटि मन्मथ ओंवाळोनी । टाकावे ऐशा मुखावरोनी । वर्णूं न शके ही मम वाणी । श्रमेल खचितचि निर्धारें ॥५२॥
आणिक कक्षीं एक झोळी । त्यांत भवानीशंकर चंद्रमौळी । याची मूर्ति सुंदर सांबळी- । माजीं विलसे बहुतचि ॥५३॥
शांत मनोहर सुंदर मूर्ति । बघतां तल्लीन होईल वृत्ति । काय सांगूं आतां  श्रोतीं । चित्त देऊनि ऐकावें ॥५४॥
ऐशापरी एक संन्यासी । कोटितीर्थ-संनिधेसीं । सायंकाळीं सूर्यास्तासी । आला गंगावळीकडोनि ॥५५॥
जेथें बैसले सारस्वत ब्राह्मण । तेथेंचि पातला तो दयाघन । उठले सकलही न लगतां क्षण । घातला साष्टांग प्रणिपात ॥५६॥
घेतली माथां चरणधूली । पाद प्रक्षाळुनी त्यावेळीं । तीर्थ प्राशन करोनि घातली । प्रदक्षिणाती ब्राह्मणीं ॥५७॥
करिती पुनःपुनः नमस्कार । बघती मुखकमल वारंवार । मनीं हर्षजाहला थोर । केला अभिषेक अश्रुधारें ॥५८॥
मग करुनी जयजयकार । केलासद्गुरु-नामाचा गजर । आणि प्रेमपुरःसर शीघ्र । आरंभिलें स्तवन तयांचें ॥५९॥
जय जय सद्गुरो करुणासागरा । भक्तवत्सला सगुणसांद्रा । आम्हां आतां पायीं थारा । देईं तूंचि दयाळा ॥६०॥
तुझें स्वरूप सद्गुरुमाउले । शांत सुंदर तूं वेल्हाळे । धन्य दिवस हा परमकृपाळे । लाभला आजी आम्हांसी ॥६१॥
साक्षात् तूं शंकर-अवतार । नाहीं संदेह यांत अणुमात्र । बहुत दिनींचे सुकृत थोर । उदया आलें आजि हें ॥६२॥
म्हणोनि आम्हां लाभले चरण । नातरी गेला असता प्राण । सकलही विदित तुजलागोन । अससी सर्वज्ञ तूं देवा ॥६३॥
हंबरतां वत्स धेनु धांवे । तैसा संकटीं पावसी स्वभावें । उपकार किती तुझे स्मरावे । तूंचि सांगें दयाळा ॥६४॥
आतां देवा आम्हां आपण । व्हावें सद्गुरु तूंचि जाण । नसे आधार आपुल्यावीण । आम्हांसी अन्य जगतीं या ॥६५॥
करावें आगमन आमुच्या सांगातीं । रहावें येथेंचि करोनि वस्ती । सकलांचा उद्धार करावा स्वहस्तीं । श्रीगुरुराया कृपाघना ॥६६॥
देउनी उपदेश निरसीं चिंता । भवभयाची देवा आतां । तुजवीण आम्हां अन्य त्राता । नाहीं सारस्वतांसी ॥६७॥
भवानीशंकरें सांगितली खूण । होईल तुम्हां स्वामींचें दरुशन । तोचि सद्गुरु करा सघन । माझाचि अवतार तो पाहीं ॥६८॥
सत्य झालें देवाचें वचन । खचितचि देखिले नं आजि चरण । आतां यावें कृपा करोन । आमुच्या स्थानीं दयाळा ॥६९॥
ऐसें स्ववितां स्तवितां ब्राह्मण । लागती चरणीं होउनी दीन । बघुनी तयांचें म्लान वदन । कळवळलें हृदय सद्गुरूचें ॥७०॥
कंठ जाहला सद्गदित । विमलांबुधारा नयनीं वर्षत । ठेविला मस्तकीं वरद हस्त । निजभक्तांच्या त्या समयीं ॥७१॥
आणिक म्हणती 'ना-भीं-ना-भीं' । भवानीशंकरा ऐसी सुरभी । असतां संनिध तुमच्या ती उभी । मग कैंचें भय तुम्हां ॥७२॥
मजही सांगे येवोन । कैलासवासी पार्वतीरमण । भेट देईं तुम्हांलागोन । ऐसा दृष्टांत जाहला मज ॥७३॥
म्हणोनि तुम्हां द्यावया दरुशन । येथें आलों लगबगें धांवून । ऐसें ऐकतां सद्गुरुवचन । आनंद चित्तीं न समावे ॥७४॥
आणि म्हणती सद्गुरुराया । यावें आतां कृपा करोनियां । हेचि प्रार्थना, नत या पायां । झालों देवा कृपाघना ॥७५॥
तेव्हां सद्गुरु अवश्य म्हणती । जैसी इच्छा तुमच्या चित्तीं । तैसेंचि होवो येऊं सांगातीं । भवानीशंकर समर्थ असे ॥७६॥
ऐकतां ऐसें सद्गुरुवचन । सकलांसी जाहला आनंद पूर्ण । सकल सामग्री सिद्ध करोन । आणिती तेव्हां लवलाहीं ॥७७॥
पालखी सजवूनि सुंदर । माजीं बैसविली मूर्ति मनोहर । घेऊनि संगें वाद्य थोर । मिरवुनी आणिती आनंदें ॥७८॥
गोकर्ण - ग्रामीं भंडिकेरी । उमामहेश्वर-देउळामाझारीं । गौरवुनी बैसविलें सिंहासनावरी । झाला गजर वाद्यांचा ॥७९॥
गगनीं दाटलीं विमानें अपार । मूर्ति पाहण्या येती सुरवर । घालिती तेव्हां पृथ्वीवर । पुष्पवृष्टि सुमनांची ॥८०॥
असो करोनि पादपूजादि समग्र । मांडिला तयांनीं उत्सव थोर । करिती नामाचा जयजयकार । गर्जती अपार प्रेमभरें ॥८१॥
सोळाशें तीस शकांतरीं । 'सर्वधारी' नाम संवत्सरीं । माघ शुद्ध सप्तमी रविवारीं । झालासे हा समारंभ ॥८२॥
उत्सवा येती नगरींचे लोक । बघतां स्वामींसी करिती कौतुक । एकमेकांप्रति म्हणती देख । महाबळेश्वर खचितचि हा ॥८३॥
किती शांत सुंदर मूर्ति । होईल याची मोठी कीर्ति । निंदकांसीही येईल स्फूर्ति । करावें वंदन या ठायीं ॥८४॥
ऐसें बोलुनी ग्रामींचे जन । निरुपायें गेले गृहालागुन । मनीं धरिले सद्गुरुचरण । भाविक सज्जनीं त्या समयीं ॥८५॥
असो मग सारस्वतांसी । समाधान झालें सर्वांसी । सद्गुरु भेटला म्हणोनि मानसीं । धीर आला सहजचि ॥८६॥
त्यासमयीं न लगतां क्षण । प्रसिद्ध म झाले सद्गुरु सघन । 'परिज्ञानाश्रम' या नामेंकरून । जगामाजीं सर्वत्र ॥८७॥
ऐसें असतां गोकर्णाहुनी । कळविली वार्ता नगर-संस्थानीं । आपुल्या सारस्वतांलागुनी । सद्गुरु येथें पातले ॥८८॥
तेथील जनीं केलें काय । सांगती राजासी आमुची माय । सद्गुरु स्वामी प्रेमळ सदय । आली गोकर्ण - ग्रामांतरीं ॥८९॥
तेव्हां बोले तेथील राव । अधिकाऱ्यांप्रति तुम्ही सर्व । तुमचे स्वामी श्रीगुरुदेव । पाचारूनि भेटवा आम्हांसी ॥९०॥
ऐसें ऐकतां निरोप घेउनी । कांहीं जण गेले गोकर्णी । गुरुमूर्ति पाहूं कधीं नयनीं । वाटे उत्सुकता त्यां भक्तां ॥९१॥
मग घेउनी दरुशन स्वामींचें । चित्तीं आनंदले साचे । म्हणती भाग्य उदेलें आमुचें । परस्परांप्रति त्या वेळीं ॥९२॥
तेव्हां प्रार्थना करिती सकल । सांगती वृत्तांत स्वामींसी समूळ । यावें नगरासी ये वेळ । म्हणोनि घातलें दंडवत ॥९३॥
यावरी स्वामी दयाघन । म्हणती भवानीशंकर-कृपेंकरून । नाहीं भय तुम्हांसी जाण । अवश्य येऊं त्या ठायीं ॥९४॥
ऐसें बोलतां सद्गुरुनाथ । सन्मानें बोलावुनी आणिती त्यांप्रत । नगर-रायासी सांगती वृत्तांत । तैं भेटला राजा स्वामींसी ॥९५॥
तंव बोले राजा तयांसी । सारस्वतांचे सद्गुरु आपण ऐसी । 'संमतिपत्रिका' पाहिजे आम्हांसी । तरीच संशय फिटेल ॥९६॥
जाउनी आपण श्रृंगेरीसी । संमतिपत्र जगद्गुरूपाशीं । मागुनी आणावें, द्यावें मजसी । ऐसें बोले तो राजा ॥९७॥
ऐकतां राजयाचे शब्द । सकल सारस्वत जाहले स्तब्ध । परी सद्गुरुस्वामींसी खेद । अणुमात्र चित्तीं न होय ॥९८॥
काय सांगूं तयांचे वर्णन । श्रोतीं असावें सावधान । लिहावया न पुरे मेदिनी जाण । किंचित बोलूं अवधारा ॥९९॥
नाहीं अणुमात्र अंगीं अवगुण । अंतरीं परम समाधान । तेवीं पूर्ण ब्रह्मज्ञान - । संपन्न पहा असती  ते ॥१००॥
शिशुपरी बघती सकल जनांसी । तैसेचि समान सुखदुःखांसी । रागद्वेष नाहीं मानसीं । पाहती सारें आत्मरूप ॥१०१॥
असो राजयाचें ऐकतां वचन । सकलांचें जाहलें भयभीत मन । परी स्वामीसडरूलागून । खेद भय ना अणुमात्र ॥१०२॥
ज्यासी जगचिं मिथ्या दिसे । त्यासी देह खोटा दिसे आपैसें । तेव्हां अभिमान कैंचा वसे । ऐशिया अंगीं सांगा हो ॥१०३॥
जेथे पाहे तेथें मीचि । आत्मरूप दिसे सर्वचि । तेव्हां आपुली आपणा लाज ती कैंची । येईल कवणासी निश्चयें ॥१०४॥
जेथें असे मीतूंपणा । तेथेंचि वाटे लज्जा जाणा । म्हणोनि अभिमान वाटे आपणा । अज्ञ जनांसी जगीं या ॥१०५॥
येथें आपुल्या सद्गुरुराया । परिज्ञानाश्रम - स्वामीया । नसे मीतूंपण म्हणोनियां । बोलती काय तें ऐकावें ॥१०६॥  
म्हणती जगगुरु शंकराचार्य । असती आम्हांसी बहुत प्रिय । ऐशा मिसें दरुशन होय । तेथील स्वामींचें आम्हांसी ॥१०७॥
तयां आम्हांसी नाहीं भेद । अणुमात्र चित्तीं नुपजे खेद । भवानीशंकर जो कां प्रसिद्ध । कर्ता करविता तोचि पैं ॥१०८॥
जाऊनि आतां श्रृंगेरीसी । संमतिपत्र आणूं त्वरेंसीं । मग दावूं तुम्हांसी । प्रेमेंकरोनि राजया ॥१०९॥
ऐसें बोलोनि उठले तेथून । सिद्ध जाहले न लगतां क्षण । जावया शृंगेरीलागोन । भक्तांसहित त्या समयीं ॥११०॥
तेव्हां त्वरेंचि भक्तजन । सन्मानें नेती स्वामींसी जाण । पुढें काय जाहलें वर्तमान । सांगूं पुढील अध्यायीं ॥१११॥
ऐशा गुरूच्या भेटीलागीं । अनंत जन्म घ्यावे हो जगीं । ज्यांचे पुण्य उगवेल वेगीं । त्यांसीच लाभे ही संधि ॥११२॥
म्हणोनि जेव्हां भेटे गुरुमाय । तेव्हांचि धरावे त्यांचे पाय । तेचि सांगती उपाय । संसारापासुनी तराया ॥११३॥
आनंदाश्रम-सद्गुरुनाथ । आणि स्वामी शिवानंदतीर्थ । एकचि यांच्या कृपेनें चतुर्थ । अध्याय गुरुदासें संपविला ॥११४॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां ताप हरती समग्र । चतुर्थाध्याय रसाळ हा ॥११५॥
अध्याय ॥४॥ ओंव्या ॥११५॥
ॐ तत्सत् - श्रीसगुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP