मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥६०॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥६०॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


ॐ गौरीनंदना श्री गणेशा । विघ्नहर्त्या जय जगदीशा । नयन मनोहर विद्याधीशा । साष्टांग नमन तव चरणी ॥१॥
नमस्ते श्री महासरस्वती । जगत्जननी भगवती । लिहिण्या मज द्यावी स्फूर्ती । ज्ञानमाळेत विविधाक्षरे गुंफुनी ॥२॥
नमन श्री देवी महाकालीसी । नमन श्री माता महालक्ष्मीसी । नमन श्री महालसा नारायणीसी । श्री शांतादुर्गेसी नमन माझे ॥३॥
नमन श्री भवानीशंकरासी । नमन श्री दुर्गापरमेश्र्वरीसी । नमन सकळ कुलदेवतांसी । गुरुपरंपरेसी प्रणाम माझा ॥४॥
मागील अध्यायी कथिले । नागरकट्टी शांताबाईने चांगले । वर्णन शिष्यस्वीकाराचे भले । नवपंचदशमाध्यायी ॥५॥
आता परिसावे भक्त जनांनी । शात चित्ते सावध होऊनी । पुढील वर्तमान शब्द सुमनांनी । कथित गुरु प्रेरणेपरी ॥६॥
शिष्यस्वीकाराच्या कांही दिन उपरान्त । प्रयाण केले गरुद्वयांनी शिरालीत । केला सत्कार वाजत गाजत । सकल चित्रापूर ग्रामस्थांनी ॥७॥
गुढ्या तोरणे उभारिली द्वारी । वैदिक मंडळी मंत्रघोष करी । येता सद्गुरुद्वयांची स्वारी । अर्पियली आरती पुष्पें ग्रामस्थांनी ॥८॥
आले मंत्रघोषाच्या जल्लोषात । स्वामी आनंदपरिज्ञानाश्रम मठांत । केला प्रेमे साष्टांग प्रणिपात । शिष्यस्वामींनी सहा समाधींसी ॥९॥
व्यवस्था संस्कृत विद्यार्जनाची । केली स्वामी आनंदाश्रमांनी शिष्याची । विविध विषय शिकविण्यासी । नेमिले शीघ्र मठाचार्य ॥१०॥
गीता उपनिषद् ब्रह्मसूत्र भाष्यात । लाभले नैपुण्य तेराव्या वयात । वेदमूर्ती बैंदुर शिवानंद निष्णात । नेमिला अध्यापनार्थ स्वामींनी ॥११॥
प्रथमतः वरील विषय: अध्यापनासी । वेदमूर्ती हळदीपूर गणेशशास्त्रींसी । आचार्य म्हणूनी नेमिले त्या समयासी । स्वामी आनंदाश्रमांनी ॥१२॥
कांही कारणान्वये त्या काळी । आचार्य विद्यार्थ्यांची मनोधारा न जुळली । त्यास्तव दिधले कार्य समुळी । बैदुर शिवानंद वेदमूर्तीसी ॥१३॥
गीर्वाण भाषेंतील कांही प्रश्न । क्लिष्ट परि महत्त्वपूर्ण । समजावती स्वामी आनंदाश्रम दयाघन । शिष्यस्वामींनी शंका विचारता ॥१४॥
शिष्यस्वामींची प्रतिभा भारी । नसे सतत अध्ययन तिज जरूरी । जाणती गुरु आनंदाश्रम अंतरी । तीक्ष्ण ग्रहणशक्ती शिष्यस्वामींची ॥१५॥
विद्यार्जनामंगे साधना । करावी लागे शिष्य परिज्ञानाश्रमांना । येती अनुभवा भावदशा नाना । साधनेमाजी शिष्यस्वामींसी ॥१६॥
विविधानुभव येती ध्यानात । घडती योगप्रकार क्षणात । विस्मये वेढीले शिष्यांचे चित्त । अनाकलनीय अनुभवांनी ॥१७॥
चित्तदशासी महत्त्व न देता । करावी साधना संपूर्णतः । बीजाक्षरार्थ स्मरूनी ध्यान करिता । प्रगती होई आपैसे ॥१८॥
वदती ऐसे स्वामी आनंदाश्रम महान । परमप्रिय स्वशिष्यालागोन। उपदेश साधकासी हा महत्त्वपूर्ण । असे अध्यात्ममार्गावरी ॥१९॥
असत्य रोचक कथा रचूनी । हितचिंतक कथिती जनांलागोनी । अपकीर्ती अनुभवली शिष्यस्वामींनी । कोवळ्या बालवयात ॥२०॥
ऐशा या बिकट स्थितीत । लाभला एकमेव आधार खचित । प्रेमळ सद्गुरु आनंदाश्रमांचा निश्चित । अखिल मठ परिसरात ॥२१॥
जाहले व्यथित अंतर्यामी । श्री परिज्ञानाश्रम शिष्यस्वामी । करिती सांत्वन आनंदाश्रम स्वामी । धैर्य देऊनी प्रेमभरे ॥२२॥
एके दिनी स्वामी आनंदाश्रमांसी । हितचिंतक म्हणे सायंकाळ समयासी । शिष्यस्वामी होऊनी मुलांसी । खेळती सर्वांसमक्ष अंगणी ॥२३॥
माधना अध्ययनी रुची घेता । लाभ होईल शिष्यांसी संपूर्णतः । अध्ययनी दुर्लक्ष त्यांनी करिता । दोष येईल व्यर्थ शिष्यांसी ॥२४॥
ऐकूनी वदती सद्गुरु महान । परमहंस आनंदाश्रम दयाघन । परिसावे ते लक्ष देऊन । भाविक सज्जन श्रोतेहो ॥२५॥
वय शिष्याचे लहान जरी । बुद्धी साठाची हे तूं ध्यानी धरी । शिष्यस्वामींची चिंता तूं ना करी । असता आम्ही समर्थ ॥२६॥
सर्वही ज्ञान वसे जयाच्या ठायी । तो हा परिज्ञान लवलाही । शिष्य प्रगतीची चिंता गुरुसी राही । जाणावे हे तूं अंतरी ॥२७॥
सांभाळावा त्वां आपुला संसार । करण्या शिष्यस्वामींचा उद्धार । शिरी घेतला आम्ही भार । त्याचे गुरु आम्ही हे तूं स्मरी ॥२८॥
त्वरित क्षमा मागितली त्या व्यक्तीने । क्षमा केली स्वामींनी प्रेमाने । दोष व्यर्थ देता त्या असामीने । तळमळले अंतरी सद्गुरु ॥२९॥
गुरु जाणती शिष्यांचा नित्यनेम । श्री आनंदाश्रमांचे त्यावरी बहु प्रेम । शिष्यांचे सर्वतोपरी कुशल क्षेम । जाणती सद्गुरु सर्वदा ॥३०॥
स्वामी आनंदाश्रम महान । अंतर्ज्ञानी सदा प्रसन्न । कर्तव्यदक्षतेचे मूर्तिमंत प्रमाण । त्यांसी ज्ञात सारे सत्य ॥३१॥
शिक्षक शिकवी पाठशालेत । जाणे विद्यार्थ्यांची बुद्धी समस्त । काय वर्णावी सद्गुरुशक्ती अनंत । या विशाल ब्रह्मांडी ॥३२॥
गुरु तत्त्व म्हणजे ते काय । परिसा सज्जनहो देऊनी अवधार्य । गुरुची पिता बंधु सखा माय । विश्व जयाचे माया स्वरूप ॥३३॥
सगुरु नव्हे केवळ मार्गदर्शक । गुरु जाणे अन्तर्बांह्य सम्यक । शिष्याचे भूत वर्तमान भविष्यादिक । जाणे अन्तर्ज्ञानाने ॥३४॥
सद्गुरु असे सर्वज्ञ सर्वव्यापक । सर्व शक्तीशाली भवरोगहारक । क्षमाशील सहिष्णु भवतारक । या मायामय विश्वांतरी ॥३५॥
मूळ गुरु तत्त्व म्हणती जयासी । ते त्या अनादि अनंत विश्वंभरासी । निर्गुण निराकार ब्रह्मत्तत्त्वासी । अणुरेणुंत भरियेले जे ॥३६॥
द्वैतरूपी हे माया जगत । निर्मिले ज्या परमात्म्याने खचित । तेंची हे जगत निश्चित । प्रतिबिंब विश्वंभर सद्गुरुंचे ॥३७॥
प्रकृती पुरुष रूपे ह्या जगतात । साक्षीभावे राही सद्गुरु अंतरात । केवळ सगुण रूपात नव्हे सीमित । सद्गुरु या ब्रह्मांडी ॥३८॥
चराचर ब्रह्मांड व्यापूनी सकळ । उरे जे अंतिम तत्त्व निर्मळ । म्हणती त्यासीच सद्गुरु प्रेमळ । वसे जो सदैव निजानंदे ॥३९॥
अज्ञान सुज्ञान वसे जयात । असे हे ज्ञानरूप गुरुतत्त्व जगतात । ज्ञान असे सदैव स्वयंप्रकाशित । परि अज्ञान ते तमोकारक ॥४०॥
या दोन्हीचा सुरम्य संगम । म्हणजेची मायामय ब्रह्मांड उत्तम । अंधार अथवा प्रकाशाचा उगम । जाणे कोणी ना बुद्धीद्वारा ॥४१॥
ज्ञान आनंद शांतिरूप सद्गुरु । अवतरे सदेह देण्या भक्तां आधारू । या तिन्ही भावांचा एकरूप संकरू । होई साक्षीभावात ॥४२॥
साक्षीभाव हा अहंतत्त्व शुद्ध । अहंतत्त्व म्हणजे नव्हे गर्व अशुद्ध । आनंद शांती प्रेम भावही विशुद्ध । नसे किंचितही त्या ठायी ॥४३॥
स्थूल सूक्ष्म संचयित गतिमान । पशुपक्षी वृक्ष लतिका पाषाण । स्त्री पुरुष थोर लहान । वसे सर्वांत हा ईश्वर सद्गुरु ॥४४॥
भवसागरी तारण्यासी भक्ता । सगुणरूपे प्रगटूनी हा त्राता । बीजाक्षर मंत्र देऊनी हा दाता । दावी निजात्म स्वरूप भक्तासी ॥४५॥
सदेह गुरु जो दिसे अंमळु । असे तो जणु आरसा केवळु । परमात्मा असे जगत्पाळु । वसे अंतर्यामी निजात्म गुरुरूपे ॥४६॥
भक्त हाती असतां घागर । शोधितसे जल सर्वत्र जगभर । तृष्णेने त्रस्त होता शरीर । व्यथित होई अज्ञानाने ॥४७॥
ज्ञानरूप सद्गुरु सदेह । दावी भक्तांसी निःसंदेह । शोधिसी जे सत्य जगभर । वसे ते तुझ्याची अंतरी ॥४८॥
परमात्मा म्हणूनी भक्त ध्यायी जयास । वसे स्वअंतरी हा विश्वास । सद्गुरु दावी अनुभवे सत्य खास । अंतर्बाह्य एकरूपत्व ॥४९॥
जीवाचा देहभाव तोडण्यास्तव । देई गुरु सुखदुःखाचे अनुभव । जेणे मी देह नव्हे हा भाव । उपजे शिष्य चित्तांतरी ॥५०॥
बीजाक्षररूपी बीज पेरूनी । अनुभवरूपे ज्ञानान्न देऊनी । भक्तोद्धारार्थ सदेह प्रगटूनी । हे कार्य करी सद्गुरु ॥४१॥
परि मनोनिग्रह व स्वप्रयत्नाने । करावी जप ध्यान अनुष्ठाने । मानस चंचलत्व निरसे तेणे । आणिक लाभे चित्तशुद्धी ॥५२॥
चित्त शून्यात स्थिर होता क्षणी । सदेह गुरु करी बोलावणी । म्हणे मार्गक्रमण करावे झणी । अंतर्शून्याकांशी एकट्याने ॥५३॥
तदनंतर आत्मरूप सद्गुरु । देऊनी सदसद्‌न‌विवेकाचा आधारु । संगे स्वानुभवाचा आधार खंबीरु । देऊनी उद्धरी मद्भक्ता ॥५४॥
अनादी सद्गुरुची भाषा मौन। बहिर्जगात शिकवी स्वानुभवातून । अंतरी विविध भावदशा दावून । देई सम्यक ज्ञान ॥५५॥
हे सर्व कथिण्याचे प्रयोजन । की सदेह गुरु हाची विश्वंभर महान । शिष्याचे हित सवार्थे समजून । मार्गदर्शन भक्तां सदा करी ॥५६॥
तेवीच विद्या आणि अध्यात्म । श्री परिज्ञानाश्रमांची उन्नती सुगम । जाणती स्वामी आनंदाश्रम । नलगे त्यासी काही सांगणे ॥५७॥
खंबीर गुरुपरंपरा पाठीराखी पूर्ण । धर्मपीठाधिकार ज्यांचा संपूर्ण । समर्थ सद्गुरु असता आपण कोण । हितचिंतक, सांगा भाविकहो ॥५८॥
असो आता ऐकावे निरुपण । वर्णिते पुढील चरित्रकथन । परिसावे भक्तीभावे स्मरुन । विश्र्वंभर श्री भवानीशंकरासी ॥५९॥
ध्यान अनुष्ठान अध्ययनाची । नित्यकर्में जीं महत्त्वाची । करिती शिष्यस्वामी नित्याची । पाहूनी संतोषले सद्गुरु ॥६०॥
वय वरुषे चौदा असता । शिष्यस्वामी अनुष्ठानासी बैसता । अद्वितीय घटना घडली प्रत्यक्षात । त्या विषयी परिसावे ॥६१॥
विश्वांची सृजन शक्ती स्वामिनी । राजराजेश्वरी ऐश्वर्यदायिनी । प्रसन्नवदना जगदंबा भवानी । प्रगटली श्री परिज्ञानाश्रमांसमोरी ॥६२॥
जाहले म्वामी तेजभारे अनुकंपित । नेत्र जाहले विस्मये प्रदीप्त । जगदंबा ठेवी स्वामी शिरी हस्त । देह भारावला परिपूर्ण ॥६३॥
देऊनी क्षणैक दर्शन । अंतर्धान पावली आदिशक्ती चिरंतन । आनंदे व्यापले मन परिपूर्ण । शिष्य परिज्ञानाश्रमांचे ॥६४॥
सद्गुरु आनंदाश्रमांसमीप जाऊन । कथिला वृत्तान्त संपूर्ण । धरिले सद्गुरुंचे दिव्य चरण । अनन्य भक्तीभावे ॥६५॥
ऐकता वृत्तान्त अभिनवपूर्ण । आनंदले स्वामी आनंदाश्रम दयाघन । बदती सद्गुरु स्वशिष्या लागोन । श्रवण करा भाविकहो ॥६६॥
तूं असशी शक्तीउपासक । राजराजेश्वरीचा अमूल्य पूजक । सृजनशक्ती ती ब्रह्मांड स्थापक । करील कृपा तुजवरी ॥६७॥
प्रवृत्तीधर्म घडवी माता । शिकवी समाजात सुसंस्कृतता । शिकविण्या आचारसंहिता । स्थापावी एक संस्था ॥६८॥
प्रवृत्ती धर्माची माता प्रतिक । देऊनी श्री दुर्गापरमेश्वरी नामक । दे तिजसी स्वतंत्र स्थानक । प्रतिष्ठापूनी प्रेमे तिजसी ॥६९॥
तदउपरान्त शिष्यस्वामींनी वाहिले । सर्वस्व अध्यात्ममाधनेत आपुले । क्षणोक्षणी प्रयाण चालले । अध्यात्म पथावरी गुरुकृपाबळे ॥७०॥
गुरुकृपे साध्य जाहली अभिनव । मन एकाग्रता उग्र साधनेस्तव । विविध सिद्धींचा जाहला उद्भव । स्वामी परिज्ञानाश्रमांमाजी ॥७१॥
सिद्धीयोगे उदी कुंकुम पुष्पे निर्मिली । सद्गुरु चरणी अर्पिली । भक्तीभावे गुरुचरणे वंदिली । स्वामी परिज्ञानाश्रमांनी ॥७२॥
प्रार्थिले शिष्यांनी सद्गुरु प्रति । आपुल्या कृपे झाली सिद्धीप्राप्ती । मानसपूजेची ही सुफळे निश्चिती । अर्पितो मी भक्तीभावे ॥७३॥
विजयोत्साह दाटता सत्वरी । चित्त नर्तन करी अंतरी । परि ही भावदशा ना बरी । जाणती स्वामी आनंदाश्रम ॥७४॥
कर्तृत्वाच्या आनंदोल्हासाने । गाठले शिखर श्री परिज्ञानाश्रम मनाने । परि सूक्ष्मातिसूक्ष्म गर्वाने । वेढीले शिष्यस्वामींसी ॥७५॥
आनंदाश्रम स्वामी वदती शिष्यासी । नच उपयुक्त सिद्धीफळे आम्हांसी । भूलू नये सिद्धी प्रलोभनांसी । संन्याशाने सन्मार्गावरी ॥७६॥
सिद्धी देते असीम कीर्ती । परि नच व्हावे वश तिज जगती । ध्यान ठेवावे सतत चित्ती । अध्यात्म स्वरूप जाणण्या ॥७७॥
शुभाषिश बाळा देतो तुजसी । उद्धरशील तूं अनेक भक्तांसी । आमच्यापेक्षा अधिक लाभोत तुजसी । सद्भक्त जगतामाजी ॥७८॥
सद्गुरु उपदेश श्रवण करिता क्षणी । गर्न निमाला झणी । नच केला पुनश्र्च स्वामींनी । सिद्धीप्रयोग ऐसा ॥७९॥
आनंदाश्रम स्वामी वदतांना स्पष्ट । उपस्थित होते कांही जन श्रेष्ठ । त्यास्तव इतुकेची बोलुनी स्पष्ट । पूर्ण केले संभाषण ॥८०॥
कांही अधीर असंतोषी जनांनी । वार्ता पसरविली शीघ्र जनी । सिद्धी उपयोग केला शिष्यस्वामींनी । ऐशापरी सर्वत्र ॥८१॥
टीकेची कुष्णरंगी अंगुली । लाभली प्रगतीपथावर चांगली । सहज साक्ष जनांसी मिळाली । त्याच्या अध्यात्म प्रगतीची ॥८२॥
सन पासष्टामाझारी । भक्तगण मिळूनी समाजांतरी । आयोजिला सुवर्णमहोत्सव सत्वरी । मुंबई शिराली बेंगळूर ग्रामी ॥८३॥
सुवर्णाक्षरांनी लिहावा ऐसा इतिहास । घडविला स्वामी आनंदाश्रमांनी खास । ह्याचा अनुभव असे भक्तांस । स्वामी मठाधिपती असता ॥८४॥
स्वामी आनंदाश्रमांनी केल्या सुधारणा । उद्धरिले असंख्य दु:खितांना । त्या विषयी कथिते भक्तांना । परिसावे शांत चित्ते ॥८५॥
आंतरब्राह्मण जातीय विवाहास । दिली अनुमती समाजास । गुरुहस्ते तीर्थोदक घेण्यास । विधवा स्त्रियांनी अनुमोदिले ॥८६॥
परदेशी सारस्वतांवरील निर्बंध । त्यजित केले सर्व बंध । संपविला वितंडवाद सबंध । एकजूट सारस्वतांत केली ॥८७॥
गरीब पुनरुज्जीवनार्थ वाहिले । जीवन सर्व आपुले । संस्कृत गुरुकुल स्थापिले । विद्यार्जनाकारणे मठान्तरी ॥८८॥
होमियोपथी औषधालय मोफत । समृद्ध ग्रंथालय स्थापिले शिरालीत । विनामूल्य पठण अध्ययनार्थ सतत । केली व्यवस्था चित्रापुरान्तरी ॥८९॥
केले सर्व समाधी पुनरूज्जीवन । कैक वस्तूंचे नूतनीकरण । दिले स्त्री शिक्षणास्तव प्रोत्साहन । सारस्वत समाजामाजी ॥९०॥
बांधियले विश्रामगृह नूतन । विद्युतदीपयुक्त संपन्न । स्त्रीचे संसारांत महत्त्व परिपूर्ण । कथिले जे शास्त्राधारित ॥९१॥
लग्न मुंज आदी कार्यांसी । अल्प खर्चिक रीतीने करण्यासी । उपदेशिले स्वामींनी जनांसी । वारंवार आशीर्वचनांतूनी ॥९२॥
पाचशे एकाहत्तर आशीर्वचने । दिधली स्वामींनी प्रेमाने । कोंकणी मराठी कन्नड हिंदी भाषेने । उपदेशिले वेळोवेळी ॥९३॥
उपस्थित असता सभेत । असंख्य संस्कृत विद्वान समस्त । स्वामी आनंदाश्रमांनी संस्कृतात । दिधली आशीर्वचने ॥९४॥
विस्मये वेढीले विद्वानांसी । पाहता स्वामींच्या संस्कृत प्राविण्यासी । धन्य म्हणती मानसी । पाहूनी स्वामींचे संस्कृत प्रभुत्व ॥९४॥
मंगळूर गोकर्ण ग्रामी । बेंगळूरांत जनता संस्कृतप्रेमी । वदले श्री आनंदाश्रम स्वामी । सहजतेने गीर्वाण भाषेंत ॥९६॥
वेदान्त, उपनिषद्, भगवद्‌गीता । भक्ती, ज्ञान, योग महत्ता । ब्रह्मसूत्र, अद्वैत सिद्धान्त या परिपूर्णता । कथिली श्री आनंदाश्रमांनी ॥९७॥
साधावी वैदिक व मठाची उन्नती । निष्ठा ठेवा परमात्म्याप्रति । मानवता धर्म पाळावा जगती । ऐसा बहुमूल्य संदेश दिधला ॥९८॥
गुरुपरंपरा नामावली जुनी । आद्य परिज्ञानाश्रमांच्या पूर्वीची संशोधूनी । इतिहासाचा आधार घेऊनी । लिहिली स्वामी आनंदाश्रमांनी ॥९९॥
जयांच्या स्मरणमात्रे लाभे मनःशांति । दग्ध होती पापें अन् अशांती । निरसती विघ्ने व्याधी जीवनान्ती । त्या श्री आनंदाश्रमांसी कैसे वर्णावे ॥१००॥
आतां कथिते पुढील निरुपण । सुवर्ण महोत्सव संक्षिप्त वर्णन । भक्तांनी केले समारंभ आयोजन । मुंबई शिवाजी उद्यानात ॥१०१॥
पाहुनी भक्तांचे प्रेम । संतोषले परमहंस आनंदाश्रम । जनांचे सर्वतोपरी क्षेम । पाहिले स्वयंसेवकांनी संतोषाने ॥१०२॥
या सुवर्ण महोत्सवात महान । दिधले शिष्यस्वामींनी आशीर्वचन । श्री आनंदाश्रमांसी साष्टांगे वंदून । शिष्यस्वीकारानंतर प्रथमत: ॥१०३॥
स्वामी आनंदाश्रम ओहळले चित्ती । पाहुनी शिष्याची प्रतिभा अन् भक्ती । जाहली असीम आनंद प्राप्ती । भक्तजनांच्या हृदयांतरी ॥१०४॥
तदनंतर दिधले आशीर्वचन । स्वामी आनंदाश्रमांनी पावन । धन्य जाहले भक्तजन । ऐकता सद्गुरुवाणी ॥१०५॥
सुवर्ण महोत्सवाप्रित्यर्थ । शतचंडी होम जाहला सार्थ । जन आले द्विसहस्त्र । शिराली चित्रापूर मठात ॥१०६॥
वैशाख शुद्ध चतुर्दशीसी । आरंभिले शतचंडी यागासी । स्थापूनी दुर्गामूर्ती सुंदरशी । अलंकारयुक्त शृंगारिली ॥१०७॥
वैशाख वद्य तृतीयेसी । संपूर्ण करुनी या शतचंडी यागासी । दुजे दिनी वैशाख संकष्टीसी । दुर्वा होम आरंभिला ॥१०८॥
श्री गणेशमूर्ती सुंदर । स्थापियली देवीच्या मांडीवर । दोन्ही मूर्ती त्या मनोहर । शोभती यज्ञ शाळेमाजी ॥१०९॥
वैदिक करिती मंत्रघोष । आळविती गणपती अथर्वशीर्ष । तुटले भक्तांचे विघ्नपाश । पूज्य सद्गुरुद्वय दर्शने ॥११०॥
वैशाख वद्य पंचमी दिनी । श्री देवी गणपती मूर्ती विसर्जन करूनी । श्री शंकर मूर्ती प्रस्थापूनी । आरंभिले रुद्रानुष्ठान ॥१११॥
पाचशे लघुरुद्रांसहित । महारुद्रोत्सव जाहला समाप्त । चाले अन्नसंतर्पण सतत । सुवर्ण महोत्सवात शिरालीत ॥११२॥
वैशाख वद्य अष्टमीसी । कनकाभिषेक केला त्या समयासी । बैसवूनी स्वामी आनंदाश्रमांसी । अर्पिली सुवर्ण पुष्पे ॥११३॥
'लक्ष्मीसूक्त' गाती वैदिक । पाहती कौतुके जन भाविक । कनक पुष्पे ती सुबक । ढळती सरसर शिरावरूनी ॥११४॥
सुवर्ण महोत्सव जाहला बेंगळूर ग्रामी । जमले असंख्य गुरुप्रेमी । संचरती जणू आनंदधामी । पाहता सद्गुरु द्वयांसी ॥११५॥
आता ऐकावे पुढील कथन । धन्य जाहले गुरुशिष्य जीवन । स्वामी परिज्ञानाश्रमा जाहले ब्रह्मज्ञान । सद्गुरु आनंदाश्रम कृपे ॥११६॥
सोनियाचा दिन उगवला । एकोणीसशे सहासष्ट गुरुपौर्णिमला । निजस्वरूप स्वयंप्रकाश प्रगटला । स्वामी परिज्ञानाश्रम ध्यानावस्थेत ॥११७॥
जाहले अहं ब्रह्मास्मी स्फुरण । ओझरे हर्षानंद चित्तांतून । वाहती झरझर अश्रू नयनांतून । पाहूनी विशाल सत्स्वरुप ॥११८॥
जिकडे पाहे तिकडे । स्थूल सूक्ष्म चोहीकडे । सर्वत्र प्रतिबिंब आपुले सापडे । स्वामी परिज्ञानाश्रमांसी ॥११९॥
कंपित जाहली काया मनोहर । वंदिले श्री आनंदाश्रम चरण सुंदर । मुखी पसरली प्रसन्नता मधुर । शब्द नच सुचती बोलावया ॥१२०॥
सद्‌गदित जाहले गुरुवर । पाहती तृप्ततेने शिष्यासी सुंदर । अंतर्ज्ञानी आनंदाश्रम गुरुवर । संतोषले होता शिष्यासी सत्स्वरुप ज्ञान ॥१२१॥
मौन भाषा एकमेकांची । साक्षी बनली गुरुशिष्य मिलनाची । आत्मा परमात्मा एकरूपत्वाची । अनुभूती उपभोगिली ॥१२२॥
आनंदी आनंद जाहला सकळ । गुरु न्याहाळती शिष्यमुख कोमल । परि गुपित राखिले हे वृत्त निर्मळ । स्वामी आनंदाश्रमांनी ॥१२३॥
निवास असता शिराली मठात । हस्तक्षेप मुळी करता कार्यात । शिकले मठ व्यवस्थापन समस्त । गुरुंकडूनी चतुरतेने शिष्यस्वामी ॥१२४॥
शिष्यस्वामींनी प्रार्थिले श्री आनंदाश्रमांसी । श्रावण वद्य अष्टमीसी । अर्पितो मम एका विनंतीसी । आपुल्या पूज्य गुरु चरणी ॥१२५ ॥
अभय देऊनी स्वशिष्यासी । सदुरु आनंदाश्रम म्हणती त्यासी । तव इच्छित असे जे मानसी । सांगावे निःसंकोचपणे आम्हां ॥१२६॥
शिष्यस्वामी वदती गुरुचरणांत । आजवरी असे प्रघात समाजात । माता न येई पुत्रा समक्ष प्रत्यक्षात । संन्यास दीक्षा स्वीकारता ॥१२७॥
मायबाप मजसी आपणची पहिले । बाळासम आजवरी सांभाळिले । जन्मदात्या मातेने प्रेमे पाळिले । अकरा वर्षापर्यंत ॥१२८॥
उल्लंघुनी ही विपरीत रीत । आपुली आज्ञा मिळता खचित । मातेचे पुरवू आम्ही इच्छित । आम्हां भेटण्यासी ॥१५९॥
पुत्रभाव वसे जरी तिच्या मनात । नच राहिला आमुच्या चित्तात । अन्य जनांपरि जीवनात । करीन सांभाळ जन्मदात्यांचा ॥१३०॥
जेधवा त्यांसी होईल इच्छा भेटण्यासी । अथवा आमच्या संगे राहण्याची ।अनुमती मिळता त्यास्तव तुमची । अंमलात आणीन रीत ही ॥१३१ ॥
दुजी विनंती परिज्ञानाश्रमांची । श्रवणे मिटे शंका मनीची । ज्ञात होता त्या विषयी सत्यची । स्वामी परिज्ञानाश्रम विषयी ॥१३२॥
म्हणती श्री परिज्ञानाश्रम श्री सद्गुरुंसी । ‘‘अंतिम ध्येय प्राप्त झाले आम्हांसी । ब्रह्मज्ञानाचे मार्ग अनेक निश्र्चयेसी । असती या जगी ॥१३३॥
ते सर्व हाताळण्यासी । द्यावी अनुमती आम्हांसी । स्वानुभवे जाणण्या प्रत्येक पंथासी । वर्तूनी त्या पंथापरी’’ ॥१३४॥
दोन्ही विनविण्यांसी तत्क्षणी । दिली मान्यता श्री आनंदाश्रमांनी । जाहला आनंद श्री परिज्ञानाश्रम मनीं । मिळता सद्गुरुंची अनुज्ञा ॥१३५॥
आता ऐकावे पुढील निरुपण । स्वामी आनंदाश्रमांची काया पावन । शनै शनै जाहली क्षीण । चातुर्मासांत शके १८८८ माजारी ॥१३६॥
भाद्रपद शुद्ध तृतीयेसी । पराभव नाम संवत्सरासी । स्वामी आनंदाश्रम महानिर्वाणासी । निघाले सोळा सप्टेंबर रोजी ॥१३७॥
दीर्घस्वरे आळवला ॐकार । आसमंत जाहला तदाकार । ऐकता गुरुमुखी नाद ॐकार । धाविन्नले शिष्यस्वामी गुरुचरणी ॥१३८॥
पवित्र गंगाजल घेऊनी हाती । गुरुमुखांत तत्क्षणी अर्पिती । दुःखाश्रू नेत्रांतूनी वाहती । स्वामी परिज्ञानाश्रमांच्या ॥१३९॥
दुःखद वार्ता येता येता सर्वत्र । जन धावले दर्शनार्थ शिरालीत । बेंगळूर मठातूनी चित्रापूर मठात । आणिली काया कार्यकर्त्यांनी ॥१४०॥
जन हळहळती मनांतून । आठवूनी सद्गुरुमूर्ती महान । दुःखार्णवी बुडाले जन । महानिर्वाणी जाता स्वामी आनंदाश्रमांनी ॥१४१॥
समाधी स्थानी बैसवुनी काया पद्मासनस्थ । शिष्यस्वामींनी केले विधी समस्त । वैदिकांनी मंत्रघोषाच्या जल्लोषात । केले विधी षोडषोपचारे ॥१४२॥
स्थापिले शिवलिंग त्यावरी । मृतिकेचे एक वर्षभरी । तदनंतर शिलालिंग समाधीवरी । स्थापिले प्राणप्रतिष्ठा करुनी ॥१४३॥
श्रीकृष्णाची मूर्ती स्थापिली । शिवलिंगाच्या पाठी चांगली । दहीपोह्याचा नैवेद्य भक्त मंडळी । आजही अर्पिती समाधीसी ॥१४४॥
स्वामी पांडुरंगाश्रमसमाधी बाजूस । दिधली समाधी व्यवस्था खास । चित्रापूर जन्मग्राम खास । स्वामी आनंदाश्रमांचे ॥१४५॥
स्वामी आनंदाश्रमांसी वंदूनी । अर्पिते षष्टदशाध्याय गुरुचरणी । स्वामी परिज्ञानाश्रमांसी मनीं स्मरुनी । करिते अध्याय संपूर्ण ॥१४६॥
अध्याय ॥६०॥ ओव्या १४६॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति षष्टदशाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP