मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥२०॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२०॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकेशवाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय  नमः ॥ॐ॥
जय जय पंचम केशवाश्रमा । कोण देवा उद्धरील आम्हां । तुजवांचोनि अज्ञांच्या क्रोध-कामा । जाळील कवण हो स्वामी ॥१॥
आंधळ्या हातीं जैसी काठी । तैसी तुझी मूर्ति गोमटी । सदा राहे भक्तांपाठीं । रक्षिसी संकटीं त्यांसी पैं ॥२॥
ऐसी तूं आमुची माउली । भक्तांसाठीं वेगें धांवली । आणिक कांहीं काज ना या वेळीं । अवनीं यावया तुजला वें ॥३॥
तुज नाहीं जनन - मरण । परी तूं येसी भक्तांकारण । येथें अवनीवरी बापा जाण । काय काज तुजलागीं ॥४॥
शिक्षकासी नाहीं शिकणें । परी शाळेसी जाई नेमानें । मुलांसी शिकवायाकारणें । जावें लागे त्यासी पैं ॥५॥
तैसें देवा भक्तांकारण । घेसी अवतार तूं बा जाण । परी न लागे तुजला बंधन । प्रपंचाचे पाहीं पां ॥६॥
जरी राहिलास तूं प्रपंचीं । तरीही न लागे ममता त्याची । सारें तुजला आत्मरूपचि । तेव्हां कैंचे बंधन पैं ॥७॥
ज्यासी असे मीतूंपण । त्यासीच हें सारें बंधन । तूं तरी गुरुराया संन्यासी पूर्ण । तेव्हां कैचें बंधन तुजलागीं ॥८॥
तुज विषम नाहीं कांहीं कांहीं एक । सारें जग तुजला देख । ब्रह्मरूपचि भासे सम्यक । नाहीं संशय यामाजीं ॥९॥
आतां दुजें न मागें कांहीं । एकचि मागतों मजला देईं । तुजवांचोनि कोणी नाहीं । द्यावया अन्य समर्थ पैं ॥१०॥
'अर्चन' भक्ति पंचम आतां । देईं दयाळा शमवीं चित्ता । ऐसी प्रार्थना करितों ताता । भक्तवत्सला करुणाळा ॥११॥
असो आतां ऐका सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । श्रीशंकराश्रम - स्वामींचें महिमान । मल्लापुर येथील समाधीचें ॥१२॥
आतां सांगू श्रीकेशवाश्रम - । स्वामी यांचे सद्गुण परम । उत्कृष्ट असुनी दाविला सुगम । मार्ग जनांसी प्रेमानें ॥१३॥
शंकराश्रम मुक्त झालियाउपरी । यांसी बेसविती गादीन वरी । स्वधर्म-राज्याचे अधिकारी । करिती सारस्वतवृंदाचे ॥१४॥
मूर्ति असे परम सुंदर । ब्रह्मतेज झळके मुखावर । म्हणती साक्षात् विष्णूचा अवतार । भेटला आम्हां जगतीं या ॥१५॥
जनांलागीं अति प्रेमानें । बोधुनी आकर्षिलें जवळी तयानें । युक्तीनें भक्ति वाढविली जेणें ।  होईल समाधान ज्यापरी ॥१६॥
ऐसें करितां जनांलागीं । भक्ति विशेष उपजली वेगीं । आमुच्या मठाचे सद्गुरूचि हे जगीं । आमुचा उद्धार करितील ॥१७॥
आम्हांसी पाहिजे सद्गुरुराय । मठ इत्यादि हेंचि सुखमय । याहुनी आणिक जगतीं ना प्रिय । ऐसी भावना दृढ झाली ॥१८॥
'आमुचें' ऐसें ज्याचें मन । त्यासी त्याची चिंता जाण । म्हणोनि त्याचा अभिमान ।  वाहुनी रक्षण तो करी ॥१९॥
म्हणोनि येथें 'मठ आमुचा'। ऐसा भाव धरी जो साचा । तो वाहे सहजचि मठाचा । अभिमान सारा प्रेमानें ॥२०॥
जेव्हां ऐसा अभिमान वाहे । तेव्हां तो करी त्याचें पाहे । रक्षण, 'माझें' म्हणोनि हें । अतिप्रेमानें अवधारा ॥२१॥
असो यापरी बहुत जन । घेती मठाचा अभिमान । करिती विचार सकल मिळोन । वर्गणी द्यावी आम्हीं पैं ॥२२॥
ऐसा ठराव करोनि देख । देती वर्गणी मठासी प्रत्येक । प्रतिवर्षीं पाठविती रोख । आपापुल्या ग्रामांतुनी ॥२३॥
ज्याच्या त्याच्या उत्पन्नापरी । देती वर्गणी शक्त्यनुसारी । तेव्हां मठासी सहजचि निर्धारीं । ऊर्जित स्थिति आली पैं ॥२४॥
घेतलीं कांहीं शेतें सुंदर । उत्पन्न स्वल्प वाढलें साचार । नाना उत्सव करिती थोर । मठामाजीं त्या काळीं ॥२५॥
असो सद्गुरु केशवाश्रम - । स्वामी आमुचे शांत परम । पूर्णज्ञानी आत्माराम । बघतां प्रेम उद्भवे पैं ॥२६॥
महिमा अपार न वर्णवे कवणा । अमुक ऐसी न होय कल्पना । तशांतही आम्हां अज्ञ जनां । कैसें समजेल सांगा हो ॥२७॥
सूर्याचा प्रकाश आंधळ्यासी । पुसतां कैसें सांगवेल त्यासी । तैसें आम्हां अज्ञ जनांसी । कैसी वर्णवेल महिमा ती ॥२८॥
परी त्या सद्गुरूच्या प्रसादें । जितुकें शक्य तितुकें आनंदें । करूं वर्णन आतां स्वच्छंदें । परिसा सज्जन भाविक हो ॥२९॥
'मुर्डेश्वर' या नामें एक । खेडें असे शिरालीनजीक । तेथें होता एक भाविक । सारस्वत ब्राह्मण पैं ॥३०॥
तो करीतसे रात्रंदिन । केशवाश्रम - सद्गुरूंचे स्मरण । आणि कधीं कधीं भेटे जाऊन । स्वामींसी परम प्रीतीनें ॥३१॥
किंचित् न धरी मनीं कामना । सदा करी तो नामस्मरणा । वारंवार करी प्रार्थना । देईं भक्ति मज देवा ॥३२॥
याहुनी न मागे कधीं कांहीं । सद्गुरुसंनिधीं खचितचि पाहीं । ऐसें असतां उदया येई । पुण्य त्याचें त्या काळीं ॥३३॥
झाला त्यासी एक पुत्र । परम तेजस्वी अति सुंदर । बघतां होय मन सत्वर । आनंदित सकलांचें ॥३४॥
झालें बाळ सुंदर बहुत । वर्षें झालीं त्यासी सात । परी न बोलेचि तो सुत । मुका म्हणती त्यासी पैं ॥३५॥
परी या गृहस्थाप्रति । न वाटे अणुमात्र त्याची खंती । पत्नी सांगे दिवसरातीं । स्वस्थ कां हो बैसलां ॥३६॥
तुम्ही भजतां स्वामींसी । त्यांच्या चरणीं घाला यासी । नातरी याची गति कैसी । सांगा पुढें होईल ती ॥३७॥
तुम्हां नाहीं अणुमात्र चिंता । सदा परमार्थीं घालितां चित्ता । परी न सुटे संसार सर्वथा । मजलागीं हा पाहीं हो ॥३८॥
तरी करा माझ्यावरी । उपकार आणि चला निर्धारीं । संनिधीपाशीं प्रार्थना सत्वरी । करोनि चरणीं या घाला ॥३९॥
यावरी बोले तो भक्त तियेसी । काय मागावें सद्गुरूपाशीं । सांगतों आतां परियेसीं । चित्त देउनी अवधारीं॥४०॥
ठेविलें राजानें अन्नछत्र । त्यापाशीं मागितलें किंचित तक्र । तेव्हां हंसतील जन समग्र । काय मंदमती म्हणोनि ॥४१॥
तेव्हां त्यासी पाहुनी खचित । आश्चर्य वाटेल राजाप्रत । म्हणे मानसीं यासी विदित । नाहीं मी राजा म्हणोनि ॥४२॥
तैसें येथे सद्गुरुराज । शाश्वत सुख द्यावया सहज । समर्थ असतां की म्हणावें मज । नश्वर प्रपंच द्या देवा ॥४३॥
ऐसें मागतां सद्गुरुराय । हंसतील मज बघुनी सदय । म्हणोनि न मागें मी सांगतों निश्चय । सद्गुरुमाउलीजवळी हें ॥४४॥
पुत्र धन दारा सारें । नश्वर म्हणोनी सदा न उरे । उगीच माझें म्हणोनि मरे । न मानत्र अहंता धरोनि ॥४५॥
जें घ्यावें सद्गुरूपासोन । तें न घेतां भलतेंचि मागतां जाण । होय आपुलेंचि नुकसान । नसे अनुमान यामाजीं ॥४६॥
नुकसान काय म्हणसी जरी । तरी सांगतों तें अवधारीं । उगीच खिन्न न व्हावें अंतरीं । वृथाचि जाण गे पाहीं ॥४७॥
जो द्यावया समर्थ अमृत । तें न मागतां दूध मागत । तरी येथ आपुलीच हानि होत । हें न कळत अज्ञांना ॥४८॥
ज्यानी मिळे हो अमृत । तो होय अमरचि त्वरित । तैसें ते दवडुनी दूध घेत । यासी काय या म्हणावें ॥४९॥
तैसें येथें सद्गुरुमाय । समर्थ असे दावाया चिन्मय । स्वरूप आपुलें, देउनी अभय । निजभक्तांसीं ती पाहीं ॥५०॥
म्हणोनि ऐशा गुरुसंनिधीं । काय मागावें हें आधीं । विचारूनि मानसीं त्या पदीं । शरण जावें मग पाहीं ॥५१॥
तरीच देईल तो करुणार्णव । खऱ्या सुखाचें जाण वैभव । त्याहुनी आणिक सुख तें अपूर्व । सांग आहे कैंचें तें ॥५२॥
हा नव्हे तुझा पुत्र । वृथा न करीं प्रेम अणुमात्र । धरीं तूं मार्ग परम पवित्र । परमार्थाचा बहु सुलभ ॥५३॥
जरी धरिला अति मोह । तरी न राहे हा शाश्वत देह । म्हणोनि न करीं तूं याचा संग्रह। अशाश्वत प्रेमाचा ॥५४॥
जें आपुलें खरें स्वरूप । त्याचा न होय कदापि लोप । ऐसे तें निजरूप दावी अमूप । सद्गुरुराणा तो माझा ॥५५॥
ऐशा त्या सद्गुरूपाशीं । विषय मागतां लाज वाटे मजसी । म्हणोनि घडीघडी येविषीं । बोलूं नको मजपाशी तूं ॥५६॥
ऐसें ऐकतां पतीचें वचन । झाली मानसीं क्रोधायमान । बैसली तेव्हां करीत रुदन । आळवी स्वामींसी त्या समयीं ॥५७॥
म्हणे देवा केशवाश्रमा । अपार ऐकिली तुझी महिमा । आमुच्या पतीनें जाळुनी कामा । टाकिलें सर्व निधारें ॥५८॥
त्यासी नको हा संसार । मजसाठीं तूं देईं साचार। माझा एकचि असे पुत्र । मुका जाण तो पाहीं ॥५९॥
हें असे तुजला विदित । म्यां काय सांगावें येथ । त्वांचि समजुनी शिकवीं त्याप्रत । बोलावयासी दयाळा ॥६०॥
मज नाहीं भक्ति-प्रेम । मीं भजलें तुजला सकाम । म्हणुनी नत्र अव्हेरीं, सुगम - । मार्ग दावीं तूंचि पैं ॥६१॥
ऐसी नानापरी करुनी प्रार्थना । चित्तीं आठवी श्रीगुरुराणा । मग ती रात्रीं ललना । पहुडे आपल्या शय्येवरी ॥६२॥
तेचि दिनीं रात्रीं स्वप्नीं । गेली शिराली - ग्रामीं तेथुनी । घेतलें दरुशन स्वामींचें ते क्षणीं । मुलासहित तियेनें ॥६३॥
स्वामींनीं दिधलें अभयवचन । ना भीं बाळे तूं न करी रुदन । तुझा पुत्र सुखसंपन्न । होईल जाण निर्धारें ॥६४॥
इतुकें सांगुनी झाले अदृश्य । स्वामी आणि मठ विशेष । मग पाहतां अंथरुणीं खास । असे ती नारी आपुल्या गृहीं ॥६५॥
होतां संपूर्ण जागृत । जाहली मानसीं विस्मित । आनंद न मावे गगनांत । परी न सांगे कवणाप्रति ॥६६॥
मग दोन दिवस गेलियावरी । तया भक्तासी रात्रीं निर्धारीं । येउनी स्वामी स्वप्नामाझारीं । बोलते  झाले तें ऐका ॥६७॥
अगा मद्भक्ता विरक्ता । घेउनी येईं तुझिया सुता । दरुशन करवीं आणुनी आतां । आज्ञा आमुची तुजलागीं ॥६८॥
 इतुकें बोलुनी केशवाश्रम । सद्गुरु ते सद्गुण-ग्राम । अदृश्य जाहले क्षणेंचि परम । भाविक भक्तासी भेटोनी ॥६९॥
तेव्हां तो झाला जागृत । पत्नीसी सांगे वृत्तांत । श्रीसद्गुरुस्वामी - मठाप्रत । जाऊं आजि शिराळीसी ॥७०॥
जाहला जो स्वप्नीं दृष्टांत । तो निवेदिला तिजला समस्त । ऐकतां बोले हर्षयुक्त । पत्नी आपुल्या पतीप्रती ॥७१॥
म्हणे ऐका प्राणनाथा । मजही स्वप्न पडिलें, आतां । सांगतें तुम्हांलागीं सर्वथा । असत्य न सांगें मी पाहीं ॥७२॥
दोन दिवस झाले खास । स्वप्न देखिलें परम सुरस । श्रीस्वामींनी सांगितलें, आम्हांस । भेट बालकास घेउनी ॥७३॥
आणि एक सांगितली खूण । तुझा बाळ करील भाषण । ना भीं तूं ऐसें वचन । बोलिले जाण मजलागीं ॥७४॥
यावरी बोले तो सद्गुरुभक्त । काय महिमा सांगूं अद्भुत । चला जाऊं आतां त्वरित । घेऊं दर्शन त्यांचे पैं ॥७५॥
ऐसें बोलुनी तो भक्त । गेला कांता-पुत्रासहित । शिराली - ग्रामीं श्रीमठांत । घेतलें दर्शन स्वामींचे ॥७६॥
तेव्हां बोलती स्वामिराय । घालीं आमुच्या पदीं तनय । ऐकतां चित्तीं पावती विस्मय । पतिपत्नी उभयतां ॥७७॥
गुरु - आज्ञेपरी घातला पायीं । मग तो ठेविता झाला डोई । तास झाला तरी नुचले पाहीं । तो बाळ आपुलें मस्तक ॥७८॥
स्फुंदस्फुंदोनि रहूं लागला । स्वामी उठविती स्वकरें तयाला । म्हणती भिऊं नको तूं बाळा । होईल कल्याण तुझें बा ॥७९॥
ऐसें म्हणोनि ठेविला हस्त । त्याच्या मस्तकीं प्रेमभरित । तेव्हां त्याच्या मातेप्रत । झाला आनंद अमितचि ॥८०॥
असो मग तीं उभयतां । चार दिवस राहिलीं तत्त्वतां । पादपूजादि करूनी चित्ता । पावलीं समाधान त्याकाळीं ॥८१॥
घेतला मंत्र उपदेश जाण । केलें मुलाचें मौंजीबंधन । मुलगा हळूहळू करी भाषण । अद्भुत महिमा श्रीगुरूंची ॥८२॥
मग ती गेलीं पुत्रासहित । आपुल्या ग्रामीं पहा त्वरित । सकल विद्या - पारंगत । झाला पुत्र सुलक्षणी ॥८३॥
तोही शाला सद्गुरुभक्त । आत्मज्ञान पावला त्वरित । प्रपंच करुनी परमार्थ । करी तो प्रेमें सद्भावें ॥८४॥
आणि माताही त्यापरीच । पुढें झाली विरक्त साच । निष्काम भजे ती स्वच्छ । नसे संशय अणुमात्र ॥८५॥
आधीं होती जी परम कामिक । मग झाली निष्काम भाविक । सद्गुरुकृपाचि ही एक । खचितचि जाणा निर्धारें ॥८६॥
असो यापरी सद्गुरुमहिमा । काय सांगूं आतां तुम्हां । पहा कैसें त्यांच्या नामा । अद्यापिही गाती पैं ॥८७॥
कैसें त्यांचे भक्तप्रेम । लीला दावुनि पुरवी काम । ऐशा गुरूचें घेतां नाम । तुटे भवभय पाप्यांचें ॥८८॥
आधीं दावुनी लीला बहुत । मग हळूहळू दाविती सुपंथ । आकर्षिती परमार्थीं चित्त । निजभक्तांचें ते पाहीं ॥८९॥
कडू औषध द्यावयाकारण । माता मुलांसी काय करी आपण । गोड पदार्थ मुखीं घालोन । मग देई ती औषध पैं ॥९०॥
तैसें येथें साधु - संत । दावुनी किंचित् लीला अद्भुत । ओढिती परमार्थीं चित्त । निजभक्तांचें तें पाहीं ॥९१॥
हें सांगाया काय कारण । कीं श्रोते करितील प्रश्न । जरी सद्गुरुमहिमा आहे पूर्ण । तरी न व्हावें दुःख भक्तां ॥९२॥
कित्येक गुरुभक्त असती मोठे । त्यांवरी कासया येती संकटें । तेव्हां महिमा जाय कुठें । ऐसा प्रश्न उद्भवेल ॥९३॥
याचि प्रश्नाचें उत्तर । वरील दृष्टान्तें दिधलें साचार । कीं बाळासी देतां औषध कडुतर । गोड आधीं दे खावया ॥९४॥
तैसें येथे सद्गुरुमाय । अणुमात्र लीला दावुनी सदय । ओढिती प्रेमबळें समुदाय । निजभक्तांचा तो पाहीं ॥९५॥
अवतार घ्यावया काय कारण । केवळ जगाचें कराया कल्याण । आणिक कांहीं येथे काज न । येण्याचें त्या प्रभुलागीं ॥९६॥
भक्तसंकट पाहुनी अवनीं । तळमळ वाटे अंतःकरणीं । कीं 'देहचि हा मी' ऐसें समजुनी । व्यर्थ आयुष्य घालविती ॥९७॥
विषयचि गोड वाटे जीवा । आठवेना क्षणमात्र देवा । काय करावें ऐशिया सर्वां । म्हणोनि अवतरे प्रभुराय ॥९८॥
जधीं जधीं साधु होउनी प्रगटे । हराया जनांचीं नाना संकटें । परी जन आंधळे मोठे । न दिसती साधु तयांसी ॥९९॥
म्हणोनि किंचित लीला दावितां । जन ठेविती भावना तत्त्वतां । तेव्हां तयांसी बोधितां । सहज ग्रहण होईल पैं ॥१००॥
जैसे व्यापारी जाहिराती । लिहिती तेथें नाना व्यक्ती । चमत्कारी चित्रें छापिती । कैशा कारणें तें सांगा ॥१०१॥
आपुला माल खरेदी व्हावा । ऐसा हेतु धरोनि नांवा । छापिती मालाच्या तेव्हां । जाहीर करिती व्यापारी ॥१०२॥
आपुलें नांव वाचावें लोकांनीं । ऐसा हेतु धरोनि स्वमनीं । नाना चित्रें त्यावरी छापुनी । लाविती जिथें तिथें तीं पाहीं ॥१०३॥
चित्रें बघतां अद्भुत विचित्र । लक्ष देती तेथें सत्वर । चित्र बघाया उत्सुक थोर । होय मन हें मानवांचें ॥१०४॥
तेव्हां बघती जाहिरात । अमुक माल येथे मिळत । म्हणोनि छापिती चित्रें बहुत । व्यापारी जाण ते पाहीं ॥१०५॥
चित्रें बघावीं जनांनीं ऐसा । हेतु नाहीं त्यांच्या मानसा । केवळ माल विकावा सहसा । हेंचि व्यापारी इच्छिती ॥१०६॥
याचिकारणें नाना चित्रें । जाहिरातीपुढें छापिती सर्वत्रें । तैसीं साधुपुरुषांची चरित्रे । असती जाणा निर्धारें ॥१०७॥
अर्थात् नाना लीला दाविती । चित्रांपरी असे खचित ती । चमत्कार पाहुनी जन भजती । म्हणोनि किंचित दाविती ते ॥१०८॥
परी हेतु न केवळ त्यांचा । उद्धारावें जनांसी साचा । लीला दावितां तरी याच्या । हृदयीं ठसेल तो बोध ॥१०९॥
ऐसा हेतु धरोनि मानसीं । करिती युक्तीनें बोध जनांसी देह । झिजविती दिवसनिशीं । काय महिमा वर्णावी ॥११०॥
याविण तयांसी न वाटे आपण । लीला दावोनि कीर्ति घेवोन । जनांसी फसवोन उदरंभरण । करावें ऐसें कदापिही ॥१११॥
म्हणोनि न दाविती बहुत लीला । जितुकी पाहिजे कार्याला । तितुकीच दावुनी निजभक्ताला । करिती उद्धार त्यांचा हो ॥११२॥
जेव्हां उपजे भक्ति त्याला । तेव्हां न दाविती त्यासी लीला । आणिक लावुनी कसाला । करिती उद्धार तयांचा ॥११३॥
पुढील अध्यायीं हेंचि कथन । सांगूं गुरुकृपें विस्तारोन । ऐकतां होईल संतुष्ट मन । प्रेमळ श्रोत्यांचें निर्धारें ॥११४॥
आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादेंचि विंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥११५॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां नासती दोष समग्र । विंशतितमाध्याय रसाळ हा ॥११६॥
अध्याय २० ॥
ओंव्या ११६ ॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    ॥छ॥
॥ इति विंशतितमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP