चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४९॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय देवा सद्गुरुनाथा । तूं सर्वजनांसी आश्रयदाता । म्हणोनि धांवलों चरणीं ताता । हरपली सर्व चिंता पैं ॥१॥
तुझे चरण धरितां दृढतर । नाहीं भय त्या कवणही थोर । अगाध महिमा तुझा अपार । बोलतां वाचा शिणली बहू ॥२॥
मी असें अज्ञ पामर । महिमा वर्णन करवेना सत्वर । तूंचि हृदयीं बैसोनि विचार । देईं दयाळा बा देवा ॥३॥
तुझी कृपा नसतां निश्चयें । कवणही कार्य ना होय पाहें । म्हणोनि देवा धांवूनि तूं ये । उशीर न करीं ये समयीं ॥४॥
'तूं मी एक' ऐसा भाव । झालियाविण कृपेसी ठाव । न मिळे निश्चयें सर्वथैव । म्हणोनि चरणीं लागतों मी ॥५॥
ऐशी माझी प्रार्थना ऐकुनी । संशय येईल श्रोत्यांच्या मनीं । कीं गुरुकृपा झालियावांचुनी । एकरूपभाव ये कैसा ॥६॥
तुम्ही म्हणतां गुरु - शिष्य एक । ऐसा निश्चय न होतां देख । गुरुकृपा न होय निश्चयात्मक । ऐसें श्रोते पुसतील ॥७॥
तरी ऐका सावधान । स्थिर करोनि आपुलें मन । कीं सद्गुरुकृपेची खूण । अनिर्वाच्य म्हणोनियां ॥८॥
जेथें उगवला वासरमणि । तेथें अंधार न राहे धरणीं । तैसी गुरुकृपा होतांक्षणीं । अज्ञान जाय सारें हें ॥९॥
ज्याचें अज्ञान जाय सर्व । त्यासी गुरु - शिष्य - एकरूपभाव । सहजचि आंगीं बाणे अपूर्व । क्षणमात्रें जाण निश्चयेंसीं ॥१०॥
परी गुरुभक्ती असावी दृढतर । कीं 'सद्गुरु आणि मी एकरूप निर्धार' । ऐसी भावना वाढवावी निरंतर । विचारेंकरोनी हृदयींच हो ॥११॥
विचार करितां वारंवार । दृढता होय चित्तीं सत्वर । मग कृपेसी काय उशीर । होईल सांगा हो तुम्ही ॥१२॥
म्हणोनि आधीं सद्गुरुमूर्ति । धरावी सदा आपुल्या चित्तीं । तेव्हां येईल विचारस्फूर्ति । एकरूप भावनेची ॥१३॥
मग भावना होतां दृढतर । सहजचि कृपा करी गुरुवर । मागावें नलगे, कष्ट ना थोर । सत्य सत्य त्रिवाचा ॥१४॥
गुरुकृपा झालियावांचुनी । अपरोक्षज्ञान न पावे कोणी । परी आधीं घ्यावें समजोनी । परोक्षज्ञानें घडीघडी तें ॥१५॥
गुरुचरणीं धरितां विश्वास । परोक्षज्ञान ये हातास । परोक्षज्ञान म्हणिजे तुम्हांस । सांगूं आतां गुरुकृपेंचि ॥१६॥
सद्गुरुमुखें करितां श्रवण । 'मी ब्रह्म' ऐसें बाणे पूर्ण । तेव्हां कळे मी हा कोण । कोटूनि आलों हें सारें ॥१७॥
तोंवरी मी हा देहचि सुंदर । समजुनी सजवी प्रेमपुरःसर । विषय सत्य मानुनी परिकर । होय रममाण त्यामाजीं ॥१८॥
जेव्हां सद्गुरु-उपदेश होय । वेदांतरहस्य कळों येय । तेंचि परोक्षज्ञान चिन्मय । ठसे पूर्ण हृदयांतरीं ॥१९॥
परी न होय अपरोक्षज्ञान । सद्गुरुकृपा झालियाविण । म्हणोनि सद्गुरु, मी एकचि समजोन । झिजवावें मन त्यामाजीं ॥२०॥
तेव्हां होईल सहजची कृपा । चुकवी जन्ममरणखेपा । यावरी नका धरूं कोपा । श्रोते सज्जन तुम्ही हो ॥२१॥
कीं श्रीसद्गुरूंसी जो न भजे । त्यावरी कृपा न करिती जे । तैसियां, सद्गुरु म्हणतां न साजे । भेद दिसे त्यांठायीं ॥२२॥
ऐशी शंका श्रोत्यांस येतां । उत्तर ऐका त्याचें आतां । भेद नाहीं त्यांच्या चित्ता । अणुभरीही निश्र्चयेंसीं ॥२३॥
मातेसी जैशीं आपुलीं बालकें । सर्वां समान ती त्यां देखे । तैसे श्रीगुरूंसी सर्व सारिखे । राजा रंक सारे पैं ॥२४॥
अणुभरी अभिमान नाहीं मनीं । मी - तूंपणाचे भेद दोन्ही । गेले त्यांचे हरपोनी । केवळ ब्रह्मचि ते बघती ॥२५॥
असो, मग गुरुकृपा होतां । अपरोक्षज्ञान होय तत्त्वतां । अपरोक्ष म्हणिजे काय हें आतां । परिसा भाविक श्रोते हो ॥२६॥
अपरोक्ष म्हणिजे निजस्वरूपाचा । अनुभव यावा प्रत्यक्ष त्याचा । कीं मी असें परिपूर्ण साचा । भरलों व्यापक सर्वांतरीं ॥२७॥
आणिक ऐका दृष्टांतासहित । साखर गोड रुचिकर बहुत । ऐसें कुणीतरी सांगतां आपुल्याप्रत । विश्वास उपजे निजमनीं ॥२८॥
ऐकुनि साखरेचें वर्णन । ध्यास लागे हृदयीं जाण । तीचि आठवे रात्रंदिन । जेणें ऐकिलें त्यासी पैं ॥२९॥
ऐशा वर्णनाच्या ध्यासें । अनुमानें मानसीं साखर दिसे । परी प्रत्यक्ष ऐशीच असे । याचा अनुभव ना येत ॥३०॥
आणि तियेची रुची कैसी । तीही न कळे आपुल्या जिव्हेसी । अनुमानेंचि माने मानसीं । अमुक रुचि म्हणोनियां ॥३१॥
अपरोक्ष म्हणिजे त्याचा स्वाद । चाखोनि बघतां अनुभव प्रसिद्ध । तद्वत् प्रत्यक्ष अनुभवासी वेद । म्हणती अपरोक्षज्ञान पहा ॥३२॥
तें व्हावया गुरुकृपेविण । सारीं साधनें निष्फळ जाण । देह झिजविला रात्रंदिन । तरीही न होय ज्ञान पहा ॥३३॥
त्यांच्या कृपेसी व्हावया पात्र । उपासना करावी अहोरात्र । तेव्हांचि होय परम पवित्र । अपरोक्षज्ञान तत्काळ ॥३४॥
म्हणोनि आधीं उपासना । करावी गुरुभक्ति हेचि जाणा । झिजवावें त्यांतचि आपुल्या मना । न विसंबतां क्षण एक ॥३५॥
एवं गुरुभक्ति हेंचि एक । साधन मुख्य निश्चयात्मक । तया पोटीं साधनें सकळिक । असती निश्र्चयें जाणा हो ॥३६॥
म्हणोनि गुरुप्रेम हेंचि एक । अपरोक्षज्ञाना पाववी देख । पुढें बोलूं विवरण सुरेख । श्रीगुरुकृपेंचि अणुमात्र ॥३७॥
मागील अध्यायीं केलें निरूपण । श्रीस्वामी आनंदाश्रम सघन । होतां पहा गुरुस्थानापन्न । संन्यासधर्म पाळिती ॥३८॥
अंगीं आलीं साधनें चारी । परी सद्गुरुसंग नसतां अंतरीं । कवणा विचारूं सन्मार्ग ये अवसरीं । म्हणोनि आळविती गुरुनाथा ॥३९॥
ऐसें मागील अध्यायीं कथिलें । आतां ऐका पुढती ये वेळे । कैसें वैराग्य तें कडक भलें । काय करिती तें ऐका ॥४०॥
लागला सद्गुरुचरणीं ध्यास । आळविती तयासी रात्रंदिवस । म्हणे देवा उद्धरीं दास । भक्तवत्सला करुणाकरा ॥४१॥
जय जय देवा सद्गुरुनाथा । तुजवांचोनि नाहीं त्राता । तूंचि देईं या मम चित्ता । स्थिरता शीघ्र दयाळा ॥४२॥
कुठें जाऊं कवणा विचारूं । कैसा होऊं यांतूनि पारु । कोण सांगेल मजला विचारु । आतां आत्मज्ञानाचा ॥४३॥
हें मठाचें बंधन मजला । परमार्थ करूं नेदी आपुला । कासया मीं संन्यास घेतला । आयुष्य व्यर्थचि जात असे ॥४४॥
तुझा संग नाहीं घडला । आत्मविचार कराया मजला । उपदेशमात्र अवचित जाहला । पूर्वपुण्येंकरोनी ॥४५॥
हे गुरुनाथा तुझी सेवा । नाहीं घडली अणुमात्र या जीवा । आतां काय करूं देवा । प्रभो सद्गुरो दयाळा ॥४६॥
धांव धांव श्रीसद्गुरुमाये । काय उपाय सांगा झणीं ये । नको बंधन मजलागीं हें । मठाचें निश्चयें ये समयीं ॥४७॥
प्रपंचबंधन नको म्हणोनि । साधक घेती संन्यास या जनीं । परी आम्हां मठस्थ - स्वामींलागोनि । अधिकचि बंधन हें सारें ॥४८॥
गृहस्थासी आपुलाचि एक । प्रपंच सांवरितां कष्ट अनेक । विश्रांती मनासी न मिळे देख । कंटाळे बहुत तो बापा ॥४९॥
आमुच्या शिरीं सर्व जनांचा । भार असे सर्वही साचा । यांतचि जन्म जाय आमुचा । न घडे परमार्थ अणुमात्र ॥५०॥
नको नको सर्वथा पसारा । चित्तासी न मिळे अणुमात्र थारा । तेव्हां काय करावें गुरुवरा । दावीं मार्ग परमार्थाचा ॥५१॥
ऐसें आळविती नानापरी । अश्रु वाहती घळघळ नेत्रीं । श्रीसद्गुरूंसी हृदयांतरीं । ध्याती घडीघडी प्रेमानें ॥५२॥
आणि म्हणती सद्गुरुराया । हृदयीं प्रगटूनि तूंचि माझिया । विचार सांगें मजला सदया । कृपा करोनि बाळावरी ॥५३॥
वारंवार करिती नमन । पुनरपि म्हणती सोडवीं बंधन । देईं आतां आत्मज्ञान । त्याविण जिणें व्यर्थचि हें ॥५४॥
यावरी श्रोत्यांसी येईल प्रश्न । कासया होय मठाचें बंधन । इतुकें कां कंटाळे मन । ऐका उत्तर त्याचें पैं ॥५५॥
परमार्था पाहिजे एकाग्र मन । त्यावीण न होय आत्मज्ञान । मठस्थस्वामी त्यांलागोन । भार थोर मठाचा ॥५६॥
सार्या आपुल्या भक्तजनांसी । सांभाळावें लागे त्यांसी । सकळांचे समाधान दिननिशीं । करितां सारा जन्म जाय ॥५७॥
दहा जनांचीं दहा मतें । तेव्हां बुचकळती यांचीं चित्तें । कवणाचें मत घ्यावें, यांतें । कठिण प्रसंग ऐसा हा ॥५८॥
स्वधर्मासी धरोनि निर्णय । करावा लागे त्यांसी उपाय । आणि न दुखवितां कवणाचें हृदय । समाधान करावें सर्वांचें ॥५९॥
एकाचें मत घेतां दुसर्यासी । खिन्नता येई त्यांच्या मानसीं । म्हणोनि युक्तीनें सकल जनांसी । समाधान करावें पैं ॥६०॥
तेव्हां करावा लागे विचार । सूक्ष्माहूनि सूक्ष्म अतितर । मग करावा निर्णय थोर । न दुखवितां कवणासी ॥६१॥
तेव्हां त्यांतचि घालावें मन । सूक्ष्म विचारीं रात्रंदिन । मग कैंचें परमार्थसाधन । विश्रांति न मिळे क्षणभरी ॥६२॥
याचि कारणें मठाचें बंधन । कठिण होय परमार्थालागुन । यावरी आणिक येईल प्रश्न । तुम्हांलागीं श्रोते हो ॥६३॥
कीं स्वामींसी इतुकें कासया । दुःख होय आपुल्या हृदया । जाहलें काय उणें हो तयां । अवतारी पुरुष असतां ते ॥६४॥
त्याचें ऐकावें उत्तर श्रोतीं । जरी ते उपजत ज्ञानी असती । देह घेतां त्यापरी वर्तती । प्रारब्धापरी तेही पैं ॥६५॥
तेवीं मनाचा धर्मही साचा । न चुके कदापि सर्वथा त्यांचा । कैसें तें ऐकाया मोर्चा । फिरवा येथें तुम्ही हो ॥६६॥
षड्विकार हे सर्वांलागीं । अज्ञां - ज्ञानियां समान जगीं । नाना व्याधी सुखदुःख भोगी । प्रारब्धापरी सकलही ॥६७॥
पहा अवतारी पुरुष म्हणोनी । चालणें बोलणें उपजल्याक्षणीं । न करी तो कदापि या जनीं । सर्वांपरीच वर्ते तो ॥६८॥
कीं मी एक ज्ञानी म्हणोनि । गर्व नसे अणुमात्र स्वमनीं । अन्यांपरी आपणही राहुनी । जोडिती परमार्थ प्रेमभरें ॥९॥
हळुहळू जन्मा आलियावरी । क्रमेंकरोनि क्रिया सारी । पालथें होणें, रांगणें त्याउपरी । चालूं लागे मग तो पैं ॥७०॥
तेणेंपरीच हाहू करोनी । पुढें क्रमानें बोले तो क्षणीं । बुद्धिचातुर्य हेंही वाढुनी । जगाचें ज्ञान त्यास कळे ॥७१॥
तैसें परमार्थींही अज्ञ होउनी । वर्ते जनांमाजीं धरणीं । हळुहळू पायरी एकेक चढोनि । मग तो पावे ज्ञानासी ॥७२॥
एवं जनांमाजीं देव । अवतरोनि दावी सर्व । लीला जनांसी निश्चयें अपूर्व । प्रपंचपारमार्थिक दोन्ही ॥७३॥
म्हणोनि सद्गुरुस्वामीरायें । आळविलें आपुल्या सद्गुरुमाये । हें ऐकूनि समजूं नये । स्वामीही अज्ञ आमुच्यापरी ॥७४॥
असो आतां ऐका पुढें । श्रीस्वामींसी पडलें सांकडें । कैसें करावें जाऊं कुणीकडे । ऐसा विचार चालविला ॥७५॥
एकांतवास केलियावीण । न होय कदापि आत्मज्ञान । म्हणोनि आतां जावें येथुन । तरीच सार्थक जन्माचें ॥७६॥
तेव्हां स्वामी पांडुरंगाश्रम । विचार सुचविती परम उत्तम । कीं सोडावा हा चित्रापुरग्राम । सार्थक होईल निश्चयेंसीं ॥७७॥
जगामाजीं हिंडतां निश्चित । कवणही मिळेल साधुसंत । तयापाशीं जावूनि त्वरित । कार्य आपुलें साधावें ॥७८॥
येथेंचि बैसतां न मिळे कवण । ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष म्हणोन । जावें धुंडीत सोडूनि हें स्थान । तीर्थयात्रा करावया ॥७९॥
परी येथील भक्तजन । जाऊं नेदी मजलागोन । यासी काय उपाय आन । न दिसे निश्चयें मजलागीं ॥८०॥
ऐसा विचार करोनि मानसीं । प्रार्थना करिती सद्गुरुपाशीं । देवा आतां तूंचि मजसी । पार घालीं दयाघना ॥८१॥
यापरी प्रार्थना करितां दिननिशीं । कांहीं दिन लोटले परियेसीं । सुचला विचार निजमानसीं । गुरुकृपेंचि ते समयीं ॥८२॥
तेव्हां आपुला भक्त उत्तम । विठ्ठल सुत्रायभटजी त्याचें नाम । तो असे भक्त भाविक परम । जिवलग साचा स्वामींचा ॥८३॥
तयालागीं एके दिनीं । पाचारिला एकांतीं बैसुनी । जो विचार आला स्वमनीं । बोलती काय तो ऐका ॥८४॥
बोलती सुब्राया आम्हां आतां । करावें स्वहित हीचि चिंता । रात्रंदिन लागली चित्ता । नाहीं अणुमात्र चैन पाहीं ॥८५॥
म्हणोनि आतां जावें येथुनी । मिळतील साधु ऐशिया स्थानीं । त्यांच्या मुखें वेदांत श्रवण करोनि । करावें हित आमुचें पैं ॥८६॥
आणि करावा एकांतवास । तरीच होईल सार्थक खास । नातरी मन हें आमुचें उदास । नलगे लक्ष कवणीकडे ॥८७॥
परी जाऊं न देती भक्त । म्हणोनि न कळवितां कवणाप्रत । जावें हेंचि दिसे उचित । ऐसें वाटे आम्हांसी ॥८८॥
येचि दिनीं अर्धनिशीं । येथूनि जावें निश्चयेंसीं । तरीच कार्य होईल परियेसीं । जाई पुढें तूं आधीं ॥८९॥
आम्हीं येऊं अर्धनिशीं सुखरूप । कवणाही न कळवितां झपझप । तुज भेटू जैनांच्या बस्तीसमीप । हाडवळी ग्रामींच्या ॥९०॥
ऐसें ऐकतां स्वामींचें वचन । सुब्रायभटजी बंदी चरण । आणि बोले 'प्रभो स्वामिन् । आज्ञा वंद्य आपुली ही ' ॥९१॥
सुत्रायभटजी श्रीस्वामींचा । निःसीम भक्त असे साचा । हृदयीं धरिली सद्गुरुवाचा । नाहीं कळविलें कवणाही ॥९२॥
जो असे खरा भक्त । तो नुलंबी आज्ञेप्रत । त्यांचें वचन असे जें गुप्त । तें न सांगे कदापि कवणाही ॥९३॥
हेंचि गुरुभक्तीचें लक्षण । आज्ञेपरी करी वर्तन । असो आतां सावधान । पुढें परिसा श्रोते हो ॥९४॥
मग गुरु शिष्य दोघे मिळुनी । विचार करिते जाहले ते क्षणीं । ठरविल्यापरी गेला निघोनि । सुत्रायभटजी आधींच ॥९५॥
गुरुवार रात्रीं अर्धनिशीं । स्वामी आले खिडकीपाशीं । तेथें बांधोनि सुंदर रशी । त्याच्या आश्रयें उतरले ॥९६॥
माडीवरोनि उतराया । खाशी युक्ती सुचली गुरुरायां । श्रीविठ्ठलअवतार मग तयां । युक्तीसी काय उणीव ॥९७॥
श्रीकृष्ण खचित सात्त्विक भोळा । परम शुद्ध प्रेमाचा पुतळा । परी नाना युक्ति ऐशी ही कला । कवणाही नाहीं त्यासमान ॥९८॥
असो मग उत्तरले वेगें । निजले हो भटजी अवघे । ऐशा समयीं चालूं लागे । कोंवळी मूर्ति पवनगतीं ॥९९॥
न घेतांचि वसनें बळकटी । त्वरित धांवली उठाउठीं । लागली मार्ग क्रमाया गोमटी । मूर्ति करणाही न दिसतां ॥१००॥
पहा कैसी सद्गुरुभक्ती । किती सांगूं आंगीं विरक्ती । तेणेंचि पार पडले निश्चितीं । नाहीं अनुमान यामाजीं ॥१०१॥
असो मग ते पवनगतीं । मार्गक्रमण करूं लागती । क्षण एक न घेतां विश्रांति । गेले सद्गुरुस्मरण करीत ॥१०२॥
चालिले एकटे निर्जन वनीं । देवचि दिसे सार्या त्रिभुवनीं । तेचि साक्षात् देव म्हणोनि । नाहीं भय त्यां कवणाचें ॥१०३॥
असो मग ते पोंचले स्थानीं । ठरविल्यापरी हाडवळीच्या वनीं । जैनाच्या वस्तीजवळी जाउनी । बघती चहुंकडे भटजीस ॥१०४॥
नाहीं भेटला सुब्राय । तेव्हां स्वामी सद्गुरुराय । म्हणती मानसीं करूं काय । कुठें शोधू रात्रीं या ॥१०५॥
सागर - गांवा जातां वाटेंत । हाडवळ्ळी हें खेडे वसत । हाडवळ्ळीच्या वनीं तेथ । जैन बस्ती असती पैं ॥१०६॥
हाडवळ्ळीमाजीं दोन बस्ती । एक पूर्वेस, पश्चिमेस दुसरी ती । एका ठायीं भटजी बैसती । स्वामींसी तिष्ठती ते समयीं ॥१०७॥
परी स्वामींस हें नाहीं विदित । भटजी कैंच्या बस्तीशीं बैसत । तेव्हां गेले स्वामी त्वरित । दुसर्या दिशेस हो पाहीं ॥१०८॥
भटजी गेले अन्य दिशेसी । चुकले उभयतां एकमेकांसी । भटजी वाट बघोनि ते दिवसीं । गेले आपुल्या ग्रामासी ॥१०९॥
असो इकडे स्वामीराय । सुब्रायभटजीस शोधिती लवलाह्य । फिरतां फिरतां शिणले पाय । न मिळे भटजी तरी पैं ॥११०॥
धुंडितां धुंडितां जाहली पहांट । श्रमले परी ना सोडिती हट्ट । वनींच वृक्षासी लावूनि पाट । बैसले एकांती ध्यानासी ॥१११॥
तहान भूक विसरूनि सारें । तेथेंच ठाण मांडिलें बरें । आज तरी येईल त्वरें । सुब्रायभटजी या स्थानीं ॥११२॥
म्हणोनि अंधार होई तोंवरी । तेथेंच वास केला निर्धारीं । जरी रात्र जाहली बरी । तरीही नाहीं भटजी पैं ॥११३॥
मग उठले तेथूनि झडकरी । हाडवळ्ळी - ग्रामांतरीं । तेथील जैन पाटिलाच्या घरीं । गेले हळुहळू लपोनियां ॥११४॥
आणि बोलती पाटिलापाशीं । मी एक नवाईत व्यापारी परियेसीं । आतां जाऊं कुठें ये निशीं । म्हणोनि झोंपाया आलों पैं ॥११५॥
तुमच्या पडवीवरी थोडी । जागा देतां कां पांचघडी । पहांडे उठोनि जाईन तांतडी । माझिया ग्रामी तत्काळ ॥११६॥
तेव्हां पाटील म्हणे अवश्य । झोंपूनि उठा सावकाश । इतुकें बोलूनि अंथरावयास । दिधली चटई प्रेमानें ॥११७॥
अंधारी स्वामींचें न देखिलें मुख । परी मनुष्यधर्म म्हणोनि देख । जागा चटई दिधली सुरेख । जैन पाटील येणें पें ॥११८॥
तेथुनी मग अरुणोदय । होतांचि उठले सद्गुरु सदय । लगबगेंसीं पुढती जाय । सद्गुरुस्मरण करीत मनीं ॥११९॥
असो, इकडे शिराली - ग्रामीं । मठांत नाहीं सद्गुरुस्वामी । ऐसी पसरतां जईंथईं बातमी । दुःखित झाले जन सारे ॥१२०॥
मठांतील भटजींसी । अधिकचि दुःख जाहलें मानसीं । हुडकाया लागले लगबगेंसीं । भटजी सारे हो तेवीं ॥१२१॥
जिकडेतिकडे करिती तार । शोधार्थ धांवती जन समग्र । भटजी, नोकर, गृहस्थ सर्वत्र । शोधिती स्वामींलागीं पैं ॥१२२॥
परी नाहीं लागला पत्ता । म्हणोनि लागली सकलांसी चिंता । म्हणती काय करूं आतां । प्रार्थिती भवानीशंकरासी ॥१२३॥
म्हणती देवा दयासागरा । तूंचि स्वामींसी पाठवीं माघारां । गुरूविण नाहीं भक्तां आसरा । हें नलगे सांगावें तुजलाग॥१२४॥
तूंचि स्फुरवुनी त्यांच्या मानसीं । माघारां आणीं झडकरी त्यांसी । ऐसी प्रार्थना चरणांपाशीं । भवानीशंकरा गुरुदेवा ॥१२५॥
ऐसी करुणा भाकुनी भक्तजन । लागले तात्काळ कार्यालागून । आतां काय करावें आपण । कवण उपाय योजावा ॥१२६॥
मठाचे मणेगार शुक्ल मंगेश भट्ट । यांनीं केला विचार उत्कृष्ट । ज्योतिषादि बघोनि झटपट । करिती शोध सत्य पहा ॥१२७॥
मग मठाचे अनंत भट्ट । उपनाम त्यांचें बड्डुकुळी श्रेष्ठ । त्यांचा पुत्र आत्माराम ज्येष्ठ । यासी केला प्रश्न पहा ॥१२८॥
आत्माराम भटजीस एक । अंजन ही विद्या सुरेख । अवगत होती त्यासी देख । तें बघावें ऐसें योजिलें पैं ॥१२९॥
आत्माराम भटजीचा पुत्र । दहा वरुषांचे बाळ पवित्र । त्याचें नाम नागेश तो पात्र । त्यासी अंजन लागतसे ॥१३०॥
अंजन लावोनि नागपत्रीं आरसा या तळहातांत । दीपापाशीं धरितां जोत होय प्रतिबिंबित । तेथ नेटानें बघतां मारुती आदि उपास्य दैवत । दिसती, दाविती प्रश्नदृश्यें ॥१३१॥
विचारितां कवणही प्रश्न । लिहून दावी मारुती आपण । दावी दृश्यें प्रश्नास धरोन । संशय नाहीं यामाजीं ॥१३२॥
परी तें नाहीं सकलांसी दिसत । कुणी एकासी असे लागत । आत्मारामभटजीचा सुत । त्यासी लागत त्या समयीं ॥१३३॥
असो विचारितां अंजनामाजीं । आनंदाश्रमस्वामी गुरुजी । हाडवळ्ळीच्या वनांत आजी । असती ऐसें सांगे तो ॥१३४॥
इतुकें सांगतां नागेश येणें । गाडी जुंपविली मंगेशभटजीनें । सागरग्रामा जावया त्वरेनें । कांहीं जनांसी घेऊनियां ॥१३५॥
मंगेशभट्ट अनंतभट्ट । आदिकरोनि गेले थेट । सागरग्रामा चालिले झटपट । जईंतईं - बघत स्वामींतें ॥१३६॥
ज्या दिवशीं पाटील - सदनीं । स्वामी निजले होते त्या दिनीं । मंगेशभटजी आदिकरोनि । जावया निवाले सागरासी ॥१३७॥
येतां वाटेंत पाटील - सदनीं । मनुष्य पाठविला मंगेशभटजींनीं । तो गडी विचारी ओरडुनी । कीं स्वामींस पाहिलें का तुम्हीं ॥१३८॥
पाटील म्हणे मीं ना पाहिलें । परी स्वामीराय तये वेळे । तेथेंच पडवीवरी निजले । नाहीं विदित पाटिलासी ॥१३९॥
तया बापुड्यासी काय विदित । जो व्यापारी नवाइत । तोचि स्वामीं सद्गुरुनाथ । कपटनाटकी कृष्ण असे ॥१४०॥
मठाचा गडी आणि पाटील । दोघेही जें बोलिले सकल । स्वामींनीं ऐकिलें होतें समूळ । परी ना बोलिले अणुमात्र ॥१४१॥
पहा कैसी आंगीं विरक्ती । तेवींच मठ सोडूनि जाती । वाटेंत जईंतईं कष्ट सोशिती । वर्णन कराया अशक्य ॥१४२॥
असो मग ते सारे जन । गेले सागरासी निघोन । तपास करिती पूर्ण । ना मिळती कवण्याही स्थानीं ते ॥१४३॥
इकडे शिरालीहूनि आणिक । भटजी आत्माराम म्हणे देख । मीही शोधार्थ निश्चयात्मक । जावें हेंचि उचित असे ॥१४४॥
आणि तार केली सागरा । कीं मीही शोधार्थ जातों त्वरा । हाडवळ्ळीग्रामों पाटिलांच्या घरा । जाउनी चहुंकडे बघतों मी ॥१४५॥
सागराहूनि गाडीवाला । शिरालीस यावया निघाला । वाटेंत स्वामी भेटले त्याला । आनंदला मानसीं अनिवार ॥१४६॥
आत्मारामभटजी हाडवळ्ळीस । आले म्हणोनि विदित असे त्यास । म्हणोनि धांवला लगबगें खास । पाटिलाच्या त्या स्थानीं ॥१४७॥
मोटारीपरी बैलगाडी । हांकिली तेणें परम तांतडीं । पाटिलाच्या घरीं सोडी । बैल आपुले क्षणमात्र ॥१४८॥
करितां चौकशी पाटिलापाशीं । भटजी गेले अन्य स्थळासी । तेथें धांवत सुटला परियेसीं । गाडी घेउनी तत्काळ ॥१४९॥
आत्मारामभटजींस गांठुनी । अमुक ठायीं स्वामी मिळाले म्हणोनी । सांगतां भटजी आनंदूनि मनीं । सांगती आपुल्या रयतासी ॥१५०॥
म्हणती धांवत जाई येथुनी । भेट घेईं स्वामींची झणीं । मी येईं तोंवरी पडूनी । राहीं त्यांच्या पदकमळीं ॥१५१॥
असो त्यासी धाडिला पुढती । मागें गेला नागेश पवनगती । आपण गाडीवरी बैसोनि जाती । भटजी लगबगें ते समयीं ॥१५२॥
कीं त्यांच्या पायासी होती सूज । चालाया नच होय म्हणूनि सहज । गाडीवरी बैसुनी काज । कराया निघाले प्रेमभरें ॥१५३॥
असो तिकडे गेला रयत । स्वामींस गांठाया लगबगें धांवत । अंतर्ज्ञानी स्वामी फिरत । कळवळोनी माघारां ॥१५४॥
भेटला रयत स्वामींलागीं । साष्टांग नमन केलें मार्गीं । मूर्ति बघतांचि त्यांच्या अंगीं । प्रेम भरलें अनिवार ॥१५५॥
कंठ जाहला सद्गदित । रोमांच अंगीं उभे राहत । घळघळ अश्नु नेत्रीं वाहत । रयताच्या त्या तेव्हां हो ॥१५६॥
आणि म्हणे स्वामी सदया । थांबा जाऊं नका येथूनियां । स्फुंदस्फुंदोनी रडत हें पाहुनियां । सद्गुरुस्वामी कळवळले ॥१५७॥
आणि म्हणती कां बा रडसी । कोण कुठिल तूं सांग आम्हांसी । येरू बोले रयत मी त्यांसी । वड्डुकुळी आत्मारामांचा ॥१५८॥
ते येती गाडीवरी मागें । नागेश येत धांवत वेगें । मज पाठविला त्याचिया संगें । आलों पुढती धांवुनियां ॥१५९॥
ऐकिल्याक्षणीं रयताचे शब्द । क्षणभरी स्वामी राहिले स्तब्ध । तें बघुनी रयता झाला आनंद । पाहे टकमकां मुखकमळ ॥१६०॥
तोंवरी नागेश धांवत येत । पितृवाक्यें थेट स्वामिषायां झोंबत । तयामागें भटजी गाडींत । पातला सन्निध स्वामींच्या ॥१६१॥
आणि स्वामींचे चरण घट्ट । धरिता जाहला आत्मारामभट्ट । आणि म्हणे गुरुराया झटपट । यावें आपुल्या स्थानासी ॥१६२॥
केला साष्टांग प्रणिपात । म्हणे सद्गुरो आपण कृपावंत । नका जाऊं अन्य स्थळांत । आम्हां अज्ञांसी टाकुनियां ॥१६३॥
आपण जातां शिराली सोडुन । मठ कासया आम्हांलागुन । शोभा कैंची आपुल्यावीण । मठासी बा गुरुराया ॥१६४॥
तुजवीण अन्य आसरा । नाहीं आम्हां अज्ञ पामरां । दावील कोण मार्ग खरा । आपणचि सांगा गुरुराया ॥१६५॥
बहुत कासया बोलूं आतां । हे चरण न सोडीं मी सर्वथा । येऊं ऐसें अभयवचन देतां । तेव्हांच सोडीन चरण हे ॥१६६॥
ऐसी प्रार्थना करितां तेणें । द्रवलें चित्त श्रीगुरूंचें दयेनें । अवश्य म्हणोनि हास्यवदनें । ऊठ येतों म्हणती ते ॥१६७॥
पहा कैसे सद्गुरुराय । केवल प्रेम बघती सदय । भक्तप्रेमानें बांधले जाय । तेवींच अवश्य म्हणती पहा ॥१६८॥
लहान बाळ आपुल्या पित्यासी । म्हणे मी जाऊं ना दें तुजसी । मीं धरिलें असतां कैसा जासी । सोडीना हात तव बाबा ॥१६९॥
तेव्हां बाप राहे तेथ । पुत्रप्रेमासाठीं हांसत । सोड रे बाळा म्हणोनि विनवित । प्रेमानें तो अडला हो ॥१७०॥
मुलाचा हात सोडवुनी घ्यावया । काय कष्ट होतील तया । परी तो न जातांचि, परतुनियां । येतो संगें बाळाच्या ॥१७१॥
तैसी आमुची सद्गुरुमाय । जावया त्यांसी कवणाचें भय । केवळ भक्तांच्या प्रेममय । वृत्तीसी भुलोनी अडले हो ॥१७२॥
साक्षात् श्रीविष्णूचा अवतार । दया - क्षमा - शांतीचे सागर । तेवींच उठले करोनी निर्धार । जावया मठासी माघारां ॥१७३॥
हाडवळ्ळीच्या पाटिला - घरीं । आधींच कळविलें असे निर्धारीं । मी स्वामींसी घेउनि येईं तोंवरी । दूध शहाळीं आणा पैं ॥१७४॥
ते दिवशीं होता रविवार । नारळ काढू नये हा आचार । पूर्वजांचा असे थोर । हें विदित जरी पाटिलासी ॥१७५॥
तरी स्वामींसाठीं शहाळीं काढितां । दोष नाहीं कदापि सर्वथा । ऐसें म्हणोनी पाटिलें तत्त्वतां । काढिलीं शहाळीं प्रेमभरें ॥१७६॥
सद्गुरुसंनिधीं कांहीं एक । विधिनिषेध कवण ना देख । सद्गुरु गुणदोषातीत निश्चयात्मक । तेवींच भय ना कवणही ॥१७७॥
असो मग स्वामी सद्गुरुराय । आणि बापलेंक भटजीद्वय । रयत आदिकरोनी ते समय । आले परतुनी हाडवळ्ळीस ॥१७८॥
येतां गाडी हाडवळ्ळीग्रामांत । थांबविली ठरविल्यापरी तेथ । आला पाटील प्रेमानें धांवत । सद्गुरुनाथां भेटाया ॥१७९॥
आणि करोनी साष्टांग नमन । म्हणे स्वामिन् कृपा करोन । आमुच्या सदनीं करावें आगमन । पावन होईल गृह माझें ॥१८०॥
तेव्हां बदले सद्गुरुनाथ । आलों होतों तुमच्या गृहांत । शुक्रवारी रात्रीं येथ । पहुडलों आम्ही निश्चयेंसीं ॥१८१॥
तेव्हां त्यास आठवलें त्वरित । आला होता एक नवाईत । तेचि हे सद्गुरुनाथ । समजला मानसीं तत्काळ ॥१८२॥
आणि तेणें केला आक्रोश । स्फुंदस्फुंदोनी रडे बहुवस । आणि म्हणे अपराध विशेष । घडला देवा मजकडूनी ॥१८३॥
काय मीं मूर्खें केला अविचार । मुख न बघतांचि निजविलें बाहेर । चटई दिधली फाटकी शीघ्र । मी निजलों सुखानें गादीवरी ॥१८४॥
मी जेविलों पोटफुटे तोंवर । उपवासी राहिलां आपण रात्रभर । ऐसा मी अज्ञ पामर । धिक्कार असो मजलागीं ॥१८५॥
आतां देवा मज पामरा । क्षमा करावी आपण कृपासागरा । आपणचि अज्ञजनांचा आसरा । करावा स्वीकार सेवेचा ॥१८६॥
करावें प्राशन पाणी नारळ । दूध केळीं घ्यावें ये वेळ । तेव्हां गहिंवरोनी प्रेमळ । नाहीं अपराध तव म्हणती ॥१८७॥
आणि त्याच्या समाधानार्थ । एक शहाळे घेतलें तेथ । प्रेमानें आशीर्वाद देत । सद्गुरुराज पाटिलासी ॥१८८॥
इतुक्यामाजीं जाहली रात्र । अंधार पसरला सर्वत्र । तरीही कित्येक जन आले शीघ्र । दर्शनालागीं स्वामींच्या ॥१८९॥
एकचि गाडी सोबतीवीण । जावया वाघांचे भय म्हणोन । नाहीं हांकीत कोणीही जाण । परी हांकिली गाडी तैं ॥१९०॥
पोहोंचले शिरालीस सुरक्षित । सद्गुरुकृपेंचि निश्चित । रात्रीं तीन प्रहर होतां मठांत । आले दयाळ पहा हो ॥१९१॥
गडबडोनि उठले मठीं जन । वाजविला नगारा, घंटा घण घण । आनंद थोर जाहला जाण । सार्या जनांलागीं हो ॥११२॥
ऐकुनी नगारा - घंटारव । उठला सारा शिराली गांव । घेतली सकळीं मठासी धांव । प्रेमासरसी तत्काळ ॥१९३॥
मग सूर्य उगवल्याक्षणीं । तारा पाठविल्या गृहस्थांलागुनी । जिकडे तिकडे अन्य स्थानीं । आले गुरुराज म्हणोनि ॥१९४॥
पहा कैसे सद्गुरुनाथ । प्रार्थितांचि द्रवलें त्यांचे चित्त । तेवींच आले धांवत । मठामाजीं माघारां ॥१९५॥
खचितचि मठाच्या भटजींचे । उपकार बहुतचि झाले साचे । नातरी सद्गुरुस्वामी यांचे । चरण ना लाभते आम्हांसी ॥१९६॥
असो आतां पुढील अध्यायीं । स्वामींचे हृदय कोमल पाहीं । शांत उदार सद्गुण सर्वही । हेंचि वर्णूं गुरुकृपें ॥१९७॥
परमहंस आनंदाश्रम । शिवानंदतीर्थस्वामी उत्तम । त्यांच्या कृपाप्रसादें एकोनपंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१९८॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां लाभती साधनें चार । एकोनपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१९९॥
अध्याय ॥४९॥
ओव्या ॥१९९॥
ॐ तत्सत्- श्री सद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2024
TOP