मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥५५॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५५॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशिवानंदतीर्थस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानी शंकराय नमः ॥ॐ॥
जय जय देवा श्रीगुरुराया । शिवानंदतीर्थस्वामी सदया । व्यापक अससी तूं बा जगीं या । काय वर्णूं तुजला हो ॥१॥
जगामाजीं असे जें 'अस्तित्व' । त्यांतचि वास करिसी तूं सदैव । आणि 'भाति' जें कळणें अपूर्व । त्यामाजीं सुंदर विलससी ॥२॥
जी असे जगीं 'प्रीति' । त्यांतही तूंचि राहसी निश्चितीं । ऐशिया तुजला वर्णाया स्फूर्ति । येईल कैसी कोठून ॥३॥
ऐसा तूं माझा सच्चिदानंद । तुझी महिमा असेचि प्रसिद्ध । काय वर्णील हा मतिमंद । अगाध लीला तव पाहीं ॥४॥
तुजमाजीं नाहीं द्वैत । अससी तूं वा शंकर साक्षात । राहुनी माझ्या हृदया - आंत । वदवीं सद्गुण तूंचि बा ॥५॥
असो आतां श्रोते हो  सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । स्वामी आनंदाश्रम दयाघन । यांचें वर्णन केलें पैं ॥६॥
एवं ऐसे आमुचे गुरुमहाराज । वर्णन केलें जें त्यांचें सहज । नऊही आश्रम एकरूप मज । दिसताती जाणा निःसंशय ॥७॥
तेवींच माझे गुरुवर्य । श्रीमत्परमहंस सदय । 'शिवानंदतीर्थ स्वामी' होय । नामाभिधान त्यांचे हो ॥८॥
अध्याय समाप्तीच्या समयीं । शिवानंदतीर्थ सद्गुरुमाई । यांचा परिचय श्रोतयां पाहीं । करवितों कर्तव्यबुद्धीनें हो ॥९॥
आमुचे चित्रापुर मठाधीश । आणि शिवानंदतीर्थ परमहंस । सर्व एकरूप असती खास । अनुभवसिद्ध हें असे ॥१०॥
माझ्या मातेसी एकेकाळीं । स्वप्नामाजीं दिसले निजस्थळीं । स्वामी सर्व आले जवळी । नवही आश्रम तेधवां ॥११॥
तेवींच सद्गुरु शिवानंदतीर्थ । हेही आले त्यासमयींच तेथ । आद्य स्वामी परिज्ञानाश्रम बोलत । माझिया मातेजवळी हो ॥१२॥
कीं सारे दहाही स्वामी । एकरूपचि आहों आम्ही । न धरीं संशय अंतर्यामीं । ऐसें बोलिले प्रेमानें ॥१३॥
इतुकें बोलुनी झाले अदृश्य । जागी होतां माता तियेस । आनंद जाहला बहुवस । हें वेगळे सांगावें न लगेचि ॥१४॥
सांगती झाली स्वप्न अद्भुत । ऐकतां आनंदलें माझें चित्त । असत्य नव्हे स्वप्न निश्र्चित । एकरूप सकल खचित ते ॥१५॥
मजही ऐसे अनुभव अमित । आले निश्र्चयें सांगतों खचित । त्यांत एक परम अद्भुत । कथितों आतां परिसावें ॥१६॥
एके काळीं शिवानंदतीर्थ । यांच्या संनिध असतां मी, तेथ । ना माध्यान्हसमयीं सद्गुरुनाथ । विश्रांति घ्याया पहुडले ॥१७॥
तेव्हां मी जवळी बैसलों स्वस्थ । कांहीं एका कामानिमित्त । कल्पना आली मम हृदयांत । काय ती सांगूं ये समयीं ॥१८॥
की मज आतां चरित्र लिहाया । उसंतचि नसे अणुमात्र ये ठाया । अन्य काम धरिले हातीं या । शिवानंदस्वामी यांचे हो ॥१९॥
वारंवार व्याधि मजप्रत । त्यामुळे लिहाया नाहीं होत । व्याधि नसे विशेष प्रस्तुत । परी न मिळेल उसंत ये समयीं ॥२०॥
ग्रंथ न होतां पहा पूर्ण । क्षोभतील आनंदाश्रम गुरु पूर्ण । मजवरी आतां निश्चयेंकरोन । ऐसी कल्पना मज आली ॥२१॥
मग पाहिलें मदन मनोहर । शिवानंदतीर्थ यांचें साचार । बघतां दिसले आनंदाश्रम गुरुवर । प्रत्यक्ष जाणा हो पाहीं ॥२२॥
एक क्षणभरी स्तब्ध बैसुनी । बघतचि राहिलों न्याहाळोनी । तेव्हां आनंदाश्रम हेचि नयनीं । दिसूं लागले त्या ठायीं ॥२३॥
वारंवार पाहिलें वदन । तरी तैसेंचि दिसे जाण । पुनरपि बघतां शिवानंद कृपाघन । हेचि निजले तेथ पहा ॥२४॥
तेव्हां आश्र्चर्य वाटलें बहुत । कळली खूण ती मजप्रत । कीं आनंदाश्रम - शिवानंदतीर्थ । एकरूप ऐसें दावियलें ॥२५॥
असो आतां परिचय त्यांचा । करूनि देऊं श्रोत्यांसी साचा । कोण कोठील सद्गुरु आमुचा । सांगूं आतां किंचित हो ॥२६॥
कारवार ग्रामीं बाड या स्थानीं । पद्मनाभ तीर्थस्वामी यांनीं । मठ बांधिला सुंदर करोनि । असे प्रख्यात तें स्थान ॥२७॥
ते बालसंन्यासी परम प्रख्यात । दत्तात्रेय - अवतार निश्र्चित । ब्रह्मनिष्ठ जीवन्मुक्त । परमहंस होते ते ॥२८॥
महिमा असे त्यांची अपार । तीव्रबुद्धि परम चतुर । ऐसे ते सद्गुरुवर । कारवारगांवीं होते पैं ॥२९॥
दत्तमूर्ति स्थापिली त्यांनीं । वेदान्त - प्रवचन दरदिनीं । भजन पालखी उत्सव आदिकरोनि । नानापरी ठेवियले ॥३०॥
ऐसे ते पद्मनाभतीर्थ । त्यांचे हे शिष्य प्रख्यात । 'शिवानंदतीर्थ' नामें असत । जीवन्मुक्त पुण्यात्मे ॥३१॥
धारवाड - प्रांतीं बंकापुर । या गांवींचे देशस्थ ब्राह्मण थोर । साक्षात् कैलासींचा शंकर । दीक्षितवंशीं अवतरलासे ॥३२॥
त्यांचे अणुमात्र चरित्रकथन । कराया इच्छा उद्भवली म्हणोन । संक्षिप्त कथितों तुम्हांलागून । श्रोते सज्जन भाविक हो ॥३३॥
त्या बंकापुर - ग्रामांत थोर । होता एक विप्रवर । 'तीर्थदीक्षित' म्हणती त्या नर । परम भाविक सज्जन तो ॥३४॥
असे तो गीर्वाणभाषानिपुण । विद्या आणि विनय - संपन्न । तेवींच वाक्चातुर्य आणि सुशीलतादि गुण । असती अंगीं त्याच्या पैं ॥३५॥
संस्कृत पढण्या निरंतर । त्याच्या जवळी येती नर । प्रेमें शिकवी दीक्षित सत्वर । अतिनिर्लोभें सकलांसी ॥३६॥
साधु - संतांवरी विश्वास । म्हणोनि जाय करोनि साहस । कुणीही साधु भेटतां तयास । कधीं कधीं जाय त्यासंगें ॥३७॥
ऐसें असतां एके काळीं । तडस - ग्रामीं जाऊनि त्या स्थळीं । एका सत्पुरुषाजवळी । राहिला पहा तीर्थपति ॥३८॥
प्रेमपुरःसर निष्कामें दीक्षित । त्यांची सेवा करी बहुत । साधु  होतां व्याधिग्रस्त । होता त्यांच्याजवळी हा ॥३९॥
दिवसेंदिवस होऊनि क्षीण । संनिध पातलें तयाचें मरण। तेव्हां दीक्षित म्लानवदन । करोनि बैसला त्या समयीं ॥४०॥
तें बघोनि साधु त्याजला । म्हणे कासया चिंता तुजला । तुझ्याचि ग्रामीं अवतरेल आपुला । साक्षात् भगवान निश्र्चयेंसीं ॥४१॥
यावरी बोलती तीर्थ - दीक्षित । बंकापुरीं कुणीकडे अवतरत । परमात्मा साक्षात् भगवंत । कोणत्या गृहीं येईल हो ॥४२॥
यावरी साधु बोलती ऐक । तें मी आतां न सांगूं सकळिक । अनुभवेंचि तुजला देख । समजेल पुढती आपैसें ॥४३॥
अनायासें घडेल तुजसी । सत्संगति निश्चयें आपैसी । इतुकें वोलूनि साधु परियेसीं । जाहले समाधिस्थ तत्काळ ॥४४॥
मग गेले तीर्थदीक्षित । बंकापुरीं पोंचले त्वरित । कथिला निजकांतेसी वृत्तांत । साधुंचा आशीर्वाद ते समयीं ॥४५॥
तेव्हां गेले कांहीं दिन । कृष्णाबाई इजलागोन । गर्भवती झाली ती पूर्ण । अगणित पुण्य तियेचें ॥४६॥
तीन अपत्यें होतीं आधीं । साधुवचन वृथा न होय कधीं । पुनरपि गर्भिणी होतां बुद्धि । झाली शांत तियेची ॥४७॥
गर्भापरी डोहाळे होती । गर्भ तो साक्षात् भगवान - मूर्ति । तेव्हां शांतता सहजचि येई ती । मातेच्या अंगीं पहा हो ॥४८॥
असो बहुत विस्तार कासया । नऊ मास पूर्ण होऊनियां । प्रसवली कृष्णाताई अवनीं या । अवतरला साक्षात् सदाशिव ॥४९॥
सत्राशें ब्याण्णव शकांतरीं । प्रमोद संवत्सर बुधवारीं । आषाढ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं । प्रदोषकाळीं प्रसवली ॥५०॥
जाहलें सुंदर पुत्ररत्न । येई पहायास दीक्षित धांवोन । अंतरीं स्मरोनि साधूचें वचन । मुखकमळ न्याहाळी ॥५१॥
मुखावरी विलसे तेज । शांततेचें पहा सहज । तीर्थदीक्षित म्हणे मी आज । धन्य जाहलों जगीं या ॥५२॥
मग होतां दिवस द्वादश । नामकरण केलें पुत्रास । 'शिव' ऐसें शोभे बहुवस । भोळा शंकरचि तो जाणा ॥५३॥
असो एवं हा गुरुराय । साक्षात् शंकरचि हा निश्चय । परम शांत सात्त्विक हृदय । अति कोमल त्यांचें पैं ॥५४॥
उपजल्यापासुनी शांत हृदय । जरी लहान बालक होय । तरी वैराग्य - लक्षण दिसोनि येय । कैसें तें ऐका अणुमात्र ॥५५॥
तीन वरुषांचे बाळ असतां । सर्वही विषयीं वैराग्य चित्ता । जननीनें खावया देतां । दे काढोनि अन्यासी ॥५६॥
सदनामाजीं मुलें बहुत । लहानमोठीं होतीं त्यांप्रत । रडतां खावयालागीं देत । आपुल्याजवळील प्रेमानें ॥५७॥
माय देखोनि म्हणे बा शिवु । तुज नको कां रे खाऊ । किती बा तुझा शांत स्वभावु । कीं आपुलें देसी अन्यासी ॥५८॥
यावरी बोले हास्यवदनें । तो रडूनि म्हणतो कीं 'मजला हें उणें'। त्यासि देतांचि आनंदानें । राहीन मी गे निश्चयेंसीं ॥५९॥
पहा तीन वरुषांचे बाळ । हृदय त्याचें किती कोमल । न बघवे अन्यांची तळमळ । आपण कष्ट सोशीत ॥६०॥
येणेंपरीच सर्वही विषयीं । अलिप्त राहती जन्मतः पाहीं । आणि देवाची भक्ति लवलाहीं । करूं लागले बहुत पहा ॥६१॥
पुराणश्रवण कीर्तन भजन । यांतचि रमती रात्रंदिन । कर्तव्यापरी घेतलें शिक्षण । परी नामस्मरणीं मन त्यांचें ॥६२॥
कानडी शाळेचे शिक्षक । होऊनि राहिले दिवस कित्येक । मन हें ठेविती निश्र्चयात्मक । सदा सर्वदा परमार्थीं॥६३॥
वडिलांची आज्ञा शिरसा मान्य । म्हणूनि करोनि घेतलें लग्न । परी असती सदा मग्न । परमार्थींच ते पहा हो ॥६४॥
नागनूर या ग्रामामाझारीं । शिक्षक झाले कांहीं काळवरी । नाम स्मरती अखंड अंतरीं । न विसंबिती क्षण एक ॥६५॥
करिती नित्यनेमें भजन । एकादशीसी हरिकीर्तन । येती ऐकाया बहुत जन । परम प्रीतीनें त्या समयीं ॥६६॥
न मिळती कदापि जनांच्या संगीं । नच जाती वाईट मार्गी । अन्यासीही लाविती वेगीं । परमार्थासी लीलेनें ॥६७॥
ऐसें यांचे बघोनि वर्तन । देवचि हा ऐसें समजोन । विश्वास ठेविती तेथील जन । यांच्या चरणीं दिनरजनीं ॥६८॥
ऐसें असतां तेथें नजीक । होंबळ्ळी नामें क्षेत्र देख । तये ठायीं संन्यासी एक । आले अवचित पहा हो ॥६९॥
त्यांचे नांव 'पद्मनानतीर्थ' । कारवारीं 'वाड मठ' ज्या म्हणत । त्यांनींच स्थापिला तो तेथ । असो पुढें परिसा हो ॥७०॥
तेथें गेले शिवानंदतीर्थ । आणि घेतलें दर्शन त्यांचें त्वरित । कांहीं दिवस राहुनी तेथ । माघारे आले नागनुरा ॥७१॥
लागला सद्गुरुचरणांचा ध्यास । कीं उपदेश कधीं मिळेल आपुल्यास । ऐसें हृदयीं रात्रंदिवस । चिंतिताती ते समयीं ॥७२॥
शिक्षकाचें असतां काम । कैसे जातील सोडुनी ग्राम । वाढूं लागलें अधिकचि प्रेम । गुरुचरणांचे हृदयीं हो ॥७३॥
कांहीं दिन लोटल्यावरी । पद्मनाभतीर्थ नुलवी - माझारीं । जाऊनि राहिले ऐशा अवसरीं । कळला वृत्तांत यांना हो ॥७४॥
नागनुरराहूनि मासनकट्टी । येथे बदली झाली उठाउठीं । तेव्हां लागली चिंता मोठी । शिवानंदस्वामींसी ॥७५॥
कीं आतां न मिळे गुरुचरण । वरीवरी न होय मजला दर्शन । नोकरी हेंचि विघ्न दारुण । परमार्थासी एक खरें ॥७६॥
ऐसें म्हणोनि केला विचार । लिहिला राजीनामा सत्वर । पाठविला मग तो लवकर । अधिकार्‍यापाशीं हो जाणा ॥७७॥
आणि गेले नुलवीमाझारीं । पद्मनाभतीर्थस्वामींस अंतरीं । धरोनि राहिले ते सत्वरीं । सेवा करीत त्यांची हो ॥७८॥
केली सेवा प्रेमें अपार । उपदेश घेतला श्रद्धापुरःसर । झालें ब्रह्मज्ञान तयां सत्वर । पावले जीवन्मुक्तदशा ॥७९॥
गुरुभक्ति अंगीं किती म्हणोनि । वर्णन कराया न पुरे मेदिनी । संक्षिप्त बोलूं गुरुकृपेंचि झणीं । परिसा सावध श्रोते हो ॥८०॥
तेथुनी स्वामी पद्मनाभतीर्थ । कारवारीं जाऊनि राहात । बांधिला मठ सुंदर तेथ । दत्तमूर्ति स्थापियली ॥८१॥
तेथे गेले त्यांच्यासंगें । शिवानंदही आपण वेगें । आप्तमोह सारूनि मागें । राहिले कांहीं काळवरी ॥८२॥
करिती सेवा रात्रंदिवस । वाड मठाचीं कामें बहुवस । उच्च नीच न बघतां साहस । करोनि कार्य करिती ते ॥८३॥
कवणही असो सद्गुरुसंनिध । त्यांचीही सेवा करिती बहुविध । न ठेवितां कवणाही शब्द । बहुप्रेमानें वागती ते ॥८४॥
सर्व जनांसी प्रेमपूर्वक । आप्तांपरी मानिती देख । जरी त्यांची असे चूक । लक्ष न देती अणुमात्र ॥८५॥
सर्वांवरी समान दृष्टि । मत्सर द्वेष नाहीं पोटीं । कठोर वचन न बोलती ओठीं । कवणालागीं कदापिही ॥८६॥
सद्गुरुमूर्ति न विसरती । रात्रंदिवस सेवा करिती । निष्काम निर्लोभें झिजविती । शरीर आपुलें निरंतर ॥८७॥
आज्ञेपरी करिती वर्तन । न चुकती कदापि त्यांत जाण । जरी जाऊं लागला प्राण । आज्ञा नुल्लंघिती अणुमात्र ॥८८॥
ज्यासी असे गुरुभक्ति थोर । तो नुल्लंघी आज्ञेसी अणुमात्र । गुरुवीण त्यासी न दिसे भूवर । अन्य वस्तू श्रेष्ठ कधीं ॥८९॥
एवं करिती गुरुभक्ति अनिवार । नाहीं बैसती कदापि समोर । बोलतां सद्गुरूंचें वदन मनोहर । न बघतां मान वांकविती ॥९०॥
भयभक्ति नम्रता शांति । मृदुभाषण करिती प्रीतीं । कांहीं बोलतां प्रत्युत्तर न देती । कार्यावीण कदापिही ॥९१॥
बाष्कळ भाषण न करिती किंचित । सदा परमार्थीं लाविती चित्त । असो आतां बोलतां बहुत । ग्रंथ वाढेल अमित पहा ॥९२॥
झिजविला देह गुरुकार्यासी । साधनअभ्यास करूनि बहुवसी । पोंचले जीवन्मुक्तदशेसी । हें कथिलेंचि वरी पहा ॥९३॥
साक्षात् अवतार - पुरुष यांसी । पोंचावें नलगे ब्रह्मज्ञानासी । उगीच लीला दाविती जनांसी । कथिलें येविषीं मागेंही ॥९४॥
आणिक नलगे सांगावा विस्तार । ग्रंथ वाढेल तेणें फार । पुढती परिसा होऊनि एकाग्र । तुम्ही सज्जन आणिक हो ॥१५॥
गुरु - आज्ञेपरी पत्नीसहित । राहिले संनिध सेवा करीत । कांहीं दिन लोटल्यावरी जात । गुरु-आज्ञेपरी ग्रामासी ॥९६॥
येणें जाणें करिती कधीं कधीं । घातलें मन निःसीम गुरुपदीं । तेव्हां लागली हळुहळू व्याधि । पद्मनाभ-स्वामींसी ॥९७॥
मग कांहीं काळ जातां । पद्मनाभस्वामींनीं तत्त्वतां । बहुत व्याधिग्रस्त होतां । केलें काय तें ऐका हो ॥९८॥
पुढें जनांसी उपदेश कराया । सांप्रदाय अधिकार द्यावा ये समया । ऐसा विचार करूनियां । शिवानंदासी पाचारिलें ॥९९॥
कुंदगोळाजवळी शिरूर - ग्रामीं । गेले होते पद्मनाभस्वामी । तेव्हां योजिलें अंतर्यामीं । द्यावा अधिकार यासीच ॥१००॥
तेव्हां बंकापुराहुनी त्वरेंसीं । बोलाविलें शिवानंदस्वामीसी । शिरूर नामक ग्रामापाशीं । येईं म्हणोनि आज्ञापिलें ॥१०१॥
तेव्हां आले शिवानंदतीर्थ । पत्नीसहित लगबगें धांवत । आनंद जाहला चित्तीं अमित । परस्परांसी त्या समयीं ॥१०२॥
मग दिधला सकलांसन्मुख । सांप्रदाय - प्रवर्तक अधिकार चोख । 'शिवानंद' हें नाम सुरेख । घातलें आपणचि प्रेमानें ॥१०३॥
आधींचें नांव 'शिव' हें इतुकें । गुरूंनीं ठेविलें 'शिवानंद' नाम निकें । आणि सच्चिदानंद स्वरूप कौतुकें । किताब दिधला पहा हो ॥१०४॥
स्वहस्तींची मुद्रिका सुंदर । घातली यांसी प्रेमानें सत्वर । आरती करविली शिष्यकरें साचार । आणि देवविला उपदेश ॥१०५॥
तेव्हांपासुनी जनांसी उपदेश । देऊं लागले प्रेमानें खास । महिमा वाढली त्यांची बहुवस । अद्यापवरी पहा हो ॥१०६॥
सद्गुरुसेवा केली अपार । अवर्णनीय असे ती साचार । सांगों जातां सविस्तर । ग्रंथ वाढेल ही भीति ॥१०७॥
त्यांची पत्नी गंगाबाई । हिनेंही केली सेवा सर्वही । एके दिनीं पद्मनाभ - गुरुमाई । काय बोलिले तें ऐका ॥१०८॥
गंगाबाई आतां तुजला । काय देऊं सांग वो मजला । तव सेवेनें तुष्टलों मी भला । सांग झडकरी ये वेळे ॥१०९॥
तेव्हां बोले गंगामाता । स्मितमुख करोनि म्हणे ताता । मागतें एकच चरणीं आतां । अन्य न मागूं तुजपाशीं ॥११०॥ ‍
अहो देवा सद्गुरुराया । पतिदान द्या मज सदया । संन्यास घेतील ऐसें हृदया । भय वाटे मजलागीं ॥१११॥
प्रपंचामाजीं परम उदास । तेवींच भीति वाटे बहुवस । इतुकीच माझी पुरवावी आस । न घ्यावा संन्यास पतिरायें ॥११२॥
तेव्हां बोलिले स्वामी आपण । भिऊं नको सर्वथा जाण । खचितचि तूं मेलियाविण । नाहीं घेत संन्यास तो ॥११३॥
तूं मेलियावरी निश्चयेंसीं । संन्यास घेईल तेचि वरुषीं । संन्यासाचा योग त्यासी । असे पाहीं साध्वी गे ॥११४॥
त्यामुळें पत्नी असे तोंवरी । संन्यास न घेतांचि भूवरी । उद्धरिले बहुत नर - नारी । गुरु - आज्ञेपरी पहा हो ॥११५॥
गृहस्थाश्रम - धर्म असे कैसा । हें आपण करोनि साहसा । अन्यासि शिकविलें उत्तम परियेसा । यथाप्रकारें हो सर्व ॥११६॥
पत्नी मेलियावरी सत्वरी । घेतला संन्यास हरिहरा माझारीं । 'शिवानंदतीर्थ' हेंचि नाम धरी । काय कारणें तें ऐका ॥११७॥
संन्यास घेतां आणिक एक । नामकरण व्हावें देख । परी यांसी शिवानंदचि सुरेख । पूर्वाश्रमींचें नांव असे ॥११८॥
कीं मायबापें 'शिवचि' ऐसें । नाम ठेविलें होतें खासें । 'शिवानंद' हें ठेविलें असे । पद्मनाभतीर्थ यांनीं हो ॥११९॥
सद्गुरूंनीं घातलें जें नाम । तें असे उत्तमाहूनि उत्तम । तें काढूं नये ऐसा नेम । म्हणोनि तेंचि ठेवियलें ॥१२०॥
'तीर्थ' इतुकें परंपरा नाम । घातलें घेतां संन्यासाश्रम । 'शिवानंदतीर्थ' हेंचि उत्तम । दरेक अध्यायीं कथिलेंसे ॥१२१॥
माझ्या मोक्षगुरूचें नाम । याचें सहजचि मजला प्रेम । आणि धर्मगुरु या आनंदाश्रम । हेंही प्रियचि मजलागीं ॥१२२॥
दोन्ही डोळे माझेचि म्हणोनि । दोहोंनी सारिखें रक्षावें जपोनी । तैसे आमुचे सद्गुरु दोन्ही । एकरूप असती माझेचि ॥१२३॥
म्हणोनि अध्यायाच्या शेवटीं । दोघांचं नाम बोलिलों ओठीं । त्यांची मजवरी कृपादृष्टी । त्यांनींच ग्रंथ वदविला ॥१२४॥
तेचि माझे ज्ञानचक्षु । त्यांनींच कथिला ग्रंथ विशेषु । निमित्तमात्र करोनि गुरुदासु । त्यांनींच केलें सारें हें ॥१२५॥
असो एवं दोन्ही गुरुवर । एकचि असती साचार । यांत संशय न घ्यावा अणुमात्र । सकल श्रोत्यांनीं पहा हो ॥१२६॥
यापरी आमुचे गुरुवर । शिवानंदतीर्थ - स्वामी साचार । यांचे सद्गुण असती अपार । शांतिसागर ते जाणा ॥१२७॥
स्वधर्मापरी करिती वर्तन । अंतरीं प्रेम भरलें पूर्ण । राजा - रंक सर्वही समान । सारें ब्रह्मचि बघती  ते ॥१२८॥
एके काळीं होन्नावरासी । आनंदाश्रमस्वामी सहजेंसीं । आले असतां त्या समयासी । हेही होते त्या ग्रामीं ॥१२९॥
तेव्हां आम्हां सारस्वतांसी । बोलिले तुम्हीं निजमठासी । अवश्य जावें गुरुदर्शनासी । अंतरीं प्रेम धरोनियां ॥१३०॥
तुमच्या धर्मगुरूसी तुम्ही भजतां । संतोष होय आमुच्या चित्ता । ऐसें बोलुनी सारस्वत - भक्तां । पाठविलें स्वामींच्या संनिधीं ॥१३१॥
आणि आपणही घ्यावें दर्शन । म्हणोनि निघाले होते एक दिन । तेव्हां कुणीं सांगितलें येऊन । येथेंच भेट घ्यावी हो ॥१३२॥
कीं आतांचि जावया ग्रामांत । निघाले असती स्वामी खचित । आपुल्याच द्वारावरुनी ते जात । येथेंचि आपण भेटावें ॥१३३॥
इतुकें ऐकतांक्षणीं । भेटायासी प्रेमेंकरोनि । नारळ आरती घेऊनि । तिष्ठत राहती सडकेवरी ॥१३४॥
येतां पालखी श्रीस्वामींची । आरती करुनी प्रेमें साची । चरण वंदोनि गुरुमाय आमुची । आली फलमंत्राक्षता घेऊनियां ॥१३५॥
एवं आमचे मठाचे स्वामी । यांवरी प्रीति अंतर्यामीं । ठेवुनी अन्यांसी म्हणती तुम्ही । धरा प्रेम त्यां ठायीं ॥१३६॥
आतां हें चरित्र लिहाया । उत्तेजन मजला देऊनियां । लिहविला ग्रंथ मजकडूनियां । प्रेमपूर्वक त्यांनीं हो ॥१३७॥
एवं त्यांचा हेतु इतुका । जरी आपुला उपदेश घेतला निका । तरीही तुम्ही विसरूं नका । निजगुरु मठालागीं हो ॥१३८॥
आपल्या धर्मगुरूसी विसरतां । पाप लागे पहा समस्तां । त्यांच्या कृपेवीण तत्त्वतां । आमुची कृपा नच होय ॥१३९॥
ते व आम्ही एक असूं निश्चयें । त्यांसी विसरतां आम्हां न साहे । त्यांच्याचि प्रसादें आमुचें दर्शन हें । लाभलें खचित ना शंका ॥१४०॥
हाचि मुख्य हेतु त्यांचा । म्हणोनि सांगती तो आम्हां साचा । कीं धर्मगुरूंसही भजावें तुमच्या । मनःपूर्वक पहा हो ॥१४१॥
ऐसी माझी सद्गुरुमाय । शिवानंदस्वामी सदय । आणि आनंदाश्रम - गुरुवर्य । करिती ग्रंथ संपूर्ण पहा ॥१४२॥
आतां यावरी येईल प्रश्न । कीं आमुचे जातीचे स्वामी असोन । कां जावें अन्य स्थळीं आपण । आत्मज्ञानासाठीं हो ॥१४३॥
तरी ऐका त्याचे उत्तर । आत्मज्ञानासी करावा गुरुवर । त्यावीण न पावे कवणही नर । आत्मज्ञानातें निश्र्चयेंसी ॥१४४॥
जैसा मुलीसी अमुकचि भ्रतार । ऐसें लिहिलें विधीनें साचार । तोचि तिला वरी निर्धार । अन्य न वरी कदापिही ॥१४५॥
तैसें येथे असे जो साधक । त्याच्या लल्लाटीं 'नियत गुरु' सम्यक । विधीनें लिहिला असे जो देख । त्यासीच शरण जाय तो ॥१४६॥
परी धर्मगुरु कुलदेव यांसी । विसरूं नये धरावें मानसीं । तरीच होय मोक्ष साधकासी । नाहीं संशय यामाजीं ॥१४७॥
दोन्ही पाय असती आपुले । एक तोडितां चालाया न ये चांगलें । तेसे दोन्ही श्रीगुरु वहिले । वंद्यचि असती आपणांसी ॥१४८॥
एकासी जरी विसरे हें मन । तरी होय परमार्थ कठिण । यांत न धरावा अनुमान । सत्य सत्य त्रिवाचा ॥१४९॥
एवं आमुची श्रीगुरुमाय । शिवानंदतीर्थ स्वामी सदय । यांची महिमा अवर्णनीय । साक्षात् अवतार शंकराचा ॥१५०॥
कित्येक म्हणती अवतार दत्ताचे । सर्वही देव एकचि साचे । एवं अवतार परमेश्वराचे । नाहीं संशय यामाजीं ॥१५१॥
म्हणोनि सांगूं येविषीं अणुमात्र । कीं शिवानंदस्वामी गुरुवर । यांनीं संन्यास घेतल्याउपर । बांधिला मठ हरिहर - ग्रामीं ॥१५२॥
भक्तजनांच्याविनंतीवरोनी । मठ बांधिला हरिहर - स्थानीं । श्रीशंकराचार्य शारदांबा आणि । दत्तात्रेय मूर्ति स्थापिल्या ॥१५३॥
कुंदगोळीं शारदा - शंकराचार्य । मूर्ति स्थापिल्या मठांत रमणीय । 'शारदा मठ' नाम देती गुरुवर्य । त्या मठासी पहा हो ॥१५४॥
हरिहर मठासी ‘ॐ कार - मठ' । नाम ठेविलें परम श्रेष्ठ । असो सांगूं आतां स्पष्ट । महिमा त्यांची ये समयीं ॥१५५॥
हरिहर - ग्रामींचा एक ब्राह्मण । रघुनाथशास्त्री नामाभिधान । एकेकाळीं वाडीसी जाऊन । राहिला कांहीं कालवरी ॥१५६॥
रहावें येथे एकान्तस्थळीं । ध्यानादि करोनि येवेळीं । काल घालवावा देवाजवळी । एक वर्ष आनंदें ॥१५७॥
म्हणोनि राहिला कांहीं दिवस । श्रीक्षेत्र नरसोबावाडीस । तेव्हां दृष्टांत जाहला तयास । काय तो ऐका सांगेन ॥१५८॥
स्वामी श्रीनृसिंहसरस्वती । म्हणती शास्त्री यासी जा तूं निश्चितीं । हरिहर - मठासी स्वामी जे असती ।तेचि मी जाण निर्धारें ॥१५९॥
मग शास्त्री होतां जागृत । होय मानसीं परम विस्मित । नं तत्काळ गेला हरिहरा धांवत । सद्गुरूंसंनिध प्रेमभरें ॥१६०॥
यापरीच ऐका आणिक । संन्यास घ्यावयाच्या समयीं देख । क्षेत्रस्थानें फिरावया सम्यक । गेले शिष्यांसमवेत ॥१६१॥
कालटी इत्यादि स्थळें फिरोनी । शिवानंद माउली सद्गुणी । कुरवपुरासी आली झणीं । प्रेमपुरःसर त्या समयीं ॥१६२॥
तेव्हां एक नवल वर्तलें । हेजीब रामू या नामें ते वेळे । यांचा एक भक्त तेथें लडिवाळें । राहिला होता एकांता ॥१६३॥
त्यासी पहांटे ब्राह्मीं - मुहूर्तीं । दृष्टांत झाला तो ऐकावा श्रोतीं । एकाग्र करोनि सावध मती । सांगूं आतां लवलाहें ॥१६४॥
कीं श्रीपादश्रीवल्लभ स्वामींनीं । आणि शिवानंदतीर्थ - सद्गुरूंनीं । भेट दिधली पहा दोघांनीं । हेजीब रामूलागीं पैं ॥१६५॥
बैसले दोघे जवळी जवळी । शिवानंद श्रीपाद तये वेळीं । रामूसन्मुख बैसुनी न्याहाळी । श्रीपाद वल्लभ प्रेमभरें ॥१६६॥
बोलिले सद्गुरु - श्रीपाद । कीं मीचि असें शिवानंद । माझाचि अवतार तो शुद्ध । सत्यवचन हें असे पहा ॥१६७॥
तेव्हां रामू होऊनि जागृत । जाहला मानसीं परम विस्मित । तोंच आले शिवानंदतीर्थ । शिष्यांसमवेत त्या स्थळीं ॥१६८॥
रामूस होय परमानंद । म्हणे देवा गुरुराया तव पद । विसरलों मी मतिमंद । विदित न मजला दत्तचि तूं ॥१६९॥
ऐसें म्हणोनि घातलें दंडवत । महिमा अपार तुझी बा सत्य । प्रभो गुरुराया ऐसें म्हणत । कथिला वृत्तांत सकलांसी ॥१७०॥
अन्य बाईसी तेचि दिनीं । दृष्टांत झाला शिवानंदांनीं । काढविली पालखी ते दिनीं । हेंही सत्य झालें पैं ॥१७१॥
हेचि स्वप्नींचे महाराज । पालखी काढविते झाले आज । तेव्हां तिजला पडला उमज । परम आश्चर्य तिज वाटे ॥१७२॥
एवं साक्षात् दत्तावतार । नाहीं यांत संशय अणुमात्र । वर्णितां महिमा ग्रंथ अपार । वाढेल हेंचि भय वाटे ॥१७३॥
म्हणोनि कथिलें किंचित महिमान । असती एकचि आमुचे दोन । शिवानंद - आनंद सद्गुरु दयाघन । नाहीं संशय यामाजीं ॥१७४॥
त्यांसी आतां करोनि नमन । करूं सारा ग्रंथ संपूर्ण । दोघे एकरूपचि परिपूर्ण । परब्रह्म परमात्मा ॥१७५॥
असो आजवरी नवही आश्रम । यांचें चरित्र वर्णिलें सुगम । पुढील अध्यायीं बोलूं उत्तम । श्रीगुरुपरंपरा-भजन पहा ॥१७६॥
परमहंस - आनंदाश्रम । शिवानंद तीर्थ केवळ परब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें पंचपंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१७७॥
स्वस्ति श्रीचित्रापुर- । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें नासती थोर । पंचपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१७८॥
अध्याय ॥५५॥
ओंव्या ॥१७८॥
ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥६॥
॥ इति पंचपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP