मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥१९॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१९॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥१९॥ Translation - भाषांतर ॥श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥ जय जय सगुरो करुणाकरा । तुजला करितों नमस्कारा । तूंचि देऊनि अभयकरा । करवीं ग्रंथविस्तार हा ॥१॥ केवीं करावें तुझें वर्णन । तुझ्या स्वरूपासी जाणेल कवण । कैसें करावें जाणिल्यावीण । वर्णन देवा तुझें तें ॥२॥ काय सांगूं चमत्कार । तुझ्या स्वरूपाचा न होय निर्धार । निर्गुण म्हणों की सगुण सुंदर । हेंचि नकळे मजलागीं ॥३॥ नको देवा निर्गुण - सगुण । तूंचि एक पाहिजे जाण । तुजवांचोन आणिक ज्ञान । कासया देवा दयाळा ॥४॥ तूंचि एक पुरे मजला । त्यामाजीं सारें आलें दयाळा । तीर्थयात्रा करणें कशाला । असतां तूं एक गुरुनाथ ॥५॥ गंगेचें करिती स्नान । करी ती गंगा पापक्षालन । म्हणोनि जाती सकल जन । गंगास्नान करावया ॥६॥ चंद्रमा आपुल्या शीतल किरणें । बाह्य ताप हरी त्वरेनें । शांतता मिळे जनासी तेणें । चंद्रकृपेनें सकलांसी ॥७॥ कल्पवृक्ष इच्छिला जो भोग । तो देउनी काय करी मग । दीनतेचा करी भंग । एवं दैन्य हरी तो ॥८॥ तुझी संगति करितां देवा । पाप - ताप - दैन्य या सर्वां । हरूनि टाकिसी तूं करुणार्णवा । खचितचि जाण निर्धारें ॥९॥ पापाचा न उरे लवलेश । अंतरबाह्य तापाचा नाश । करोनि आणिक दैन्य विशेष । हरिसी सारें निश्चयेंसीं ॥१०॥ म्हणोनि देवा तुझी एक । संगति मिळतां लाभ अनेक । मग कासया दुजें आणिक। ऐसें दैवत सांपडतां ॥११॥ असो आतां सद्गुरुनाथा । न विसंबें तुजला ताता । परी देईं तूंचि स्फुरण चित्ता । स्तवन कराया मजलागीं ॥१२॥ असो मागील अध्यायीं केलें कथन । शंकराश्रमवामी जाण । जरी झाले मुक्त दयाघन । तरी न लोपे महिमा त्यांची ती ॥१३॥ नरसोबावाडीच्या अर्चकासी । पाठवितां देवानें मल्लापुरासी । व्याधि जाऊनि निजग्रामासी । गेले दोघेही बापलेक ॥१४॥ एवं सद्गुरु झाले जरी मुक्त । कीर्ति त्यांची राहे सतत । 'अस्ति - भाति - प्रियत्वें' असत । सर्वत्र व्यापक ते पाहीं ॥१५॥ आतां कुणीही करितील प्रश्न । सद्गुरूचि कां व्यापक जाण । आम्ही सकलही व्यापक असोन । काय हें सांगतां विपरीत ॥१६॥ तरी ऐका त्याचें उत्तर । आम्ही व्यापक सर्वही निर्धार । तैसें आहे का आमुचे अंतर । तरीच बोलावें हें पाहीं ॥१७॥ सद्गुरूचें तैसेंच अंतर । त्यापरीच ते राहती निरंतर । कर्ता करविता तोचि साचार । म्हणोनि सर्व साध्य तयालागीं ॥१८॥ तयाहुनी नाहीं देव निराळा । सर्वांचा जाणता तोचि एकला । म्हणोनि तोचि सर्व जगाला । अधिष्ठान होय पां ॥१९॥ ऐशा त्या सद्गुरुस्वामींची । महिमा काय वर्णावी साची । आम्हां अज्ञांसी योग्यता कैंची । येईल कोठुनी सांगा हो ॥२०॥ जितुकें तो स्फुरवील आम्हां । तितुकेंचि सांगूं आतां तुम्हां । आणिक काहीं त्यांची महिमा । अवधारा प्रेमानें भाविक हो ॥२१॥ एके काळीं पांडुरंगाश्रम । आश्रम जाणा त्यांचा अष्टम । शिरालीहुनी मठासी उत्तम । मल्लापुर - ग्रामी आले ते ॥२२॥ घेऊनि समाधीचें दर्शन । कांहीं दिवस तेथे राहून । शिरालीसी जावया निघाले जाण । पांडुरंगाश्रम स्वामिराय ॥२३॥ मल्लापुर मठींचा घंटानाद । ऐकतां जनांसी होय आनंद । ऐसी उत्कृष्ट घंटा प्रसिद्ध । होती जाणा मठांतरीं ॥२४॥ ही घंटा शिराली - ग्रामीं । नेऊनि लावूं तेथें आम्ही । ऐसें म्हणुनी पांडुरंगाश्रमस्वामी । करिती सिद्धता नेण्याची ॥२५॥ तेव्हां स्वामींसी तेचि दिनीं । झोंपतां रात्रीं पहा स्वप्नीं । समाधिस्थ शंकराश्रमस्वामींनीं । दर्शन देऊनि सांगितलें ॥२६॥ म्हणती बाळा पांडुरंगा । नेऊं नको घंटा ही गा । इजसी असो हिची जागा । ठेव येथेंचि ही पाहीं ॥२७॥ जरी पाहिजे शिराली मठासी । तरी सांगतों एक तुजसी । येचिपरी कुमठा - ग्रामासी । मिळेल घंटा तुजलागीं ॥२८॥ कुमठा - ग्रामीं असे एक । कांसार हुशार परम भाविक । तयाकडुनी करवीं देख । ऐसीच घंटा करील तो ॥२९॥ इतुकें सांगुनी श्रीगुरुनाथ । शंकराश्रम जाहले गुप्त । पांडुरंगाश्रम झाले जागृत । विस्मित मानसीं होती ते ॥३०॥ मग ती घंटा तेथेंच सोडुनी । गेले परिवारासहित तेथुनी । पांडुरंगाश्रम सद्गुणखाणी । कुमठा-ग्रामासी तेधवां ॥३१॥ तेथें जाउनी जनांपाशीं । कांसाराची केली चौकशी । ऐकतां खूण तेथील जनांसी । कळलें अमुकचि कांसार ॥३२॥ मग जाऊनि तया कांसारा । कथिला घंटेचा वृत्तांत सारा । मग त्यानें प्रेमानें त्वरा । केली घंटा उत्तम ती ॥३३॥ घेऊनि आला संनिधीपाशीं । दाविली घंटा अतिप्रेमेंसीं । बघुनि झाला हर्ष मानसीं । सकलांच्याही ते वेळां ॥३४॥ जैसा मल्लापुरांतील घंटेचा । नाद होतां आनंद साचा । त्यापरीच याही घंटानादाचा । आनंद वाटे सकलांसी ॥३५॥ तेव्हां जाहलें आश्रर्य सकलां । म्हणती शंकराश्रमवामींची लीला । अगाध आतां पाहिली डोळां । ऐकिली होती कानांनीं जी ॥३६॥ ऐसें बोलती परस्पर । स्वामींसही वाटला आनंद थोर । श्रीशंकराश्रम-गुरुवर । यांची लीला बघोनियां ॥३७॥ असो यापरी आणिक अमित । असती कथा त्यांच्या अद्भुत । परी आम्हांसी जितुक्या विदित । तितुक्या सांगूं आतां पैं ॥३८॥ पुन्हां कथा एक अद्भुत । सांगुनी करूं अध्याय समाप्त । श्रोते हो करा सावध चित्त । तुम्ही सज्जन भाविक हो ॥३९॥ शके अठराशें छत्तिसामाजीं । पांडुरंगाथम श्रीसद्गुरुजी । आले मल्लापुर - ग्रामीं सहजीं । भेटीसी एकदां मठांत ॥४०॥ तेव्हां केला थोर विचार । करावा येथें जीर्णोद्धार । समाधि आणि मठ समग्र । पुनरपि बांधावा सुंदर तो ॥४१॥ ऐसें म्हणोनि स्वामींनी । केली सिद्धता बांधावया झणीं । लाविले जन तये स्थानीं । कामालागीं त्या समयीं ॥४२॥ काढितां समाधीवरील दगड । आश्र्चर्य वाटलें सकळां उघड । बिल्व तुलसी गंधादि उदंड । यांचा परिमळ पसरला ॥४३॥ तेव्हां तेथें डोकावुनी । बघती सारे जन येउनी । देखिला तेथें त्यांनी नयनीं । चमत्कार तो ऐकावा ॥४४॥ तुलसी - बिल्वपत्र - पुष्पादि । वाहिलीं होती देतां समाधि । तीं टवटवीत दिसलीं संनिधीं । पाहुनी रोमांचित झाले सर्व ॥४५॥ आश्र्चर्य करिती सकल जन । म्हणती अघटित महिमान । शंकराश्रमस्वामीचें हें जाण । धन्य धन्य सारस्वत हे ॥४६॥ देवही येती स्वर्गींहुनी । धांवत विमानीं बैसुनी । पुष्पवृष्टि ते करिती झणीं । समाधीवरी प्रेमानें ॥४७॥ म्हणती देवा दत्तात्रेया । त्वां जाउनी धरणीं श्रीगुरुराया । सकळ जनांचा उद्धार करूनियां । वाढविली कीर्ति आपुली ॥४८॥ काय ते नर धन्य तेथील । असे तयांचे पुण्य प्रबल । तयांपुढे आदी देव सकल । परम दुर्बल निश्र्चयेंसी ॥४९॥ ऐशियापरी स्तविती देव । खचितचि त्यांचें बोलणें सर्व । परी ज्याच्या अंतरीं असे भाव । तोचि तरेल निर्धारें ॥५०॥ नसतां चित्तीं प्रेमभाव । त्यासी काय करील देव । वृथाचि देवा ठेविती नांव । महिमा नेणतां तयाची ॥५१॥ विचार करितां सद्गुरुवीण । नाहीं ताराया समर्थ कवण । म्हणोनि जातां त्यासीच शरण । तोचि सोडवी यांतुनी ॥५२॥ येथे करतील कुणी प्रश्न । कासया सद्गुरु आम्हां जाण । वाचितां पुस्तकें सर्वही ज्ञान । येईल आमुच्या हातीं पैं ॥५३॥ तरी याचे उत्तर अवधारा । काय करावा पुस्तक - पसारा । गुरुवांचोनि चित्ता थारा । न मिळे कदापि निश्र्चयेंसी ॥५४॥ खरें तत्त्व पुस्तकीं न मिळे । केलें तें सांगूं ये वेळे । लक्ष लावोनि येथे आपुलें । अवधारा भाविक श्रोते हो ॥५५॥ होता एका ग्रामीं एक । शेतकरी परम हुशार देख । काबाडकष्ट करोनि सुरेख । चालवी प्रपंच आपुला तो ॥५६॥ ऐसें असतां तयालागीं । व्याधि लागुनी दुःख भोगी । कंटाळला बहुत तो जगीं । शेतकरी आपल्या व्याधीसी ॥५७॥ आयुष्य संपले त्याचें समग्र । जवळी नव्हता त्याचा पुत्र । लिहुनी ठेविलें एक पत्र । मरणसमयीं त्यानें पैं ॥५८॥ मग सोडिला त्यानें प्राण । लोकांनी केलें त्याचे दहन । ऐकोनि आला पुत्र धांवोन । लगबगें जाण त्या समयीं ॥५९॥ तेव्हां त्याने बापाचे पत्र । वाचुनी पाहिलें निरखुनी नेत्र । न करितां विचार क्षणमात्र । उठला झडकरी तो पाहीं ॥६०॥ पत्रामाजी लिहिलें काय । असे तो पाहीं कोणता विषय । येईल श्रोत्यांच्या चित्तीं संशय । सांगतों आतां अवधारा ॥६१॥ तुजकरितां कांहीं प्राप्ति । करोनि ठेविली नाहीं अंतीं । शेत आहे ठेविलें तुजप्रति । खणितां कष्टें प्राप्ति पैं ॥६२॥ ऐसें वाचितां पुत्र झडकरी । गेला थेट शेतावरी । सारे शेत खणुनी निर्धारीं । पाही त्यामाजीं काय असे ॥६३॥ परी न मिळे त्यासी कांहीं । शेतामाजीं द्रव्यादि पाहीं । तेव्हां घाबरूनि म्हणे काय ही । करणी विपरीत देवाची ॥६४॥ स्पष्ट लिहिलें माझ्या वडिलें । शेतामाजीं तुज ठेविलें । कष्ट करितां मिळेल तरी ये वेळे । काय झालें धन तें पैं ॥६५॥ सारे शेत खणुनी खणुनी । केलें सर्व रक्ताचे पाणी । तरीही न सांपडे त्यालागोनी । धन पाहीं अणुमात्र ॥६६॥ आतां ऐका सावधान । कां न सांपडे त्यासी धन । ठेविलेंचि नसतां जाण । कैसें सांपडे त्याला हो ॥६७॥ बापानें जें लिहिलें पत्र । त्याचा अर्थ न जाणतां पुत्र । खणूं लागला भूमि पवित्र । उगीच शिणला तो पाहीं ॥६८॥ तया पत्राचा ऐसा अर्थ । कीं शेत आहे तुजप्रत । बीज घालूनि करीं कष्ट सतत । पीक येईल तेव्हां पैं ॥६९॥ ऐसा त्याचा असोनि अर्थ । वाचिल्यानें न कळे त्याप्रत । तेंचि मुखानें सांगतां विवरोनि समस्त । कळलें असतें त्यालागीं ॥७०॥ तैसें येथें पुस्तकें वाचितां । न कळे तत्त्व आपल्या चित्ता । सद्गुरुवीण जनासी सर्वथा । म्हणोनि जावें शरण तया ॥७१॥ तूं नव्हे देह-मन-बुद्धि । ब्रह्मस्वरूप आहेसी इत्यादि । जरी पुस्तकीं त्याची प्रसिद्धि । तरीही न कळे गुरुवीण ॥७२॥ गुरुमुखें करी श्रवण । तरीच त्याची कळे खूण । तेव्हांचि होईल ब्रह्मज्ञान । आम्हां अज्ञान जनांसी ॥७३॥ असो आतां तया गुरुनाथा । सतत स्मरावें तरी चित्ता । होईल समाधान तें तत्त्वतां । आम्हां जनांसी निर्धारें ॥७४॥ आतां श्रीगुरुशंकराश्रम । असे हा प्रेमळ चतुर्थ 'आश्रम'। लावुनि जनांसी भक्तिप्रेम । उद्धरिलें जाण सर्वांसी ॥७५॥ यापरी करोनि प्रेमानें यांनीं । शके सोळाशें ब्याण्णवापासोनी । सत्राशें सात वरी जगीं राहोनि । स्वधर्मराज्य चालविलें ॥७६॥ पुढील अध्यायीं केशवाश्रम। स्वामी आमुचे जाणा पंचम । प्रेमानें चालवितील स्वधर्म - । राज्य सारस्वतवृंदाचें ॥७७॥ त्यांची कथा परम अद्भुत । एका भक्ताचा पुरविला मनोरथ । ऐकतां होईल संतुष्ट चित्त । अभक्तांचेही तें पाहीं ॥७८॥आनंदाश्रम - पुण्यपुरुष । शिवानंदतीर्थ हे एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें एकोनविंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥७९॥ खस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां भक्ति होय दृढतर । एकोनविंशाध्याय रसाळ हा ॥८०॥ अध्याय १९ ॥ओंव्या ८० ॥ ॥ श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥छ॥ ॥छ॥॥ इति एकोनवींशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP