मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४०॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४०॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नम: ॥ श्रीभवानीशंकराय नम: ॥ॐ॥
जय जय सद्गुरो करुणासागरा । भक्तवत्सला सद्गुणसांद्रा । अससी व्यापक तूं बा यतींद्रा । काय वर्णावी तव महिमा ॥१॥
तुज ध्यातां न उरे कांहीं । वृत्ति विरोनि जाय सर्वही । साक्षिरूपें ब्रह्मात्मा राही । ऐसा सद्गुरु माझा तूं ॥२॥
नामरूप सारें खोटें । तुझें स्वरूपचि एक गोमटें । त्यावीण अन्य स्थळ असे कोठें । सार्‍या ब्रह्मांडीं हो पाहीं ॥३॥
परी आम्ही असों मतिमंद । लावितों वृथाचि तुला शब्द । कीं धरोनि देहसंबंध । वर्णाश्रम - नामादि ॥४॥
ऐसा तूं अससी देव । नाहीं तुजला द्वैतभाव । सारें आत्मरूपचि सदैव । बघसी सर्वत्र तूं देवा ॥५॥
ऐशिया तुझिया चरणीं लागतां । तुटे सारी भवभय - चिंता । कितीही स्तविलें जरी आतां । तृप्ति न होय मानसीं ॥६॥
अहा देवा सद्गुरुनाथा । तुझें प्रेम अद्भुतचि ताता । कल्पना करवेना चित्ता । अंतचि नसे त्यालागीं ॥७॥
हरएक विषय जनांसी जाण । अप्रिय होती एके दिन । प्रियाप्रियता त्यांलागोन । असेचि जाण सर्वदा ॥८॥
तुझें प्रेम नव्हे तैसें । त्याचा वीट केव्हांही नसे । म्हणोनि तुझें प्रेम सत्य असे । खचित खचित गुरुनाथा ॥९॥
असो आतां श्रोते तिष्ठती । म्हणोनि द्यावी मजला स्फूर्ति । तुझी तूंचि वर्णवीं कीर्ति । मजकडोनि हो देवा ॥१०॥
ऐका तुम्ही श्रोते सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । दुग्गप्पशेट्टीचें जहाज जाण । आलें सत्वर गुरुकृपें ॥११॥
आतां ऐका कथा रसाळ । गुरूची महिमा अद्भुत केवळ । आणि हृदय त्यांचें अति कोमळ । कैसें वानावें न कळे तें ॥१२॥
सर्वांभूती समान भाव । यातिकुळाचा पुसला ठाव । सकलां समचि बघती गुरुदेव । ऐसी माउली ती जाणा ॥१३॥
अंगीं असे जो दृढभाव । तोचि बघती करुणार्णव । हीन यातीचा जरी तो मानव । तरी त्यासी उद्धरिती ॥१४॥
यावरी एक सांगूं कथा । इकडेचि लावा आपुल्या चित्ता । सर्वही दोष हरती ऐकतां । आम्हां सकल अज्ञांचे ॥१५॥
अठराशें चोवीस शकामाझारीं । कुमठा म्हणजे कुंभापुरीं । तया ग्रामीं एके अवसरीं । यावया निघाले श्रीस्वामी ॥१६॥
तेव्हां तेथें एक यवन । अल्लीशा नांवाचा जाण । कोर्टामाजीं कारकून । होता तया ग्रामीं हो ॥१७॥
रुपये तीस त्याचा पगार । इंग्रजी न येत त्यासी फार । परी त्यानें केला विचार । अर्ज करावा सरकारा ॥१८॥
मजला इंग्रजी येतसे बरवें । म्हणोनि वरचिया जागेसी न्यावें । ऐसी अर्जी केली स्वभावें । सरकारी वरिष्ठ अधिकार्‍या ॥१९॥
तेव्हां कारवार कोर्टांत । नेमिला इंग्रजी कामावरी त्वरित । दहा रुपये बढती त्याप्रत । मंजूर केली जज्जानें ॥२०॥
तेव्हां तेथें कारवारीं । अल्लीशावरील अधिकारी । त्यानें केली तक्रार भारी । न्यायाधीशाजवळी पैं ॥२१॥
अल्लीशासी चांगलें इंग्रजी । येत नसे म्हणोनि तो त्यामाजीं । काम कराया योग्य नव्हे जी । ऐसें वाटतें मजलागीं ॥२२॥
ऐकतां क्षोभला न्यायाधीश । म्हणे असत्य अर्जी पाठविली आम्हांस । म्हणोनि बळेंचि आणितों त्यास येथील इंग्रजी कामावरी ॥२३॥
जरी तो काम यथाप्रकार । न करील तरी तया सत्वर । काढुनी टाकूं हा निर्धार । ऐसें बोलिला तो जाणा ॥२४॥
इतुकें बोलुनी न्यायाधीश । हुकूम पाठवी कुमठेस । तेथील सबजज्ज यास । अल्लीशासी पाठवाया ॥२५॥
तेव्हां अल्लीशाचा मित्र यवन । कारवार कोर्टांतील कारकून । त्यासी ही हकीकत संपूर्ण । कळली तत्काळ जाणा हो ॥२६॥
त्यानें कळविली बातमी सारी । गुप्तपणें अल्लीशाला सत्वरी । ऐकुनी दचकला तो अंतरीं । बैसला चिंतायुक्त बहु ॥२७॥
कोर्टामाजीं बैसे सचिंत । नाहीं गेला सदनाप्रत । जेवावयासी तो विसरत । झाला चिंताक्रांत  बहु ॥२८॥
तेव्हां तेथें त्याच्या सन्मुख । बैसला होता कारकून एक । सारस्वत मंगेशभट्ट नामक । परम भाविक तो जाणा ॥२९॥
त्यानें बघोनि म्लानवदन । पुसिलें तेव्हां अल्लीशालागून । तूं कसली चिंता करिसी जाण । काय झालें तुजला बा ॥३०॥
तूं न गेलास जेवावयासी । काय कारण तें सांग मजसी । ऐसें ऐकतां अल्लीशानें त्यासी । निवेदिला सकल वृत्तांत ॥३१॥
ऐकुनी सकल वर्तमान । बोले मंगेशभट्ट कारकून । ना भी तुजला सांगतों जाण । सद्गुरु आमुचे येती पैं ॥३२॥
तूं न करीं चिंता कांहीं । त्या सद्गुरुंसी शरण जाईं । तेचि रक्षितील तूतें पाहीं । संशय नाहीं यामाजीं ॥३३॥
चित्रापुरीं असे त्यांचा वास । पांडुरंगाश्रम म्हणती त्यांस । सायंकाळीं येचि ग्रामास । येती निश्र्चयें आजि पैं ॥३४॥
त्यांचा तुजला आशीर्वाद । देववूं निश्र्चयें होईल आनंद । ते असती परम प्रसिद्ध । साक्षात्‌ अवतार दत्ताचे ॥३५॥
तेचि तुझी सारी चिंता । हरितील निश्र्चयें जाण तत्त्वतां । नसे कवणही भय तुज आतां । धरीं विश्र्वास त्यांचे चरणीं ॥३६॥
ऐसा शब्द पडतां कानीं । उठला हरुषें गर्जना करोनि । म्हणे तुमचे स्वामी देखिल्यावांचोनि । ना घें पाणी निर्धारें ॥३७॥
यापरी बोलुनी बैसला स्वस्थ । श्रीस्वामींचे चरण ध्यात । नाहीं गेला सदनाप्रत । जेवावयालागीं तो ॥३८॥
सकाळपासूनि कोर्टामाझारीं । बैसला होता कामावरी । न गेला बघुनी ते अवसरीं । म्हणे मंगेशभट्ट तया ॥३९॥
अरे अल्लीशा आतां जाईं । जेवावया वेगें निजगृहीं । सायंकाळीं दर्शन पाहीं । होईल पहा स्वामींचे ॥४०॥
यावरी बोले अल्लीशा आपण । तुझे गुरुपाय देखिल्यावीण । न घें मी पाणी निश्चयें जाण । हरितील तेचि मम चिंता ॥४१॥
माझा निश्रयचि झाला ऐसा । भेटीवीण पाणी न घें सहसा । त्यांच्या चरणी ठेविला भरंवसा । तेचि रक्षितील मजलागीं ॥४२॥
त्यांसीच आतां जातों शरण । जरी आलें मजला मरण । मी न सोडीं त्यांचे चरण । सत्य सत्य त्रिवाचा ॥४३॥
पहा कैसी महिमा अगाध । स्वामींच्या नामाचा शब्द । कानीं पडतांचि झाला आनंद । धैर्य आलें मजलागीं ॥४४॥
नाम-महिमाच जर इतुकी । तर दर्शनमहिमा असेल कितुकी । हें सांगावें नलगे सुज्ञांस की । ते जाणनील सहजचि पैं ॥४५॥
त्यांच्या आशीर्वादेंकरून । कार्य होईल न लागतां क्षण । ऐसी दृढ आशा मनीं धरून । राहिलों असें मी निश्चयें ॥४६॥
माझ्या मनाची स्थिति आज । काय झाली खरी नी तुज । सांगतों कीं काय गति मज । होईल कांहीं कळेना ॥४७॥
हाय हाय कवणा सांगूं । काय असे माझा भोगू । कांहीं न कळे कैसा मी जगूं । भिक्षापात्राचांचोनि ॥४८॥
माझी जाईल निश्र्चयें नोकरी । जाऊं आतां कवणा घरीं । कोण माझें रक्षण करी । ऐशा संकटापासूनियां ॥४९॥
जगामाजीं अपकीर्ति थोर । घेउनी जगणें कासया भूवर । याहुनी मरणें बरें शीघ्र । ऐसा विचार येई मनीं ॥५०॥
इतुक्यामाजीं तुजकडून मीं । ऐकतां सद्गुरुमहिमा नामी । माझी स्थिति अंतर्यामीं । कैशी जाहली ती ऐका ॥५१॥
समजा गृहासी लागली आग । ऐशा समयीं आकाशीं ढंग । अवचित भरोनि गर्जे मेघ । पडला पर्जन्य तत्काळ ॥५२॥
तेव्हां होऊनि अग्नि शांत । सदन दिसे शोभिवंत । जैशाचें तैसेंच उरे तेथ । अणुमात्र हानी न होतां ॥५३॥
तैसें आपुल्या सद्गुरूचें नाम । कर्णीं पडतांक्षणीं उत्तम । तापाग्नि हृदयींचा मम । विझला तेव्हांचि तो पाहीं ॥५४॥
एवं माझें हृदय शांत । झालें आनंदमय निश्रित । ऐसा नामाचा महिमा अद्भुत । काय सांगून तुजला मी ॥५५॥
जरी नामेंच इतुकें होय । दर्शनें सारी भीति जाय । आशीर्वादें होईल कार्य । नाहीं संशय यामाजीं ॥५६॥
ऐशिया त्या गुरुमाईचे । दर्शनावीण मी सदनीं न वचें । जीवनही न घें साचें । जरी गेला प्राण पहा ॥५७॥
ऐसें बोलुनी तैसेंच तेणें । केलें निग्रहें नलगे सांगणें । सायंकाळीं पहा तो त्वरेनें । गेला स्वामींसी सामोरा ॥५८॥
सारे शिष्यवृंद सारस्वत । ग्रामाबाहेरी जाती धांवत । त्यांच्यासंगें हाही जात । राहिला शेतांत कडेसी उभा ॥५९॥
असें मी हीन जातीचा यवन । हे असती श्रेष्ठ ब्राह्मण । त्यांत मिसळू नये आपण । ऐसें समजुनी दूर राहे ॥६०॥
तेव्हां श्रीस्वामींची पालखी । लांबुनी येतां नयनीं विलोकी । साष्टांग प्रणिपात घातला तेणें कीं । शेतांतरींच हो जाणा ॥६१॥
हातामाजीं होता जो नारळ । मार्गावरी टाकुनी ते वेळ । घातला जो नमस्कार प्रेमळ । ना उठे पालखी येई तों ॥६२॥
मग हळू हळू पालखी आली । सारस्वत ब्राह्मण भक्तांजवळी । जो नारळ पडला ते स्थळीं । जनांनीं अर्पिला तो स्वामींसी ॥६३॥
आणि वाद्यें घेऊनि थोर । मिरवीत नेले श्री सद्गुरुवर । गेले सांगातीं सकल नर। अल्लीशाही गेला दुरोनियां ॥६४॥
शंकरनारायण देउळीं । पालखी स्वामींची मिरवीत नेली । हाही गेला तये स्थळीं । अतिप्रेमानें तत्काळ ॥६५॥
मग स्वामी सद्गुरुराय । यांचे भक्तांनीं प्रक्षालुनी पाय । आंत घेउनी जाती ते समय ।  बोलती कृपाघन काय पहा ॥६६॥
आमुच्या कोंकणी भाषेचें वचन । ऐका स्वामींचे सावधान । परम रसाळ मृदु भाषण । अमृतवाक्य तें जाण ॥६७॥
"ताव्वळी कुम्टे गांवांभायर येवनु । गाद्द्या बैलांतु तुर्कांचो पाय पोण्णु । निद्दलेलो खैं गेलो पोळौनु । ताक्का आत्तां आप्पया " ॥६८॥
ऐसें बोलुनी आणविला त्यासी । फलमंत्राक्षता देवविल्या त्या निशीं । आनंद झाला त्याच्या मानसीं । बैसला तो तेथेंचि रस्त्यावरी ॥६९॥
करूं लागला स्वामींचे ध्यान । मनामाजीं प्रेमेंकरोन । नाहीं गेला गृहालागोन । भान नसे त्या देहाचें ॥७०॥
म्हणे देवा सद्गुरुनाथा । धांव पाव बापा अनाथा । तूंचि देवा मजला त्राता । तुजवीण अन्य ना जगतीं ॥७१॥
मी पापी हीन दीन । असें एक अज्ञ यवन । परी अव्हेर न करीं जाण । प्रभो दयाळा कृपाघना ॥७२॥
आपुली मूर्ति मनीं धरोन । सदा ध्यातों निश्र्चयें जाण । द्यावें गुरुराया अभयवचन । चिंता सारी दूर करीं ॥७३॥
मजला उद्धरा परमेश्वरा । आलों शरण अनन्य गुरुवरा । तुजवांचोनि अन्य थारा । देईं ना मी चित्तासी ॥७४॥
ऐसी करुणा भाकुनी तेव्हां । ध्यात बैसला सद्गुरुदेवा । धरुनी मानसीं दृढभावा । सारी रात्र तेथेंचि ॥७५॥
इकडे देउळीं सर्व मंडळी । अष्टाविधान आरती ते वेळीं । पाहुनी आपुल्या गृहासी गेली । प्रसाद घेउनी ते समयीं ॥७६॥
हा बैसला म्हणुनी कवणा ना विदित । आठवणही नाहीं कवणाप्रत । मुलगा येतां माघारा धाडित । येत नाहीं मी घरीं म्हणे ॥७७॥
असो मग पहाट झाली । भक्तमंडळी येऊं लागली । स्वामींच्या दर्शना देउळीं । उत्सुक होऊनि लगबगेंसी ॥७८॥
जो त्याचा मित्र सारस्वत । जेणें कथिली कीर्ति त्याप्रत । तोही आला तेथें त्वरित । दर्शन घ्यावया स्वामींचें ॥७९॥
तेथें बघुनी अल्लीशासी । तो मित्र बोले परियेसीं । अरे तूं अजुनी न गेलासी । सदनाप्रति कीं बापा ॥८०॥
यावरी बोले अल्लीशा आपण । तुमच्या स्वामींचे आशीर्वचन । न जाय घेतल्यावीण येथून । सदनाप्रति मी पाहीं ॥८१॥
यावरी म्हणे मित्र कारकून । तुजला फलमंत्राक्षता जाण । दिधलें तेंचि आशीर्वचन । समज बाबा निश्चयेंसीं ॥८२॥
अरे आपुल्या मनींचा हेतु । साधु ओळखती निश्चयें जाण तूं । उगीच भलतें नको चिंतूं । नाना कुतर्क घेऊनियां ॥८३॥
शेतामाजीं पालथा पडुनी । नमस्कार घातलास तूं दुरूनी । नाहीं पाहिलें तुजलागोनी । ब्राह्मण कीं यवन म्हणोनियां  ॥८४॥
परी जातां देवळामाझारीं । 'तो यवन कुठे गेला पाचारीं' । हें कळल्यावांचुनी स्वामी अंतरीं । कैसें बोलिले सांगें बा ॥८५॥
यावरी बोले अल्लीशा यवन । अहो ते स्वामी कृपाघन । जेव्हां देतील आशीर्वचन । तेव्हांचि जाईन मी सदना ॥८६॥
तोंवरी येथेंचि बैसेन निश्र्चयें । जरी दिवस-रात्र पाहें । बैसावें लागे, तरीही न जायें । येथुनी सत्य जाण तूं ॥८७॥
ते जेव्हां देतील दर्शन । तेव्हां माझा वृत्तांत सांगेन । ऐकूनि त्यांनीं आशीर्वचन । देतां जाईन जेवाया ॥८८॥
फलमंत्राक्षता दिधली खरें । परी ना कळविले मनोरथ सारे । म्हणोनि कळवुनी हेतु मम त्वरें । आशीर्वाद घेऊं इच्छितों मी ॥८९॥
त्यावीण नाहीं जात येथुनी । सदनाप्रति चरण ते सोडुनी । नाहीं घेत अन्नपाणी । बैसेन मी दिवसभरी ॥९०॥
जरी गेला माझा प्राण । तरीही न जायें मी येथोन । इतुकें बोलुनी तेथेंचि जाण । बैसला तिष्ठत अल्लीशा ॥९१॥
इकडे स्वामी स्नान करोनी । बैसले आपुल्या अनुष्ठानीं । जरी विदित असे त्यांलागोनि । तरी ते बघती अंत पहा ॥९२॥
असो मग तो श्रीस्वामींची । भिक्षा होई तों बैसे तैसाचि । भिक्षा होतांचि इच्छा त्याची । कळविली सारस्वत - कारकुनें ॥९३॥
सुब्राव भटजी तेथील शास्त्री । त्यांकडे गोष्ट कळविली सारी । त्यांनीं स्वामीसंनिध सत्वरी । कथिली लगबगें जाऊनियां ॥९४॥
अहाहा काय कनवाळू मूर्ति । ऐकतां सद्गुरु कळवळले चित्तीं । कीं उपवासी बैसला दिनरातीं । यवन अल्लीशा हा पाहीं ॥९५॥
कंठ जाहला सद्गदित । विमलांबुधारा नयनीं वाहत । कैसें पहा साधूचे चित्त । किती कोमल तें सांगूं ॥९६॥
सत्पुरुषांसी राजा-रंक । असती समचि पहा सकळिक । मुलांसी माता जैसी देख । तेसी पाहे गुरुमाउली ॥९७॥
नाहीं बघती उंच-नीच जात । स्वजन - अन्य नसे त्यांप्रत । नाहीं गरीब आणि श्रीमंत । धनदौलत ना बघती ॥९८॥
साधु बघती भक्तिप्रेम । आणि निश्चय निष्ठा दृढतम । तेव्हांच पुरविती ते काम । सकाम निष्काम भक्तांचा ॥९९॥
जातीचा तो जरी यवन । तरी प्रेम त्याचें यवन न जाण । आणिक ऐका सावधान । तुम्ही सज्जन श्रोते हो ॥१००॥
प्रेमासी नाहीं जात - गोत । आपपर नाहीं त्याच्यांत । परी देहासी असे निश्चित । स्वधर्मापरी वर्तणें ॥१०१॥
साधु न सोडिती स्वधर्म । परधर्माची निंदा ही अधर्म । हें न करिती ते सद्गुणधाम । परम दयाळू कनवाळू ॥१०२॥
असती खरे साधुसंत । ते न सोडिती स्वधर्म निश्चित । व्यवहारीं जैसें वागावें ज्याप्रत । तैसेंच वागती त्यापाशीं ॥१०३॥
स्वधर्माची न करिती हानी । प्रेम न देती झुगारुनी । देहासी असे जात म्हणुनी । त्यापरी वर्तविती देहासी ॥१०४॥
प्रेमासी नाहीं निश्र्चयें जात । प्रेम ना विकलें कवणाप्रत । नाहीं भेद कैंचाही प्रेमांत । तें प्रेम कुठलें सांगा हो ॥१०५॥
प्रेम हें असे निजवरूपाचें । तेथुनीच उठतें निश्चयें साचें । स्वरूप हें आपुलें कैसें याचें । करूं विवरण अणुमात्र ॥१०६॥
आत्मरूप हें अभेद स्वरूप । त्याचेंचि अंग प्रेम हें अल्प । तैसेंच तें प्रेम होत अमूप । वेगळे सांगणें नलगेचि ॥१०७॥
सूर्या सोडुनी नाहीं रश्मी । तेवीं स्वरूपासीं प्रेम अभिन्न नेहमीं । म्हणोनि प्रेम हें उठे अंतर्यामीं । निजस्वरूपांतुनीचि पैं ॥१०८॥
परी आम्हां अज्ञजनांसी । न कळे त्याची थोरवी कैसी । एक ब्रह्मज्ञानीच जाणे त्यासी । आपुल्या अनुभवेंकरूनियां ॥१०९॥
एवं सकलांचें प्रेम हें एक । त्यामाजीं नसती भेद अनेक । यवन - ब्राह्मणादि सकळिक । देहासी हें सारें असे ॥११०॥
म्हणोनि सद्गुरु बघती प्रेम । न बघती देह रूप नाम । जातगोत अधम उत्तम । हेंही न बघती कदापि ते ॥१११॥
कवणही जातीचा असो मानव । अंत्यजही भजो धरोनि दृढभाव । त्यासी रक्षिती सद्गुरुदेव । न धिक्कारिती कदापिही ॥११२॥
कालपासुनी न घेतलें उदक । तेवींच न सेवी अन्न - निद्रादिक। तिष्ठत बैसला देवळासन्मुख । रात्रभरी तो दृढनिष्ठं ॥११३॥
ऐसें सुब्रायभटांनीं सांगितलें । ऐकुनी स्वामी बहु कळवळले । आधींच कां न तुम्हीं सांगितलें । ऐसें म्हणुनी उठले ते ॥११४॥
प्रेमाश्नु आले त्यांचे नयनीं । धांव घेतली त्यांनीं झणीं । बैसला अल्लीशा जे स्थानीं । मार्गाजवळी गेले ते ॥११५॥
ओट्यावरी जाऊनि बैसले । भटजींमार्फत बोलते झाले । म्हणती बाळा सांग वहिलें । वृत्त आपुलें आम्हांसी ॥११६॥
सांग मनींचा हेतु सारा । खुळ्यापरी न करीं अविचारा । जग हें सारें नश्वर नेत्रा । जें जें दिसतें तें पाहीं ॥११७॥
आपुलें देह-धन-सुत दारा । सकल नश्वर व्यर्थ पसारा । ऐसें समजुनी ध्याईं प्रभुवरा । विचार करोनि तूं बाबा ॥११८॥
करीं तुझ्या अल्लाचें स्मरण । तोचि तुझें करील कल्याण । काय हेतु तुझा जाण । असे तो सांग निर्मळ मनें ॥११९॥
यावरी अल्लीशा नमन करोन । बोलता झाला गहिंवरोन । काय सांगूं देवा आपण । आहां सर्वज्ञ सर्वसाक्षी ॥१२०॥
परी मी अज्ञ म्हणोन। निवेदितों कर्मकथन । तूंचि एक मजलागोन। आप्तइष्ट मायबाप ॥१२१॥
तुजहुनी नाहीं अन्य देव । मरेतोंवरी घेईन नांव । न विसंबें सर्वथैव । प्रभो देवा तुजलागीं ॥१२२॥
असो मी एक कोर्टामाजीं । कारकून असें हो गुरुजी । तीस रुपये पगार सहजीं । मिळे मजला ईशकृपें ॥१२३॥
परी आशा ही महाघातक । लागली मनासी रुखरुख । मजला बढती व्हावी आणिक । म्हणोनि घातला गोंधळ म्यां ॥१२४॥
मजला बरवें येतसे इंग्रजी । म्हणोनि कारवार - कोर्टामाजीं । केली तांतडीनें म्यां अर्जी । तेथील न्यायाधीशासी हो ॥१२५॥
परी मजला इंग्रजी चांगलें । येतें म्हणोनि खोटेंच सगळं । लिहोनि अर्ज पाठविला बळें । विचार अणुमात्र न करितां ॥१२६॥
मजला इंग्रजी ना ये चांगलें । हें कुणीतरी साहेबासी कळविलें । कोपला साहेब ते वेळे । मजवरी बहुत हो पाहीं ॥१२७॥
ऐसें म्हणोनि सारा वृत्तांत । निवेदिला स्वामीसंनिध त्वरित । नोकरी माझी जाईल निश्चित । हेंचि भय वाटतसे ॥१२८॥
हीचि चिंता मजलागोन । कीं लोभें केलें असत्य भाषण । बढतीऐवजीं नोकरी जावोन । दीनदशेसी पाचारिलें ॥१२९॥
असे जरी मम अपराध । तरी तूं देव अससी प्रसिद्ध । रक्षिसील हा मतिमंद । ऐसें ऐकुनी शरण आलों ॥१३०॥
मजला क्षमा करोनि दयाळा । रक्षण करावें तूंचि ये वेळां । तुजवांचोनि नाहीं वेगळा । अन्य त्राता जगीं मज ॥१३१॥
ऐसें बोलुनी करी तो नमन । तेव्हां स्वामी बोलती आपण । भिऊं नको चिंता करील हरण । भवानीशंकर निश्र्चयेंसीं ॥१३२॥
यश येईल तुझिया कार्या । विश्वास असों दे तव हृदया । तोचि रक्षील न धरीं संशया । अणुभरीही तूं जाण ॥१३३॥
जो जाईल अनन्य - शरण । 'अनन्य' म्हणिजे तयावांचून । अन्य वस्तु आणिक जगीं न । ऐसें भजतां तो रक्षी ॥१३४॥
अनन्य - भक्तिभावें भजतां । त्यासी तो कृपाळू न करी परता । कल्याण करी रक्षी भक्तां । ना भी ना भी तूं पाहीं ॥१३५॥
इतुकें बोलुनी पुनरपि त्यासी । दिधली फलमंत्राक्षता प्रेमेंसीं । आणिक त्याला जेवावयासी । वाढविलें तेव्हां स्वामींनीं ॥१३६॥
मग तो प्रेमानें जेवुनी प्रसाद । स्तुति केली स्वामींची बहुविध । गुरुमूर्ति मनीं धरोनी प्रसिद्ध । गेला आपुल्या सदनासी ॥१३७॥
सद्गुरुनाथ करिती कल्याण । ऐसा निश्चय अंतरीं धरोन । लागला आपुल्या कामालागुन । झाले तीन दिवस पहा ॥१३८॥
आली तार कारवाराहुनी । न्यायाधीशाची मुन्सफालागुनी । दुजा हुकूम धाडिल्यावांचुनी । नका पाठवूं अल्लीशासी ॥१३९॥
हैं ऐकतां अल्लीशालागीं । आनंद होऊनि धांवला मार्गीं । स्वामीसंनिध सांगाया वेगीं । गेला देवळामाजीं तो ॥१४०॥
कळविली वार्ता श्रीस्वामींसी । म्हणे आपुलीच कृपा परियेसीं । बढती न मिळो नोकरी मजसी । तितुकीच राहो तुमच्या कृपें ॥१४१॥
यावरी बोलती स्वामिराय । बढतीही होईल निःसंशय । धरीं तूं आपुल्या हृदयीं निश्चय । विश्वास ठेव देवावरी ॥१४२॥
असो मग काय थोर । झाला सांगू चमत्कार । पंचेचाळीस करोनि पगार । नेमिला नाझर शिर्शीसी ॥१४३॥
कुणीं कांहीं न्यायाधीशासी । न सुचवितां स्वयेंचि परियेसीं । नाझर नेमिला अल्लीशासी । शिर्शी - कोर्टामाजीं पैं ॥१४४॥
इतुक्यांत स्वामी पांडुरंगाश्रम । यांनीं गोकर्णीं केला मुक्काम । हुकूम बघतां अल्लीशा परम । आनंदें धांवला गोकर्णा ॥१४५॥
कागदपत्र जेथिंच्या तेथें । टाकुनी गेला गोकर्णातें । भेटला श्रीसद्गुरुस्वामींतें । कळविला वृत्तांत सारा तयां ॥१४६॥
म्हणे देवा सद्गुरुराया । आपुल्या आशीर्वादेंकरोनियां । झालें सकल कार्य सदया । असत्य न होय तव वाणी ॥१४७॥
आतां आला दास हा शरण । न सोडीं हे कधीही चरण । न विसरें मी तुजलागोन । देवा गुरुराया दयाळा ॥१४८॥
मी जातीचा हीन म्हणोन । नाहीं अव्हेरिलें मजलागोन । सकलां बघतां शिशुसमान । किती सद्गुणी तूं माये ॥१४९॥
काय वानूं तुझी महिमा । परम अगाध नसे त्या उपमा । न समजे कवणाही गरिमा । मी तरी अविचारी काय कळे ॥१५०॥
आपुल्या  कृपाप्रसादें खचित । अघटित घटना झाली निश्र्चित । न्यायाधीशें केलें जें समस्त । सांगतों देवा तुजलागीं ॥१५१॥
माझी नोकरी काढण्याऐवजीं । बदली केली शिर्शीमाजीं । नाझर नेमिला ही भाकृपा तुझी । आणि गंमत सांगूं पैं ॥१५२॥
पूर्वीं होता पगार तीस । कारवारींचा होता चाळिस । आतां केला पंचेचाळीस । कृपा आपुली ही देवा ॥१५३॥
आतां स्वामी एकचि मागणें । दुजें कांहीं न मागें जाणें । अज्ञ बालक कांहीं नेणे । तूंचि शिकवावें मजलागीं ॥१५४॥
आपुले सद्गुणचि गावे निशिदिनीं । यांतचि झिजवीं माझी वाणी । देईं ठाव तुझिया चरणीं । यावीण मागणं नाहीं दुजें ॥१५५॥
ऐसें बोलुनी नमन करुनी । सुंदर मूर्ति तो न्याहाळी नयनीं । आनंद होय त्याचिया मनीं । तेव्हां बोलती श्रीस्वामी ॥१५६॥
होईल तुझें इहपर कल्याण । तुझा जन्म होय पावन । श्रीकरी सतत अल्लाचें स्मरण । नाहीं भय बा तुजलागीं ॥१५७॥
यापरी देतां आशीर्वचन । अल्लीशा संतोषे स्वमनीं जाण । सेवा 'काणिका' करवोन । प्रसाद घेऊन गेला तो ॥१५८॥
तैसात्र हुकुमापरी तेथ । शिर्शीमाजीं जाउनी राहात । श्रीस्वामींचे ध्यान करीत । राहे दिननिशीं तो प्रेमें ॥१५९॥
असो पुढील अध्यायीं आणिक । कथा सांगूं परम सुरेख । याचि अल्लीशालागीं देख । रक्षिती सद्गुरुस्वामी हो ॥१६०॥
आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें चत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१६१॥
स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां लाभेल मोक्ष शीघ्र । चत्वारिंशत्तमाध्याय रसाळ हा ॥१६२॥
अध्याय ४०॥
ओव्या १६२॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP