मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥२१॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२१॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकेशवाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय सद्गुरो दीनदयाळा । करुणाकरा भक्तवत्सला । स्वस्वरूपाचा सुखसोहळा । दाविसी डोळां निजकृपेंचि ॥१॥
कैसे तुझे गुण वर्णावे । तूं गुणातीत अससी स्वभावें । ऐशा तुला वर्णाया व्हावें । त्वद्रूपचि बा देवा ॥२॥
तुझ्या स्वरूपाची न कळतां खूण । कैसें करावें देवा वर्णन । नाहीं योग्यता मजला जाण । सद्गुरुराया दयाळा ॥३॥
बालक करितां स्तनपान । न्याहाळे मातेचे वदन । ऐसें करितां ओळखे पूर्ण । हीच माता म्हणोनि ॥४॥
तैसा तुझ्या प्रेमदुग्धाचा । घुटका घेतांचि निश्रय साचा । होय अनुभव चित्ता आमुच्या । स्वस्वरूपाचा बापाहीं ॥५॥
म्हणोनि देवा तूंचि आतां । भक्ति-प्रेमरस पाजुनी ताता । ओळखवीं दिव्य स्वरूप चित्ता । कृपासागरा वेल्हाळा ॥६॥
जरी पाहिलें स्वरूप डोळां । तरीही न कळे तुझी लीला । केवढी किती अंत ना त्याला । मग कैसें वर्णवे ॥७॥
वर्णिता वर्णविता तूंचि जाण । विचार करितां नाहीं आन । तूंचि अनसी सर्वत्र परिपूर्ण । नाहीं अनुमान यामाजीं ॥८॥
असो आतां श्रोते हो सादर । ऐका सद्गुण परम थोर । श्रीसद्गुरु कृपासागर । यांचे साचार आतां पैं ॥९॥
मागील अध्यायीं कथा सुंदर । निष्काम भक्त यांचा कुमार । मुक्यासी वाचा देऊनि उद्धार । केला परम प्रीतीनें ॥१०॥
ऐशी ती सद्गुरुमूर्ति । परम कृपाळू अंगीं शांति । लाविले जन सन्मार्गाप्रति । बोधुनी वारंवार तयां ॥११॥
नको त्यांसी पैसा अडका । केवळ भाव बघती देखा । यावरी कथा कथितों ऐका । तुम्हीं भाविक सज्जन हो ॥१२॥
मंगळूर ग्रामीं होता एक । सारस्वत भक्त बहु भाविक । केशवाश्रमस्वामींचा देख । प्रेमळ भक्त तो साचा ॥१३॥
ब्रह्मचारी असे सज्जन । होता बंधूंचें अन्न खावोन । स्वतंत्र एक पैही जाण । नसे हातीं तयाच्या ॥१४॥
अंगकष्ट करुनी नाना । पोटासी अन्न मिळे त्या जाणा । चित्तीं धरी सद्गुरुराणा । निशिदिनीं, तो भाविक पैं ॥१५॥
ऐसें असतां एके दिनीं । विचार करी तो अंतःकरणीं । जावें सद्गुरु-संनिधानीं । शिराली - ग्रामी आतां पैं ॥१६॥
ऐसें योजुनी निघाला त्वरित । पायींच गेला मार्ग आक्रमित । शिणला तो भक्त अमित । सुजले पाय बहुतचि ॥१७॥
वाटेंत एक गांव लागतां । तेथें अश्वत्थ वृक्ष होता । तेथें निजतां लागली चिंता । म्हणे आतां पुढें कैसें क्रमावें ॥१८॥
अहा देवा भक्तवत्सला । काय करूं बा ये वेळां । कधीं पाहूं मूर्ति डोळां । काय प्रारब्ध हें माझें ॥१९॥
येथेंचि आतां माझा प्राण । जाईल तरी मग कोठून । होईल बापा तुझें दर्शन । सांग दयाळा तूं मजला ॥२०॥
येथवरी आलों कैसातरी । पुढें चालवेना निर्धारीं । आतां तूंचि कृपा करीं । अनाथावरी करुणाळा ॥२१॥
त्वां रक्षिले बहुत जनांसी । आतां कां न उपजे दया मानसीं । येथें टाकितां अर्ध वाटेसी । कोण गती मम देवा ॥२२॥
तुजवांचोनि मज रक्षिता । कवणही नसे जनीं ताता । आणिक न मागें मी आतां । भेटीवीण तव देवा ॥२३॥
यावरी जैसें तुझ्या मानसीं । तैसेंचि करी तूं बा मजसी । भक्तजनांची चिंता तुजसी । म्यां तरी कासया सांगावें ॥२४॥
ऐसें म्हणोनि तो भक्त । पहुडला मूर्ति चिंतुनी त्वरित । निद्रा लागली तेव्हां त्याप्रत । पडिलें स्वप्न सुंदर त्या ॥२५॥
 केशवाश्रम - सद्गुरुनाथ । येउनी बैसले जवळी तेथ । पायांसी तेल चोळिलें त्याप्रत । अति प्रेमानें त्या काळीं ॥२६॥
अदृश्य जाहले अवचित ।  मग जागा जाहला तो भक्त । बघतां झाला आश्र्चर्यचकित । दिसे तेल पायांसी ॥२७॥
झाले पाय सडसडीत । न दुखती पाय किंचित । तेव्हां उठला तेथूनि त्वरित । भक्त न चालूं लागला तो ॥२८॥
ज्याची भक्ति दृढतर । त्याची चिंता सद्गुरूसी थोर । आपण वाहती तयाचा भार । काय महिमा वर्णावी ॥२९॥
पहा काय आश्चर्य थोर । स्वप्नींचा या कैसा चमत्कार । ऐसी सद्गुरुमूर्ति सुंदर । साक्षात् महेश्वर अवतरला ॥३०॥
असो मग तो भक्तराज । शिराली - ग्रामीं पोंचला सहज । दर्शन घेतलें स्वामींचें निज - । प्रेमानें त्यानें जाण पां ॥३१॥
म्हणे मानसीं धन्य धन्य । देवा तुजवीण नाहीं अन्य । विषय पांचही असती शून्य । तूंचि एक सत्य अससी ॥३२॥
ऐसें भावुनी निजमानसीं । धरी प्रीतीनें गुरुचरणांसी । तृप्त होउनी परियेसीं । पावला अखंड समाधान ॥३३॥
असो यावरी घेउनी दर्शन । राहिला तेथे कांहीं दिन । मग गेला ग्रामीं जाण । मंगळूरासी तो भक्त ॥३४॥
यापरी तो प्रतिवर्षीं । येतसे सद्गुरुदर्शनासी । करितां करितां त्याचे मानसीं । उपजहें वैराग्य संसारीं ॥३५॥
ऐसें असतां सद्गुरुनाथ । कसासी लाविती भक्ताप्रत । आलें त्यावरी संकट बहुत । काय तें आतां परिसा हो ॥३६॥
कष्ट करोनि नानापरी । बंधुजनांची करी चाकरी । देहरक्षणार्थ उदर भरी । ध्याई सतत गुरुमूर्ति ॥३७॥
ऐसें असतां तो भक्त । प्रारब्धवशें झाला अशक्त । कष्ट कराया न होय शक्त । करिती तुच्छ सकलही ॥३८॥
छी थू करिती सकलही आप्त । परी हा न डगमगे किंचित । गुरूपदेश धरोनि चित्तांत । नांदे सुखानें तो पाहीं ॥३९॥
न देती पोटभरी त्यासी अन्न । म्हणती खा कष्ट करोन । आम्हीं आणावें कोठोन । तुजलागीं कैंचे वाढावें ॥४०॥
ऐसे नानापरी बोलती शब्द । परी याच्या अंतरीं नाहीं खेद । पाही सर्वत्र सद्गुरुपाद । चित्तीं अखंड गुरुनाम ॥४१॥
मग झाला हा बहु अशक्त । बंधु दवडिती त्याप्रत । जाया निघाला शिराली - ग्रामांत । हळू हळू वाट चालोनी ॥४२॥
घेतलें स्वामींचे दर्शन । आनंदला मनीं पूर्ण । जें करिती सद्गुरु सघन । म्हणे तें आमुचें हितचि होय ॥४३॥
मग स्वामींनी त्याजलागीं । प्रेमानें न्याहाळिलें वेगीं । तेव्हां तयासी अंगीं । आली शक्ति हळू हळू ॥४४॥
सेवा करी श्रीस्वामींची । मनोभावें मूर्ति साची । हृदयीं धरोनि, सर्व जनांची । सेवा करी तो प्रेमानें ॥४५॥
सर्वांठायीं सद्गुरुमृति । ऐसा भाव धरोनि चित्तीं । ज्यासी नसे अंगीं शक्ति । त्याची सेवा करी पैं ॥४६॥
ऐसा त्याचा भाव बघोनि । सद्गुरु संतोषती अंतःकरणीं । आणिक त्यावरी परम सद्गुणी । माउली प्रीति करीतसे ॥४७॥
पहा कैसी त्यांची वृत्ति । सत्पुरुषांची ऐसीच स्थिती । जे जनांवरी करिती प्रीति । तेचि होती प्रिय त्यांस ॥४८॥
आपुली सेवा न केली । न बघती त्याकडे कधींकाळीं । परी सेवितां संकटकाली । कोणाही तें प्रिय त्यांना ॥४९॥
परोपकाराइतुकें पुण्य । नाहीं जगती आणिक अन्य । म्हणोनि सद्गुरुसी होय मान्य । परोपकार हा पाहीं ॥५०॥
जातीचा अंत्यज कां असेना । आपत्काळीं त्याच्याही जाणा । करावें प्रेमें संगोपन । तोचि जाणा खरा भक्त ॥५१॥  
सोवळें वस्त्र करोनि परिधान । पूजेचें साहित्य हातीं धरोन । समजा जाय देउळीं जाण । पूजेलागीं कुणी एक ॥५२॥
तेव्हां तेथें रस्त्यावरी । एक अंत्यज पडला भूवरी । मृच्छा येउनी निर्धारीं । काय करावें तेव्हां त्यासी ॥५३॥
सोवळें आहे माझें म्हणुनी । ऐसें न पाहतां लगबगें धांवुनी । सावध करावें त्वामी झणीं । पाणी लावुनी डोळ्यांसी ॥९४॥
आणिलें जें पंचामृत । त्यासी पाजावें तें त्वरित । अंत्यज जेव्हां सावधान होत । तेव्हां पोंचवावें गृहासी त्या ॥५५॥
मग येउनी आपुल्या गृहासी । स्नान करावें परियेसीं । न चुकावें आपुल्या धर्मासी । परी करावा परोपकार ॥५६॥
ऐसियासी पुण्य अपार । पूजेच्या कोटिगुणें पहा थोर । ऐसी ही सद्गुरूची वाणी मधुर । श्रोतयांसी सांगितली ॥५७॥
असो यापरी तो गुरुभक्त । जनांवरी करी उपकार बहुत । बंधूनीं ऐकुनी ऐसी मात । आश्चर्यचकित झाले ते ॥५८॥
झाला बहुत अशक्त म्हणुनी । दवडिला होता गृहांतुनी । परी तो सद्गुरु - कृपावलोकनीं । झाला सशक्त नंतरी ॥५९॥
म्हणोनि झालें आश्र्चर्य । धांवुनी येती बंधुद्वय । बघतां मूर्ति होती तन्मय । आनंद चित्तीं न समावे ॥६०॥
म्हणती देवा सद्गुरुराया । काय महिमा तुझी सदया । देईं आम्हां तव पदीं ठाया । ऐसें नानापरी प्रार्थिती ॥६१॥
मग ते पूजा करूनि सर्वतोपरी । जाती आपुल्या ग्रामांतरीं । धन्य धन्य म्हणती अंतरीं । बंधूसी जाणा निर्धारें ॥६२॥
असो तो झाला परमभक्त । निपुण परमार्थीं विख्यात । ब्रह्मज्ञानी होय त्वरित । काय वानूं गुण त्याचे ॥६३॥
श्रीकेशवाश्रम सद्गुरुमाय । यापरीच जनांसी उद्धरी सदय । सांगुनी नाना उपाय । दाविती चिन्मय निजरूपा ॥६४॥
पहा कैसा तो उद्धरिला भक्त । कसासी लावुनी बघितला भावार्थ । आतां कुणीही म्हणतील येथ । काय कसासी लाविला ॥६५॥
तरी ऐका त्याचें उत्तर । त्या भक्तासी कष्ट थोर । आले बहुतचि साचार । हेंचि कसासी लावणें ॥६६॥
जरी झाले तितुके कष्ट । तरीही खेद ना त्याच्या चित्तांत । जो असे खरा भक्त । तो सदैव तृप्त असे ॥६७॥
म्हणोनि त्यासी अणुमात्र चिंता । नसे स्वार्थ मानसीं तत्त्वतां । लावुनी सद्गुरूपाशीं चित्ता । ब्रह्मज्ञान तेणें जोडिलें ॥६८॥
सुख-दुःख यांसी भिउनी । जरी केली भक्ति सजणी । त्याचा उपयोग न होय झणीं । जन्म व्यर्थ जातसे ॥६९॥
ज्यासी असे इच्छा सुखाची । त्याची भक्ति कामिक साची । जरी केली तेणें भक्ति गुरूची । तरीही न सुटे बंधन पैं ॥७०॥
म्हणोनि सद्गुरु निश्चय बघती । भक्ता कसासी लावुनी पाहती । जरी तो उतरेल कसाप्रती । तरीच समाधान लाभेल ॥७१॥
सद्गुरु जें करिती कार्य । तेणेंचि भक्तहित होय । ते जैसें ठेवितील सदय । त्यांतचि आनंदें रहावें ॥७२॥
जरी आले कष्ट सतत । तरी आपुल्या सद्गुरूप्रत । नच विसरावें तरीच परमार्थ । होईल प्राप्त निश्चयें ॥७३॥
असो आतां स्वामी सदय । यांनीं करुनी नाना उपाय । उद्धरिला अगणित भक्तसमुदाय । सांगतां ग्रंथ वाढेल हा ॥७४॥
साधुसंतांचा अवतार जाण । जगाचें कराया कल्याण । याहुनी त्यां आणिक काज न । अवतरण्यासी कांहीं एक ॥७५॥
म्हणोनि ते सारा जन्म । झिजविती देह परमार्थी उत्तम । ते असती पूर्ण ब्रह्म । निमग्न असती स्वस्वरूपीं ॥७६॥
नको त्यांसी प्रपंच निश्चितीं । म्हणोनि करिती एकांतीं वस्ती । दाविती जनांसी 'घेतों विश्रांती' । म्हणुनीच राहती एकीकडे ॥७७॥
तैसें केशवाश्रम - श्रीगुरूंनीं । जवळीच 'तलगेरी' ऐशा स्थानीं । विश्रांति - गृह बांधवुनी । राहती उष्मकालीं ते तेथें ॥७८॥
जनांसी बघाया विश्रांतिस्थान । परी यांच्या मानसीं निराळेचि जाण । होती निजस्वरूपीं निमग्न । एकांती जाउनी ते पाहीं ॥७९॥
यापरी ते शुद्ध ब्रह्मज्ञानी । परम सात्त्विक निरभिमानी । सकलां जनांसी लाविलें भजनीं । प्रेमबळानें निर्धारें ॥८०॥
ऐसें असतां बहुत दिन । सुखें केलें कालक्रमण । निवविती सारस्वत भक्तजन । सद्गुरु निजकृपेंकरोनि ॥८१॥
कालेंकरूनि वार्धक्य आलें । केशवाश्रम अशक्त बहुत झाले । शिष्यजन विचारांत पडले । काय करावें म्हणोनि ॥८२॥
सर्वही करिती मनीं विचार । करवावा आतां शिष्य - स्वीकार । म्हणूनि धुंडूं लागले ते सत्वर । योग्य बटूसी तेधवां ॥८३॥
धुंडितां मिळाला योग्य सहज । शुक्लभट्ट यांचा वंशज । मुलक्षणी मुलगा पहा सतेज । भवानीशंकर कृपेनें ॥८४॥
मंगळूर नामें प्रसिद्ध शहरी । लाभला मुलगा सुंदर भारी । बघतांचि वृत्ति होय अंतरीं । तल्लीन जाणा मानवांची ॥८५॥
भक्तजनांच्या आग्रहास्तव । तेथे गेले होते गुरुदेव । तेव्हांचि प्रार्थिती जन सर्व । शिष्य-स्वीकार करावया ॥८६॥
प्रार्थना त्यांची ऐकूनि कानीं । योग्य वाटलें स्वामींच्या मनीं । शिष्य-स्वीकार करिती झणीं । सद्गुरु शिरालींत तेधवां ॥८७॥
कासया त्यांसी इतुका कठिण । संन्यास - आश्रम तो जाण । पुढील अध्यायीं याचें विवरण । बोलूं गुरुकृपेंकरूनि ॥८८॥
असो आतां ऐका सकल । शके सत्राशें सव्वीस सोज्वळ । रक्ताक्षी संवत्सर आषाढ शुक्ल । पंचमी ऐशा शुभदिनीं ॥८९॥
‘‘वामनाश्रम’’ या नामेंकरुनी । हे शिष्य प्रसिद्ध जाहले जनीं । मग येती चित्रापुरीं ते झणीं । सद्गुरु निजशिष्यासमवेत ॥९०॥
कांहीं वर्षें वामनाश्रमांसी । योगाभ्यास शिकविला प्रेमेंसीं । ब्रह्मज्ञानी झाले परियेसीं । 'वामनाश्रम' स्वामी ते ॥९१॥ '
सुभानु' नाम संवत्सरीं । सत्राशें पंचेचाळ शकांतरीं । मार्गशीर्ष नवमी अवसरीं । झालें वर्तमान तें परिसावें ॥९२॥  
सद्गुरुस्वामी केशवाश्रम । संपतां अवतार कार्यक्रम । घेती समाधि आनंदें उत्तम । मार्ग सांगुनी सकलांसी ॥९३॥
ऐसे जे साधुसंत । जगाच्या कल्याणा झिजविती स्वतांप्रत । देहाची ना धरिती प्रीत । नाहीं स्वार्थ अणुमात्र ॥९४॥
ऐशा सद्गुरु माउलीलागीं । भजतां सहजचि आपण वेगीं । पावुनी समाधान, जगीं । दुज्यांसी ताराया समर्थ पैं ॥९५॥
म्हणोनि करावी सत्संगति । त्यावीण आम्हां नाहीं गति । तेचि देउनी शुद्ध मति । उद्धरिती यांत न संशय ॥९६॥
जो करी गुरुनिंदा । तो न पोंहचे मोक्षपदा । लटिकें नव्हे हें, त्याची आपदा । कधींही न चुके निश्र्चयेसीं ॥९७॥
म्हणोनि आपण धरावे चरण । तरीच चुके जन्ममरण । पुढें होईल याचें विवरण । गुरूचि श्रेष्ठ म्हणोनियां ॥९८॥
असो आतां केशवाश्रम - । सद्गुरुस्वामी यांनीं परम । उत्कृष्ट जनांसी लावुनी प्रेम । अवतारसमाप्ति केली पैं ॥९९॥
शके सत्राशें सातांपासुनी । पंचेचाळवरी तयांनीं । निजभक्तांस्तव जगीं राहुनी । स्वधर्मराज्य चालविलें ॥१००॥
पुढील अध्यायीं षष्ठ आश्रम । 'वामनाश्रम' - स्वामी हें नाम । धरोनि चालविती स्वधर्म - । राज्य सारस्वतवृंदाचें ॥१०१॥
त्यांचीही महिमा अगाध । तीही बोलूं प्रेमास्पद । ऐकतां होईल आनंद । भाविक भक्तांलागीं पैं ॥१०२॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादेंचि एकविंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०३॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां भ्रम होईल दूर । एकविंशाध्याय रसाळ हा ॥१०४॥
अध्याय २१ ॥
ओंव्या १०४ ॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP