मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥४३॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४३॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥४३॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्वांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जया जी श्रीगुरुराया । काय स्वरूप तुझें हें सदया । कल्पनाचि न करवे बुद्धीसी या । ऐसें प्रेमळ रूप तुझें ॥१॥ इतुकें प्रेम लागाया भक्तां । काय कारण श्रीगुरुनाथा । तूंचि सांगें मजला ताता । भक्तवत्सला कृपाघना ॥२॥ सगुण स्वरूप बघतां प्रेम । उपजे तरी जगीं परम । सुंदर गौरवर्ण उत्तम । अमनी अनेक जन बापा ॥३॥ सद्गुण बघोनि म्हणतां जरी । ते न दिसती बाहेरी । परी मूर्ति बघतांतचि अंतरीं । भरे प्रेम अनिवार ॥४॥ बरें स्वरूप बघतांचि साजिरें । कवण्या ठायीं म्हणावें ‘बरें’ । नासिका कर्ण कीं नयन हें सारें । यामाजीं सुरेख काय असे ॥५॥ सकळ मिळोनि एक वदन । कवणा सुंदर म्हणावें आपण । हेंचि न कळे मजलागोन । यास्तव साकार हें लटकेंचि ॥६॥ गुण बघतां नानाविध । तेही सत्य नव्हती हें प्रसिद्ध । परी देवा होय आनंद । तुझी मृर्ति आठवितां ॥७॥ साधु-संत बोलती वचन । सद्गुरूसी भजावें आपण । तेचि चुकविती जन्म-मरण । पोहोंचविती मोक्षासी ॥८॥ परी देवा विचार करितां । तुझें प्रेमचि मोक्ष तत्त्वतां । तुजवांचोनि श्रेष्ठ तें ताता । नसे कांहीं अणुमात्र ॥९॥ रूप गुण विद्या सर्वही । तव चरणींच असती पाहीं । नाना कुतर्क घेतले तरीही । तूं श्रेष्ठ हें सिद्ध होय ॥१०॥ श्रेष्ठ कनिष्ठ कांहीं एक । म्हणाया तुजला वाव ना देख । पहा कैसें तें निश्चयात्मक । सांगतों परी हंसूं नको ॥११॥ श्रेष्ठ जरी म्हणूं तुजसी । भक्तांपुढें तूं कनिष्ठ होसी । कारण त्यांच्या कार्यांसी । झटसी लाज सोडूनियां ॥१२॥ जरी कनिष्ठ म्हणूं तुजसी । तरी सर्वांचा मालक अससी । वरिष्ठही भजती बहुवसी । डौल सारूनि एकीकडे ॥१३॥ बांकविती मान आपुली तुजपुढें । प्रार्थना करिती येतां सांकडें । तुजला पाहतां होती वेडे । कांहीं नावडे तुजवीण ॥१४॥ तेव्हां कनिष्ठ म्हणतां तूंतें । कैसें शोभेल सांगा मातें । एकचि दिसे मजला खरें तें । बोलतों देवा प्रेमभरें ॥१५॥ कवणही नसे बोलाया वाट । तुझी इच्छाच ही एक श्रेष्ठ । इच्छेसरिसें होय तें उत्कृष्ट । जें जें करिसी तें देवा ॥१६॥ म्हणोनि तुझी भक्ति करितां । कवणही न उरे चिंता । मग कैंचें भय त्या भक्ता । तव कृपें हो दयाळा ॥१७॥ असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । मंगेशभट्ट - राधेचें लग्न । आशीर्वादें झालें पैं ॥१८॥ आणि मंगळूर - ग्रामींचा गृहस्थ । यासी दाविलें स्वामींनीं त्वरित । आपण होऊनि साक्षात् दत्त । ऐशी कथा वर्णियेली ॥१९॥ आणिक बोलूं त्यांचें महिमान । तुम्ही श्रोते सावधान । परिसा मूर्ति मानसीं धरोन । तेव्हां येईल दुडदुडां ती ॥२०॥ - पांडुरंगाश्रम । यांनीं चालविलें साम्राज्य परम । बावन्न वर्षें वरी उत्तम । अधिकचि होय यांचें पैं ॥२१॥ परमतीव्र वैराग्य यांचें । धर्मरक्षण करिती साचें । जनां सांगती स्वधर्माचें । आचरण कदापि सोडूं नका ॥२२॥ धर्मकार्यीं झिजविला देह । परम कडक वृत्ति निःस्पृह । नाहीं अंगीं ममता मोह । सांगती निक्षुनी धर्म जनां ॥२३॥ शिखेवीण कोणी येतां नर । चोपुनी सांगती त्यासी विचार । न धरिती भीड अणुमात्र । जनांमाजीं पहा हो ॥२४॥ निंदो अथवा वंदो कुणी । न धरिती अणुमात्रही मनीं । जगाचें कल्याण एकचि झणीं । व्हावें हें अंतरीं सर्वदा ॥२५॥ जो हें समजे मानसीं भक्त । त्याचें कल्याण होय निश्चित । अज्ञपणें निंदित त्यांप्रत । नशीबचि त्याचें म्हणावें पैं ॥२६॥ खरे जे असती साधु-संत । सदा जनांचे कल्याण इच्छित । नाहीं कवणाचें भय त्यांप्रत । मायबापचि जाणा ते ॥२७॥ मायबापांसी आपुल्या मुलांचें । चोपुनी सांगाया भय तें कैंचें । उद्धट वर्तन करितां साचें । करिती शिक्षा ताकाळ ॥२८॥ तद्वत् आमुचे मठाधीश । स्वामी मायबापचि आम्हांस । स्वधर्मरक्षक म्हणोनि तयांस । अधर्म नावडे अणुमात्र ॥२९॥ जरी करिती अधर्म स्वजन । कळवळे सद्गुरुस्वामींचे मन । झिजविती देह रात्रंदिन । स्वधर्म रक्षणास्तव जाणा ॥३०॥जनाचें हित व्हावें ऐसा । एकचि हेतु त्यांचा परियेसा । म्हणोनि कोपही दाविती खासा । जनांलागीं ते पाहीं ॥३१॥ यावरी येईल सहज प्रश्न । स्वधर्में वागतां हित तें कवण । तरी परिसावें सावधान । श्रोते सज्जन हो तुम्ही ॥३२॥ हें जग सारें नश्वर । सर्वही जाणती श्रेष्ठ नर । कीं व्यवहारी आपण बोलतों चतुर । काय भरंवसा देहाचा ॥३३॥ परी वरिवरी बोलती ते शब्द । नाहीं अंतरी अणुमात्र खेद । कीं मी घ्यावा निज - आनंद । ऐसा अनुताप ना पोटीं ॥३४॥ ऐसें व्हावया काय कारण । जग सारें भासे खरें म्हणोन । घडे हातुनी यथेष्ट आचरण । विषयलालसा असल्यामुळें ॥३५॥ जरी ना घातले स्वामींनीं नियम । वाढे बहुतचि आमुचा काम । न ये क्षणभरी मुखांतुनी 'राम' । रमोनि जाय मन विषयीं ॥३६॥ विषयीं गर्क होतां निश्चयें । इहपरासी मुकतो तो स्वयें । मग कैंचें समाधान मनासी ये । फिरे नाना योनी तो ॥३७॥ एकदां गेला मनुष्यदेह । पुनरपि न मिळे तो लवलाहें । यांत नाहीं अणुमात्र संदेह । म्हणोनि नच तो दवडावा ॥३८॥ तेवीं येचि जन्मीं आपण । चुकवावें आपुलें जन्म-मरण । विषयीं न जावें बुडोन । तरीच लाभे मोक्ष तया ॥३९॥ जीवा सहजचि विषयीं ममता । त्याचा त्याग न करवे चित्ता । सारा जन्म त्यांतचि तत्त्वतां । घालितों आपण दिनरजनीं ॥४०॥ म्हणोनि सद्गुरुस्वामी आम्हांसी । स्वधर्माचे नियम ते बहुवसी । घालुनी देती प्रेमासरशीं । आपणही वर्तती तैसेचि ॥४१॥ नियमें विषयलालसा जात । हें विदितचि असे सकलांप्रत । तरीही विवरूं आतां किंचित । लक्ष देऊनि अवधारा ॥४२॥ जरी असे लहान बाळ । तेंही नियमें विषय सकळ । त्यागाया सिद्ध होय ते वेळ । परम प्रीतीनें हो जाणा ॥४३॥ सणावारीं करिती पक्वान्न । नानाविध सारे जन । देवासि नैवेद्य केल्यावीण । न खाती अनेक जन पाहीं ॥४४॥ बाळ मागतां सांगे माता । देवाचा नैवेद्य न होतां । तुज द्यावया न होय सर्वथा । म्हणोनि नाहीं देत कधीं ॥४५॥ ऐसें करितां पुढें त्या बाळा । आवरूनि घ्यावया मन ते वेळां । सहजचि होय नियमें त्याला । क्षणभरी तरी निश्र्चयें ॥४६॥ तें म्हणे ‘‘आई नैवेद्य करोनि । मग देईल मजलागोनि ।" तोंवरी मन आवरोनि । धरी तें अज्ञ बालक ॥४७॥ इतुके तरी तीन तास । विषयलालसा सोडी खास । अज्ञ बालक जरी तें बहुवस । नियमेंचि सोडी विषयमुखा ॥४८॥ तेव्हां आम्हां कैसें न होय । नियम पाळितां सोडाया विषय । म्हणुनीच सांगती स्वामिराय । स्वधर्मनियम पाळाया ॥ ४९ ॥ स्नानसंध्या केल्यावीण । ब्राह्मणें जेवूं नये आपण । ऐसें वेदशास्त्रवचन । सांगती समजा गुरुराय ॥५०॥ पाळितांचि तितुके नियम । मन आवराया मार्ग सुगम । तैसेच आणिक नाना धर्म । करावे लागती आपुल्यासी ॥५१॥ तेणेंकरोनि मनासी बंधन । बंधनें विषयीं न जाय मन । मग सहजचि पाप - क्षालन । होय निश्चयें जनांचें ॥५२॥ पापनाश होतां सत्वरी । चित्त शुद्ध होय निर्धारीं । चित्त शुद्ध झालियावरी । आत्मज्ञान होय झणीं ॥५३॥ याचिकारणें स्वामिराय । करिती जनांसी बोध सदय । स्वधर्में राहाटतां नाहीं भय । ऐसें गर्जती प्रेमभरें ॥५४॥ त्यांचा अवतार याचिकारणें । जगाचें कल्याण होईल जेणें । तेंचि करिती परमप्रीतीनें । आम्हां अज्ञांस्तव ते जाणा ॥५५॥ त्यांनीं जरी स्वधर्मबंधन । नाहीं घातलें तरी हें मन । विषयीं बुडोनि रात्रंदिन । जातील अधःपाता जन सारे ॥५६॥ म्हणोनि स्वामी श्रीगुरूंसी । लागली चिंता काय करूं ऐसी । पार घालूं कैसें अज्ञांसी । भक्तां अभक्तां सकळां हो ॥५७॥ म्हणोनि घडिघडी करिती बोध । जनांसि आपुल्या नानाविध । म्हणती नका होऊं मोहांध । नका जाऊं आडमार्गे ॥५८॥ सोडूं नका स्वधर्म सारा । जितुका होय तितुकाचि करा । कष्ट न लागती कदापि हो नरा । स्वधर्मरक्षण करण्यातें ॥५९॥ परधर्मभयदायक । स्वधर्म तो सर्वां रक्षक । सोडूं नये आपुला सुरेख । कधींकाळीं निश्चयेंसीं ॥६०॥ जरी वाटे परधर्में सुख । तरी नव्हे, दुःखचि देख । ऐसा चित्तीं करावा विवेक । रात्रंदिन मानवांनीं ॥६१॥ स्वधर्में वर्ततां जें होय सुख । अन्यधर्में तें न होय देख । परधर्म हा क्लेशकारक । कैसें तें पहा सांगूं पैं ॥६२॥ पहा कैसें स्वधर्में वर्ततां । नाहीं भय कवणाचे तत्त्वतां । अधर्म कराया प्रवर्ततां । पलपवुनी करावा लागे तो ॥६३॥ समजा एकानें अधर्म करितां । त्याचा मित्र येई अवचिता । तेव्हां आला ऐसें ऐकतां । दचकुनी उठे लगबगें तो ॥६४॥ त्यासी कळली कीं माझी करणी । ऐसी भीति वाटे त्याच्या मनीं । एवं भीति अधर्मालागुनी । कवणही असो तें कार्य ॥६५॥ धर्मापरी वर्ततां आपण । नाहीं कोणतेही भय त्यालागुन । परधर्म आणि अधर्म गहन । बहुतचि भय कीं त्यामाजीं ॥६६॥ तैसें तें भय, हेंचि अतिशय । ओझं डोईं आपुल्या होय । तें उतरावया श्रीगुरुमाय । येत आपुली प्रेमानें ॥६७॥ एकदां सारें उतरलें तेव्हां । आणिक पुनरपि भार न घ्यावा । करूं नये तो आपण कां करावा । अधर्म जाणा हो तुम्ही ॥६८॥ जो असे आपुला धर्म । तोच श्रेष्ठ आम्हांसी परम । म्हणोनि सद्गुरु ते गुणग्राम । बोधिती उत्तम सकलांसी ॥६९॥ कष्ट सोसुनी आपण सकल । कंठशोष करिती वेल्हाळ । परी ना आम्हां जनांसी तळमळ । घालितों गोंधळ अधिकचि ॥७०॥ असो आपुला स्वधर्म थोर । पाळितां आपुलें मन हें सत्वर । त्यागुनी विषयसुखासी निर्धार । पावें निजसुखासी तात्काळ ॥७१॥ वरी कथिल्यापरी मन हें । स्वधर्मनियमें बांधिलें पाहें । विषयांपासुनी दूर राहे । क्षणभरी तरी निश्र्चयेंसीं ॥७२॥ कीं ब्राह्मणें अमुक न करावें । करावें अमुक ऐसेंचि बरवें । स्त्री-पुरुषें-गृहस्थै-विधवें । चातुर्वर्णां स्वधर्म श्रेष्ठ असे ॥७३॥ स्वधर्माचें बंधन । वेदशास्त्रीं केलें कथन । तेंचि मांगती कृपा करोन । लटिकें न सांगती अणुमात्र ॥७४॥ ऐसें बंधन जरी न केलें । भलतेंचि आचरण घडेल ये वेळे । मानवांकडोनि म्हणोनि नेमिलें । वेदशास्त्रें बंधन पैं ॥७५॥ तेंचि सांगती सद्गुरु सघन । परी नायकतों आम्ही त्यांचे वचन । म्हणोनि खेद झाला उत्पन्न । श्रीपांडुरंगाश्रमस्वामींसी ॥७६॥ कीं नायकती आपुलें वचन । तरी पुढती यां गति कवण । कैसी बुद्धि यांची म्हणोन । त्रासती अंतरीं बहुतचि ॥७७॥ दाविली वाट ती सोडोनी । अन्यचि धरिली असे जनांनीं । तेव्हां वाटे अंतःकरणीं । कैसे तरुनी जातील हे ॥७८॥ स्वधर्माची होतां हानी । उरली नाहीं आणिक करणी । तोचि भवनदीसी सेतू असुनी । तेणेंचि होय ज्ञान पैं ॥७९॥ स्वधर्म हाचि सेतू तोडितां । कैसें जावें पार तत्त्वतां । म्हणोनि जनांची लागली चिंता । श्रीस्वामींसी अनिवार ॥८०॥ कीं आतां आमुच्या वृद्धापकाळीं । परधर्म शिकले जन ये वेळीं । कैसें साहूं देखतां डोळीं । म्हणोनि हळहळती मानसीं ॥८१॥असो ऐसें असतां पाहीं । एकेकाळीं प्रार्थिती सर्वही । अहो देवा श्रीगुरुमाई । भक्तवत्सले करुणाळे ॥८२॥ आतां करावा शिष्य - स्वीकार । ऐशी कृपा करावी आम्हांवर । यावरी स्वामी नेदिती उत्तम । संमतीचे लोकांसी ॥८३॥ तेव्हां भक्त करतील काय । मानसीं परम खेद होय । कधीं करतील शिष्य गुरुवर्य । ऐसा ध्यास धरिला जनीं ॥८४॥ मग गेले कांहीं दिवस । शके अठराशें छत्तीस । यावेळीं श्रीस्वामींस । अवचित आजार झाला पैं ॥८५॥ ज्वर येई सदा त्यांसी । क्षीण झाले तेव्हां बहुवसी । वार्ता पसरली देशोदेशीं । आमुच्या जनामाझारीं ॥८६॥ तेव्हां रावबहादुर येन्नमिडी । व्यंकटराव आला तांतडीं । आणि बैंदूर नारायण आवडीं । आला धांवत शिरालीसी ॥८७॥ तेवीं चिक्रमने भवानीशंकर । आणिक प्रमुख बहुत नर । आले धांवत चित्रापुर - । स्थानीं बहुत चिंतेनें ॥८८॥ जाऊनि स्वामीसंनिधीं । प्रार्थना केली परमावधी । काय ती सांगतों ऐका आधीं । सद्गुरुचरणां स्मरोनि ॥८९॥ म्हणती देवा सद्गुरुराया । आतां शिष्य - स्वीकार सदया । करावा कृपा करोनियां । आमुच्यास्तव तुम्ही हो ॥९०॥ सद्गुरु नसतां जगीं आम्ही । राहावें कैसें सांगा स्वामी । कोण दावील मार्ग हा नेहमीं । गुरुवीण नाहीं गति अन्य ॥९१॥ सद्गुरु नसतां मठामाजीं । काय शोभा येईल गुरुजी । म्हणोनि आमुची विनंती आजि । करावी मान्य हो देवा ॥९२॥ देउळासि नसतां कळस । कवणही न म्हणे देऊळ त्यास । तैसें मठामाजीं बघतां खास । सद्गुरु नसतां मठ नव्हे ॥९३॥ जरी मठीं असती अनेक जन । तरी स्वामीविण दिसे शून्य । म्हणोनि कवणही न धरितां अनुमान । शिष्य - स्वीकार करावा ॥९४॥आधींच धर्मग्लानि होय । सद्गुरु नसतां गति काय । आहां अज्ञांसी कोण सदय । शिकवील गहन स्वधर्म खरा ॥९५॥ कोण सांगेल सद्विचार । पुढें कोण गति होय साचार । आणिक नाहीं आधार । गुरुवीण जगतीं अन्य पहा ॥९६॥ जगीं नाना संकटें येती । तेव्हां धांवुनी येतों मठाप्रति । निवारील कवण सांगाती । गुरुवांचोनि दयाघना ॥९७॥ सारें तुजला असे विदित । प्रार्थावें नलगे देवा तुजप्रत । आमुचा सारा हेतु तूं खचित । जाणसी तेव्हां काय वदों ॥९८॥ ऐशियापरी करोनि प्रार्थना । साष्टांग प्रणिपात घातला चरणा । तेव्हां बोले श्रीगुरुराणा । काय म्हणोनि तें परिसा ॥९९॥ गृहस्थ जनांचे बघतां वर्तन । आमुचें मन होय अति उद्विग्न । तेव्हां शिष्य स्वीकार न करूं पूर्ण । निश्चय आमुचा झाला असे ॥१००॥ ऐसें ऐकतां सद्गुरुवचन । जनांचें होय म्लान वदन । खिन्न जाहलें अंतःकरण । परी बोलाया धैर्य नसे ॥१०१॥ मग सारे मिळोनि जन । सर्व समाधींसंनिध जाऊन । तेवींच भवानीशंकर देवासी भेटोन । प्रार्थना करिती त्यासमयीं ॥१०२॥ सेवाही करविली त्यांनीं बहुत । कीं शिष्यस्वीकार करावा त्वरित । ऐसी प्रेरणा होवो स्वामींप्रत । यापरी जनांनीं प्रार्थिले ॥१०३॥ इतुकें जरी प्रार्थिले जनांनीं । तरी उदासीनचि ते अंतःकरणीं । ऐसे निष्ठुर कां झाले म्हणोनि । कुणीही पुसतील तरी ऐका ॥१०४॥ सद्गुरु खचितचि असती दयाळ । कठोर नव्हती, असती कोमळ । परी पाहिली परीक्षा सकळ । भक्तजनांची तेधवां ॥१०५॥ वरूनि दाखविला कोप बहुत । बघाया जनांचा भावार्थ । न करूं म्हणती शिष्य निश्र्चित । ऐसा हट्ट धरियेला ॥१०६॥ जरी असती मुलें चतुर । माता बोले चुकतां अणुमात्र । म्हणे तूं अससी खचितचि खर । काय कारणें तें ऐका ॥१०७॥ असे जरी परम चतुर । किंचित चुकतां वारंवार । जरी न कथिलें तरी पुढें तो कुमार । चूकचि करील निर्धारें ॥१०८॥ म्हणोनि बोलती मातापिता । शहाणा अधिकचि व्हावें तत्त्वतां । ऐसी धरोनियां ममता । प्रेमेंच बोलती त्यालागीं ॥१०९॥ तद्वत् आमुचे स्वामी कृपाघन । बोलिले की जनांचे वर्तन । बघुनी न होत समाधान । म्हणोनि शिष्य न करूं ॥११०॥ परी अनेक जनांचे प्रेम बघोन । आनंदें उचंबळें त्यांचे मन । अधिकार वाढवावयालागुन । दाविला कोप वरकरणी ॥१११॥ ज्याच्या अंगीं खरी भक्ति । तो न ढळे कदापि अंतीं । जरी स्वामी अत्यंत क्षोभती । तरी प्रेमचि वाढे अनिवार ॥११२॥ म्हणोनि भक्तांचें प्रेम अधिक । वाढवावें निश्चयात्मक । इतुकाच त्यांचा हेतु देख । म्हणुनीच ओळले नाहीं ते ॥११३॥ म्हणती मानसीं लागो ध्यास । सद्गुरु असावा ऐसा विश्वास । दृढ होतां शिष्य करितां खास । न ढळे प्रेम कदापिही ॥११४॥ आमुच्या कोंकणीमाजीं एक । म्हण असे परम सुरेख । 'घ' म्हणतांक्षणींच देख । 'घप्प' करूं नये कधीं ॥११५॥ ऐशा म्हणीपरी करितां कार्य । तें बरवें कदापि न होय । म्हणोनि कोणतेंही असो कार्य । सावकाश विचारें करावें ॥११६॥ बालका चांगली क्षुधा न लागतां । वाढी अन्न पणं त्यासी माता । भुकेल्यावीण मुखीं घालतां । थुंकोनि टाकी तो ग्रास ॥११७॥ ज्यासी खरी लागली भूक । अन्न दे म्हणोनि मातेसन्मुख । लगबगें धांवे जेवी तात्काळिक । अन्न सारें तें बाळ ॥११८॥ म्हणोनि माता काय करी । मुलाची भूक समजुनी निर्धारीं । ताट वाढी नानापरी । मग तें धांवे जेवावया ॥११९॥ तद्वत् सद्गुरु - श्रीस्वामींनीं । जनांचे प्रेम वाढावें अजुनी । ऐशा उद्देशें आग्रह धरुनी । नको शिष्य ऐसें सांगितलें ॥१२०॥ गुरुप्रेमाची लागतां भूक । शिष्य करतां होय सुख । कीं प्रेमासरशीं धांवती सकळिक । श्रीसद्गुरूच्या संनिधीं ॥१२१॥जेवीं हातींचा खेळ सोडुनी बाळ । भूक लागतां माते जवळ । धांवे दुडदुडां ते वेळ । जेवूं घाल म्हणोनियां ॥१२२॥ यास्तव माता काय करी । भुकेल्यावीण न देई निर्धारीं । जरी मागाया आलें तरी । नेदी सर्वथा ती पाहीं ॥१२३॥ म्हणे वृथाचि देऊं कासया । भूक ना तुज टाकिशील वायां । भूक लागतां आपण होऊनियां । देई ती जेवाया प्रेमानें ॥१२४॥ तैसें स्वामिरायें येथ केलें । कीं प्रेमाची भूक लागतां ते वेळे । शिष्य करितां स्वीकारिती निजबळें । आनंदानें गृहस्थ पैं ॥१२५॥ भुकेला अन्न कोण दवडी । तैमी गुरुप्रेमाची ज्यासी गोडी । तो कदापि चरण न सोडी । श्रीसद्गुरूंचे पहा हो ॥१२६॥यावरी करितील श्रोते प्रश्न । अन्नाची उपमा सद्गुरूलागून । कैसी शोभे सांगा वचन । तरी अवधारा उत्तर तें ॥१२७॥सद्गुरु म्हणिजे मुख्य जीवित । तेणेंच होय समाधान प्राप्त । अन्नानें कैसी भूक शमत । तेणेंचि वांचत देह खरा ॥१२८॥ श्री तैसें येथें सद्गुरुराज । तेंचि आमुचें जीवन आज । त्यादीग न होय समाधान सहज । अन्य मार्ग न दूसरा ॥१२९॥ पहा देहासी नाना उपचार । वस्त्रं भूषणें लेववी सुंदर । परी अन्नाविण न जगे साचार । कोणीही प्राणी या जगीं ॥१३०॥ ज्या ज्या प्राण्यासी जो जो आहार । तो तो त्यासी अन्नचि साचार । मनुष्यांमाजींही नाना प्रकार । असती अन्नाचे पहा हो ॥१३१॥ गहूं ज्वारी तांदुळादि अनेक । संवयीपरी खाती देख । परी त्यांचें तेंचि सुरेख । अन्न जाणा हो निर्धारें ॥१३२॥ असो एवं अन्नावांचुनी। न जगे कदापि कोणी प्राणी । तैसें श्रीसद्गुरुवांचोनि । न पावे कोणी निजात्मज्ञान ॥१३३॥ म्हणोनि सद्गुरु हेंचि जीवन । व्हावया पूर्ण निजात्मज्ञान । तेचि नेती हळूहळू करोन । अनेक मार्गीं भक्तांसी ॥१३४॥ म्हणोनि सद्गुरु नसतां जगांत । भक्त भुकेनें व्याकुळ होत । तेवींच जगीं साधुसंत । अवतरती जगाच्या कल्याणा ॥१३५॥ एक जातां निजधामासी । दुजा तयार ठेविती त्या जागेसी । तेवींच कळवळती निजमानसीं । स्वामी पांडुरंगाश्रम आपुले ॥१३६॥ परी बघावया भाव भक्तांचा । शिष्य न करूं म्हणती साचा । वावरील उपमेपरी व्हावा प्रेमाचा । सुकाळ अनिवार सकाळ जनीं ॥१३७॥ अर्थात् प्रेमाची लागावी बहुत । क्षुधा निश्चयें निजभक्तांप्रत । म्हणोनि करोनि स्वस्थ चित्त । राहिले जाणा गुरुराय ॥१३८॥ प्रेम वाढो बलवत्तर । करूं तेव्हां शिष्य - स्वीकार । कैसी गति होय जगामाझार । ऐसें हळहळोत भक्त मनीं ॥१३९॥ त्यांचा अवतार म्हणजे जगाचें कल्याण । अंगीं असोनि त्रिकाळ - ज्ञान । शिष्य - स्वीकार न करिती आपण । ऐसें सहज न घडेचि ॥१४०॥ एवं सद्गुरु दयाघन । साक्षात् परमात्मस्वरूपचि पूर्ण । जगाच्या कल्याणा अवतरोन । करी उद्धार जनांचा ॥१४१॥ देह रक्षाया निर्मिलें धान्य । तेवींच व्हावया स्वरूपज्ञान । अवतरोनि स्वयें आपण । समाधान करी भक्तांचें ॥१४२॥ धन धान्य सारी संपत्ति । चराचर देव मानव जगतीं । आपणचि नटला जगत्पति । सार्या ब्रह्मांडीं हो जाणा ॥१४३॥ म्हणोनि वरील उपमेमाजीं । अन्न माता सारें गुरुजी । यांसी घेतलें बोलतां सहजीं । चूक न माना श्रोते हो ॥१४४॥ इतुकें मात्र नव्हे ऐका । श्रीगुरूसि उपमाचि न देखा । कवणही दिल्या उपमेसारिखा । दिसे योग्य गुरुराय ॥१४५॥ ऐसा आमुचा सद्गुरुनाथ । काय सांगूं त्याची मात । केवळ परब्रह्मचि असे निश्चित । नाहीं संशय यामाजीं ॥१४६॥ सद्गुरु हाचि निश्र्चयें मोक्ष । त्यावीण नाहीं आणिक विशेष । आनंद कवणही त्रिभुवनीं खास । सत्य सत्य त्रिवाचा ॥१४७॥ असो इकडे भक्तजन । गेले आपुल्या ग्रामालागुन । तळमळती मानसीं रात्रंदिन । स्वामी पाहिजे म्हणोनियां ॥१४८॥ पुढील अध्यायीं बोलूं सारें । शिष्य - स्वीकार करितील त्वरें । हेंचि कथन करूं विस्तारें । सद्गुरुकृपाप्रसादेंचि ॥१४९॥ आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें त्रिचत्वारिंश - । अध्याय गुरुदासें संपविला ॥१५०॥ स्वस्ति श्रीषित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । त्रिचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१५१॥ अध्याय ४३॥ ओंव्या १५१॥ ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथ चरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥ इति त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP