मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥२७॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२७॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकृष्णाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय देवा करुणाकरा । येसी जगाच्या उद्धारा । आम्हां सारस्वतांसी थारा । दिधला तूं बा सकलांसी ॥१॥
तुज नाहीं येणें जाणें । नाहीं परमार्थ आणिक शिकणें । परी भक्तजनांकारणें । करिसी योग नानापरी ॥२॥
आपण करुनी जनां दाविसी । तेणें इहपर सुख त्यां देसी । तुझी स्तुति करावी कैसी । न कळे अज्ञ बाळा या ॥३॥
मुलें खेळती जैसा खेळ । कीं थोरांपरी बोलती बोल । एक म्हणे मी जातों ये वेळ । कचेरीसी आतां पैं ॥४॥
एक होऊनि मास्तर आपण । मुलांसी शिकवी प्रेमेंकरोन । परी त्यांच्या मनासी जाण । कांहीं एक ना समजे ॥५॥
तैसें देवा मी असें अज्ञ । भक्ति नाहीं मजलागोन । परी लागलों कराया वर्णन । श्रेष्ठ संतांचे पाहूनियां ॥६॥
अनेक संतांनीं केलें वर्णन । त्यामाजीं प्रेम भरलें पूर्ण । म्हणोनि बघतांचि द्रवतें अंतःकरण । जरी तो असला अज्ञानी ॥७॥
आम्हीं जें केलें वर्णन । त्यांत प्रेमाचा बिंदुही जाण । नसे निश्चयें म्हणोन । लाज वाटे मजलागीं ॥८॥
परी देवा तुझ्या संनिधीं । अणुमात्र लाज नाहींच कधीं । तेव्हांचि सरसावलों आधीं । ग्रंथ लिहाया उल्हासें ॥९॥
जरी नाहीं प्रेम अंगीं । साहस करितां येई तें वेगीं । सद्गुरुकृपा होतां जगीं । कवणही अज्ञ न उरे ॥१०॥
करितां साहस सद्गुरुनाथ । करिती कृपा झडकरी तेथ । संशय नाहीं अणुमात्र येथ । सांगतों देवा कृपाघना ॥११॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । दुर्गप्पय्यासी सप्तशती देऊन । सुखसंपत्ति दिधली त्या ॥१२॥
आतां परिसा सावधान । श्रीकृष्णाश्रम यांचे सद्गुण । आणिक करूं निवेदन । सद्गुरुकृपेंचि आतां पैं ॥१३॥
नसे त्यांसी संसारबंधन । परी करिती जनांकारण । शिष्य - स्वीकार तो जाण । करिती सहन भार सदा ॥१५॥
कोणता भार जरी म्हणाल । तरी बालक तरुण ऐशा कोमल । शिष्याचा भार प्यावा समूळ । स्वामींनी आपण हो पाहीं ॥१५॥
त्याचे करावें रक्षण सारें । हेंचि एक ओझें खरें । साधुत्वलक्षण हेंचि निर्धारें । देह झिजविती उपकारा ॥१६॥
असो स्वामी कृष्णाश्रम यांनी । केलें कल्याण जनांचे झणीं । भक्ति-प्रेम वाढलें जनीं । त्यांच्या उपदेशें हो पाहीं ॥१७॥
ऐसें असतां एके काळीं । मंगळूरीं आपुल्या जनाच्या मेळीं । वामनाश्रम स्वामींच्या समाधीजवळी । गेले कृष्णाश्रमस्वामी हे ॥१८॥
भेट घ्यावया सद्गुरुस्वामींची । गेले परिवारसहित सहजचि । कांहीं दिन राहिले तेथेंचि । भक्तांच्या प्रार्थनेस्तव जाणा ॥१९॥
तेव्हां एकेकाळीं समग्र । भक्त आले मठासी शीघ्र । प्रार्थिती सद्गुरूसी सत्वर । शिष्य-स्वीकार करावया ॥२०॥
तेव्हां सद्गुरु सुहास्यवदन । करिती प्रेमळ मृदु भाषण । शिष्य - स्वीकार आतां जाण । अवश्य करूं ये समयीं ॥२१॥
ऐकुनी सकलां जाहला आनंद । शिष्य निवडिला सुप्रसिद्ध । 'नगर' कुळींचा आनंदकंद । तेजःपुंज तो पाहीं ॥२२॥
श्रीकृष्णाश्रमस्वामींचा । चुलत बंधु भाविक साचा । नगर-सांतपय्या यांचा । ज्येष्ठ पुत्र प्रेमळ तो ॥२३॥
'काळप्पय्या' नामेंकरून । हाका मारिती सकल जन । परम सात्त्विक शुद्ध आचरण । अंतःकरण कोमल तें ॥२४॥
कमलनयन सुंदर वदन । बघतांचि दिसे सुलक्षण । अंगकांति गौरवर्ण । ऐशी मूर्ति मनोहर ॥२५॥
पाहुनी मग सुमुहूर्त । केला शिष्य - स्वीकार मठांत । झाले जन समस्त । आनंदित त्या समयीं ॥२६॥
शके सत्राशें एकोणऐशिं । पिंगळ नाम संवत्सर । कार्तिक शुद्ध पौर्णिमेसी सत्वर । केला उपदेश श्रीगुरूंनीं ॥२७॥
'पांडुरंगाश्रम' नामाभिधान । दिधलें सुंदर प्रेमेंकरोन । जनांमाजीं आनंद पूर्ण । भरला जाण ते समयीं ॥२८॥
व ऐशी ती मूर्ति गोमटी । घातली गळां सुवर्णकंठी । बघतां वाटे लागेल दृष्टी । काय वर्णूं ती आतां ॥२९॥
असो यापरी झालें कार्य । सर्व जनांसी हितकर होय । आणि कृष्णाश्रम स्वामी सदय । हेही संतोष पावती ॥३०॥
तीव्र बुद्धीचा पाहुनी शिष्य । जनांस स्वधर्म शिकवावयास । योग्य पात्र हें म्हणोनि गुरूंस । परमानंद जाहला ॥३१॥
हा साक्षात् दत्ताचा अवतार । हे सद्गुरु जाणती साचार । परी शिष्याची लीला दावाया समग्र । एक चमत्कार केला त्यांनीं ॥३२॥
समजा एक असे बाळ । तें नानापरी खेळे खेळ । उल्हासे अंतरी माता प्रेमळ । करी कौतुक लडिवाळपणें ॥३३॥
जनांसमक्ष ती नारी । खेळवूं लागे नानापरी । आपुल्या बाळाचे कौतुक करी । प्रेम नावरे तियेसी ॥३४॥
तैसें कृष्णाश्रम स्वामींलागीं । शिष्यप्रेम सहज ये अंगीं । त्यांची लीला दावाया जगीं । उत्सुक झाले तात्काळ ॥३५॥
परिसा आतां तीच कथा । लावा इकडे आपुल्या चित्ता । ऐकतां हरती सर्वही चिंता । नाहीं सर्वथा संशय ॥३६॥
जेव्हां झाला शिष्य - स्वीकार । त्या उत्सवामाजीं एक सुंदर । सुवर्णकंठी पांडुरंगाश्रमगुरुवर । यांच्या गळां घातली पैं ॥३७॥
ती एका भक्तें उत्सवकालीं । शोभेसाठीं होती घातली । उत्सव पूर्ण होतां गुरुमाउली । म्हणती शिष्यासी तें ऐका ॥३८॥
कंठी दे ज्याची त्यासी । तो आला आहे येथें मठासी । ऐकतां स्मितमुखें सद्गुरूपाशीं । बोलते झाले प्रेमें ते ॥३९॥
अहो गुरुराया ही सुवर्णकंठी । दिसे मजला अतिशय गोमटी । सद्गुरुप्रेम याच्या पोटीं । भरलें असे घनदाट ॥४०॥
यावरी बोले भक्तवत्सल । नको ती कंठी तुजला बाळ । दुजी करवुनी देतों सोज्ज्वळ । देईं ती ज्याची त्यासीच ॥४१॥
येरू बोले सद्गुरु नाथा । अपराध क्षमा करीं बा ताता। देईंना मी कंठी सर्वथा । दुजी करवुनी द्या त्यांसी ॥४२॥
ये कंठीवरी प्रेम बहुत । कीं ती उपदेशसमयीं येथ । अंगावरी होती निश्र्चित । ती माझ्या स्वहिताची ॥४३॥
हा असे आपुला प्रसाद । परम प्रेमळ सुंदर सुखद । द्यावया वाटे मला खेद । सद्गुरुराया करुणाळा ॥४४॥
ही सुवर्णाची कंठी । घातली जी माझिया कंठीं । ती सबंध दिवसा कंठी । सत्सुखामाजी दिनरजनी ॥४५॥
एवं तिन्ही मिळोनि कंठी । त्रैमूर्ती ही एक गोमटी रज-तम-सत्त्व गुणांची मोठी । परम सुंदर ही एक ॥४६॥
रज-तम-सत्त्व मिळोनि एक । नाहीं येथें निश्र्चयें अनेक । एक तेथें अन्य ना देख । सारें ब्रह्मचि परिपूर्ण ॥४७॥
ऐसी ही कंठी तुमचा प्रसाद । मिळालासे मज अत्यंत सुखद । तिची महिमा वाटते अगाध । म्हणोनि ती द्यावीसी न वाटे ॥४८॥
ऐसे हे शब्द ऐकुनी कर्णीं । संतोषले सद्गुरु स्वमनीं । परी जगीं अविहित करणी । न करिती ते कदापिही ॥४९॥
म्हणोनि बोलती शिष्याप्रती । आमुची आज्ञा तुजला श्रेष्ठ ती । म्हणोनि कंठी ज्यांची ती । त्यांसी देईं तूं बाळा ॥५०॥
यावरी दिधली कंठी काढुनी । प्रेमानें ज्याची त्यासी झणीं । तेव्हां गेले गृहालागुनी । कंठी घेऊनि ते जन ॥५१॥
परी त्यांसी तेव्हांपासुनी । सुखचि नाहीं त्यांच्या सदनीं । मग तयांसी कळलें मनीं । स्वामींची लीला ही ऐसें ॥५२॥
बोलती सदनीं आपआपसीं । कंठी नेऊनि द्यावी स्वामींसी । ती आणिल्यापासुनी आम्हांसी । सुखचि नाहीं अणुमात्र ॥५३॥
ही त्या सद्गुरुस्वामींची करणी । म्हणोनि पुनरपि द्यावी त्या चरणीं । अगाध महिमा दाविती धरणीं । श्रीदत्तावतार संशय ना ॥५४॥
मग ऐसें बोलुनी तत्काळ । घरांतील मुख्य गृहस्थ वडील । कंठी घेऊनि तो प्रेमळ । धांविन्नला मठासी ॥५५॥
अर्पिली कृष्णाश्रमस्वामींच्या चरणीं । आणि बोले मृदुवचनीं । न कळे महिमा काय ही करणी । आम्हांलागीं दयाळा ॥५६॥
येथुनी ही सुवर्णकंठी । नेल्यापासुनी आमुच्या पाठीं । लागला शनि उठाउठी । त्रासलों आम्ही नानाविध ॥५७॥
म्हणोनि ही कंठी देवा । पांडुरंगाश्रम - स्वामींसी सेवा । म्हणुनि अर्पितों, धरुनी भावा । स्वीकार करावा याचा पैं ॥५८॥
तेव्हां म्हणती कृष्णाश्रम - गुरुराय । तुमचें असे स्वच्छ हृदय । न क्षोभे तुमच्यावरी सदय । भवानी- शंकर कदापिही ॥५९॥
प्रारब्धावरी येती कष्ट । न करी प्रभु तो कदापि वाईट । परीही तुझी प्रेमाची भेट । म्हणोनि स्वीकारूं आम्ही बा ॥६०॥
मग बोलावुनी शिष्यासी । घातली गळां कंठी परियेसीं । तेव्हां जाहला आनंद मानसीं । कंठीच्या मालका त्या समयीं ॥६१॥
तो असे परम भक्त । परी स्वामींची इच्छा नसतां विदित । कंठी नेली होती गृहाप्रत । स्वामींनीं देतां त्या समयीं ॥६२॥
जेव्हां आले नाना कष्ट । संशयेंचि वाटलें वाईट । म्हणोनि आला थेट । स्वामीसंनिधीं तात्काळ ॥६३॥
मग अर्पण करितां कंठी । परम आनंद जाहला पोटीं । सद्गुरु - नाम बोले ओठीं । प्रेमपूर्वक तो भक्त ॥६४॥
मग जनांच्या मुखें कळला वृत्तांत । त्या गृहस्थालागीं समस्त । कीं पांडुरंगाश्रम स्वामींचा मनोरथ । हीच कंठी प्रिय त्यांसी ॥६५॥
तेव्हां तो गहिंबरला भक्त । म्हणे साक्षात् अवतरला दत्त । भाग्य आमुचें अपरिमित । म्हणोनि लाभली ही मूर्ति ॥६६॥
ऐसें बोलुनी साष्टांग नमन । घातलें गुरुशिष्यांलागून । म्हणे सद्गुरो आम्ही अज्ञ । न कळे महिमा कवणाही ॥६७॥
म्हणोनि देवा तूंचि पाहीं । शिष्याचा प्रभाव लवलाहीं । दाविला आम्हां सकलही । नाहीं संशय यामाजीं ॥६८॥
काय तुझें भक्तप्रेम । निश्वयेंसी असे निस्सीम भक्तकामकल्पद्रुम । म्हणती तुजला असत्य नव्हे ॥६९॥
जसो आतां आपदां देवा । कृपा करोनियां जडजीवां । उद्धरावें करुणार्णवा । क्षमा करोनि अपराध ॥७०॥
ऐसें ऐकतां भक्तवचन । द्रवले स्वामींचे अंतःकरण । म्हणती कृपाळु दयाघन । धैर्य धरावें मानसीं बा ॥७१॥
भवानीशंकर देवाच्या कृपें । जाती नासुनी सर्वही पापें । त्याच्या वचनीं धरणी कांपे । सत्यवचन हें आमुचें ॥७२॥
तोचि विधि-हरि शंकर । अवतरला येथें भूवर । साक्षात् दत्तावतार । नव्हे भाषण असत्य तुझें ॥७३॥
ऐसी भावना होतां दृढ । प्रपंचीं परमार्थाची होईल वाढ । अंती परमार्थ वाटेल गोड । विटेल मन प्रपंचीं ॥७४॥
यावरी तो करुनी नमन । दोन्ही आश्रमां प्रेमेंकरोन । निघाला आपुल्या गृहालागुन । आठवुनी सद्गुण स्वामींचे ॥७५॥
तेव्हां त्यांचे सकलही कष्ट । निरसन झाले निश्र्चयें स्पष्ट । अधिकचि सुख पूर्वींहुनी श्रेष्ठ । स्थिति आली त्यांसी पैं ॥७६॥
 पहा कैसी सद्गुरुमाय । यांची कृपा पावली उदय । विपुल पुण्य त्यांचें होय । म्हणोनि कंठी घेतली ती ॥७७॥
त्यांसी नाहीं सुवर्णाची हौस । परी दाविली इच्छा जनांस । कृष्णाश्रमस्वामींच्या प्रेरणेस । अनुकूल होवोनि ॥७८॥
दावाया जनांस लीला अगाध । वरिवरी  करोनि शिष्यासी बोध । ज्याची कंठी त्याच्या संनिध । देवविली आपण स्वामिरायें ॥७९॥
जो साक्षात् दत्तावतार । त्यानी स्वाभाविक असे विचार । परी शिष्यमहिमा असे थोर । हें दाविले जनीं प्रेमानें ॥८०॥
जनांचा भाव ऐसा होय । कीं पांडुरंगाश्रम - स्वामिराय । यांचे असे बालवय । तेवींच हट्टी स्वभाव ॥८१॥
परी हें ऐसें नव्हे खचित । हट्ट कैंचा येईल त्यांप्रत । परी केली कृष्णलीला बहुत । हेतु जगाचें कल्याण ॥८२॥
आपण वरिवरी हट्ट दावित । जनांचे त्यांत कल्याण करीत । यावरी आणिक कथा प्रख्यात । पुढील अध्यायीं बोलूं पैं ॥८३॥
असो पुढे यांचें चरित्र । असे लीला परमविचित्र । प्रस्तुत गाऊं यांचे स्तोत्र । श्रीकृष्णाश्रम - स्वामींचे ॥८४॥
महिमा असे परम अपार । वर्णितां होय ग्रंथविस्तार । सद्गुण-शांतीचा समुद्र । दुर्गुणा ठाव ना तेथें ॥८५॥
जरी शिष्य लहान बाळ । त्यासी संगोपन करी वेल्हाळ । मृदु आणि परम प्रेमळ । वचनेंसीं तया सांभाळिलें ॥८६॥
मातेहुनी अधिक प्रेम । निजभक्तांवरी असे निःसीम । कंठ शोषुनी आत्माराम । दाविती साधकांलागी पैं ॥८७॥
इतरांसीही लावुनी नेम । शिकविती आपुला स्वधर्म । तेवींच येई जो सकाम । त्याचा पुरविती मनोरथ ॥८८॥
एवं सर्व जनांसी जाण । देती फल त्या-त्यांलागोन । इच्छेपरी सर्व देऊन । करिती उद्धार त्यांचा हो ॥८९॥
जैसी माता आपुल्या मुलांसी । रक्षण करी दिननिशीं । तैसी गुरुमाउली आम्हांसी । रक्षीतसे प्रेमानें ॥९०॥
ज्याची न प्रकृति असे जैसी । तैसेंचि अनुपान माता तयासी । देऊनि जतन करी, तैशी । गुरुमाउली आम्हां पैं ॥९१॥
सकामासी देऊनि इच्छित । हळू हळू त्या निष्काम करीत । मग तो लागे परमार्थाप्रत । साधक होऊनि निश्चयें ॥९२॥
नानापरी कराया भक्ति । साधन करुनी जगीं ठेविती । पुढील अध्यायीं हेंचि निगुती । सांगुनियां वृत्ति तोषवूं ॥९३॥
एवं सद्गुरु स्वामी एक । हेचि श्रेष्ठ निश्वयात्मक । म्हणोनि आम्ही सकळिक । ध्याऊं ऐशी गुरुमूर्ति ॥९४॥
आप्त हे सारे धनाचे असती । निर्धनासी कोणीही न पुसती । म्हणोनि त्यांची सोडावी भ्रांती । 'माझीं माझीं' हीं म्हणोनि ॥९५॥
द्रव्य बघतां हातामाजी । करिती तेव्हां हांजी हांजी । अथवा आपुली त्यावरी मर्जी । दाविती अपार बळेंचि ॥९६॥
म्हणोनि स्वजनांची प्रीति शेवटीं । निश्र्चयें जाणा ठरते खोटी । परी सद्गुरुमूर्ति गोमटी । त्यांचीच प्रीति खरी असे ॥९७॥
नाहीं त्यांसी अंगीं स्वार्थ । केवळ करिती कल्याणार्थ । ऐशियां भजतां न होय व्यर्थ । शुद्ध परमार्थ लाने त्यां ॥९८॥
आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें सप्तविंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥९९॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां अज्ञान निरसे समग्र । सप्तविंशाध्याय रसाळ हा ॥१००॥
अध्याय २७ ॥
ओंव्या १०० ॥
॥ॐ तत्सत्-श्रीसगुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    
॥इति सप्तविंशोऽध्यायः समाप्तः ॥


References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP