मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥३९॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३९॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नम: ॥ श्रीभवानीशंकराय नम: ॥ॐ॥
जय जय श्रीसद्गुरु सदया । तूं भक्तवत्सल म्हणोनियां । जगीं कीर्ति घेसी, परी या । बाळासें वात्सल्य ना तुजला ॥१॥
तुझा नव्हे हा अपराध । वृथाच दिधला दोष बहुविध । काय अज्ञ मी मतिमंद । विचार अणुमात्र न करितां ॥२॥
विचारांतीं समजे निश्र्चयें । पक्षपात नसे तुज गुरुमाये । समदृष्टि तुजला आहे । मातेसमान तूं देवा ॥३॥
देवा तुजला सारे भक्त । एकचि सारे भेद ना किंचित । आमुचे दुर्गुणचि आम्हां बाधत । नाहीं संशय यामाजीं ॥४॥
तुझ्या वचनाहुनी आणिक । श्रेष्ठ कवणही जगीं ना देख । परी मी नायकें वचन सुरेख । दवडितों अमूल्य तव वचन ॥५॥
तुझिया वचनीं भरला आनंद । केवल शुद्ध ब्रह्मानंद । परी मी नेणता मतिबंद धिक्कारीं दुर्लक्ष करोनियां ॥६॥
भक्तप्रेमेंचि करिसी आज्ञा । तितुकी पाळाया बुद्धि मज ना । भलतेंचि करितों सोडुनी वचना । तेव्हां वात्सल्य कोठूनि ये ॥७॥
ऐसा दुर्गुणी तुझा भक्त । तेव्हां कैंची कृपा होत । हेंचि भय वाटतें मजप्रत । सद्गुरुराया दयाळा ॥८॥
म्हणोनि देवा सद्गुरुराया । अल्प म्हणोनि न टाकीं सदया । तूंचि टाकितां लोटोनियां । कैसी बुद्धि येईल ती ॥९॥
‍मी न पाळीं आपुलें वचन । म्हणोनि जरी अवकृपा करोन । धिक्कारिसी तरी जाण । होय बुद्धि मलिन बहु ॥१०॥
तेव्हां आज्ञा कैंची पालन । होय देवा मजकडोन । पाहें तूंचि विचारें जाण । मी तरी अज्ञ बालक ॥११॥
तुझ्या कृपाकटाक्षावीण । कैसी घडेल आज्ञा पालन । सांगणें नलगे तुजलागोन । सारें जाणसी तूं देवा ॥१२॥
माझ्या अंगीं दुर्गुण बहुत । परी अनन्य - शरण तुजप्रत । येतों मी बा प्रेमानें निश्र्चित । मग कैंचें भय मजला ॥१३॥
जो येई अनन्य-शरण । सद्गुरु त्याचें करी रक्षण । ऐसा मज विश्र्वास पूर्ण । असे जाण गुरुराया ॥१४॥
आतां तरी कृपा करोनि । रक्षीं मजप्रति येईं धांवूनि । करितों प्रार्थना कर जोडूनि । आलों चरणीं शरण पहा ॥१५॥
मीं केले अन्याय अगणित । परी तूं रक्षिलें मजप्रत । याचि धैर्यें राहिलों जगांत । मूर्ति मानसीं धरोनियां ॥१६॥
असो आतां सद्गुरुनाथा । देईं स्फूर्ति माझिया चित्ता । ग्रंथसमाप्ति करवीं ताता । झडकरींच कृपाघना ॥१७॥
आतां ऐका सावधान । तुम्ही भाविक श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । सावकार कामत रक्षियला ॥१८॥
कीं त्याचा तुरुंगवास । चुकविला स्वामींनी कृपेनें खास । ऐसे पांडुरंगाश्रम परमहंस । न कळे महिमा त्यांची हो ॥१९॥
आणिक बोलूं महिमा अपार । श्रोते हो करोनि चित्त स्थिर । परिसावें आतां होऊनि सादर । गुरुमूर्ति नयनीं आणूनियां ॥२०॥
दक्षिण प्रांतीं बैंदूर-ग्रामीं । खेडें असे ‘एडतरे’ नामीं । तेथें दुग्गप्पशेट्टी हा नेहमीं । करी व्यापार मोठा पैं ॥२१॥
दुज्या देशाहुनी माल । आणवी जहाजावरी तो सकल । ऐसें असतां एकवेळ । झाली अघटित घटना पैं ॥२२॥
आली तार दुग्गप्पशेट्टीस । कीं माल पाठविला तुजला ये दिवस । उतरवुनी घ्यावा तुम्हीं खास । लगबगेंसी व्यवस्थित ॥२३॥
तेव्हां दुग्गप्पशेट्टी यानें । केली व्यवस्था सारी त्वरेनें । माल उतरूनि घ्यावयाकारणें । मनुष्य ठेविले त्या ठायीं ॥२४॥
तीन मास लोटुनी गेले । अजूनही जहाज नाहीं आलें । म्हणोनि चिंता करी ते वेळे । पाठवी मनुष्य जेथें तेथें ॥२५॥
कुठेंही न लागे ठाव ठिकाण । जहाज बुडालें कीं काय म्हणोन । हेंही न कळे कवणालागून । थोर चिंता लागली ॥२६॥
‍होता त्यावरी माल बहुत । पंचदश सहस्र रुपयांचा होत । हानि म्हणुनी चिंताक्रांत । झाला दुग्गप्पशेट्टी तो ॥२७॥
ऐसें असतां तये वेळीं । बैंदुराहुनी सारस्वत - मंडळी । आली एडतरे - ग्रामाजवळी । त्यांसी भेटला दुग्गप्पा ॥२८॥
तेव्हां म्हणे हो आमुचें जहाज । अजुनी न आलें म्हणोनि मज । चिंता पडली तीचि आज । कांहीं न सुचे ये समयीं ॥२९॥
यावरी म्हणती सारस्वत भक्त । सांगूं एक आतां तुजप्रत । आमुचे स्वामी आज येत । म्हणोनि जातों सामोरे ॥३०॥
जाऊनि नदीतीराजवळी । मिरवुनी आणितों आम्ही ये वेळीं । तूंही येउनि चरणकमळीं । जाईं शरण त्यांलागीं ॥३१॥
त्यांची महिमा असे अपार । तेचि रक्षितील तुजला साचार । ऐसें बोलतां निघाला सत्वर । आमुच्या जनासंगें तो ॥३२॥
असो गेला दुग्गप्पशेट्टी । जनासंगें स्वामींच्या भेटी । जाऊनि पोहोंचला नदीकांठीं । तोंवरी आली पालखी पैं ॥३३॥
भेटला श्रीस्वामींलागीं । साष्टांग नमस्कार केला वेगीं । म्हणे स्वामिन्‌ महाराज योगी । कृपा असावी मजवरुती ॥३४॥
ऐसें प्राथुनि सारा वृत्तांत । निवेदिला तेव्हां भीत भीत । यावरी बोलती कृपावंत । श्रीपांडुरंगाश्रमस्वामी ते ॥३५॥
भवानीशंकरकृपेंकरुनी । उदयीक येईल जहाज बा झणीं । नको करूं चिंता म्हणोनि दिधला प्रसाद त्या समयीं ॥३६॥
तेव्हां करोनि साष्टांग नमन । गेला दुग्गप्पा कामालागून । स्वामी बैंदूर-ग्रामीं जाण । गेले भक्तांसमवेत ॥३७॥
तेथ राहुनी दोन दिवस । गेले शिरालीमाजीं मठास । इकडे दुग्गप्पशेट्टी यास । लागला ध्यास जहाजाचा ॥३८॥
स्वामिचरणीं धरोनि विश्र्वास । गेला दुजे दिनीं पहावयास । जहाज आलें कीं म्हणोनि हरुष । धरोनि मानसीं गेला तो ॥३९॥
जाऊनि समुद्रकिनार्‍यापाशीं । बैसला ध्यात श्रीस्वामींसी । सायंकाळी आलें परियेंसी । जहाज हळू हळू त्या स्थानीं ॥४०॥
बघतां आनंद न मावे पोटीं म्हणे स्वामींची कृपादृष्टी । असत्य न होय बोलिलें ओठीं । श्रीस्वामींनी संशय न ॥४१॥
असो मग सर्वही माल । शाबित पाहूनि तये वेळ । करोनि व्यवस्था त्याची सकल । गेला भेटीसी चित्रापुरा ॥४२॥
श्रीस्वामींची घेऊनि भेट । मुखें बोले स्तोत्र पटपट । आणि सेवा करविली उत्कृष्ट । दुग्गप्पटशेट्टीनें प्रेमभरें ॥४३॥
तेव्हां सद्गुरु स्वामिरायें । दिधला प्रसाद आपण स्वयें । उपरणी आणि घोडा निश्र्चयें । दुग्गप्पशेट्टीसी ते समयीं ॥४४॥
तेव्हां दुग्गप्पशेट्टी यासी । अभिमान आला निजमानसीं । मी श्रीमंत असोनि बहुवसी । कासया घेऊं स्वामींचें ॥४५॥
ऐसें मानूनि न घेतां जाण । गेला आपुल्या गांवालागोन । परी अभिमान न होय सहन । परमेश्र्वरासी कदापि ॥४६॥
कवणाही येतां अभिमान । करी शिक्षा प्रभु तो आपण जे परम भक्त असती पूर्ण । त्यांचाही हरण करी वर्ग ॥४७॥
द्रौपदी बहुत प्रीतीची भगिनी । तिचाही गर्व हरण करोनि । अर्जुन - गर्व सर्व हरोनि । उद्धरिलें त्यांसी श्रीकृष्णें ॥४८॥
गरुड - सत्यभामेंचेंही । गर्वहरण केलें पाहीं । ऐशा कथा ऐकिल्या कांहीं । पुराणांतरीं सकलांनीं ॥४९॥
कसलाही असो तो गर्व । न करी सहन सद्गुरुदेव । तत्काळ हरी त्याचें सर्व । निजकढपाबळेंकरोनियां ॥५०॥
‍सद्गुरु म्हणिजे देवाहूनि । श्रेष्ठ असे निश्र्चयें म्हणोनि । त्यापुढें गर्व करितां कोणी । नावडे देवा कदापिही ॥५१॥
भगवद्गीतेमाजीं देखा । स्वयें श्रीकृष्णें कथिलें सकळिकां । सद्गुरूसी भजतां एका । मज पोहोंचे निर्धारें ॥५२॥
एवं सद्गुरु श्रेष्ठ म्हणोनि दाविलें भगवंतें प्रेमेंकरोनि । तेवींच न साहे त्यालागोनि । गर्व करितां सद्गुरूपुढें ॥५३॥
सद्गुरु - देव एकचि जाण । यांत कांहीं ना अनुमान । सद्गुरूचा जो अपमान । तो देवासीच होत पहा ॥५४॥
असो गर्व केलिया मानवें । कां हरण केला देवें । भक्तांवरी तो कोप नव्हे । कृपाचि ती खचित पहा ॥५५॥
अभिमानें वृत्ति मलिन होय । तेणें विवेक लोपे निश्र्चय । मग कैंची स्वरूपचिन्मय - । प्राप्ति त्यासी होय कदा ॥५६॥
अणुमात्र जरी मीपणा उपजे । तेथेंचि येई गर्व सहजें सद्गुरूवीण न पाहे दुजें । त्यासि न ये गर्व कदा ॥५७॥
डोळ्यांमाजीं अणूइतका । केर पडला तरी तो देखा । त्रास देई बहुत निका । हें सकळांसी विदित असे ॥५८॥
तैसें येथें भाविकांलागीं । अणुमात्र अभिमान येतां जगीं । परमार्थाची हानि ती वेगीं । होय निश्र्चयें ती जाणा ॥५९॥
म्हणोनि त्याचें करोनि खंडण । हळू हळू नेती परमार्थीं जाण । तैसेंच सोडितां अभिमान । बळावे अपार तो पाहीं ॥६०॥
असो त्या दुग्गप्पाशेट्टीसी । अभिमान आला निश्र्चयेंसी । ग्रामीं जातांक्षणीं परियेसीं । पडला आजारी बहुतचि ॥६१॥
शुद्धीच नाहीं अंगावरुती । आप्तेष्ट सारीं घाबरलीं अति । म्हणती आतां कवण गति । काय करणें हें कळेना ॥६२॥
पहा स्वामींचा चमत्कार । मग थोडी शुद्धि आली अंगावर । तेव्हां त्यासी कळलें साचार । मी विपरीत व्याधीनें पीडिलों ॥६३॥
ऐसें व्हावया काय कारण । हेंही आठवलें त्यालागोन । स्वामींपुढें केला अभिमान । मी श्रीमंत म्हणोनियां ॥६४॥
ऐसी आठवण होतांक्षणीं । केली प्रार्थना स्वामींची स्वमनीं । म्हणे देवा कृपा करोनि । उठवा मजला ये समयीं ॥६५॥
मी येतों उठल्याक्षणीं । घेतों मागुनी घोडा - उपरणी । अहंकार दावितां तुझ्या चरणीं । नाहीं उपयोग बा पाहीं ॥६६॥
मी इतुका श्रीमंत असोनि । घ्यावें कासया आपुल्याकडोनि । ऐसा अभिमान वाटला मनीं । क्षमा करावी मजलागीं ॥६७॥
तुजपुढें आम्ही अज्ञ नर । केवीं होऊं श्रीमंत परिकर । तूंचि श्रीमंत अमित थोर । तुजपुढें येर कनिष्ठचि ॥६८॥
विद्येमाजीं तूंचि श्रेष्ठ । बुद्धिही तुझीच ज्येष्ठ । तुजवीण नाहीं जगतीं वरिष्ठ । यावरी नाहीं बोलणें पैं ॥६९॥
तूं अससी परम ज्ञानी । ज्ञानीच श्रेष्ठ सर्वांहुनी । सार्वभौम राजाही धरणीं । नसे तुजहुनी श्रेष्ठ कदा ॥७०॥
तूं त्रिभुवनाचा महाराजा । तुझे हातीं सारी प्रजा । ऐसा तूं बा सद्गुरु माझा । न लागे तुझा अंत कधीं ॥७१॥
ऐशा तुजपुढें करितां गर्व । सहजचि हरोनि जाय सर्व । क्षमा करोनि धांव धांव । रक्षीं मजला गुरुराया ॥७२॥
सारें जगचि तुझें असतां । वृथाचि अभिमान घेतला माथां । श्रीमंत कोणीं केला हें न कळतां । व्यर्थ अभिमानें हुंबरलों ॥७३॥
‍ही सारी धन - दौलत तूं न देतां कैंची लाभत । पूर्वकर्मापरी प्राप्त । करूनि त्वांचि दिधली पैं ॥७४॥
तव सत्तेवांचुनी जग । न वर्ते लवभरी चांग । परी तूं राहसी निस्संग । सोंग घेसी मानवाचें ॥७५॥
सारी सत्ता असुनी हातीं । परतंत्रता दाविसी जगतीं । महिमा न कळे कवणाप्रति । अगाध म्हणुनी ती पाहीं ॥७६॥
असो आतां स्वामी दयाळा । करीं कृपा मजवरी ये वेळां । बोलतां कंठ सद्गद झाला । उठले अंगीं रोमांच ॥७७॥
ऐशी केली बहुविध प्रार्थना । ध्यात राहिला स्वामींच्या चरणा । धरिली मनीं दृढतर भावना । दुग्गप्पशेट्टीनें हो पाहीं ॥७८॥
असो ऐशी करितां प्रार्थना । श्रीस्वामींसी आली करुणा । आजारांतून उठविला जाणा । मग तो गेला चित्रापुरा ॥७९॥
श्रीस्वामींचें घेऊनि दर्शन । केली प्रार्थना करोनि नमन । म्हणे देवा मजलागोन । द्यावा प्रसाद हातींचा ॥८०॥
आपुल्या हातींचा प्रेमळ प्रसाद । न घेतां गेलों मी मतिमंद । तुझी महिमा न कळतां प्रसिद्ध । अभिमान केला तुजपुढें ॥८१॥
म्हणोनि मिळालें त्याचें फळ । व्याधिग्रस्त झालों ते वेळ । क्षण न लागतां तत्काळ । पडलों आजारी बहुतचि ॥८२॥
थोडी शुद्धि येतां मजला । बहुत प्रार्थना केली तुजला । तेव्हां तूंचि आलासि रक्षायाला । धांवत धांवत ते समयीं ॥८३॥
तव कृपेंचि वांचलों देवा । म्हणोनि प्रसाद मागुनी घ्यावा । ऐसा हेतु धरोनि बरवा । आलों शरण या चरणीं ॥८४॥
ऐसें ऐकतां स्वामींचें मन । प्रेमभरित जाहलें पूर्ण । म्हणती पुनरपि तुज देईन । प्रसाद ठेविला तो पाहीं ॥८५॥
इतुकें बोलुनी दिधला प्रसाद । घोडा - उपरणी प्रेमें शुद्ध । त्यांत ओतोनि प्रेमानंद । दिधला दुग्गप्पशेट्टीसी ॥८६॥
तो प्रसाद केवळ प्रेममय । प्रेमावांचुनी आणिक काय । असेल यांत नाहीं संशय । पहा कैसें सांगूं तें ॥८७॥
सद्गुरुभक्ति ज्यांच्या हृदयीं । त्यासीच कळे प्रेम हें पाहीं । आम्हां अज्ञजनांलागीं कांहीं । ठाव न लगे अणुमात्र ॥८८॥
‍सद्गुरुस्वामींचा हस्तस्पर्श होतां त्यांत न उरे दोष । कवणही वस्तु असो ती विशेष होय शुद्ध ती पाहीं ॥८९॥
त्यांचे सद्गुण तयांमाजीं । निश्र्चयें येती सहजासहजीं । म्हणोनि इतुकें महत्त्व आजी । बघती जन प्रसादांत ॥९०॥
जे असती भक्त प्रेमळ । दर्शना जातां नेती नारळ । करस्पर्श होतां तत्काळ । होय तो निर्मळ निश्र्चयें ॥९१॥
पडतां पदरीं फलमंत्राक्षत । मन होय प्रेमभरित । जरी असे तो अभक्त । पळभरी आनंद होय तया ॥९२॥
सद्गुरुमूर्ति आनंद - खाणी । त्यांचा स्पर्श होतांक्षणीं । वस्तूंत आनंद भरे झणीं । हें दृष्टांतासहित सांगूं पैं ॥९३॥
पाणी असे परम शीत । वस्त्र घालितां आपण त्यांत । तेंही शीत होय त्वरित । उदकाच्या संगेंकरोनि ॥९४॥
तेवींच तें शीतवस्त्र । समजा ज्याचा भडके नेत्र । त्यासि लावितां अणुमात्र । क्षणैक सुख होय तया ॥९५॥
तैसी सद्गुरुरायाची मूर्ति । आनंदमय सदा असे ती । त्यांचा करस्पर्श होतां त्याप्रति । वस्तुही त्यापरी होय पहा ॥९६॥
पाण्यासंगें वस्त्र जैसें । सद्गुरुसंगें होय तैसें । हस्तस्पर्श होतां आपैसे । येती त्यांचे गुण त्यांत ॥९७॥
सात्त्विक वृत्ति आनंदभरित । तयांहस्तें घेतां फलमंत्राक्षत । शीतवस्त्रें जैसें नेत्रांसी सुख होत । तैसें मन आमुचें उल्हासे ॥९८॥
प्रेम उचंबळे अमित । ऐसा प्रसाद - महिमा अद्भुत । म्हणोनि प्रसाद प्रेममय निश्र्चित । लटके बोल नव्हती हे ॥९९॥
ते प्रसन्नचित्तें देती जें कीं । तो प्रसादचि म्हणोनि लोकीं । प्रचार असे, म्हणोनि मस्तकीं धरावा प्रेमानें सकळिकीं ॥१००॥
तेव्हां होय आमुचेंही मन । आनंदरूप निश्र्चयेहं जाण । सद्गुरुकृपाचि ही पूर्ण । नाहीं संशय यामाजीं ॥१०१॥
सद्गुरु प्रेमानें जें देती । त्यांत सारें प्रेम ओतिती । तैसी प्रेमळ वस्तु त्यांच्या हस्तीं । घेतां आनंद न वर्णवे ॥१०२॥
असो मग दुग्गप्पासी । प्रसाद देती तेजोराशी । घोडा उपरणें परियेसीं । गेला घेऊनि ग्रामा तो ॥१०३॥
तो भजे श्रीस्वामींस । धरिला त्यांच्या चरणीं विश्र्वास । कधीं कधीं जाय दर्शनास । श्रीसंनिधीं दुग्गप्पा ॥१०४॥
ऐसी सद्गुरुमहिमा अपार । सारे भजती प्रेमपुर:सर । न करिती स्वामी धिक्कार । हीन जातीचा म्हणोनियां ॥१०५॥
दुग्गप्पाशेट्टी जातीचा एक । नाडगीर होता देख । श्रीस्वामी बघती सुरेख भक्तिभाव हाचि पैं ॥१०६॥
स्वधर्मापरी वर्तन । न घेती त्यांचें अन्नपान । मनीं एकचि सारे जन । नाहीं भेद अणुमात्र ॥१०७॥
असो आतां आणिक सांगूं पुढील अध्यायीं कथेचा योगु । परम रसाळ न करावा त्यागु । परिसा प्रेमानें तुम्ही हो ॥१०८॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें एकोनचत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०९॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - ।
गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां लाभे मोक्ष साचार । एकोनचत्वारिंशत्तमाध्याय रसाळ हा ॥११०॥
अध्याय ३९॥
ओंव्या ११० ॥
ॐ तत्सत्‌ - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    
॥ इति एकोनचत्वारिंशोऽध्याय: समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP