चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२३॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीवामना श्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥
जय जय सद्गुरो दयाघना । नाहीं स्थिरता माझिया मना । कृपा करोनि उदरा जाणा । दीन - दासालागीं पैं ॥१॥
तुज म्हणती भक्तवत्सल । तरी कां न पावसी ये वेळ । न स्फुरे म्हणुनी तळमळे बाळ । ग्रंथ लिहायालागीं पैं ॥२॥
ऐशा समयीं तूं बा देवा । न येतां तरी कैसी सेवा । करूं जाण करुणार्णवा । सांगें मजला गुरुनाथा ॥३॥
तुवां स्फुरविल्यावांचोन । मी काय करूं कवन । कर्ता करविता तूंचि असोन । व्यर्थ अभिमानें हुंबरतों ॥४॥
'मी कर्ता' ऐशी भावना । आहे म्हणोनि भाकितों करुणा । 'तूंचि स्फुरवीं' ऐसिया वचना । घडीघडी बोलिलों अज्ञानें ॥५॥
कर्ता करविता तूंचि असुनी । मी कासया प्रार्थावें चरणीं । तव कृपेवीण कांहींही करणी । न घडे जाण सर्वथा ॥६॥
ऐसें असतां अज्ञपणे बा । 'मीपणा' करोनि उभा । भाकितां करुणा नाहीं शोभा । खचितचि जाण निर्धारें ॥७॥
असो ताता सद्गुरुनाथा । तूंचि तोडीं माझी अहंता। तुजहुनी भिन्न ना मी सर्वथा । ऐसें ज्ञान दे मजला ॥८॥
जेथें नाहीं मीतूंपण । तेथें कर्ता करविता कोण । अवघें ब्रह्मचि परिपूर्ण । ओतप्रोत भरलें पैं ॥९॥
इतुकीच बापा करीं करुणा । आणिक न मागें दयाघना । सारें ब्रह्म दावीं नयना । प्रभो गुरुराया जगदीशा ॥१०॥
असो आतां परिसा सज्जन । मागील अध्यायीं केलें कथन । वामनाश्रमस्वामींचे सद्गुण । आणि शिष्य-स्वीकार तो ॥११॥
आतां ऐका सावधान । आणि सद्गुणांचें वर्णन । वामनाश्रमस्वामी सघन । यांचें जाण सकलही ॥१२॥
सारें चरित्र कराया कथन । लिहाया न पुर मेदिनी जाण । अणु मात्रचि आतां करूं वर्णन । अवधारा चित्त देऊनियां ॥१३॥
श्रीस्वामी 'वामनाश्रम' । ऐसें ना घेउनी कलियुगीं नाम । साक्षात् अवतरे श्रीरघुराम । आनंदधाम तें एक ॥१४॥
कैसे होय ने आनंदधाम । हें कळेल भजतां निष्काम । कां न कळे भजतां सकाम । ऐसा प्रश्न उद्भवे पैं ॥१५॥
ऐका त्याचें उत्तर आतां । स्थिर करोनि आपुल्या चित्ता । अंतरी कामना धरोनि भजतां । मनासी तळमळ सततचि ॥१६॥
जरी गेलों संनिधीं आपण । बहुत तळमळे आपुलें मन । कैसें माझें कार्य जाण । होईल ऐसें म्हणोनि ॥१७॥
कामनेसी नाहीं तूट । मरे तोंवरी न येई वीट । सदा करीतसे वटवट । अमुक पाहिजे म्हणोनि ॥१८॥
जरी न होय कार्य सफल । तरी मानसीं करी तळमळ । ऐसियासी कैसें समजेल । आनंदधाम सद्गुरु हें ॥१९॥
जो असे निष्काम भक्त । तो होय परम विरक्त । तेव्हां तेथे कैंचा होय आसक्त । विषयांमाजीं तो जाण ॥२०॥
ज्याच्या चित्तीं नाहीं विषय । त्यासी सदा सुखचि होय । ऐसियासी सद्गुरु सदय । आनंदधाम सहज कळे ॥२१॥
आनंदधाम यामाजीं नाहीं । संशयतिळभरी खचितचि पाहीं । आनंदाची मूर्तिच सर्व ही । आनंदचि त्या भासतसे ॥२२॥
त्यांसी नाहीं सुखदुःख । केवळ निजानंदीं निमग्न देख । म्हणोनि सद्गुरु आनंदाचें एक । सदन सुरेख तें जाण ॥२३॥
त्यांसी भजतां भक्तजनांसी । सुखदुःख तिळमात्र न होय मानसीं । ऐसी माउली ही परियेसीं । वामनाश्रम स्वामी पैं ॥२४॥
कवणही येतां संनिध । प्रेमें बोलती करुनी बोध । जरी केला कुणीही अपराध । ना क्षोभती तयावरी ॥२५॥
परम सात्विक आणि चतुर । सूक्ष्म विचार करिती थोर । कवणाचंही न दुखविती अंतर । ऐसी सगुणखाणी ती ॥२६॥
ऐसें असतां मंगळूर - ग्रामीं । नेले बोलावुनी सद्गुरुस्वामी । आनंदले जन अंतर्यामीं । गुरुशिष्यमूर्ति बघोनियां ॥२७॥
जनांची भक्ति वाढली थोर । भजती स्वामींसी निरंतर । ऐसे असतां सुखानें समग्र । अपूर्व चमत्कार वर्तला ॥२८॥
श्रीस्वामीसद्गुरूचें आगमन । होउनी झाले कांहीं दिन । तेव्हां सर्व भक्त मिळोन । करिती विचार आपसांमध्ये ॥२९॥
कीं मठाचे आधिपत्य सकल । कृष्णाश्रमस्वामी वेल्हाळ । यांच्या हाती येतां येवेळ । उत्तम कार्य होईल पैं ॥३०॥
वामनाश्रम सद्गुरुनाथ । लक्ष न देती कांहींच येथ । म्हणोनि विचार करोनि समस्त । गेले भेटीसी स्वामींच्या ॥३१॥
प्रार्थना करिती मधुरवचनें । म्हणती देवा तव कृपेनें । सर्व कार्य बरवेंचि होणें । उणीवता ना अणुमात्र ॥३२॥
परी असे आमुची प्रार्थना । येते आम्हां एक कल्पना । मठाचे आधिपत्य जाणा । कृष्णाश्रमांसी सोंपविणें ॥३३॥
तयांजवळी देतां होय । अनुभव, होउनी पुढें कार्य । नेटकें कराया त्यांसी वेळ काय । ऐसें वाटतें आम्हांसी ॥३४॥
ऐसें भक्तांचें वचन । स्वामींसी मानवलें नाहीं जाण । मनामाजीं जाहले खिन्न । बहुत उद्विग्न होती ते ॥३५॥
हातामाजीं होती किल्ली । एकीकडे ती फेंकूनि दिधली । देवीची प्रार्थना आरंभिली । दीर्घस्वरें प्रेमानें ॥३६॥
महादेवी परमेश्वरी । भगवती तूं गुणसुंदरी । बालकावरी कृपा करीं । नेईं मजला येथोनि ॥३७॥
मी येथें जगोनि काय । उपयोग होईल सांगें तूं माय । संपलें आमुचे सर्व कार्य । येतों आतां तव चरणीं ॥३८॥
ऐसें बोलतां स्वल्पचि दिन । न गेले इतुक्यामाजीं जाण । देवी आली स्वामींलागून । ज्वर अपार आला पैं ॥३९॥
तेव्हां जनांसी लागली चिंता । वचन असत्य न होय सर्वथा । काय चमत्कार दाविला भक्तां । ऐसें परस्पर बोलती ॥४०॥
कुठें कांहीं नाहीं देवी । खेड्यांत अथवा संनिध गांवीं । यांच्याकडेच येउनी दावी । प्रभाव आपुला प्रेमानें ॥४१॥
यावरोनि कळलें सकलां । स्वामींचाचि खेळ हा आपुला । दाविती जनांसी करुनी लीला । म्हणोनि आश्चर्य वाटलें त्यां ॥४२॥
आणि म्हणती एकमेकांसी । आमुचाचि अपराध थोर परियेसीं । ऐसें म्हणोनि लागले गुरुचरणासी । क्षमा करीं म्हणताती ॥४३॥
यावरी बोलती कृपाघन । भिऊं नका तुम्ही भक्तजन । यांत कवणाचाही अपराध न । जाणा तुम्ही खचितचि हो ॥४४॥
संपलें आमुचें अवतारकार्य । आम्ही पहातों आमुचा ठाय । देतों तुम्हां आतां अभय । प्रारब्ध न चुके कवणाही ॥४५॥
तुमचें न होय वाईट कांहीं । गुरुभक्ति तुमची खरी पाहीं । व्यर्थ न होय ती कदापिही । अणुमात्र जरी चुकतांचि ॥४६॥
पहा साधूंचें कैसें अंतर । जरी अपराध महाथोर । तरीही न क्षोभती त्यांच्यावर । अधिकचि प्रेम करिती ते ॥४७॥
आतां श्रोते करितील प्रश्न । कासया तरी क्षोभले दारुण । देवीकडे बोलिले वचन । नेईं त्वरेनें म्हणोनि ॥४८॥
ऐका तरी त्याचें उत्तर । मनुष्य नव्हती स्वामी साचार । तयां कैंचा क्षोभ अनिवार । सांगा येईल कोठोनि ॥४९॥
जनांसी शिकवायाकारण । दाविती वरिवरी कोप दारुण । तैसें वामनाश्रमगुरूंनीं जाण । क्षोभुनी दाविलें जनांसी कीं ॥५०॥
आतां म्हणाल काय थोर । अपराध केला सांगा सत्वर । तरी ऐका तुम्ही श्रोते चतुर । भाविक आणि सज्जन हो ॥५१॥
बुद्ध्याच न केला अपराध । झाला तो अज्ञपणें शुद्ध । अविचारें होउनी बुद्धिमंद । केला घोर अन्याय ॥५२॥
सद्गुरुस्वामी महाथोर । असे त्यांसी श्रेष्ठ विचार । ते जें करिती कार्य समग्र । तें सारासार पाहुनीच ॥५३॥
त्यांच्या कार्यामाजीं केवळ । आपण न करावी ढवळाढवळ । तरीच तें कार्य सफळ । होईल जाणा निर्धारें ॥५४॥
ऐसें असतां भक्तजनांनीं । मणेगाराची पाहूनि करणी । द्यावें म्हणती आधिपत्य झणीं । कृष्णाश्रमस्वामींजवळीं ॥५५॥
शुक्लभट्ट मणेगाराजवळी । व्यवस्था सारी कोणी सोपविली । चतुर आपुली सद्गुरुमाउली । हिचेंचि कार्य सकल तें ॥५६॥
सद्गुरु जें करिती कार्य । तेणें जगाचे हितचि होय । ऐसें असतां घेणे संशय । हाचि अपराध भक्तांचा ॥५७॥
परी तो अपराध प्रेमयुक्त । हें श्रीस्वामींसी असे विदित । तोही न पडावा किंचित । म्हणोनि दाविला चमत्कार ॥५८॥
जाणोनि सकल पुढील भविष्य । प्रार्थिलें जनांसमक्ष देवीस । त्यांच्या मानसीं अपराध विशेष । यावा ऐशा हेतूनें ॥५९॥
परी अंतरी नाहीं क्षोभ । म्हणती मानसीं भक्त दुर्लभ । मी भक्तप्रेमाचा वल्लभ । मजहुनी भिन्न ना भक्त ॥६०॥
यापरी सद्गुरुस्वामीराय । केला जरी भक्तांनीं अन्याय । तेथें दुर्लक्ष करिती सदय । न क्षोभले अंतरीं किंचितही ॥६१॥
बालक असे उत्कृष्ट बहुत । परी त्याच्या अंगीं दुर्गुण किंचित । देखतां तयासी ताडण करीत । तरी अंतर - प्रेम खंडेना ॥६२॥
आणिकही आपुला बाळ । गुणी व्हावा म्हणोनि वेल्हाळ । बोले भेडसावुनी येवेळ । टाकुनी तुम्हां जात्यें मी ॥६३॥
ऐसें बोलुनी ती जननी । जात्ये माहेरीं मुलासी सोडुनी । परी वेगळा भाव असे मनीं । दावी वरीवरी कोप तया ॥६४॥
जावयाचें होतें काजचि म्हणुनी । गेली मुलासी लटिकें सांगुनी । तैसें वामनाश्रमस्वामींनी । केलें जनांसी दावाया ॥६५॥
परी अंतरीं जनांचें हित । व्हावें ऐसाचि असे हेत । हितचि चिंतिती म्हणोनि त्यांप्रत । ‘हितचिंतक’ म्हणती पैं ॥६६॥
विकारी संवत्सर कार्तिकमासीं । वद्य नवमी ऐशा दिवशीं । शके सतराशें एकसष्ठ या वर्षीं । जाहले मुक्त श्रीस्वामी ॥६७॥
तेव्हां तेथेंचि मंगळूर-ग्रामीं । समाधि दिधली परम नामी । बघतां आनंद अंतर्यामीं । तेथील जनांसी होय सदा॥६८॥
तेथील लोकांचें पुण्य बहुत । म्हणोनि मुक्त जाहले तेथ । दर्शन घडे समाधीचें सतत । तेथील भाविक भक्तजनां ॥६९॥
काय लीला तया स्वामींची । कुठेंही नसतां देवी साची । करुणा भाकितां स्वामींनीं तिची । आली धांवूनि तात्काळ ॥७०॥
कवणालाही न येतां देवी । स्वामींची आज्ञा मान्य करावी । म्हणोनि घेऊनी त्यांसी बरवी । गेली आपुल्या स्थानासी ॥७१॥
पुनरपि न आली कवणासीही । तेव्हां आश्र्चर्य करिती सर्वही । श्रीसद्गुरु - स्वामींची नवलाई । नाहीं संशय यामाजीं ॥७२॥
एवं सद्गुरु-स्वामींसन्मुख । न दावावा आपुला विवेक । ते जे सांगती तेंचि एक । करावें आपण भक्तजनें ॥७३॥
असो यावरी तेथील जनांनीं । समाधि देतां विधियुक्त त्यांनीं । प्रायश्र्चित्त हवनादि करोनि । शहाळ्यांचा अभिषेक केला पैं ॥७४॥
आणूनि शहाळीं जनांनीं अमित । अभिषेक केला समाधीवरी तेथ । आणिक प्रार्थना करिती बहुत । परम प्रीतीनें ते पाहीं ॥७५॥
अद्यापिही जन कित्येक । नवस करिती तेथें सुरेख । विशेष कार्यालागीं देख । शहाळ-अभिषेक करिती पैं ॥७६॥
तेव्हां त्यांचें कार्य सफल । निश्र्चयानें होतें समूल । हा नव्हे लटिका बोल । बघावें करोनि विश्र्वासें ॥७७॥
कवणाही येतां आपत्काल । समाधीसन्मुख सुंदर सोज्ज्वळ । नंदादीप ठेविती निश्र्चल । नवस करोनि त्या काळीं ॥७८॥
तेव्हां त्यांचे सारे कष्ट । क्षण न लागतां होती नष्ट । यावरी असे एक गोष्ट । पुढील अध्यायीं सांगूं ती ॥७९॥
आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें त्रयोविंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥८०॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां नासे विषयेच्छा थोर । त्रयोविंशाध्याय रसाळ हा ॥८१॥
अध्याय २३ ॥ ओंव्या ८१ ॥ ॐ तत्सत्श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥छ॥
॥ इति त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 29, 2024
TOP