चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१३॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जया जी श्रीगुरुराया । देवा तुझ्या नामस्मरणासी काया । झिजवावी न लागे निश्र्चयें सदया । परम सुलभ साधन हें ॥१॥
तरी वाटतें परम कठिण । कैसें करावें न कळे भजन । ऐसें व्हावया एकचि कारण । विषय गोड वाटती म्हणोनि ॥२॥
तूंचि आतां कृपा करोनि । विषयांतुनी मजला सोडवुनी । लावीं मन हें नामस्मरणीं । तुझिया देवा कृपाघना ॥३॥
स्मरतां नाम तुझें सतत । होईल सारें शुद्ध चित्त । म्हणोनि आणिक नाहीं मागत । देईं बुद्धि तव स्मरणातें ॥४॥
असो आतां सद्गुरुनाथा । तूंचि करोनि शुद्ध चित्ता । वदवीं सविस्तर तुझिया ग्रंथा । दीनदासाकडूनियां ॥५॥
आतां श्रोते हो सावधान । करा परम अमृत - श्रवण । परिज्ञानाश्रम यांचें महिमान । प्रेमळ सज्जन तुम्ही हो ॥६॥
मागील अध्यायीं सद्गुरुनाथ । परिज्ञानाश्रम परम विख्यात । यांचा तृतीय अवतार होउनी त्वरित । केला उद्धार जनांचा ॥७॥
आणि श्रीसद्गुरुरायें । उठविलें सावकाराच्या भार्ये । ज्वरांतुनी क्षणांत पाहें । होय सुखरूप ती जाणा ॥८॥
एवं सद्गुरुमहिमा अपार । आणिक एक ऐसी सुंदर । कथा वर्णन करूं साचार । असावें सावध चित्तानें ॥९॥
भटकळ - ग्रामीं होता एक । सारस्वत ब्राह्मण असे तो देख । विषयांमाजी सदा गर्क । त्याचें नाम लक्षुमण ॥१०॥
नाहीं विदित त्या स्वामी देव । परी तो न करी सर्वथैव । निंदा स्तुति दोन्हीचा ठाव । नसे त्या ब्राह्मणा कांहीं हो ॥११॥
ऐसें असतां एके दिवशीं । जाई तो सहज शिराली - ग्रामासी । नावेवरी बैसतां त्यासी । भेटला दुजा सारस्वत ॥१२॥
म्हणे तो सारस्वत लक्षुमणासी । कुठें जासी तूं या दिवशीं । येरू बोले शिराली - ग्रामासी । असे काज मजलागीं ॥१३॥
तेव्हां बोले सारस्वत । मीही जातों तेथेंचि मठांत । येसी कां तूं आमुच्या सांगात । सद्गुरुभेटीसी जाण पां ॥१४॥
यावरी बोले लक्षुमण । काय करावें तेथे जाऊन । मग बोले सारस्वत ब्राह्मण । सद्गुरुदर्शना घ्यावें बा ॥१५॥
घेतां स्वामींचे दर्शन । होय सारें पाप दहन । करितां त्यांचा बोध श्रवण । आत्मज्ञान होय पहा ॥१६॥
ऐकतां हांसे लक्षुमण मानसीं । खुळ लागलें म्हाताऱ्यासी । म्हणोनि सांगे मजसी । ब्रह्मज्ञान फुकटचि ॥१७॥
मग बोले तयापाशीं । जरी होईल सवड मजसी । तरी येतों एके दिवशीं । भेटीलागीं मठांत ॥१८॥
यावरी बोले सारस्वत । आतांचि येई भेटू त्वरित । काज तुझें बा असे सतत । न सोडीं मी तुजलागीं ॥१९॥
पहा तरी येउनी एक वेळ । सद्गुरुमूर्ति परम वेल्हाळ । किती तयांचे हृदय कोमल । बघतां ना सोडिसी तूं चरण ॥२०॥
यापरी केला बहुत आग्रह । तोंवरी संपला नदीप्रवाह । नावेवरुनी उत्तरे लक्षुमणासह । गेले ग्रामासी दोघेही ॥२१॥
सारस्वताच्या आग्रहास्तव । लक्षुमण घेई मठासी धांव । आपुलें काज सोडुनी सर्व । गेला संगें तयाच्या ॥२२॥
सद्गुरुस्वामी यांचे दर्शन । घेउनी आनंद जाहला पूर्ण । म्हणे मानसीं आजि सुदिन । कधीं ना पाहिले चरण हे म्यां ॥२३॥
ऐसें म्हणोनि लक्षुमण । घाली प्रेमानें साष्टांग नमन । म्हणे दयाळा आजवरी तव न । घडलें दर्शन मजलागीं ॥२४॥
नाहीं मजला महिमा विदित । आजि हा भेटे सारस्वत । ओढुनी आणिलें त्यानें मजप्रत । अति आग्रहेंकरोनि ॥२५॥
कैंचे सद्गुरु कैंचे स्वामी । यापरी बोलोनि वायां गेलों मी । येथेंचि असुनी भटकळ - ग्रामीं । नाहीं आलों या ठायीं ॥२६॥
असो आतां देवा मजला । क्षमा करावी या निज बाळा । बोलतां अश्रु लोटले डोळां । कांपे थरथरां अधरोष्ठ ॥२७॥
ऐसें म्हणोनि वारंवार । करी प्रदक्षिणा नमस्कार । तेव्हां तो सारस्वत बोले चतुर । लक्षुमणाप्रती तेधवां ॥२८॥
नाहीं तुझा अपराध कांहीं । पूर्वसुकृतावांचुनी पाहीं । सद्गुरुस्वामी कवणासही । सन्मुख असतां न दिसती ॥२९॥
जवळी असुनी सद्गुरु सघन । न दिसती आम्हांलागुन । खरे साधु कलियुगीं जाण । म्हणती न दिसती कवणासही ॥३०॥
जे दृष्टी पडती साधु । ते सर्वही असती भोंदू । ऐसा तयांसी लावितों शब्दु । अज्ञानें जाणा आपण ॥३१॥
एवं असतां साधु सन्मुख । म्हणतों आम्ही त्यासी मूर्ख । आपुल्यापरी मानितों देख । सद्गुरुस्वामींसी त्या खचित ॥३२॥
आपुलें मुख करोनि वांकुडें । बघतां दर्पणीं तेणेंचि पाडें । दिसे तेव्हां दोष कवणाचा घडे । आपुलाच ऐसें सिद्ध होय ॥३३॥
तद्वत् साधूचा नव्हे दोष । आपुलाचि तो असे खास । म्हणुनी आम्ही बोलतों तयांस । भोंदू ऐसें म्हणोनि ॥३४॥
परी ते न होती भोंदू कधींही । जैसे ते तैसेचि असती पाहीं । ऐकुनी ऐसें सद्गुरुमाई । काय बोले तें ऐका ॥३५॥
म्हणती लक्षुमणा ऐक । सांगतों तुजला अणुमात्र विवेक । चित्तीं धरोनि तो एक । राहें सुखानें तूं बापा ॥३६॥
जगीं जें जें दिसे सर्व । तें तें नश्वर रूप नांव । म्हणोनि धरावा दृढभाव । प्रभुचरणीं सदा तो ॥३७॥
धरितां दृढभाव तया चरणीं । तोचि उद्धरील तुजलागोनी । काया आणि मन वाणी । लावीं भजनीं तयाच्या ॥३८॥
ऐसें करितां रात्रंदिन । तोचि करी तुझें रक्षण । यामाजीं न करीं अनुमान । ठेवीं विश्वास मम वचनीं ॥३९॥
नलगे सोडावें प्रपंचकाज । करीं निष्काम चित्तानें सहज । धरोनि अंतरीं प्रभुराज । करी व्यवहार निर्धारें ॥४०॥
समज एक असे नोकर । करी धन्याचा सारा व्यवहार । धन्याहुनी सूक्ष्म विचार । करोनि कार्य करीतसे ॥४१॥
न करी पैशाची हयगय कांहीं । इमानीपणें करी तो पाहीं । परी अंतरी चिंता नाहीं । अणुमात्र तया चाकरासी ॥४२॥
धन्याचा लाभ अथवा हानि । चाकरालागीं समचि दोन्ही । परी धन्याच्या अंतःकरणीं । सुखदुःख तें बाधतसे ॥४३॥
होतां लाभ आनंद होय । हानि होतां दुःख अतिशय । ऐसें व्हावयासा कारण काय । धन्यासी वाटे 'माझें हें' ॥४४॥
म्हणोनि केला जरी प्रपंच । ममत्व तेथें न धरीं साच । धनी येथें प्रभु तोच । आपण नोकर समजावें ॥४५॥
प्रपंचाचे काज थोर । सुलभ अथवा कठिण अपार । घडो आपुल्या हाताने निरंतर । परी असावें अलिप्तचि ॥४६॥
लाभ अथवा हानि साची । न करीं पर्वा तूं तयाची । सुख दुःख सर्व समचि । पहा नोकरापरी बा तूं ॥४७॥
एवं सर्व प्रपंचाची । सोडुनी देईं मालकी साची । प्रभु परमेश्वर याची । करितों नोकरी मी खास ॥४८॥
ऐसें भावूनि रात्रंदिवस । अर्पण करावें त्याचें त्यास । सर्वेश्वर सर्वात्मा ऐशा प्रभूस । अनन्य असावें सर्वदा ॥४९॥
माझे नाहीं यांत अणुमात्र । तोचि प्रपंचाचा धनी स्वतंत्र । ऐसा भाव असावा पवित्र । पहावें सर्वत्र त्यासीच ॥५०॥
त्याचेंचि करावें चिंतन । तेव्हां सहजचि होशी पावन । असत्य नोहे आमुचें वचन । होईल उद्धार तव बापा ॥५१॥
ऐशिया दृष्टांतावरी प्रश्न । येईल बापा तुजलागोन । तरी त्याचें उत्तर देऊन । करितों निवारण शंकेचें ॥५२॥
धन्यासी सुख दुःख सकळ । नोकरा नाहीं भय समूळ । आतां सांगतां देव दयाळ । धनी आपुल्या प्रपंचाचा ॥५३॥
तरी त्यासी होय की चिंता । आमुच्या प्रपंचासाठीं चित्ता । आणि सुख दुःख तत्त्वता । त्यासी बाधे कां सांगा ॥५४॥
तरी ऐक सांगतों आतां । लावीं इकडेचि तुझिया चित्ता । तो असे अकर्ता अभोक्ता । न बाधे त्यासी दुःख ॥५५॥
दृष्टांत सारा साम्य कधींही । नसे कदापि निश्र्चयें पाहीं । योग्य अर्थ तितुकाचि घेईं । अयोग्य टाकुनी दे सारें ॥५६॥
असो एवं प्रभु परमेश्वर । तोचि धनी असे साचार । त्यावरी टाकुनी आपुला भार । करीं निरंतर ध्यान त्याचें ॥५७॥
ऐकतां सद्गुरुस्वामींचा बोध । आभर्य करिती भक्तवृंद । यासी इतुके कठिण शब्द । कैसे पटतील म्हणोनि ॥५८॥
परी सद्गुरूची कृपा होतां । सहजचि येई ज्ञान हाता । होय निरसन भवभयचिंता । क्षण न लागतां ती पाहीं ॥५९॥
असो तो गेला स्वामींसी शरण । घेतला उपदेश सद्गुरूंकडोन । झाला परमज्ञानी पूर्ण । तो लक्षुमण सारस्वत ॥६०॥
गुरुकृपा जाहलिया काय उशीर । करुनी सोडो मनुष्या ईश्वर । महिमा तयाची अपार । वर्णूं न शकें अज्ञ मी ॥६१॥
परी धरावे दृढतर चरण । जावें त्यासी अनन्य शरण । तेव्हां तो सद्गुरू दयाघन । क्षणेंचि उद्धरी त्यालागीं ॥६२॥
'अनन्य' म्हणिजे गुरूवांचुनी । अन्य दैवत नसे कोणी । त्यापुढें विषयही तुच्छ समजोनी । राहे अलिप्त तो पाहीं ॥६३॥
अनन्य मात्र शरण यावा । तरीच सद्गुरु उद्धरी त्या जीवा । नातरी सद्गुरूंनीं कैसा करावा । उद्धार त्याचा सांगा पैं ॥६४॥
ज्याच्या अंगीं भक्ति - श्रद्धा । तोचि शरण जाय सद्गुरुपदा । मग ते कनवाळू त्याची आपदा । चुकविती जन्ममरणांची ॥६५॥
जरी ना गेला अनन्य शरण । कां न उद्धरावें त्यालागून । ऐसा कोणी करील प्रश्न । ऐका त्याचें उत्तर पैं ॥६६॥
जरी करिती सद्गुरु उद्धार । तरी ज्याचा त्यासीच पाहिजे विचार । कैसा तें हें सांगूं सविस्तर । सद्गुरु स्फुरवील त्यापरी ॥६७॥
चित्त स्थिर झालियावीण । न जाई को अनन्य शरण । अनन्यासीच आत्मज्ञान । होय खचितचि निर्धारें ॥६८॥
ज्याचें असेल चंचल मन । त्यासी न होय उपदेश-ग्रहण । उपदेश - ग्रहण झालियावांचोन । न होय ज्ञान निश्र्चित ॥६९॥
सद्गुरु असती ताराया समर्थ । राहती धरुनी कृपेचा हस्त । परी असावें आपुले चित्त । सिद्ध होउनी तरण्यासी ॥७०॥
मन हें असे परम चंचळ । तेथें कैसा बोध ठसेल । मर्कटापरी धांवे सकल । जगभरी तें अनिवार ॥७१॥
तेव्हां त्यासी करावें काय । गुरुनाथाचा नसे अन्याय । आपुला आपुणचि करोनि उपाय । स्थिर करावें तयासी ॥७२॥
पर्जन्य पढे महाथोर । सर्वांठायी समचि अपार । परी राहे खळग्यामाजीं नीर । दगडावरी न राहे ॥७३॥
तैसें खळग्यापरी ज्याचे हृदय । खोल असे तेथें ग्रहण होय । दगडापरी जो वरीवरी घेय । त्यासी न ठसे सर्वथा ॥७४॥
ऐसे व्हावया काय कारण । चित्तीं विषय भरले संपूर्ण । मग कैंचे आत्मज्ञान । होईल त्यासी सांगा हो ॥७५॥
करूं जातां श्रवण मनन । विषयचि आमुच्या सन्मुख जाण । उभे राहती दत्त करून । मग कैसें समजेल ॥७६॥
समजल्यावीण कैसें उमजे । उमजे तरीच 'नव्हे हें मांझे’ । ऐसा चित्तीं विचार उपजे । खचितचि जाणा निर्धारें ॥७७॥
म्हणोनि आधीं करावा त्याग । विषयसुखाचा सकलही चांग । तरीच आला समजा योग । निजसुखाचा त्या पाहीं ॥७८॥
येथें येईल ऐसा आक्षेप । कीं म्हणतां विषयचि आमुच्या समीप । उभे राहती म्हणोनि निजरूप । न होय प्राप्त आपुल्यासी ॥७९॥
तरी येथें करावें काय । त्यागितां सारे आम्हीं विषय । देह हा आमुचा अशक्त होय । तरी कैसें करावें पैं ॥८०॥
ऐका आतां त्याचें उत्तर । करा सारा आपुला व्यवहार । स्वधर्मापरी निरंतर । न व्हावें आसक्त त्यांत पैं ॥८१॥
न होतां विषयी आसक्त । कर्तव्य जितुकेंचि येथ । न धरितां अंगी स्वार्थ । करा प्रपंच तो पाहीं ॥८२॥
म्हणोनि न होतां विषयासक्त । करितां श्रवण मनन यथार्थ । आत्मज्ञान होय प्राप्त । साधकालागीं निर्धारें ॥८३॥
एवं चित्तीं असतां विषय । निजस्वरुपाचें ज्ञान न होय । यावरी आतां एक रमणीय । दृष्टांत देऊं तो परिसा ॥८४॥
एकदां एक सभ्य गृहस्थ । बैसला असतां अकस्मात । बहुत वर्षांनीं त्याचा अत्यंत । प्रेमळ मित्र भेटला पैं ॥८५॥
तेव्हां तयासी अति हर्ष । झाला पाहुनी एकमेकांस । मग बोलती दोघेही बहुवस । गर्क जाहले त्यामाजीं ॥८६॥
तितुक्यामाजीं एक इसम । आला असे म्हणोनि काम । बेसला ऐकत आराम । संवाद उभय मित्रांचा ॥८७॥
हाही बैसे त्यांच्याचि सन्मुख । परी मित्रापुढें त्यासी आणिक । न दिसे तेव्हां कांहींएक । मित्रमोहामाजी पैं ॥८८॥
जेव्हां गेला मित्र आपुल्या गृहासी । तेव्हां हा इसम दिसे त्यासी । म्हणे कधीं येथें बैसलासी । तो म्हणे दोन तास झाले ॥८९॥
यावरी बोले हा गृहस्थ । कुणी आल्याचा भान मजप्रत । जाहला परी लक्ष ना तेथ । कळलें ना कोण कांहीं तें ॥९०॥
तैसें आपुल्या चित्तीं बहुत । विषय भरोनि बैसल्या तेथ । श्रवण मनन परमार्थ । विषयांपुढें न दिसेचि ॥९१॥
विषयसुखामाजी रममाण । झाल्यामुळें आम्हांलागोन। न समजे श्रवण मनन । मग कैंचें निजसुख तें ॥९२॥
असतां चित्तीं विश्व अमित । जरी बैसलों श्रवण करीत । काय होईल आम्हां प्राप्त । परी न होय व्यर्थ तें ॥९३॥
जैसा त्या गृहस्थासन्मुख । बैसला दुजा इसम देख । दिसला तरी निश्र्चयात्मक । कळलें ना चित्ती तयाच्या ॥९४॥
तैसें विषयीं होऊनियां रत । जरी केलें श्रवण अमित । शब्द तितुकेचि कानीं पडत । समज उपज ना तेथें ॥९५॥
म्हणोनि सद्गुरूसी अनन्य शरण । जो जाई त्याची विषयेच्छा पूर्ण । सहजचि नासे आपण होऊन । सांगू कैसें तें ऐका ॥१६॥
जो जाई अनन्य शरण । त्यासी गुरुविण विषय श्रेष्ठ ना आन । तेव्हां विषयीं कां म्हणोन । जाईल सांगा तो बापा ॥९७॥
ऐशा भक्तासी सद्गुरुराज । क्षण न लागतां उद्धरी सहज । येरांचेंही करी काज । नच धिक्कारी त्या पाहीं ॥९८॥
जरी अनन्य शरण न गेला । भक्ति प्रेम आहे ज्याला । करिती कधीं कधीं बोध तयाला । लाविती हळुहळू निजमार्गा ॥९९॥
म्हणोनि धरावे सद्गुरुचरण । कळो न कळो आपुल्यालागोन । जरी विषयीं आपुलें हें मन । तरी न सोडावें गुरुचरणां ॥१००॥
ऐसें करितां करितां सहज । विषयासक्ति सोडवी गुरुराज । त्यासीच असे त्याची लाज । आपुल्या ब्रीदाची निर्धारें ॥१०१॥
म्हणोनि जावें त्यासीच शरण । भार घालावा त्यावरीच जाण । परी बळेंचि गुरुवांचोन । विषयसेवन न करावें ॥१०२॥
शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध । यांत सद्गुरूचाचि बघावा आनंद । आतां म्हणाल श्रोते सबंध । सेवावें काय दुर्विषयां ॥१०३॥
ऐसें मात्र नच करावें । गुरुरूप म्हणोनि नच सेवावें । दुर्विषय वा ते आघवे । अंधश्रद्धा करूं नये ॥१०४॥
जरी झाला परम ज्ञानी । तोही विधि - निषेध ठेवुनी । करी व्यवहार दुर्विषय टाकुनी । कर्तव्यापरी वर्ते तो ॥१०५॥
तेव्हां आम्हीं अज्ञ जनांनीं । कैसे सेवावे दुर्विषय सांगा झणीं । असो सद्गुरुवांचोनी । अन्य विषय न सेवावे ॥१०६॥
आतां पहा परिज्ञानाश्रम । सद्गुरुस्वामी हें की उत्तम । बोधुनी जनांसी लाविती प्रेम । निजस्वरूपाचें तें जाणा ॥१०७॥
पुढील अध्यायीं शिष्य - स्वीकार करोन । करिती निजधामासी गमन । तेथुनी तृतीय अवताराचें पूर्ण । झालें कार्य सकलही ॥१०८॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें त्रयोदश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०९॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां विघ्नें नासती साचार । त्रयोदशाध्याय रसाळ हा ॥११०॥
अध्याय ॥१३॥
ओंव्या ॥११०॥
ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः॥
N/A
References : N/A
Last Updated : January 19, 2024
TOP