चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३७॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ॐ॥
जय जय देवा सद्गुरुराया। तुझें स्वरूप अगाध सदया । जातां वर्णन करावया । तल्लीन होय तेथेंचि ॥१॥
कर्णीं पडतां तुझें वचन । आनंदें भरोनि येई मन । नुरे अणुमात्र या मीतूंपण । अहाहा देवा प्रभुराया ॥२॥
चरणस्पर्श होतां मस्तकीं । निरसुनी अज्ञान सारें टाकी । ऐसा सद्गुरु तूं माझा या लोकीं । अवतरला साक्षात् शंकराचार्य ॥३॥
देवा मज निश्चयें जाण । मन कळे कांहीं ज्ञानाज्ञान । तेव्हां कैंचे ग्रंथलेखन । घडेल सदया मजकडुनि ॥४॥
तुझी महिमा कराया वर्णन । योग्यता नाहीं मजलागोन । जेवीं सूर्याचें वर्णन जाण । जन्मांधासी न करवे ॥५॥
प्रभो आतां सद्गुरुराया । पार घालीं निजदासा या । वेडी वांकुडी सेवा म्हणूनियां । नच धिक्कारीं तूं बापा ॥६॥
जैसे बाळाचे बोबडे बोल । मातेसी तेचि गोड केवल । तैसें तुजला माझें सकल । गोडचि वाटे निश्चयेंसीं ॥७॥
असो आतां श्रोते हो सज्जन । सांगूं तुम्हां सद्गुरुवचन । मी पापी मतिहीन । परी तुम्ही परिसा प्रेमानें ॥८॥
तुमच्या प्रेमास्तवचि गुरु करील । सत्वर ग्रंथाची समाप्ति सकल । ऐसी आशा दिसे ये वेळे । निश्चयें जाणा तुम्ही हो ॥९॥
जरी मी करितों भलती बडबड । गुरुवीण नसे ती पहा उघड । अवघ्या शब्दांमाजीं गोड । त्यांचेंचि स्वरूप भरलें हो ॥१०॥
त्यांचें नाम म्हणिजे एक । अमृताहुनी गोड सुरेख । त्याहुनी जगीं नाहीं आणिक । साधन सोपें निजमार्गा ॥११॥
नाम घेतां दिसे रूप । रूप पाहतां आपोआप । तात्काळ होय ब्रह्मरूप । प्रेमळ भक्त हो जाणा ॥१२॥
मूर्ति धरितां निजमानसीं । त्यांच्या वचनीं परियेसीं । विश्वास उपजे निश्चयेसीं । सत्य वचन पहा हें ॥१३॥
धरितां वाक्यीं विश्वास । मग काय उणीवता त्यास । तेणेंचि तो पावे खास । ब्रह्मज्ञान निश्र्चयेंसीं ॥१४॥
सद्गुरुवचनामाजीं निश्चयें । भरला ब्रह्मानंदचि पाहें । तें आम्हीं पाळितां लवलाहें । काय उशीर मग सांगा ॥१५॥
समजा असे एक टोपली । ती आम्रफळांनीं भरली । झांकुनी ठेविली असतां त्या स्थळीं । आला तेथे बाळ एक ॥१६॥
वास सुटला घमघमित । बाळ घाली टोपलींत हात । प्रयन केला त्यानें बहुत । आंबे त्यांतूनि काढावया ॥१७॥
ऐसें साहस करितां त्यासी । फळें प्राप्त झालीं परियेसीं । खाउनी तो तृप्त होय मानसीं । जाई नाचत आनंदें ॥१८॥
तद्वत् येथें आंब्यांची टोपली । जाणा सद्गुरुनाथ - माउली । तीमाजीं असती भरलीं । परब्रह्मरूप आम्रफळें ॥१९॥
गुरुदेह - टोपलीमाझार । भरलीं आम्रफळे गोड सुंदर । वचनरूप वास परिकर । येईं मुखांतूनि तो जाणा ॥२०॥
वास येतांही आम्रफळांचा । दुर्लक्षोनि जरी बाळ तैंचा । जाता सोडोनि फळें साचा । तृप्त झाला असता काय ॥२१॥
बहु प्रयत्नें घेतल्याकारण । तृप्त झाला तो खाऊन । तैसें येथे सकलही आपण । धरावा विश्वास सद्गुरुवचनीं ॥२२॥
येतां आम्रफळांचा वास । येथे आंबे असती खास । ऐसें समजोनि बाळास । इच्छा होय खाण्याची ॥२३॥
यापरी येथें सद्गुरुवचन । हेचि निजवरूपाची खूण । त्या विश्वासें जातां पूर्ण । पाव समाधान तात्काळ ॥२४॥
सद्गुरु केवळ परब्रह्म । म्हणोनि वचन गोड परम । आनंदचि त्यांत उत्तम । भरला असे हो जाणा ॥२५॥
आंब्यांमाजीं गोडी आणि वास । दोन्ही असती पहा विशेष । तैसे सद्गुरुनाथ ब्रह्म खास । त्यांच्या वचनीं सारें असे ॥२६॥
त्यांचें वचनचि परब्रह्म । आनंदरस त्यांतचि उत्तम । भरला असे अप्रतिम । काय सांगूं तुम्हांसी ॥२७॥
आम्रवासें आंबा सांपडे । गुरुवाक्यें परब्रह्म आतुडे । सद्भक्तांचे तुटे सांकडें । विलंब नसे तयासी ॥२८॥
एवं सद्गुरुवचनामाजीं । परब्रह्मचि भरलें सहजीं । म्हणोनि त्यांचें वचनचि आजि । श्रेष्ठ बोलती संतजन ॥२९॥
हेंचि मागील अध्यायीं निरूपण । सारस्वत भक्त शंकर गोकर्ण । गुरुवचनेंचि समाधान । पावला पूर्ण पहा तो ॥३०॥
म्हणोनि ऐसें सद्गुरुवचन । हेंचि करी सर्वांचं रक्षण । प्रपंचीं परमार्थीं जाण । सद्गुरुवचनचि उद्धरी ॥३१॥
ज्यासी हवें जें जें जाण । तें तें द्यावया समर्थ कृपाघन । परी करावा प्रयत्न आपण । दृढ विश्वासें हो पाहीं ॥३२॥
विश्वास धरोनि करितां कार्य । करितो रक्षण सद्गुरुवर्य । म्हणोनीच त्यांचे पाय । धरावे आधीं लवलाहीं ॥३३॥
असो आतां सावधान । ऐका श्रोते तुम्ही सज्जन । सर्वांगाचे करोनि कान । सद्गुणगान श्रीगुरूंचें ॥३४॥
तीचि कथा सांगूं आतां । सद्गुरुवचनचि श्रेष्ठ तत्त्वतां । तेंचि पार घाली समस्तां । निजभक्तांलागीं पैं ॥३५॥
मंगेश भट्ट नामें एक । सारस्वत होता भाविक । तयाची भार्या पार्वती देख । नांदती कारवार ग्रामीं हो ॥३६॥
एके काळीं पार्वती आपण । मुलांसहित गेली तेथून । शिरालीमाजीं कांहीं दिन । राहिली आजारी म्हणोनि ॥३७॥
तेथे शांतादुर्गा - देउळीं । मंगेश भट्ट याची ते स्थळीं । बंधुपत्नी होती ते वेळीं । त्यांच्या सदनीं ती राहे ॥३८॥
तेव्हां मंगेशाचें एक मूल । पांच वर्षांचे होतें बाळ । पडलें आजारी ते वेळ । शिराली - ग्रामीं हो पाहीं ॥३९॥
झाला सन्निपात विपरीत । किंकाळ्या फोडी मुलगी बहुत । नाना उपचार करिती समस्त । परी उपयोग न होय ॥४०॥
झाले सर्व वैद्य थकले । ज्वर अणुमात्रही न हाले । शुद्धि नसतां तीन दिन झाले । पार्वती बहुत घावरली ॥४१॥
'आंबा' म्हणोनि एकचि शब्द । घेऊनि किंकाळे बाळ बेशुद्ध । आणिक कांहीं भेदाभेद । न समजेचि अणुमात्र ॥४२॥
ऐसें पाहुनी सकळ जन । चिंता करिती बहुत जाण । मूल न वांचे आमुचें म्हणोन । माय रडतसे ते समयीं ॥४३॥
तेव्हां स्वामी सद्गुरुनाथ । भक्तांची माउली प्रख्यात । आली भेटाया देवीसी तेथ । शांतादुर्गा - देउळासी ॥४४॥
तेव्हां मुलीच्या किंकाळ्या ऐकुनी । स्वामी वदले मृदुवचनीं । ज्वर गेला नाहीं कां अजुनी। तेव्हां कुळकर्णी मूर्ति उत्तर दे ॥४५॥
म्हणे स्वामिन् आज तियेस । शुद्धि नसतां झाले तीन दिवस । आंबा आंबा म्हणे त्याहुनी विशेष । नाहीं शुद्धी तिजलागीं ॥४६॥
यावरी म्हणती स्वामीराज । नगर - रामराय यांचें आज । ओषध द्या म्हणिजे सहज । गुण येईल तिजलागीं ॥४७॥
येरू बोले त्यांचे आम्हीं । औषध दिधलें होतें स्वामी । जे वैद्य शिराली - ग्रामीं । थकले सर्वही ये समयीं ॥४८॥
तेव्हां स्वामी पुनरपि म्हणती । नगररामाचें औषध निश्चितीं । द्यावें आजचि सत्वरगतीं । होईल बरी ती ईशकृपें ॥४९॥
आणि देवीसन्मुख तिजला । पायऱ्यांवरी आणुनी घाला । गुण होईल सत्वर बाळा । इतुकें बोलुनी गेले ते ॥५०॥
मठामाजीं जाउनी सत्वरीं । आंबा पाठविला ते अवसरीं । निरोप धाडिला आंबा मुखांतरीं । घाला त्या बाळाच्या प्रसाद हा ॥५१॥
सद्गुरु आज्ञा होतां ऐसी । तात्काळ आंबा लाविला मुखासी । धरिला विश्वास निजमानसीं । वचनावरी स्वामींच्या ॥५२॥
आणि नगररामरायासी । बोलावुनी आणिला आज्ञेसरशी । म्हणती तुमचें औषध इजसी । द्यावें पुनरपि आतां पैं ॥५३॥
यावरी बोले रामराव । आमुचें औषध झालें सर्व । उपयोगा न ये सर्वथैव । कासया पुनरपि वृथाचि ॥५४॥
तेव्हां बोले पार्वती त्यासी । श्रीस्वामींची आज्ञा आम्हांसी । तुमचें औषध द्यावें इजसी । म्हणोनि तुम्हीच द्या कृपेनें ॥५५॥
श्रीस्वामींचें वाक्यचि श्रेष्ठ । तेचि हरिती सर्वही कष्ट । ऐशी ऐकतां सारी गोष्ट । स्मित मुख झाला रामराव ॥५६॥
आणि म्हणेश्रीस्वामींची । आज्ञा असतां भीति कैंची । देतों औषध आतांचि । उशीर न करूं ये समयीं ॥५७॥
इतुकें बोलुनी कांहीं जिन्नस । देऊनि म्हणे याचा सुरस । काढा करूनि पाजावा मुलीस । बरी होईल गुरुकृपें ॥५८॥
ऐसें ऐकतां वैद्याचें वचन । काढा केला न लागतां क्षण । पाजिला सद्गुरुवाक्य स्मरोन । भक्तिपूर्वक ते समयीं ॥५९॥
पहा कैसा चमत्कार । सद्गुरुमहिमा परम अपार । काढा देतांचि सत्वर । आला घाम तिजलागीं ॥६०॥
आणि ज्वर गेला निघोनी । आनंद झाला सर्वांच्या मनीं । म्हणती काय ही स्वामींची करणी । धन्य धन्य गुरुनाथ ते ॥६१॥
मग थोड्या दिवसांमाजीं । ज्वर सारा गेला सहजीं । श्रीपांडुरंगाश्रम-गुरुजी। यांची कृपा सारी ही ॥६२॥
पहा कैसें सद्गुरुवचन । वचनेंचि बुरी झाली ती पूर्ण । यांत नाहीं अनुमान । ऐका श्रोते हो सावध ॥६३॥
आधीं दिधलें होतें औषध । बहुत वैद्यांचें नानाविध । आणि रामरावांचेही प्रसिद्ध । दिधलें होतें ते समयीं ॥६४॥
माझ्या औषधें न होय गुण । कासया वृथाचि देऊं आपण । रामरायें ऐसें बोलून । औषध बंद ठेविलें ॥६५॥
परी तेंचि देतां पुनरपि त्वरित । गुण आला गुरुकृपेंचि निश्चित । काय महिमा त्यांची अद्भुत । न वर्णवे आम्हां अज्ञांसी ॥६६॥
एवं सद्गुरुवाक्यचि श्रेष्ठ । प्रपंचीं परमार्थी हरे संकट । आणि पावती सकलाभीष्ट । गुरुवाक्येंचि हो पाहीं ॥६७॥
त्यांचें वाक्य इतुकें कासया । श्रेष्ठ म्हणाल प्रपंचीं या । तरी चित्त सावध करोनियां । ऐका सज्जन श्रोते हो ॥६८॥
सद्गुरुमूर्ति परम सात्त्विक । नाहीं द्वैतभाव त्यांसी देख । दिसे परब्रह्मचि सकळिक । सच्चिदानंद त्यां पाहीं ॥६९॥
म्हणोनि त्यांची शुद्ध बुद्धि । आणि वाणी सरळ साधी । तेवींच असत्य न होय सुधी । वाक्य त्यांचे कदापिही ॥७०॥
जरी अत्यंत वस्त्र मलिन । त्यामी शुद्ध लावितां सावण । घाण जाय सारी निघोन । वसन होय तें शुभ्र ॥७१॥
तैसी सद्गुरुस्वामींची वाणी । साबणापरी शुद्ध म्हणोनि । बोलतां जनांचीं दुरितें पळोनि । जाती सर्वही तत्काळ ॥७२॥
सावण काढी वस्त्राचें मलिनत्व । तेसें आम्हां अज्ञांचे सर्व । पाप नासुनी टाकी गुरुदेव । आपुल्या वाणीनें लगबगेंसीं ॥७३॥
पूर्वपापें होय ग्रहबाधा । तेणें नाना रोग जडती सदा । आणि येई बहुत आपदा । पापानेंच सारी ती ॥७४॥
तेव्हां सद्गुरूचें शुद्ध वचन । निघतांचि त्यांचे मुखांतून । आणि कृपारूप घालितां जीवन । धुऊनि टाकिती पापमळ ॥७५॥
पाप नसतां ग्रह पळती । ग्रह पळतां रोग जाती । ऐशी सत्पुरुषांची मूर्ति । काय सांगूं नवलाई ॥७६॥
म्हणोनि सद्गुरुवचनापरतें । श्री आणिक नाहीं साधन आमुतें । तेंचि पालन करितां आयितें । साधे आपणा परमार्थ ॥७७॥
प्रपंचीं अथवा परमार्थी । गुरुवचनचि थोर अति । तेणेंचि होय सुख निश्र्चितीं । नाहीं संदेह यामाजीं ॥७८॥
परमार्थाचा पंथ हा कठिण । ऐसें आम्हां वाटे जाण । परी पाळितां सद्गुरुवचन । परम सुलभ होय तो ॥७९॥
म्हणोनि सद्गुरुस्वामी दयाघन । यांचे धरावे आधीं चरण । आणि पाळावें त्यांचें वचन । मग कैंचें भय त्याला ॥८०॥
संसाररूप नदी खोल । ओलांडावी आम्हीं सकळ । काय उपाय करावा ये वेळ । तरी नौका लक्षावी ॥८१॥
येथें सद्गुरु - आज्ञा हीचि । परम सुंदर नौका आमुची । त्यावरी बैसावें त्वरितचि । तीचि पार नेत असे ॥८२॥
नावेवरी न बैसतां । पैलतीरा पायींच जातां । तो बुडूनि मरेल क्षण न लागतां । 'मी शहाणा' या अभिमानें ॥८३॥
तैसें येथे सद्गुरु - आज्ञा । धिक्कारूनि म्हणे मीचि शहाणा । ऐशा अभिमानें करितां गर्जना । काय गति होईल ती ऐका ॥८४॥
मोक्ष राहे ठायींच्या ठायीं । परी अंतीं अधोगतीसी जाई । त्याहूनि संसारीं रमतां कांहीं । नाहीं तितुका दोष खरा ॥८५॥
पहा कैसें तें परिसा या आधीं । जेणें ओलांडावी नदी । तेणें बैसतां नौकेमधीं । जाय पैलतीरा बिनधोकपणें ॥८६॥
पैलतीरींचि राहतां जाण । सुखी राहे तो कीं आपण । चालूनि जाय जरी नदींतून । मेल्याविणन राहे ॥८७॥
तद्वत् येथें भवनदीपार । जाऊनि नीजसुखीं रहावें हा निर्धार । परी गुरुआज्ञारूप नाव साचार । त्यागुनी अभिमानें अन्य करी ॥८८॥
मोडितां सद्गुरु-आज्ञा आपण । जावें लागे अधोगतीस जाण । मग कैंचा मोक्ष गहन । लाभेल सांगा आम्हांसी ॥८९॥
इकडे संसारींही बरवी गति । नाहीं कदापि त्याप्रति । ऐसी गुरु - आज्ञेची प्रचीति । अनुभवसिद्ध हो जाणा ॥९०॥
यावरी येईल सहजचि प्रश्न । जावें जरी त्या गुरूसी शरण । तरी अणुमात्र चुकतां आपण । गति कठिण होईल पैं ॥९१॥
तरी परिसा याचें उत्तर । श्रीगुरूसी भजतां दृढतर । नाहीं भय त्यां हा निर्धार । सद्गुरु माउली कनवाळू ॥९२॥
ते न करिती आज्ञा कठिण । अति सुलभ सांगे कृपाघन । ज्याची योग्यता जितुकी जाण । तैसीच करिती आज्ञा ते ॥९३॥
तीही भक्तांच्या हितासाठीं । त्यांत स्वार्थ नसे त्यांच्या पोटीं । असो ज्याची योग्यता मोठी । त्यासीत्र कठिण आज्ञा करिती ॥९४॥
सारांश, ज्याची जितुकी योग्यता । तितुकेंचि त्यासी सांगती तत्त्वतां । जैसी रक्षी मुलांसी माता । तैसीच रक्षी गुरुमाउली ॥९५॥
जें असे लहान बालक । त्यासी दूधचि पाजी माता देख । जया पेज घालावी आणिक । भात ज्यासी तें त्या देई ॥९६॥
यापरी करी माता जतन । जया जें यावें तेंचि देऊन । तैसे सद्गुरुस्वामी सघन । सांगती मार्ग भक्तांसी ॥९७॥
आणि माता करी काय । जें करितां हित होय । तेंचि कराया शिकवी निर्भय । निजबाळासी प्रेमानें ॥९८॥
न केल्या ती कोपे बहुत । बहुविध त्यासी शिक्षा करीत । परी अंतरीं तिच्या अमित । प्रेम असेचि जाणा हो ॥९९॥
अमुक अमुक करीं ऐशी । आज्ञा करी ती दिननिशीं । हित व्हावें हाचि मानसीं । हेतु असे तियेचा ॥१००॥
जेणें पाळिली मातेची आज्ञा । तोचि पुढें होय शहाणा । नातरी होय दुर्गुणी जाणा । ढुंकून त्याकडे पाहीना कोणी ॥१०१॥
तद्वत् जे साधु संत । केवळ जनांचें कल्याण इच्छितात । त्यात्रि कारणें आज्ञापिती त्यांप्रत । स्वधर्मापरी वर्तावें म्हणूनि ॥१०२॥
सोडावें तुम्हीं अन्नपान । संसार सोडूनि सेवावें वन । ऐसें कदापि न सांगती वचन । साधुसंत गुरुराज ॥१०३॥
ठायींच बैसोनि करावा परमार्थ । दुर्विषय सारे सोडावे येथ । आणि दुर्गुण सोडूनि सतत । ध्यावें मानसीं प्रभुराया ॥१०४॥
आणिक करावा स्वधर्म आपुला । भगवद्भाव धरोनि चांगला । प्राणिमात्रांसीं पहावें मकलां । हीचि आज्ञा करिती ते ॥१०५॥
'हातीं काम मनीं राम' । यांतचि घाला अवघा जन्म । ऐसा भक्तांसी मार्ग सुगम । दाविती प्रेमळ चित्तें ते ॥१०६॥
ते जें सांगती साधन । तेंचि प्रेमें करावें आपण । जरी मीचि शहाणा म्हणोन । वर्तेल तरी घसरे तो ॥१०७॥
एवं गुरु - आज्ञेपरी वर्ततां । प्रपंचीं अथवा परमार्थी भक्तां । मुखचि होय तयांसी तत्त्वतां । नाहीं संशय यामाजीं ॥१०८॥
सद्गुरुप्रेम ज्याचे चित्तीं । त्यासी गुरुआज्ञा सुलभचि दिसे ती । प्रेमें पाळितां उद्धार निश्चितीं । होय त्या भक्ताचा तत्काळ ॥१०९॥
जो असे खरा भक्त । त्यामी मिळती खरे संत । तेणें तत्काळ होय तो मुक्त । सत्य सत्य त्रिवाचा ॥११०॥
एवं सद्गुरु - महिमा अपार । पुढील अध्यायीं सांगूं सविस्तर । तेणें तराल भवसागर । सद्गुरुकृपेंचि सज्जन हो ॥१११॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपा - प्रसादें सप्तत्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥११२॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । सप्तत्रिंशाध्याय रसाळ हा ॥११३॥
अध्याय ३७ ॥
ओव्या ११३ ॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथ चरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2024
TOP