मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥५०॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५०॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय स्वामी सद्गुरुराया । तूं सर्व जगासी आश्रय सदया । नाम - रूप जातां विलया । तूंचि अससी सर्वत्र ॥१॥
जैसें सुवर्ण - अलंकार । एकचि असे साचार । कीं नाम - रूप त्यागितां समग्र । उरे केवळ सुवर्णचि ॥२॥
तैसा देवा तूं गुरुराया । जें जें दिसे नामरूप जगीं या । त्याचा त्याग समूळ केलिया । तूंचि अससी सर्वत्र ॥३॥
सुवर्ण जैसें अलंकारीं । पूर्ण व्यापिलें आंत - बाहेरी । अणुमात्र जागा नुरे निर्धारीं । अलंकारीं सुवर्णावीण ॥४॥
तैसा तूं नाम-रूपांतरीं । आंत - बाहेरी अससी निर्धारीं । तुजवांचोनि जागा अणुभरी । नाहीं निश्र्चयें बा ताता ॥५॥
तेव्हां आमुच्या हृदयामाजीं । अंतर्बाह्य व्यापक सहजीं । अससी तूं आमुचा गुरुजी । कैसा वर्णूं तुजलागीं ॥६॥
जी जी आम्हां कल्पना येत । ती ती तूंचि अससी सतत । यावरी श्रोते होऊनि संशयग्रस्त । म्हणतील काय बडबड ही ॥७॥
कल्पना म्हणिजे मिथ्या सारी । ती सद्गुरु कैसेनि सांग बरी । ऐका त्याचें उत्तर झडकरी । चित्त देऊनि इकडे हो ॥८॥
 कल्पना मिथ्या हें वचन सत्य । परी त्यांतील ज्ञान हें नित्य । जैसी लहरी असे असत्य । जल सत्य हो पाहीं ॥९॥
सागर आणि लहरी यांचें । जल असे एकचि साचें । समुद्र - लहरीसी भेद नसतां कैंचें । उदक वेगळें होईल ॥१०॥
तैसें निजस्वरूपाचें ज्ञान । आणि कल्पनेंतील एकचि जाण । कल्पना निजस्वरूप एक असोन । ज्ञान वेगळे केवीं होय ॥११॥
असो आमुचा सद्गुरु सखा । निजस्वरूपचि असे देखा । कल्पनेमाजीं भरला निका । नाहीं संशय यामध्यें ॥१२॥
म्हणोनि सद्गुरु कल्पनेआंत । भरला व्यापक सदोदित । तेव्हां वर्णील कोण त्यांप्रत । वेगळा होऊनि कैसेनि ॥१३॥
असो आतां ऐका चरित्र । मागील अध्यायीं कथिलें सविस्तर । आनंदाश्रमस्वामी गुरुवर । जातां प्रार्थून आणिलें ॥१४॥
मग ते राहिले मठामाझारीं । परी मनासी चैन नसे अणुभरी । कवणही कार्य करिती वरिवरी । कर्तव्य म्हणोनि आपुलें ॥१५॥
रात्रंदिन एकचि चिंता । काय करूं उपाय आतां । न घडे परमार्थ येथे राहतां । नाहीं शंका यामाजीं ॥१६॥
ऐसें म्हणोनि सद्गुरुनाथा । आळवीतसे काय करूं आतां । तूंचि स्फुरवीं माझिया चित्ता । कवणही उपाय करुणाळा ॥१७॥
जरी आणिक जाऊं येथुनी । तरी जनासि दुःख होय मनीं । जनांचे मन दुखविणें याहुनी । नाहीं हिंसा अन्य ती ॥१८॥
पहा कैसी साधूची वृत्ति । जनांचें मन कधीं ना दुखविती । तीचि मोठी हिंसा समजती । काय कोमल हृदय पहा ॥१९॥
मानवांहातुनी अनेक हिंसा । घडती परी तें नकळे सहसा । आम्हां अज्ञांसि परियेसा । खचित खचित निर्धारें ॥२०॥
असत्य भाषण चहाडी चोरी । जनीं दिसती हे दुर्गुण भारी । हीच असे हिंसा खरी । यापरी ओळखा अन्यही ॥२१॥
ऐशी नानाप्रकारें । हिंसा होत आमुच्या करें । ती न दिसतां आम्ही त्वरें । शोधितों अन्याचें हिंसाकर्म ॥२२॥
म्हणतों तो चहाडखोर । हा असे महाचोर । यासी असे नरक घोर । पापी जन्मले धरणीवरी ॥२३॥
ऐसी करितों जनांची निंदा । यापरी घडे हिंसाचि सदा । आणिक बहुविध अन्यांसी बाधा । देतों आपण अज्ञानें ॥२४॥
आपुल्या कार्यास्तव जनांसी । देतों पीडा बहुवसी । नकळे अज्ञपणे आम्हांसी । हिंसा घडली ही म्हणोनि ॥२५॥
केवळ आपुल्या स्वार्थासाठीं । लागतों बहुपरी जनाच्या पाठीं । परी तें न दिसे आमुच्या दृष्टी । पाप घडलें म्हणूनियां ॥२६॥
एकावरी करितों प्रीति । दुज्यासी छळणें त्यासि ना मिति । हेंही एक पाप निश्चितीं । आणिक बोलूं तें ऐका ॥ २७ ॥
एकाचें करीतसे स्तवन । दुज्यासन्मुख रात्रंदिन । हेंही एक पाप हातून । सूक्ष्मरूप होय खरें ॥२८॥
कैसें तें पहा आतां । कीं हुरहुर लागे दुज्याच्या चित्ता । करीतसे परम चिंता । माझें हा न करी स्तवन कधीं ॥२९॥
मी इतुकें याचें करितों काम । परी मज म्हणेना हा उत्तम । ऐसें त्याच्या मनासी परम । होय दुःख अनिवार ॥३०॥
म्हणोनि ऐसीं बारीक सारीक । पापें घडती हातून अनेक । परी साधुपुरुष देख । न करिती ऐसीं पापें कधीं ॥३१॥
असो ऐसीं पापें सर्वही सांगतां । विस्तार होईल निश्चयें ग्रंथा । म्हणोनि सांगूं पुढती आतां । सद्गुरुकथा परिसा ती ॥३२॥
मग स्वामी विचार करिती । काय करूं गुरुराया म्हणती । आतां देईं तूंचि मति । न कळे मज कांहीं हो ॥३३॥
मज पाहिजे एकांतवास । येथें जनसमूह बहुवस । येती जाती रात्रंदिवस । पुण्यभावना धरोनियां ॥३४॥
त्यांसी नका येऊं म्हणतां । दुःख होय त्यांचिया चित्ता । आणिक येथ बहुविध चिंता । लागती मनासी अहर्निशीं ॥३५॥
म्हणोनि येथें नानापरी । परमार्थासी प्रतिकूल भारी । तेवींच मठाचीं बंधनें सारीं । नकोत मजला दयाघना ॥३६॥
जरी जाऊं सोडुनी येथून । दुःख करितील सकल जन । ऐसें त्यांचें दुखवोनि मन । जाणें हेंही उचित नव्हे ॥३७॥
म्हणोनि देवा आतां काय । करावा सांगें युक्त उपाय । करीं माझें मन निर्भय । तारीं तारीं निजदासा ॥३८॥
इतुकें बोलतां कंठ दाटला । घळघळ अश्रु वाहती डोळां । अधर कांपती ते वेळां । अनुताप झाला थोर पहा ॥३९॥
म्हणती देवा मजला आतां । सकल कार्या आश्रयदाता । तुजवांचोनि नसे सर्वथा । अन्य कवणही गुरुराया ॥४०॥
तूं माझ्या संनिध असतां । कैंचें भय मजला ताता । वृथाचि कासया करावी चिंता । भक्तभिमानी तूं अससी ॥४१॥
कवण्याही साधुपुरुषद्वारें । तूं भेट देईं मजला त्वरें । बोधामृताचे तुषार स्वकरें । उडवुनि तळमळ शांत करीं ॥४२॥
एकाग्र होऊनि चातक । पर्जन्यासी ध्यायी सम्यक । तैसा मी तुझा किंकर बालक । मार्गप्रतीक्षा करीत असें ॥४३॥
तूं अससी सर्वांठायीं । तुजहुनि ठावं रिता नाहीं । जगींचा साधु असो कवणही । तुझेंचि स्वरूप मानीन मी ॥४४॥
आतां भेटेल जो साधु । तोचि करील मजला बोधु । तुझाचि तो कृपाप्रसादु । ऐसें समजतों मी देवा ॥४५॥
म्हणोनि देवा सद्गुरुराया । धांवा झडकरी दर्शन द्याया । कोणाच्याही द्वारें तूंचि सदया । भेट देईं मजलागीं ॥४६॥
प्रल्हादानें बाहतां सत्वरी । काष्ठांत प्रगटलासी तूं हरी । तेव्हां सजीव ऐशा शरीरीं । प्रगटाया असाध्य काय तुला ॥४७॥
त्यांतही साधुपुरुष-शरीरीं । प्रगट व्हाया उशीर ना लवभरी । म्हणोनि प्रार्थितों भेट दे झडकरी । प्रभो दयाळा गुरुराया ॥४८॥
यावरी श्रोते करितील प्रश्न । कीं अन्य साधूंच्या ठायीं प्रगटोन । कासया द्यावें दर्शन । व्यापक असतां गुरुनाथ ॥४९॥
श्रीस्वामींच्या हृदयीं प्रगटुनी । कां न सांगावे विचार झणीं । तरी परिसा उत्तर ये क्षणीं । लक्ष देउनी प्रेमानें ॥५०॥
अन्या निमित्तमात्र करोनी । आपणचि विचार करिती स्वमनीं । जैसा असे प्रचार धरणीं । त्यापरी वर्तती ज्ञानी हो ॥५१॥
श्रीसद्गुरु हृदयांतरीं । प्रगटल्याविण आत्मविचारीं । नच होय गति निर्धारीं । कोण्याही साधकाची पहा हो ॥५२॥
जरी केलीं अनेक साधनें । गुरुकृपेवीण व्यर्थचि जिणें । ती झालिया काय उणें । भक्तालागीं पहा हो ॥५३॥
म्हणोनि गुरुभक्ति हेंचि साधन । मुख्य असे साधकांलागोन । अन्य साधनें सकलही जाण । तयापोटीं आलीं पहा ॥५४॥
व्रत नेम अनुष्ठान । तीर्थयात्रा संतर्पण । यज्ञयाग - जपतपादि साधन । न होय गुरुभक्तीसमान पहा तें ॥५५॥
वेदांतश्रवण केलें अपार । अथवा निदिध्यास करी निरंतर । ध्यानधारणादि योग सुंदर । करितांही न होय आत्मज्ञान ॥५६॥
एवं बहुविध केली खटपट । तरी ती सारी होय फलकट । गुरुभक्ति ही एकचि थेट । घेऊनि जाय निजरूपा ॥५७॥
म्हणोनि गुरुभक्ति मुख्य साधन । तेणेंचि गुरुकृपा होय पूर्ण । गुरुकृपा झालिया उशीर तो कवण । निजात्मज्ञाना पहा हो ॥५८॥
गुरुभक्तीचिया पोटीं । आलीं सर्व साधनें मोठीं । हें नलगे वेगळें सांगावें ओठीं । करोनि बघतां सहज कळे ॥५९॥
देह रक्षाया नाना उपचार । स्नान - वस्त्रादिक अपार । केले जरी अन्नावीण साचार । न जगे देह कदापिही ॥६०॥
अन्नचि मुख्य शरीरासी । म्हणोनि अन्नमय कोष म्हणती त्यासी । सकल प्राणी अन्नेंचि परियेसीं । बाढे जगे पहा हो ॥६१॥
ज्या ज्या प्राण्या जो जो आहार । त्यासी अन्न बोलिजे साचार । एवं अन्नावीण कवणही थोर । साधुपुरुषही वांचेना ॥६२॥
तैसें येथें नानापरी । साधन - अभ्यास केला जरी । गुरुभक्तीवीण अंतरीं । न होय आत्मज्ञान कदा ॥६३॥
म्हणोनि श्रीसद्गुरुलागीं । अनन्य भजतां निश्चयें वेगीं । आत्मज्ञान होय जगीं । सत्यचि जाणा संशय ना ॥६४॥
गुरुभक्ति दृढ होतांक्षणीं । कृपा सहज होय झणीं । त्यासी कष्ट अणुमात्र कोणीं । करावा नलगे निश्चयेंसीं ॥६५॥
गुरुकृपा ही सहजचि असे । परी ती भावनेच्या हातीं वसे । सद्गुरूच्याही हातीं नसे । कारण सकल जन समान त्यां ॥६६॥
पहा रज्जूवरी दिसे विखार । पाय पडतां कांपे थरथर । म्हणे मज डसला भयंकर । ऐसें समजे वृथाचि ॥६७॥
विदित असे ज्या रज्जु म्हणोनि । तो म्हणे पहा दिवा घेउनी । साप नव्हे तो रज्जु धरणीं । पडला असे निश्चयेंसीं ॥६८॥
परी हा न धरी विश्वास । ढुंकूनही न बघे त्यास । तेव्हां भय वाढे बहुवस । सापचि डसला म्हणोनियां ॥६९॥
त्यासी काय करावें तेणें । चूक कवणाची सांगा त्वरेनें । याचीच ऐसें म्हणतां निश्चयानें । दोष न होय सर्वथा ॥७०॥
तद्वत् येथें सद्गुरुराज । ज्ञानदिवा हातीं घेउनी सहज । उभे असती भक्तकाज । कराया तिष्ठत न प्रेमानें ॥७१॥
परी आम्हीं त्यांच्या वचनीं । विश्वास न धरितां आपुल्या मनीं । नाना कुतर्क उठवितों झटकुनी । तेवींच देहभान वाढे पैं ॥७२॥
म्हणोनि आम्हीं सद्गुरुनाथा । दोष न द्यावा अणुमात्र सर्वथा । त्यांच्या वचनीं विश्वास धरितां । पार पडे निश्चयेंसीं ॥७३॥
गुरुकृपेंचि होय ज्ञान । श्रवण जरी करी अन्याकडून । तरी सद्गुरु आपुला जो असे कृपाधन । तोचि हृदयीं प्रगटे हो ॥७४॥
तेणेंचि होय आत्मज्ञान । परी करावें श्रवण मनन । श्रुति - युक्ति - अनुभव प्रमाण । ज्ञानासी लागे हें पाहीं ॥७५॥
म्हणोनि आनंदाश्रम स्वामीराय । शोधिती कवणही साधूचे पाय । युक्ति सांगावया आपुली गुरुमाय । गुप्त असे म्हणोनियां ॥७६॥
पहा कैसी स्वामींप्रति । किती असे सद्गुरुभक्ति । म्हणोनि रात्रंदिन ध्याती । सद्गुरुचरण दृढतर ते ॥७७॥
असो मग श्रीस्वामी सतत । गुरुमातेचें ध्यान करीत । राहिले भार घालुनी स्वस्थ । सद्गुरूवरी त्या समयीं ॥७८॥
कांहीं दिन गेलियावरी । स्वामी गेले गोकर्णामाझारीं । परिवारासहित पोंचली स्वारी । सकल जन आनंदले ॥७९॥
तेथें कांहीं दिन केला वास । त्या ठायीं एक सत्पुरुष । कृष्णाचार्यस्वामी नामें परमहंस । भेटले अवचित तयांसी ॥८०॥
ते हृषीकेशींचे रहिवासी । जीवन्मुक्त ऐसे संन्यासी । त्यांस बघतां श्रीस्वामींसी । आनंद जाहला अनिवार ॥८१॥
कंठ होय सद्गदित । प्रेमाश्रु नयनीं वाहात । परी नच दाविती जनांप्रत । आवरुनी धरिती हृदयीं हो ॥८२॥
असो त्यांसी बघतांक्षणीं । हे साधु ऐसें कळलें मनीं । मुंगीसी साखरेची गोडी कोणीं । सांगावी नलगे सहज कळे ॥८३॥
जेथें असे शर्करा उत्तम । तेथें मुंगी जाय हा नेम । कळे का तिजला शर्करा नाम । कैसी पारख होय तिज ॥८४॥
तैसे जे खरे साधक । त्यांसी साधूंची लागे पारख । कोणीं सांगावें नलगे देख । आम्हां अज्ञ जनांपरी ॥८५॥
त्यांत आमुचे स्वामिराय । साक्षात् भगवान् अवतार होय । कळे त्यांसी सर्वांचें हृदय । सांगावें नलगे कुणींही त्यां ॥८६॥
असो मग सद्गुरुनाथें । काय केलें ऐका झणीं तें । प्रेमपुरःसर सावध चित्तें । तुम्ही प्रेमळ श्रोते हो ॥८७॥
श्रीस्वामी सद्गुरुनाथ । आणि कृष्णाचार्य प्रख्यात । संभाषण होतां दोघांचें तेथ । एकमेकां प्रेम उपजलें ॥८८॥
परी ते गेले आपुल्या ग्रामांत । हृषीकेशक्षेत्रीं त्वरित । इकडे स्वामी सद्गुरुनाथ । आले चित्रापुर - ग्रामीं पैं ॥८९॥
परी धरिले निजमानसीं । कृष्णाचार्यांकडे जातां मजसी । परमार्थलाभ निश्वयेंसीं । घडेल खचित संशय ना ॥९०॥
ऐसा करोनि विचार स्वमनीं । हृषीकेशीं जावोनि झणीं । परमार्थश्रवण त्यांच्याकडुनी । करावें ऐसें चिंतिती ॥९१॥
आमुचे सद्गुरु पांडुरंगाश्रम । हेचि ते मज भेटले गुणग्राम । तेचि सांगतील बोध उत्तम । म्हणोनि जावें शीघ्रगतीं ॥९२॥
कांहीं दिन तेथेंचि राहुनी । समजुनी घ्यावें त्यांच्याकडोनी । तरी आतां सर्वांलागुनी । कळवावा विचार हेंचि बरें ॥९३॥
ऐसा विचार करोनि मानसीं । कळविला सारा हेतु जनांसी । तेव्हां अवश्य म्हणोनि ते समयेंसी । केली सिद्धता लोकांनीं ॥९४॥
मग अन्य ग्रामींचे कांहीं जन । आणि शिरालीचे मिळोन । निघाले स्वामीसंगतीं आपण । परम उत्साहें त्या क्षेत्रा ॥९५॥
जातां वाटेमाजीं बहुत । गांवोगांवीं वास करीत । चालले हुबळी - पुणें - मुंबईप्रत । दिल्ली आदि शहरींही ॥९६॥
तेवीं बहुविध पवित्र स्थानीं । राहुनी पुनीत केली धरणी । आनंद जाहला सकलांलागुनी । मूर्ति बघुनी प्रेमळ ती ॥९७॥
ज्या ज्या स्थळीं केला मुक्काम । त्या त्या स्थळीं प्रवचनें उत्तम । दिधलीं, तेव्हां सकलांचें प्रेम । वाढलें स्वामींच्या चरणीं हो ॥९८॥
अनेक भाषा असती अवगत । एका ग्रामीं असतां तेथ । महाराष्ट्रीयांनीं प्रार्थिलें बहुत । सांगावें प्रवचन म्हणोनियां ॥९९॥
कीं आम्हांसी मराठीवीण । अन्य भाषेचें नसे ज्ञान । मराठींत सांगावें प्रवचन । म्हणोनि चरण वंदियले ॥१००॥
त्यावरी बोलती कृपाघन । आम्हांसि मराठी न कळे पूर्ण । तेव्हां म्हणती सर्व जन । न करणें अनुमान तुम्हीं हो ॥१०१॥
कैसें जरी बोलिलां आपण । आनंदचि आम्हां होय पूर्ण । आपुल्या मुखींचें करावें श्रवण । इतुकीच इच्छा आमुची हो ॥१०२॥
ऐसें ऐकतां अवश्य म्हणोनि । प्रवर्तले ते मराठी प्रवचनीं । बोलिले अस्खलित वाचेकरोनि । मराठी भाषा उत्तम ॥१०३॥
ऐकतां जन झाले तटस्थ । प्रेम उचंबळे हृदयांत । पूर्ण झालियावरी बोलत । आपापसांमाजीं ते जन ॥१०४॥
मराठी न येतां बोलिले उत्तम । विषय समजला आम्हां सुगम । म्हणती धन्य धन्य परम । प्रेमळ मूर्ति ही पाहीं ॥१०५॥
ऐसें बोलुनी एकमेकांप्रति । धन्यवाद स्वामींसी देती । आनंद जाहला मनासि अति । काय सांगूं हो आतां ॥१०६॥
त्यांसी काय असे उणीवता । शिकावें नलगे नवीन आतां । सकल विद्या येती हाता । न लागतां क्षण संशय ना ॥१०७॥
ऐशापरी जेथें तेथें राहुनी । गेले हृषीकेशक्षेत्र - स्थानीं । कांहीं दिवस मुक्काम करोनि । घालविला काल परमार्थीं ॥१०८॥
कृष्णाचार्य - स्वामींजवळी । श्रीमत् शंकराचार्यांचीं सगळीं । ब्रह्मसूत्रादि भाष्यें ते वेळीं । श्रवण केलीं प्रेमानें ॥१०९॥
ऐसा कांहीं दिवस तेथ । काल क्रमिला परमार्थांत । कार्य सिद्ध जाहलें समस्त । उशीर न लागला तयांसी ॥११०॥
आधींच शेत नांगरुनी सर्व । बीज पेरिलें उत्तम भरीव । पाऊस पडतांक्षणीं सदैव । उगवे तृण सुंदर तें ॥१११॥
मग हंगामीं येती कणसें । त्यासी उशीर न लागतसे । श्रीसद्गुरुस्वामींसी तैसें । ज्ञान - विज्ञानही जाहलें ॥११२॥
आधींच चारी साधनें अंगीं । गुरूपदेश - बीज पडलें वेगीं । श्रवणरूप पर्जन्यालागीं । पहात होते वाट ते ॥११३॥
तेव्हां गुरुमहाराज बोलले । कृष्णाचार्यरूपें भेटले । श्रीस्वामींच्या हृदयीं ते वेळे । घातला पर्जन्य कर्णद्वारें ॥११४॥
तेव्हां 'मी ब्रह्म' ऐसें स्फुरण । हेंचि शेत उगवलें भरून । हिरखें गार जाहलें पूर्ण । आनंदाच्या अंकुरांनीं ॥११५॥
वारंवार आनंदाच्या । उकळ्या येती अंतरीं साच्या । म्हणोनि मुखावरी त्यांच्या । तेज अपार विलसतसे तें ॥११६॥
असो ऐसें असतां पाहीं । त्या ग्रामीं एकदां कांहीं । उत्सवनिमित्तें स्वामींस सर्वांहीं । पाचारिलें होतें पैं ॥११७॥
तेथें बहुत संन्यासी यांना । बोलाविलें अनेक जनांना । ते स्थळीं आमुचा सद्गुरुराणा । बैसला एकीकडे जाऊनियां ॥११८॥
तेव्हां तेथील मुख्य गृहस्थ । आला स्वामींजवळी तेथ । मुखकांति पाहतां विस्मित । झाला चित्तीं अनिवार ॥११९॥
हे न होत सामान्य पुरुष । ही जागा नव्हे योग्य यांस । ऐसें समजुनी सावकाश । आला जवळी स्वामींच्या ॥१२०॥
आणि बोले कर जोडोनि । यावें येथें कृपा करोनि । ऐसें म्हणोनि गेला घेऊनि । उच्च स्थानीं बैसविलें ॥१२१॥
पहा कैसी असे मूर्ति । सहजचि विलसे मुखावरी कांति । परिचय नसतां अणुमात्र चित्तीं । कैसें प्रेम त्या उद्भवलें ॥१२२॥
तेवींच दिधलें उच्चस्थान । कळलें कैसें त्यालागून । कीं हे स्वामी श्रेष्ठ म्हणोन । वदनचि सांगे त्यांचें पैं ॥१२३॥
ऐशी आमुची गुरुमाउली । कवणही बघतांचि येई जवळी । महिमा अपार असे त्या स्थळीं । पुढील अध्यायीं सांगूं ती ॥१२४॥
ऐशापरी तेथ कांहीं दिवस । राहुनी स्वामी परमहंस । आले वेगें आपुल्या ग्रामास । चित्रापुर - मठातें ॥१२५॥
परी तें ब्रह्मसूत्रभाष्य पूर्ण । ऐकावें दृढ व्हावया कारण । म्हणोनि येथे केलें पाचारण । कृष्णाचार्यस्वामींसी ॥१२६॥
येतांचि कांहीं दिन श्रवण । केलें बहुत प्रेमेंकरोन । संशय सारे होउनी निरसन । ब्रह्मज्ञान दृढ होत ॥१२७॥
‘मी ब्रह्म' ऐसें अनुसंधान । धरिलें अणुमात्र न होय खंडण । सहजासहज आनंदपूर्ण । भोगी निजात्मरूपाचा ॥१२८॥
वास्तविक विचार करितां । भोगणेंचि नाहीं चित्ता । भोग्य भोक्ता - भोगणें तत्त्वतां । त्रिपुटी तेथें न उरे पैं ॥१२९॥
ब्रह्मानंद भोगितो म्हणाया । भोक्ताचि नुरे तया ठाया । भोक्ता म्हणतां वेगळा होऊनियां । पहावें लागे ब्रह्माहुनी ॥१३०॥
म्हणोनि येथें 'मी ब्रह्म' ऐसा । भाव मुळीं न साहे सहसा । कवणही भाव न धरितां आपैसा । सहजानंदचि त्या ठायीं ॥१३१॥
एवं सद्गुरु 'आनंदाश्रम' । ऐसें शोभे त्यांसी नाम । नामापरीच राहती परम । आनंदामाजींच सर्वदा ॥१३२॥
हें बघुनी कृष्णाचार्य - स्वामी । विस्मित होती अंतर्यामीं । ऐसी मूर्ति देखिली ना मीं । कवणे ठायीं म्हणती ते ॥१३३॥
ऐसे स्वामींचे शांत सद्गुण । आणि एकाग्र करितां श्रवण । लगेच चित्तीं होय ग्रहण । ब्रह्मज्ञान ते समयीं ॥१३४॥
असो आतां पुढील अध्यायीं । आणीक लीला दावील गुरुमाई । आतां ऐकिलें तितुकें हृदयीं । धरूं आपण प्रेमानें ॥१३५॥
श्रीस्वामी - आनंदाश्रम । शिवानंदतीर्थस्वामी उत्तम । यांच्या कृपाप्रसादें पंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१३६॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां ब्रह्मनिष्ठ होय साचार । पंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१३७॥
अध्याय ॥५०॥
ओंव्या ॥१३७॥
ॐ तत्सत्- श्री सद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥५॥        
॥ इति पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP