मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥५२॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५२॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥
जय जय देवा श्रीगुरुराया । तुझी लीला अगाध सदया । मजसारिख्या अभक्ताकडूनियां । वदविलें चरित्र तूं पाहीं ॥१॥
अणुमात्र कां होईना वर्णन । वदविले सर्व आश्रमांचे सद्गुण । नसतां माझिया अंगीं ज्ञान । पार घातलें तूंचि बा ॥२॥
ऐसी तूं आमुची माउली । अज्ञ जनांसी आम्हां पावली । तुझी कृपारूप सावुली । पडे वरिवरी शीतल ती ॥३॥
जैसें पार घातलें येथवरी । तैसाच ग्रंथ तूं पूर्ण करीं । अजुनी भय वाटे अंतरीं । कैसें पार पडेल हें ॥४॥
सकल कार्या तूंचि एक । विघ्नहर्ता गणनायक । तुजवांचोनि नाहीं आणिक । अन्य देवता दयाळा ॥५॥
असो आतां श्रोते हो सज्जन । आणिक ऐका स्वामींचे सद्गुण । अणुमात्रचि करूं वर्णन । गुरुकृपेंचि पहा हो ॥६॥
परम शांत हृदय त्यांचें । म्हणोनि शब्दही तैशिया मुखींचे । तेही शांतचि असती साचे । ऐकतां शांत मन होय ॥७॥
यावरी एक कथा सुंदर । सांगूं आतां सविस्तर । चित्त करावें एकाग्र । उत्सुक होउनी ये समयीं ॥८॥
पहा आमुचे सद्गुरुनाथ । स्वामी आनंदाश्रम विख्यात । सुंदर प्रवचनें देती शांत । सकलांचें चित्त आकर्षिती ॥९॥
ऐसें असतां एकेकाळीं । शके अठराशें साठ ये वेळीं । बेंगळूर - ग्रामीं सद्गुरुमाउली । गेली होती प्रेमळ ती ॥१०॥
तेथील जनांनीं करितां आग्रह । संतुष्ट कराया भक्तसमूह । गेले प्रेमानें न धरितां संदेह । निजभक्त - प्रेम पाहूनियां ॥११॥
जेथें बोलाविती आपुले भक्त । तेथें अवश्य जाती निश्चित । देह झिजविती भक्तांस्तव अमित । नाहीं स्वार्थ त्यामाजीं ॥१२॥
प्रवचन देती अति उत्तम । ऐकतां जनांचें वाढे प्रेम । कां कीं वृत्ति त्यांची निष्काम । स्वार्थ अणुभरी ना तेथे ॥१३॥
केवळ जनांचे व्हावें कल्याण । इतुकीच इच्छा धरोनि आपण । देह झिजविती रात्रंदिन । नाहीं संशय यामाजीं ॥१४॥
असो मग बेंगळूर या शहरीं । प्रवचनें झालीं ते अवसरीं । बहुत जन नर - नारी । येती ऐकाया धांवूनियां ॥१५॥
अहा काय सांगूं तें प्रवचन । ऐकतां जनांचे आनंदलें मन । प्रेमाश्रु वाहती नयनांतून । काय वर्णूं तें दृश्य ॥१६॥
तेव्हां तेथे त्या गांवांत । दोवे बंधु होते निश्र्चित । उपमान त्यांचे असे 'तोंबत' । रामरावसुत ते पाहीं ॥१७॥
दोघेही मोठे अधिकारी असती । मठाचें नामही कधीं न घेती । स्वामींस पहावया येती । सहज एका मित्रासवें ॥१८॥
तये समयीं प्रवचनलाभ । जाहला भाग्यें त्यांसी सुलभ । ऐकतांचि फुटला कोंब । गुरुप्रेमाचा तत्काळ ॥१९॥
मागील अध्यायीं बोलिलें वचन । कीं अमृतवाणी स्वामींची म्हणोन । त्यापरी मुखींचे बोल ऐकून । प्रेम उपजलें त्यांसी हो ॥२०॥
असो मग त्या बंधुद्वयासी । बहुत अनुताप जाहला मानसीं । जातां या दोघेही आपल्या गृहासी । बोलती एकमेकांप्रति तेव्हां ॥२१॥
म्हणती काय प्रेमळ मूर्ति । बहुत छान प्रवचन सांगती । आजवरी नाहीं कळलें चित्तीं । इतुके शांत हे म्हणूनियां ॥२२॥
सहा वरुषांपासुनी आजवरी । मठासी वर्गणी दिधली ना खरी । अर्पण करूं आतां तरी । ऐसा विचार चालविला ॥२३॥
मग ते दोघे गेले निजाया । उठोनियां आपुल्या ठाया । परी मनासी चैन न त्यांचिया । अपराध केला म्हणोनि ॥२४॥
ऐसे ते बंधुद्वय तेव्हां । निजल्या ठायीं करिती धांवा । म्हणती प्रभो श्रीगुरुदेवा । अपराधी आम्ही बहुतचि ॥२५॥
आजवरी न कळली महिमा । म्हणोनि विसरलों तुझिया नामा । आतां करावी आम्हांसी क्षमा । श्रीगुरुनाथा कृपाघना ॥२६॥
तूं साक्षात् वैकुंठवासी । भक्तांकारणें अवतरलासी । परी आम्हां अज्ञ जनांसी । वाटे मनुष्यचि तूं एक ॥२७॥
स्वामी म्हणजे कवणाचिया एका । मुलासी आणुनी बसविती देखा । ऐसीच कल्पना आमुचि ऐका । होती देवा आजवरी ॥२८॥
आम्हां आणि तयांसी काय भेद । उगीच म्हणती श्रेष्ठ प्रसिद्ध । ऐसें वाटुनी देवा तव पद । नाहीं आठविलें अणुमात्र ॥२९॥
परी तूं आम्हांसि ना विसरला । म्हणुनी भेटलासी आम्हांला । प्रवचन सांगुनी आढिलें बाळां । व्यर्थचि मरती म्हणोनियां ॥३०॥
बालक विसरतां निजमातेला । दावुनी त्यासी नाना खेळा । वळवी त्याचिया चित्ताला । आपुल्याकडे ती माय ॥३१॥
ऐसें करोनि करी रक्षण । निजबाळाचें माय ती जाण । तैसा तूं सद्गुरु दयाघन । सांभाळिसी अज्ञातें ॥३२॥
प्रवचनरूपें लीला दावुनी । आमुचें मन घेतलें आकर्षुनी । उपकार तुझे कैसेनी । विसरावे सांगें गुरुराया ॥३३॥
निजपुत्राचे अपराध पोटीं । घालुनी माय रक्षी संकटीं । तैसी तूं आम्हां मूर्ति गोमटी । धांवलीस रक्षाया निर्धारें ॥३४॥
स्वधर्माची सोडुनी सुलभ वाट । धरिली अधर्माची ती बिकट । तेंचि ओढवले परम संकट । परी तूं धांवलासी तत्काळ ॥३५॥
ऐसी तूं आमुची सद्गुरुमाई । तव उपकारां सीमा नाहीं । कैसे होऊं तुझे उतराई । श्रीगुरुराया करुणाळा ॥३६॥
ऐसी करुणा भाकिली अपार । अश्रु नयनीं आले फार । चिंतीत असतां निद्रा अनिवार । लागली त्या दोघांसी ॥३७॥
दुसर्‍या दिवशीं उठतांक्षणीं । बंधुद्वय तोंबत हे झणीं । सहा वरुषांची द्यावया वर्गणी । लागले तयारीस तेधवां ॥३८॥    
मग होतां प्रवचन - समय । जावया निघाले बंधुद्वय । घेउनी बाराशें रुपये । स्वामीसंनिधीं आले ते ॥३९॥
येऊनियां ऐसे प्रेमें तेथ । विनविती आपुल्या मित्राप्रत । गुरुदत्ता तुजवरी सोंपवीत । आमुचें कार्य करावें तूं ॥४०॥
तेव्हां गुरुदत्तराव बोले । अवश्य करूं सांगा ये वेळे । ऐसें बोलतां ते लडिवाळें । लागती कानीं त्याच्या पैं ॥४१॥
देउनी हातीं धनाची थैली । म्हणती ही अर्पा गुरुपदकमळीं । आणि विनंति आमुची त्या स्थळीं । सांगा सकल जनांसमक्ष ॥४२॥
ऐसें ऐकतां न लागतां क्षण । गुरुदत्तराव श्रीसंनिधीं जावोन । बंधुद्वयांनी सांगितलें जें वचन । तेंचि बोले सभेमाजीं ॥४३॥
म्हणे स्वामिन् सद्गुरुराय । हे तोंबत बंधुद्वय । तोंबत रामराव यांचे तनय । करिती विनंति पदकमळीं ॥४४॥
धैर्य न त्यांसी बोलावया । म्हणोनि सांगविती मजकडुनियां । तेंचि बोलतों आतां सदया । त्यांची विनंति संनिधीशीं ॥४५॥
म्हणती सद्गुरुस्वामी । इतुके काळपर्यंत आम्हीं । मठासी जें करावें नेहमीं । तें कर्तव्यकर्म ना केलें ॥४६॥
आमुचें ऐसें बघोनि वर्तन । अन्यांसीही वर्ताया कारण । आम्ही झालों निश्चयें जाण । याहुनी अपराध ना थोर ॥४७॥
ऐसा अपराध बोलावा उघड । सभेमाजीं सोडुनी भीड । ऐसी इच्छा असे दृढ । काय कारण तें सांगूं ॥४८॥
आमुच्यापरीच अन्य जन । विसरले जरी गुरुपदा जाण । तयांसीही पश्चात्ताप होऊन । शरण जावोत श्रीचरणां ॥४९॥
आणि तनुमनधनादिक । अर्पावयासी निश्चयात्मक । प्रवृत्त होवोत सकळिक । ऐसी इच्छा आमुची हो ॥५०॥
दयाळा आमुच्या सद्गुरुराया । अपराध झाला आमुचा म्हणोनियां । पश्चात्ताप होय आमुच्या हृदया । अतितर देवा हो पाहीं ॥५१॥
तरी आतां सद्गुरुनाथा । सहा वरुषांची वर्गणी ताता । धन आपुल्या चरणीं आतां । अर्पितों जाणा करुणाळा ॥५२॥
हे प्रभो सद्गुरुराया । आमुचा अपराध क्षमा करोनियां । कृपा करावी बालकावरी या । अल्प सेवा स्वीकारावी ॥५३॥
आणि आम्हां अज्ञ बालकां । द्यावा आशीर्वाद देखा । रक्षण करावें म्हणोनि पादुकां । करितों प्रार्थना गुरुवर्या ॥५४॥
ऐशी प्रार्थना सद्गुरुसंनिधीं । निवेदिली गुरुदत्तरावानें आधीं । मग धनाची थैली गुरुपदीं । अर्पिली तोंबत बंधूची ॥५५॥
तेव्हां ऐकुनी त्यांची प्रार्थना । स्मितमुखें बोलती सद्गुरु जाणा । कृपादृष्टीनें बघुनी त्यांना । म्हणती तोंबत - बंधूसी ॥५६॥
तुम्हीं अपराध केला म्हणोनि । विदितचि नाहीं आम्हांलागुनी । तुमचे वडील विश्वास ठेवूनि । होते मठावरी ऐकियलें ॥५७॥
असो आतां तुम्हीं तुमचें । कर्तव्यकर्म समजुनी साचें । स्वधर्में वर्तावें ऐसें वडिलांचें । मनें घेतलें पूर्वपुण्यें ॥५८॥
ओढिलें मनासी न लागतां क्षण । हें बघोनि आम्हां निश्चयेंकरोन । मनीं संतोष जाहला पूर्ण । बंधुद्वयांनो पहा हो ॥५९॥
भवानीशंकर आतां तुमचें । कल्याण करील जाणा साचें । ऐसा आशीर्वाद दिधला वाचे । परम प्रीतीनें त्या समयीं ॥६०॥
असो ऐसे हे बंधुद्वय । अद्यापिही सद्गुरुपाय । ध्याती सदा धरुनी निश्चय । धन्य जिणें त्यांचें पैं ॥६१॥
त्या बंधूमाजीं एक । केशवराव नामें प्रमुख । त्यासी ओळखती सकळिक । बहुतकरोनि देशांत ॥६२॥
सद्गुरुस्वामी यांच्या संगें । येउनी कधीं कधीं व्याख्यान सांगे । स्थिरता - फंड व्हावा वेगें । ऐसा हेतु धरोनियां ॥६३॥
पहा कैसी स्वामींची शांति । प्रगटली येउनी यांच्या चित्तीं । तेवींच धरिली सद्गुरुमूर्ति । बंधुद्वयांनी हृदयीं हो ॥६४॥
असो एवं सद्गुरुनाथ । यांचें मन बहुत शांत । म्हणोनि त्यांचे प्रवचनही सतत । शांतचि होय निधीरें ॥६५॥
तैशा त्या शांततेचे गुण । जनांनीं ऐकतां प्रवचन । येती त्यांच्या मानसीं धांवून । तत्काळ जाणा प्रेमभरें ॥६६॥
जेव्हां शांतता येई अंगीं । तेव्हां परमार्थीं मन जाय वेगीं । मग कासया जन परमार्थहीन जगीं । ऐसा प्रश्न उद्भवेल ॥६७॥
तरी त्यांचे ऐका उत्तर । सत्त्वगुणासह शांतता थोर । करील ज्याच्या अंगीं संचार । तोचि वळेल परमार्थीं ॥६८॥
जगीं कित्येक असती नर । प्रपंचीं शांत दिसती फार । परी त्यांत मिश्र असे रजोगुण चोर । न दिसे अन्य॥६९॥
यापरी कथिलें मागील अध्यायीं । आणिक सांगावें नलगे कांहीं । एवं शुद्ध - सात्त्विक शांतता पाहीं । तीचि नेई परमार ७०॥
श्रीसद्गुरूंचे ऐकतां प्रवचन । सात्त्विक शांतता ये धांवोन । यावरी आणिक कराल प्रश्न । तुम्ही श्रोते जन सारे ॥७१॥
कीं सद्गुरुस्वामींचें प्रवचन । ऐकती जगीं अनेक जन । सकलांचेही पूर्ण मन । कां न लागे परमार्थीं ॥७२॥
तरी परिसा त्याचें उत्तर । दृष्टांतासहित देऊं सत्वर । सकलही आपुलें चित्त एकाग्र । करोनि सावध बैसावें ॥७३॥
जेथें असे ओली भिंत । त्यावरी दगड मारितां वैसत । तीच कोरडी असतां तेथ । न बैसे दगड निश्चयेंसीं ॥७४॥
तैसें ज्याचें मन कोमळ । त्यासी प्रवचनाचे मिळे फळ । लागे मनासी तळमळ । परमार्थ केव्हां पावेन मी ॥७५॥
तेव्हां सहजचि होय अनुताप । अनुतापें जाय सकल पाप । मग सत्त्वगुण आपोआप । येत अंगीं तत्काळ ॥७६॥
ज्याचें हृदय असे कठिण । तेणें ऐकिलें जरी प्रवचन । तरी न जाय परमार्थीं मन । कधींकाळीं निश्चयें हो ॥७७॥
एवं सद्गुरुस्वामीराय । सात्त्विक शांत म्हणोनि हृदय । प्रवचनही तैसेंच होय । शांतरूपचि सहजेंसीं ॥७८॥
ती शांतता जनांच्या हृदयीं । कर्णद्वारें जाय सर्वही । कैसी ती जनांच्या अंतरीं येई । तेंचि सांगूं गुरुकृपें ॥७९॥
उदकावरोनि येतां वारा । त्यांतील शीतलता घेऊनि ये त्वरा । तेणें उष्मा जाऊनि सारा । सुख होय जनांसी ॥८०॥
जरी आला वारा शीतल । तरी कपाटें बंद करोनि सकळ । बैसतां न थांबे त्याची तळमळ । उकाड्यापासूनि कदापिही ॥८१॥
तैसें येथे सद्गुरु प्रसिद्ध । त्यांच्या मुखें निघती जे शब्द । ते शांतता घेऊनि शुद्ध । येऊनि पसरती चोहींकडे ॥८२॥
परी ज्याचें असे हृदय उघड । पापरूप मोडलें कवाड । तेथेंच जाय धांवूनि दुडदुड । शांतता स्वामींची निश्चयेंसीं ॥८३॥
तेव्हां त्याचें मनही शांत । होउनी घुसे परमार्थांत । त्यावीण न जाय आपुलें चित्त । परमार्थीं तें कदापिही ॥८४॥
याचिकारणें ऐकावीं प्रवचनें । तेवींच सांगती जें स्वामी प्रेमानें । जनांचें कल्याण व्हावें या योगानें । त्यावीण अन्य हेतु नसे ॥८५॥
एवं सद्गुरुस्वामीराय । जगाचें कल्याण करिती सदय । अन्य हेतु नाहीं हा निश्चय । इतुके कष्ट सोसावया ॥८६॥
साक्षात् वैकुंठवासी राम । अवतरे भक्तांचे पुरवाया काम । आणि दूर कराया भवभ्रम । अज्ञ जनांचा हो जाणा ॥८७॥
जो भजे कामना धरुनी । न त्याची कामना पुरविती झणीं । यावरी कथा असती बहुत जनीं । नाहीं कथिल्या त्या येथें ॥८८॥
सकल कथाया गेलों जरी । तरी ग्रंथ वाढेल भारी । एवं साक्षात् वैकुंठवासी श्रीहरी । नाहीं संशय यामाजीं ॥८९॥
तेवींच जाणती आमुचें हृदय । याचा अनुभवेंचि होय निश्चय । तें सांगूं आतां कैसें काय । परिसा सावध चित्तानें ॥९०॥
एके काळीं सद्गुरुस्वामी । आले आमुच्या धारवाडग्रामीं । प्रवचन दिधलें तेव्हां तें मी । ऐकाया गेलों ते समयीं ॥९१॥
जेव्हां येऊनि बैसले सभेंत । श्रीस्वामी सद्गुरुनाथ । कांहीं वेळ राहिले स्वस्थ । शांत चित्तें तेधवां ॥९२॥
तेव्हां एक कल्पना मजला । आली काय ती सांगूं ये वेळां । सद्गुरुमूर्ति पाहुनी डोळां । वाटला आनंद मम हृदयीं ॥९३॥
आणि वाटलें यांचे प्रवचन । दोन-तीन वेळां ऐकिलें जाण । परी नाहीं केला श्रवण । वेदान्तविषय यांच्या मुखें ॥९४॥
हे कां न सांगती वेदान्तविषय । यांस सांगतां न ये कीं काय । अथवा वेदान्त न जाणती सर्व समुदाय । म्हणोनि न सांगती कीं न कळे ॥९५॥
स्वधर्माविषयीं देती सुंदर । सूक्ष्म विचारें प्रवचनें थोर । परी वेदान्ताचे शब्द चार । ऐकावे प्रेमळ स्वामींचे ॥९६॥
ऐसी कल्पना हृदयीं माझ्या । येतांक्षणीं श्रीगुरुराजा । तत्परचि असे सकलही काजा । न्यूनता अणुमात्र नाहीं तेथें ॥१७॥
जेव्हां आरंभिलें प्रवचन द्याया । वेदान्तविषयचि बोलिले ना त्या समया । ऐकतां आनंद जाहला माझिया । चित्तासि अनिवार हो जाणा ॥९८॥
पहा माझी कल्पना कैसी । कळूनि आली श्रीगुरुरायांसी । अंतर्ज्ञान असे तयांसी । साक्षात् अवतार विष्णूचा तो ॥९९॥
आणिक त्यांची महिमा विशेष । माझ्या अनुभवाची खास । सांगतों आतां मी तुम्हांस । प्रेमळचित्तें परिसा हो ॥१००॥
हा असे आश्रम नवम । श्रीसद्गुरु आनंदाश्रम । यांचें चरित्र लिहितां उत्तम । दाविली महिमा ती ऐका ॥१०१॥
एके दिनीं लिहितां ग्रंथ । विचार अणुमात्र न सुचे त्वरित । तेव्हां मनासी लागलें अत्यंत । कांहीं अपराध झाला कीं ॥१०२॥
तैं केली प्रार्थना स्वामींसी । तीचि येथें लिहिली ते दिवशीं । तेंचि पुनरपि बोलूं परियेसीं । सद्गुरुमहिमा पावन ती ॥१०३॥
तुझ्या कृपेवीण सर्वथा । न उठे स्फूर्ति लिहाया ग्रंथा । म्हणोनि देवा येईं आतां । धांवोनि वेगें मम हृदयीं ॥१०४॥
ऐसें लिहितांक्षणीं एक । चमत्कार झाला निश्चयात्मक । घमघम सुवास आला सुरेख । काय सांगूं नवलाई ॥१०५॥
नसती सदनीं सुवासिक फुलें । अथवा पूजादि नाहीं ते वेळे । परिमळ द्रव्य नाहीं ठेविलें । नाहीं लाविल्या उदबत्त्या ॥१०६॥
आळीमाजीं कवण्याही ठायीं । सुवासिक पदार्थ अणुमात्र नाहीं । तेव्हां सद्गुरुमहिमाच ही पाहीं । नाहीं संशय यामाजीं ॥१०७॥
कीं देवा धांवुनी ये आतां । ऐसें म्हणतांचि आली गुरुमाता । सत्यचि हें दावाया तत्त्वतां । सुवास हीच खूण पहा ॥१०८॥
ऐसी बहुपरी अनेक वेळां । महिमा दाविली या निज डोळां । सर्वही विस्तार सांगाया मजला । नाहीं शक्ति ये समयीं ॥१०९॥
असो ऐसी सद्गुरुमाउली । आठवावी पावलोपावलीं । तरीच स्वरूपीं वृत्ति आपुली । स्थिर होईल क्षणमात्रें ॥११०॥
परमहंस आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ एकरूप ब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें द्विपंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविल॥१११॥
स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पायें नासती थोर । द्विपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥११२॥
अध्याय ॥५२॥
ओंव्या ॥११२॥
ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    
॥ इति द्विपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP