मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥३२॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३२॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥३२॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगा श्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय सद्गुरो करुणाकरा । भक्तवत्सला परम उदारा । देईं सुमति मज पामरा । कृपा करोनि आतां पैं ॥१॥ जरी माझी मंदमति । तुजला स्मरतां शीघ्रगति । होय बुद्धि तीव्र बा ती । नाहीं शंका यामाजीं ॥२॥ परी असावी दृढतर भक्ति । तेणें मानसीं येई मूर्ति । मूर्ति धरितां निष्काम चित्तीं । पार पावे सहजचि ॥३॥ म्हणोनि देवा मजला आतां । भक्ति देई तूं बा ताता । कवणही न देईल सर्वथा । तुजवीण, म्हणोनि शरण मी ॥४॥ असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं कथा निरूपण । पांडुरंगाश्रम सद्गुरु दयाघन । यांच्या इच्छेपरी होत कार्य ॥५॥ आतां आणिक सांगूं सद्गुण । अगाध महिमा त्यांचा पूर्ण । ऐसी सद्गुरुमाय सगुण । ध्यावी निरंतर हृदयांत ॥६॥ तरीच आम्हां मानवांसी । इहपरलोकीं सुख परियेसीं । आणिक बोलूं सगुणराशी । सावध असावें श्रोते हो ॥७॥ परम ज्ञानी निर्भयवृत्ति । विचारपूर्वक कार्य करिती । जनांसी वरिवरी धर्मजागृति । देती प्रेमानें उल्हासें ॥८॥ धर्माविरुद्ध जनांचें वर्तन । होऊं नेदिती कदापि जाण । विरुद्ध वागतां तयांलागून । शासन करिती तात्काळ ॥९॥ पंचगव्य प्रायश्चित्त । देऊनि त्यांसी शुद्ध करीत । नाहीं कदापि भीड त्यांप्रत । कवणाचीही हो पाहीं ॥१०॥ मातेसी कवणाची असे भीड । मुलांसी मारुनी मोडिते खोड । म्हणे माजलास तूं द्वाड । यापरी बोले क्रोधानें ॥११॥ तैसे सद्गुरुमहाराज । आपुल्या भक्तांसी सांगती रोज । कीं स्वधर्मापरी वर्तणें तुज । उचित असे सर्वदा ॥१२॥ एतद्विषयीं वारंवार । करिती बोध जनां सविस्तार । जरी न करी त्यापरी नर । त्यासी शासन करिती पैं ॥१३॥शासन म्हणिजे नव्हे शिक्षा । शास्त्रापरी हरिती दोषा । त्याकारणें मठासी पैसा । दंड म्हणोनि न द्यावा तो ॥१४॥ श्रीस्वामींसी त्या पैशाचा। कवडीचाही लाभ नसे साचा । जनांच्या कल्याणास्तव त्याचा । खर्च होय निर्धारें ॥१५॥ मठासी देतां पैसा आपण । काय होय जनांचे कल्याण । याचें सांगतों वर्णन । सविस्तर तें ऐकावें ॥१६॥ दंड द्यावा हें शासन । कां म्हणाल तरी ऐका वचन । सांगूं आतां गुरूंसी स्मरून । सावध असा श्रोते हो ॥१७॥ अधर्म अकर्म करितां नरासी । पाप घडे निश्र्चयेंसीं । तेव्हां करितां पुण्यराशी। जळे पाप सारें तें ॥१८॥ म्हणोनि मठासी देतां दंड । पुण्य अंगीं येईं उदंड । जरी तो झाला पापी मूढ । तरीही उद्धरे त्यायोगें ॥१९॥ असो सद्गुरुस्वामिराय । सकल जनांचें हितचि होय । ऐसेंचि करिती हा निश्चय । नाहीं स्वार्थ त्यांसी हो ॥२०॥ परी अज्ञपणे कांहीं जन । छळू लागतां त्यांसी जाण । सद्गुरुस्वामी क्षमाशील पूर्ण । न क्षोभती त्यांजवरी ॥२१॥ इंग्लंडादि परदेशीं जाती नर । त्यांसी शास्त्राधारें घालिती बहिष्कार जाण । प्रायश्चित्त त्यांलागूनि साचार । न मिळे जाणा कदापिही ॥२२॥ ऐशाविषयीं एकेकाळीं । महासभा बोलावुनी ते वेळीं । श्रीपांडुरंगाश्रम - स्वामींजवळी । मांडिला प्रश्न जनांनीं ॥२३॥ तेव्हां सद्गुरुस्वामींनीं आपण । युक्तिपूर्वक चातुर्यें जाण । उत्तर दिधलें त्यांलागून । शांत प्रेमळ मृदु वचनें ॥२४॥ त्यांनीं जनांसीच करोनि प्रश्न । त्यांच्याचि मुखांतुनी आपण । करविला निर्णय उत्कृष्ट जाण । ऐशी माउली चतुर बहु ॥२५॥ सकल जनां तो होऊनि मान्य । म्हणती स्वामींसी धन्य धन्य । इतुके चतुर नाहींत अन्य। ऐसें बोलती एकमेकां ॥२६॥ परी हा निर्णय कांहीं जनांला । मुळींच पहा नाहीं रुचला। विरुद्ध झाले ते स्वामींला । परी बोलण्यासी धैर्य नसे ॥२७॥ मागें करिती निंदा बहुत । स्वामींसी सारें होई विदित । परी न क्षोभती ते मनांत । अणुभरीही त्यांजवरी ॥२८॥ जरी पडली निंदा कानीं । खेद किंचितही न करिती मनीं । प्रार्थिती ते दिनरजनीं । भवानीशंकर - देवासी ॥२९॥ म्हणती प्रभो दयाघना । जरी केली निंदा नाना। तरी रक्षावें सकल जनां । क्षमा करोनि बा देवा ॥३०॥ बाळानें जरी केला अपराध । माता तयावरी न करी क्रोध । जरी झाला बहु मतिमंद । तरी नुपेक्षी ती निजपुत्रा ॥३१॥ तैसें देवा तुजला सर्व । मुलेंचि असती सकल जीव । अपराध पोटीं घालूनि धांव । रक्षावया तयांसी ॥३२॥ दुर्गुणी म्हणूनि जरी त्यागिसी । तरी काय करावें तैसियांसी । कोण रक्षण करील त्यांसी । सांग कृपाळा दयानिधे ॥३३॥ तूंचि देऊनि बुद्धि चांगली । धर्मजागृति करीं ये वेळीं । घेईं जनांसी प्रेमें जवळी । सांभाळीं आपुलीं हीं बाळें ॥३४॥ऐसी प्रार्थना करिती दिननिशीं । श्रीभवानीशंकरचरणांपाशीं । स्वामी आमुचे कळवळोनि मानसीं । आम्हां अज्ञान्यांकारणें ॥३५॥ जरी झाले अभक्त थोर । तरीही त्यांसी न करिती दूर । ऐसे आमुचे सद्गुरुवर । काय वर्णावे गुण त्यांचे ॥३६॥ ऐसियांचे धरितां चरण । सहजचि होती कष्ट निवारण । आणिक होय आत्मज्ञान । निश्चयें जाणा तुम्ही हो ॥३७॥ यावरी कांहीं कथा सुरस । सांगूं आतां गुरुकृपेंचि तुम्हांस । चित्त येथेंचि द्यावें खास । इतर विषय टाकोनि ॥३८॥ भटकळ या ग्रामीं एक । होता सारस्वत ब्राह्मण भाविक । त्याचें नाम मंगेश देख । 'बैंदुर' हें उपनांव ॥३९॥ महालकरी तो तेथील जाण । अंगीं असती बहुत सद्गुण । पांडुरंगाश्रमस्वामी दयाघन । यांसि भजे नित्य तो ॥४०॥ ऐसें असतां एके काळीं । आलें संकट त्याचिया कपाळीं । काय तें ऐका श्रोते ये वेळीं । सांगूं सारा वृत्तांत ॥४१॥ तेथे होते कांहीं यवन । त्यांसी मंगेशावरी द्वेष पूर्ण । म्हणोनि खोटा आरोप घालोन । चालविला खटला तयांनीं ॥४२॥ कीं सरकारी वृक्ष वाळले कांहीं । ते लिलांव करितां पाहीं । आपुल्या ज्ञातिजनांसी सर्वही । विकले कमी मोलानें ॥४३॥ म्हणोनि नुकसान बहुत । सरकारासी जाहलें खचित । ऐसें खोटेंचि कळवूनि त्याप्रत । खटला घातला त्यावरी ॥४४॥ डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यापाशीं । गेला खटला विचारासी । त्यानें विचार करोनि मानसीं । कारवारासी पाठविला ॥४५॥ आणि बैंदुर मंगेश यासी । तूं जा कारवार - ग्रामासी । ऐशी आज्ञा केली वेगेंसीं । मॅजिस्ट्रेट साहेबानें ॥४६॥ ऐकतां झालें दुःख परम । मुखीं घेत सद्गुरुनाम । धरोनि अंतरीं शुद्ध प्रेम । चालिला मंगेश शिरालीसी ॥४७॥ घेऊनि भेट श्रीस्वामींची । साष्टांग नमन केलें सवेंचि । इच्छा निवेदिली मनींची। प्रार्थना करोनि येणेंपरी ॥४८॥ म्हणे प्रभो श्रीपांडुरंगा । सद्गुरुराया तूं कृपांगा । कोण रक्षील मजला सांगा । तुजवांचोनि या समयीं ॥४९॥ प्रपंचीं परमार्थीं देख । तूंचि रक्षिसी सद्गुरु एक । तुजवीण नाहीं आणिक । या बाळासी कवणही ॥५०॥ तूं तारीं अथवा मारीं । न सोडीं हे चरण निर्धारीं । काय करशील तें करीं । भार घातला तुजवरी ॥५१॥ द्यावें मज अभय वचन । आशीर्वाद द्यावा जाण । तरीच मी जाईन येथोन । म्हणोनि घातलें दंडवत ॥५२॥ ऐशी प्रार्थना करोनि स्वामींसी । चरणांसंनिध तो परियेसीं । आडवा पडला न उठवे त्यासी । तेव्हां कळवळले गुरुराय ॥५३॥ येऊनि भवानीशंकरसंनिध । केली प्रार्थना बहुविध । मंगेशा म्हणती हो सावध । ऊठ वत्सा भिऊं नको ॥५४॥ श्रीभगवानीशंकर देव । तुजला रक्षील सदैव । ठेवीं तूं आपुला दृढभाव । नाहीं भय तुजलागीं ॥५५॥ तुझें करील तो कल्याण । न होऊं देईल अवमान । न धरी यांत अनुमान । सत्यवचन हें आमुचें ॥५६॥ नको करूं चिंता जाण । झडकरीं जा कारवारालागुन । ऐसें बोलुनी स्वयें आपण । उठविला तेव्हां प्रेमानें ॥५७॥ तैं उठला मंगेश सत्वरीं । अश्रु लोटले नयनामाझारीं । ओंठ कांपती थरथरां भारी । म्हणे देवा कनवाळू तूं ॥५८॥ आपुली आज्ञा शिरसा मान्य । तुजहुनी मजला देव नसे अन्य । ना तुझ्या दर्शनें झालों धन्य । काय उणें आतां मजलागीं ॥५९॥ ऐसें म्हणोनि धरिले चरण । श्रीस्वामींचे प्रेमेंकरोन । मनीं धरोनि सद्गुरुवचन । जावया निघाला कारवारा ॥६०॥ तेव्हां दिधला देवाचा प्रसाद । आणिक देती आशीर्वाद । तेणें होय अधिकचि आनंद । बैंदूर मंगेशरायासी ॥६१॥ मग करोनि साष्टांग नमन । गेला कारवारालागोन । आतां ऐका सावधान । तेथील वृत्तांत श्रोते हो ॥६२॥ कोर्टामाजीं न्यायाधीश । यांनीं खटला चालविला विशेष । पुसती वृत्तांत मंगेशास । तों काय वर्तलें तें ऐका ॥६३॥ फॉरेस्ट कन्सर्वेटर कर्नल पेटन । अवचित तेथें आला जाण । स्वामींच्या कृपेची ही खूण । पटली मंगेश यासी पैं ॥६४॥ ती कैसी हैं सांगतों आतां । पेटन जज्जाचा मित्र होता । तो त्या भेटाया बंगल्यासी जातां । दिसली गडवड कोर्टाजवळी ॥६५॥ जज्ज कोर्टांत असे बैसला । हें कळलें पेटन साहेबाला । भेटावयासी तो चालला । आला अंगणीं सहजचि ॥६६॥ तेथें फळ्या त्या आंब्याच्या । ज्या जप्त करूनि आणिल्या साच्या । त्या ह्या कर्नल साहेबाच्या । दृष्टीस पडल्या सहजचि तेव्हां ॥६७॥ अंगणामाजीं पडिलें लांकूड । आंब्याचें तें पाहिलें उघड । पायानें ढकलुनी तें जाड । आपुल्यांतचि बडबडला ॥६८॥ आंब्याचें हें लांकूड वाईट । उपयोगा में न ये दिसे स्पष्ट"। ऐसें बोलुनी गेला थेट । जज्जसाहेबाजवळी तो ॥६९॥ दोघांच्याही झाल्या भेटी । परस्पर प्रेमें बोलती । आला विषय सहजगती । मंगेशाच्या खटल्याचा ॥७०॥ न्यायाधीश म्हणे पेटनासी । लांकडाची परीक्षा असे तुम्हांसी । याची किंमत किती, ऐशी । पृच्छा केली तयानें ॥७१॥ यावरी बोले पेटनसाहेब । हें विकितां काय होय लाभ । निरुपयोगी हें लांकूड, सुलभ । मिळे निश्र्चयें केव्हांही ॥७२॥ ऐसें ऐकतां त्याचें उत्तर । न्यायाधीशाचें कळवळलें अंतर । म्हणे आम्हीं केला अविचार । मागें पुढें न बघतां ॥७३॥ आंब्याचें लांकूड असे स्वस्त । मंगेशाचा ना अपराध यांत । विकिलें असे ती योग्य किंमत । सोडूं आतां त्यालागीं ॥७४॥ ऐसें बोलुनी केला विचार । मंगेशासी सोडिलें सत्वर । सन्मानें पाठविला सुखकर । भटकळासी त्या समयीं ॥७५॥ पुनरपि तीचि नोकरी । महालकरी या जागेवरी । पाठविला प्रेमानें झडकरी । न्यायाधीशानें त्या समयीं ॥७६॥ तेव्हां मंगेश गेला ग्रामा । अंतरीं धरूनि सद्गुरुनामा । म्हणे देवा तुझिया प्रेमा । उपमा नाहीं कसलीही ॥७७॥ मग तो गेला चित्रापुरा थेट । घेतली श्रीस्वामींची भेट । अंतरीं उठली प्रेमाची लाट । घातलें दंडवत साष्टांगें ॥७८॥ आणि बोले सगुरो दयाळा । देवा तूंचि पावलासी ये वेळां । अगाध असे तुझी लीला । काय सांगूं नवलाई ॥७९॥ माझ्या कार्याकरितांचि पेटन - । साहेबासी पाठविलें तेथे आपण । योगायोग आणिला जुळवून । म्हणोनि येथे मी पोचलों ॥८०॥ ही तुझी कृपाचि होय । न्यायाधीशाचें कळवळले हृदय । महिमा तुझी अवर्णनीय । भक्तवत्सला गुरुराया ॥८१॥ आपुलें वाक्य न होय असत्य । साक्षात् दत्ताचा अवतार तूं सत्य । दाविसी जनांसी नित्य । अगाध लीला आपुली ही ॥८२॥ परी आम्हांसी नाहीं भक्ति । म्हणोनि मनुष्य भावितों तुजप्रति । अंधासी कैंची दिसेल ज्योति । तैसी तव मूर्ति अज्ञांसी ॥८३॥ असो आतां प्रभो दयाळा । दावीं चिन्मय स्वरूप डोळां । इतुकें बोलुनी चरणीं घातला । साष्टांग प्रणिपात तयानें ॥८४॥ यावरी बोले सद्गुरुराय । धरितां आपण दृढ निश्चय । रक्षण आपुलें सहजचि होय । नाहीं संशय यामाजीं ॥८५॥ निश्चयें होय सर्वही प्राप्त । सद्गुण सद्भक्ति येई त्वरित । तेणेंचि समाधान पावे चित्त । क्षण न लागतां बा पाहीं ॥८६॥ म्हणोनि देव सद्गुरु आणि सत् - शास्त्र । यांवरी विश्वाम ठेवावा निरंतर । भय नाहीं त्यासी अणुमात्र । सत्यवचन हें आमुचें ॥८७॥ प्रपंचीं आणि परमार्थीं । त्यासी रक्षी जगत्पति । प्रेमभाव धरावा चित्तीं । तरीच कार्य साधेल ॥८८॥ प्रेमावीण कोरडा निश्चय । काय उपयोग त्याचा होय । प्रेमचि श्रेष्ठ यांत संशय । नाहीं अणुभरी जाणा हो ॥८९॥ भक्ति - प्रेम हेंचि श्रेष्ठ । त्यावीण अनेक साधनें उत्कृष्ट । केली जरी नाना खटपट । तरी निष्फळ तें सारें ॥९०॥ बहुत दागिने अंगावरी । रूप सुंदर आणि गोरी । कपाळीं कुंकूं नसतां नारी । काय शोभा तियेची ॥९१॥ वरण आमटी खमंग रुचिकर । परी लवणावांचुनी निःसार । तैसें प्रेमावीण निष्फल समग्र । काय उपयोग तयाचा ॥९२॥ म्हणोनि निश्चय जरी धरिला । तरी भक्तिप्रेमावीण तो आंधळा । त्यावांचोनि होतो ढिला । वारंवार तो पाहीं ॥९३॥ भक्ति - प्रेमयुक्त जो निश्चय । तोचि सदा दृढतर होय । मग कैंचें त्यासी भय । सांग बापा तूं आतां ॥९४॥ आम्हीं काय केलें ये वेळां । तुझा निश्रयचि तुज फळला । निश्र्चयेंचि भवानीशंकर पावला । सत्य जाण मंगेशा ॥९५॥ ऐकुनी हें सद्गुरुवचन । संतोषला मंगेश जाण । धरोनि अंतरीं सद्गुरुचरण । गेला भटकळ - ग्रामासी ॥९६॥ अधिकचि वाढली त्याची भक्ति । कीं स्वामींची महिमा अगाध अति । ऐसा ध्यास धरिला चित्तीं । सदा आठवी गुरुनाथा ॥९७॥ पहा श्रोते हो सद्गुरुराज । वृत्ति त्यांची सहजासहज । नसे त्यांच्यांत अहंकार - बीज । 'मी कर्ता भोक्ता' म्हणोनियां ॥९८॥ करिती आपुल्या भक्तांचे कल्याण । परी 'मीं केलें' न म्हणे मन । साक्षात् दत्तावतार पूर्ण । निश्र्चयें जाण तो पाहीं ॥९९॥ पुढील अध्यायीं ऐसीच कथा । दर्शन दिधलें आपुल्या भक्तां । ऐका सावध करोनि चित्ता । तुम्ही भाविक श्रोते हो ॥१००॥ जरी नाहीं वक्त्यासी भक्ति । तरी आपण ऐकावें प्रीतीं । आपुल्या प्रेमानें मजला स्फूर्ति । देतील सद्गुरु वदण्या तें ॥१०१॥ म्हणुनी सरसावलों ग्रंथ कराया । जरी नसे निश्चय अंतरीं माझिया । तरी तुमच्या संगें करोनियां । मजही लाभ होईल ॥१०२॥ चातकासाठीं पडे पर्जन्य । त्याचा उपयोग घेती अन्य । तेसें तुमच्या निमित्तें होय मी धन्य । सद्गुरुकथामृत सेवोनियां ॥१०३॥ खचितचि मी सांगतों तुम्हां । नाहीं माझ्या अंगीं प्रेमा । मग कैसें सद्गुरुनामा । घेऊं सांगा तुम्हीच ॥१०४॥ नाम धरितां प्रेमें चित्तीं । प्रगटेल तेव्हां सद्गुरुमूर्ति । त्यावीण कैंची येईल स्फूर्ति । कथन कराया हो पाहीं ॥१०५॥ तुमच्या प्रेमें कां होईना । अणुमात्र वर्णन करवी जाणा । मजकडूनि श्रीसद्गुरुराणा । सत्य सत्य त्रिवाचा ॥१०६॥ ज्ञानदेवें बोलविले वेद । रेड्यामुखीं, हें असे प्रसिद्ध । परी त्या रेड्यासी काय ते शब्द । झाले का अवगत त्या समयीं ॥१०७॥ तो असे अज्ञ रेडा । ज्ञानदेवकृपें बोलिला भडभडां । परी तो त्यांतील अर्थ बापुडा । काय जाणूं शकेल हो ॥१०८॥ तैसे श्रीसद्गुरुराय । करविती ग्रंथ मजकडूनि सदय । परी त्यांतील अर्थ अन्वय । मजलागीं न कळे तो ॥१०९॥ असो आतां सद्गुरुनाथ । काय वदविती ते वदवोत । तुम्ही करोनि सावध चित्त । ऐका पुढील अध्यायीं ॥११०॥ आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें द्वात्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१११॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें नासती समग्र । द्वात्रिंशाध्याय रसाळ हा ॥११२॥ अध्याय ३२ ॥ ओंव्या ११२ ॥ ॐ तत्सत् - श्री सद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥६॥ ॥६॥॥ इति द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP