खंड २ - अध्याय ७३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । गृत्समद प्रल्हादा सांगत । नाना अवतार घेई एकदंत । त्याचे अनंत असे चरित । वर्णनातीत तें असे ॥१॥
वेदादीही समर्थ नसत । तेथ माझें काय बळ चालत । स्वल्पबुद्धि मी असत । परी भक्तिभावें कांही कथिलें ॥२॥
गणेश हा एकदंत । सोऽहं ब्रह्यांत संस्थित । देही जीवां ज्ञानदानांत । प्रभू तो सदा मग्न असे ॥३॥
एकदंत तो सर्वेश असत । पूर्ण योगधारक जगांत । अर्थांतभावें जाणावा चित्तांत । विबुधांनी तो देवा ॥४॥
माया एक वाच्या असत । दंत सत्ताधारक वर्तत । त्यांच्या योगे मायिक ख्यात । गजानन गणेश्वर ॥५॥
त्याचे महाभागा करी भजन । प्रल्हादा विधिपूर्वक चिंतन । नष्टशाप होऊन । एकदंताचा प्रसाद मिळवी ॥६॥
मुद्गल म्हणती दक्षाप्रत । प्रल्हाद गृत्समदा प्रार्थित । गणेशज्ञान जाणण्या उत्कंठित । वैष्णवांच तो शिरोमणी ॥७॥
विष्णुभक्त मी अत्यंत । जन्मापासून प्रख्यात । कोणत्या प्रकारें एकदंत । गणनायक मी भजावा ॥८॥
सर्वज्ञ तूं विशेष ख्यात । म्हणोनी विचारी तुजप्रत । गणेशाचें योगसाधन उदात्त । सांग सर्व मजला तूं ॥९॥
गुत्समद तेव्हां सांगत । गणेशाचे अवतार चार असत । गौण ते तुजप्रती वर्णित । संशय दूर करण्या तुझा ॥१०॥
गणेशान स्वानंदनगरांत । असे जो देव प्रतिष्ठित । स्वयं निर्मी जगतें अपरिमित । लीला करण्या गणनायक ॥११॥
त्या जगांत क्रीडा करित । नानाविध गणेश आनंदांत । ब्रह्मरुप जाण त्यास पुनीत । योगसेवेनें प्रल्हादा ॥१२॥
तो ब्रह्मांत चतुर्धा संजात । क्रीडार्थ पंचम निजलोकस्थित । संयोगधारक चतुर मोहवित । मायेनें तो गणेश्वर ॥१३॥
स्वस्वरुपें हृदयीं निवसत । गजानन देव सतत । नामरुपात्मकांत ब्रह्म जें असत । वेदांत तेंच सद्रुप ॥१४॥
शक्तिवाचक सद्गुरु असत । आत्मा अमृतरुप वर्तत । भानू सद्रुपात्मकांत ज्ञात । अभेदें आनंद विष्णुरुप ॥१५॥
तिन्हींत अव्यक्त स्वरुप असत । निर्मोह अकर्ता शिव पुनीत । तो तुर्य ऐसे वेदीं ख्यात । चारांचा संयोग स्वानंद ॥१६॥
तें ब्रह्म तो गणनाथ खेळत । नानाप्रकारें जगांत । ऐसे त्याचे असती कीर्तित । चार अवतार गौणरुप ॥१७॥
चतुर्भाव प्रसिद्ध करण्यास । गौण रुप घेई देवेश । आनंदात्मकलांशें ईश । विष्णु तो गणपरुपी ॥१८॥
त्यास गणेशाहून न भिन्न । दानवोत्तमा जाण तूं पावन । विष्णू तोच असे गजानन । रहस्य हें उमज चित्तीं ॥१९॥
चारांच्या भजनें मन होत । शुद्ध तैसें विनीत । तेणे गणेश योगांत होत । अधिकारी तो साधक ॥२०॥
जैसा चार आश्रमविभाग ख्यात । एक पूर्ण होता जात दुसर्यांत । मानव भक्तिसंयुत । अंतीं योगी शांतिपूर्ण ॥२१॥
तेव्हां तो आश्रमरहित । तैसाच क्रम या योगांत । वैष्णवादिक क्रमें जात । गणेशभक्त एकनिष्ठ ॥२२॥
आतां ऐक योगसाधन । जें करता योगीपद लाभून । स्वानंदाचा अनुभव येऊन । गणेशसायुज्य लाभतें ॥२३॥
स्वानंद तो विहारसंयुक्त । सर्व संयोगकारी गणेश मायायुत । विहारविहीन योगस्मृत । निर्मायिक जगांत ॥२४॥
संयोग अभेद हीनत्वें असत । भवहन्ता गणनायक ख्यात । संयोग अयोगें होत । पूर्ण योग तो गणेश ॥२५॥
प्रल्हादा गणनाथ पूर्ण ब्रह्ममय । योग्यांत योगें प्राप्त होय । संयोगायोग वर्जित अभय । पूर्णभावें जाण तूं ॥२६॥
त्याची माया द्विधा असत । सिद्धिबुद्धिरुपा ख्यात । बुद्धि पंचधा चित्तरुपांत । क्षिप्त मूढ विक्षिप्त ॥२७॥
एकाग्र निरोधक ऐसी पंचधा । चित्तवृत्ति जी मोहदा । ती गणपाची माया सुखदा । जाणावी तूं गणेशयोगीं ॥२८॥
क्षिप्त मूढ जें चित्त । कर्म विकर्मात स्थित । त्यायोगें विश्व चालत । आपापल्या स्वभावें ॥२९॥
अकर्मांत विक्षिप्त चित्त । त्याणें शुक्लगतीनें मोक्ष प्राप्त । एकाग्र चित्त अष्टधा वर्तत । निवसे एकात्म्यांत तेंच ॥३०॥
संप्रज्ञात तें समाधिस्थ चित्त । ऐसे जाण प्रल्हादा पुनीत । निरोधसंज्ञ चित्त होत । निवृत्तीचें रुपधारी ॥३१॥
असंप्राज्ञ योगस्या जाणावें । योगसेवेनें स्वभावें । पंचधा चित्तवृत्तीचें व्हावें । बुद्धिरुप परिज्ञात ॥३२॥
माया गणनाथाची सोडावी । योगसेवेनें त्यजावी । सिद्धि नानाविधा ओळखावी । भ्रांतिप्रदा प्रख्यात ॥३३॥
सिद्धिस्तव भ्रमयुक्त । लोक होती जगतांत । धर्मार्थकाममोक्षांची वर्तत । सिद्धिअ भिन्नस्वरुपा ॥३४॥
ब्रह्मभूतकरी सिद्धि त्यजावी । पंचधाती जगांत जाणावी । मोहदा ती उमजावी । बुद्धि सिद्धि आघवी ॥३५॥
त्या दोघांच्या साधनें खेळत । विघ्नराज तो जगात । बुद्धीनें जें नर जाणत । मागून मोह प्रवर्ततो ॥३६॥
म्हणून गणेशभक्तीनें व्हावें वर्जित । उभय मायापाशें संसारांत । पंचधा चित्तवृत्ति त्यजित । तैशीच पंचधा सिद्धि त्यजी ॥३७॥
त्यांचा त्याग करुन । गणेशयोगें भज गजानन । ऐसें सांगून देई प्रसन्न । गणराजाचा मंत्र त्यासी ॥३८॥
गणानां त्वा हा वेदोक्त । मुनिसत्तम मंत्र देत । विधिपूर्वक तें प्रल्हाद पूजित । महात्म्या त्या गृत्समदासी ॥३९॥
दक्षा गृत्समद नंतर जात । आकाशमार्ग स्वर्गांत । प्रल्हाद गणेशयोग साधित । योगींद्रवंद्य तो झाला ॥४०॥
शांतिधारक तो होत । विरोचना स्वपुत्रा राज्य देत । गणेशभजनीं योगीं संसक्त । सर्वदा झाला प्रल्हाद ॥४१॥
सगुण तें विष्णुरुप । निर्गुण तें ब्रह्मरुप । गणेशाचें सर्व स्वरुप । कलांशानें जग व्यापी ॥४२॥
हें रहस्य जाणून आश्रित । अभेदयोगी प्रल्हाद मनांत । चिंतामणीस जाणून अविरत । अनन्यभावें भजन करी ॥४३॥
स्वल्पकाळें दैत्येंद्र होत । शांतियोगपरायण जगांत । गणेशाशीं एकभाव लाभत । शांतियोगें अन्तीं तो ॥४४॥
प्रल्हादाचा शाप नष्ट । गणेशाच्या कृपेनें इष्ट । स्वसंगतीनें पुन्हा दुष्ट । भ्रांत न करिती प्रल्हादा ॥४५॥
ऐशापरी मद त्यागून । एकदंताचा आश्रय घेऊन । असुर प्रल्हादही महान । योगी प्रख्यात जाहला ॥४६॥
ऐसें प्रल्हादमाहात्म्य ऐकत । अथवा जों हें वाचित । नरोत्तमा त्या दक्षा जगांत । ईप्सिताचा लाभ होई ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते गुत्समदप्रल्हादसंवादसमाप्तिवर्णनं नाम त्रिसप्ततितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP