मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय २६

खंड २ - अध्याय २६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढें सांगती । बर्हिषनामा राजा जगती । पृथुवंशात ज्याची ख्याती । प्रजापालक धर्मात्मा ॥१॥
कर्ममार्गीं परायण असत । तो नृप विविध यज्ञ करित । समस्त पृथ्वीसी झाकित । कुशाग्रांनी त्या वेळीं ॥२॥
एकदां मृगयेसी वनीं जात । तेथ समुद्रतनयेसी पाहत । तिच्यासवें विवाह करित । दहा पुत्र झाले त्यासी ॥३॥
ते सर्वही समान वर्ण असत । समान मान समाचार ख्यात । प्रजार्थ ते तप आचरित । समुद्राच्या समीप ॥४॥
नारायण नाम सरोवर असत । तेथ विष्णूसी ते पुजित । प्राचीनबर्हि राजाप्रत । नारद आले त्या वेळीं ॥५॥
त्या करुणानिधीस पूजित । भावभक्तीने कर जोडित । मुनिश्रेष्ठ त्यास म्हणत । ज्ञाननिधी तो तेधवां ॥६॥
राजा तूं ये यज्ञ केलेस । त्यांचें फळ काय विशेष । यज्ञकर्म देतसे बंधनास । ऐसें वेद सांगती ॥७॥
यज्ञांत नाना पशु मारिले । घोर हिंसात्मक कृत तूं केलें । तुझ्या वधार्थ ते जाहले । मरणानंतर अधीर ॥८॥
आतां तूं वृद्ध झालास । कर्म सोडून देई नीरस । कर्मांकुरदाहक अग्निरुपास । ज्ञानमार्गा आचरी तूं ॥९॥
नारदांचें वचन ऐकून । राजा म्हणे विस्मित मन । विनयपूर्वक हात जोडून । कर्मनाशक ज्ञान सांगा मज ॥१०॥
दयासिंधो मज तारावें । भवसागरीं पार करावें । कर्मपरयणासी मज सांगावें । कर्माचें शुद्ध रुप ॥११॥
तेव्हा मुनिसत्तम बोलती वचन । ज्ञान योगमय असे जाण । योग अभेदात्मक असून । योगानें ब्रह्मभूतें योगी होय ॥१२॥
राजेंद्रा या देहांत । गणपतीचें बिंब दिसत । मोहयुक्त तदाकार हृदयीं स्थित । जीवरुपें सगुण तें ॥१३॥
पांच प्रकारें चित्त वृत्ति । विलसत असे या जगतीं । क्षिप्ता मूढा विक्षिप्त असती । एकाग्रा तैसी निरोधिका ॥१४॥
जेथ चित्त त्याग करित । नर तेव्हां क्षिप्ता वृत्ति होत । मूढासम कांहीं न जाणत । ऐशा स्थितींत मूढ रुप ॥१५॥
मुमुक्षूंचें जेव्हां चित्त । ब्रह्मलालसेनें व्याप्त । संसारसुखीं मग्न न होत । तेव्हां तें विक्षिप्त जाणावें ॥१६॥
ऐशा विक्षिप्त चित्तवृत्तींत । ब्रह्मासी संग न होत । परी एकाग्र चित्तवृत्तींत । आत्माकारें स्थित होय ॥१७॥
योगसेवेनें तद्‍रुप होत। अंतर्ज्ञानें सर्व पाहत । देह देहीही न राहत । निरोधिका वृत्ति ती ॥१८॥
निवृत्तिदायक ती असत । संयोग योगाचा होत अंत । योगसेवेनें लाभत । विरोधवृत्ती चित्ताची ॥१९॥
ऐसी पंचविध चित्तवृत्ति । राजा तीच बुद्धी उत्तमा जगतीं । हृदयीं राहून जाण निश्चिती । गणपासह खेळतसे ॥२०॥
पंचधा जी चित्तवृत्ति । तेथ मोहाची वसती । स्वस्थानक रुप ऐश्वर्य स्थिति । त्या मोहाची होतसे ॥२१॥
ऐश्वर्य भरांतिरुप जी सिद्धी असत । ब्रह्माची पंचविध ख्यात । धर्म अर्थ काम मोक्षांची जगांत । ऐसे जाण महीपते ॥२२॥
जी भूतमात्रांस फिरवित । गणपासंगें खेळत । ती मायी ऐसें निश्चत । जाण नृपा तूं निःसंशय ॥२३॥
ज्ञानरुपा स्वयं बुद्धि । ऐश्वर्य म्हणती तिला सिद्धि । त्या बुद्धीसिद्धीचें बिंब प्रसिद्धि । भरमाख्य जीवसंज्ञाकित ॥२४॥
मायामय सदा जात । मायासौख्यांत लालसायुक्त । महीपाला ती बंधयुक्त । हृदयीं पहा प्रकाशते ॥२५॥
पंचधा चित्तवृत्तीनें प्रकाशित । माया सर्व ही जगतांत । म्हणोनि चिंतामणि नामें ख्यात । गणेश जगतीं जाहला ॥२६॥
देह चतुर्विध प्रोक्त । स्थूल सूक्ष्म समात्मक असत । नादरुप तो चवथा होत । बिंदू त्यांची परागति ॥२७॥
देहांत देहभागांत । देही भरांतीनें चतुर्विध होत । ब्रह्म एक असोनि बहु भासत । तें ब्रह्म मी जाण नराधिपा ॥२८॥
त्याच्या योगें स्वतः उत्थान । वेदांत ब्रह्म प्रतिष्ठित महान । सत्य परतें उत्थान । सौख्यमय परम असे ॥२९॥
स्वतः उत्थान परउत्थान । त्यायोगें पंचविध ब्रह्म जाण । स्वसंवेद्य सत्यासत्य रुप असून । समाकार नेति भेदात्मक ॥३०॥
जेथ ब्रह्मांचा संयोग । योग अभेदें शाश्वत सुयोग । समाधिसुखद स्वानंद चांग । ऐश्या रीतीं वर्णिला असे ॥३१॥
त्यारहित अयोगयुक्त । ब्रह्म निवृतिदायक असत । संयोग अयोगनाशें होत । शांतिप्रदायक हा योग ॥३२॥
गणेश समूहपति स्मृत । समूह ब्रह्मरुप असत । ज्ञानचक्षूनें ते जाणावें पुनीत । त्या गणनायकां तूं भज ॥३३॥
हृदयांत जो भगवान । बुद्धि प्रकाशक पूर्ण । बुद्धीचा ईश असून । शांतिदायक तो असे ॥३४॥
ऐसें सांगून महायोगी नारद । थांबले करोनि तत्त्व विशद । प्राचीन बर्हि करी प्रणाम सुखद । करुनि नंतर बोलतसे ॥३५॥
अरे मुनिपुंगवा योग्या जगांत । दयोसिंधो विप्र न जाणत । हे परम रहस्य मत्समीपस्थित । तारिलें सांप्रत तूं मजला ॥३६॥
नारद अंतर्धान पावले । तत्क्षणीं गणपतीचें स्मरण केलें । वीणागानरत जाहले । सदा सुखी ते स्वेच्छाचारी ॥३७॥
प्राचीन बर्हि राजर्षि देत । स्थावर आपुलें राज्य अमात्यांप्रत । राज्य सोडून वनांत । जाऊनि गणेशाचें ध्यान करी ॥३८॥
नारदानें जैसें कथिलें । तयासी उत्तम ज्ञान भलें । यथायोगक्रमें तें आचरिलें । अंती गणेश ब्रह्मीं लय ॥३९॥
तो योगी गणेशक होऊन । ब्रह्मभूत नृपश्रेष्ठ सुमन । प्राचीनबर्हीचे चरित्र ऐकून । वाचून पाप नष्ट होय ॥४०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदन्तचरिते प्राचीनबर्हिषश्चरितं नाम षड्‌विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP