मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ४७

खंड २ - अध्याय ४७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । तारक जेव्हां परतला । तेव्हां मदासुरा हर्ष जाहला । दैत्यांसहित त्या समयीं झाला । उत्सुक ऐकण्या शक्तिसंदेश ॥१॥
तारकें मदासुरा प्रणाम करुन । वृत्तान्त सारा केला कथन । देवी असुर कुलदैवत असून । देवपक्षीं रत अमे ॥२॥
तें ऐकून मद्यपी मदासुर । प्रतापी संतप्त अनिवार । देवांचें हनन करण्या आतुर । समुद्युक्त जाहला ॥३॥
सुसज्ज दैत्यपतींसमवेत । महाकालासम मदासुर जात । शक्तिलोकीं सर्व सेनेसहित । शक्तिगणांते त्यानें मारिलें ॥४॥
ते शक्तिगण छिन्न शरीर । स्वनगरांत धावले सत्वर । वृत्तान्त कथिती उद्वेगकर । दैत्यांच्या त्या स्वारीचा ॥५॥
तें ऐकून शंकरादीसहित । महाशक्ति लढण्या जात । सवें सर्व महाबल सैन्य असत । संग्राममंडळी पातली ॥६॥
सिंहारुढा चतुर्बाहुधरा । खड्‌गचर्मधरा धनुर्बाणधरा । नाना शक्ति समुदायधरा । क्रोधें ज्वलित अग्निसम ॥७॥
तिच्या वामांगापासून । श्री झाली उत्पन्न । दक्षिणांगापासून । सावित्री निर्माण जाहली ॥८॥
हृदयापासून संज्ञा जन्मत । त्याचें सैन्य पृथक असत । विष्णुशंकरादी देव वाहनीं स्थित । आपापल्या सेनेसह ॥९॥
इत्यादि शक्तींनी युक्त । मोठें सैन्य देवसंयुत । परमदारुण ते पहात । दैत्येंद्र मुख्य त्या समयीं ॥१०॥
दैत्यांनी तेव्हां शस्त्रोघ सोडिला । शक्ति सेनागण त्रस्त केला । महाघोर संतप्त हल्ला । असुरांनी तें चढविला ॥११॥
शक्तीनें देव पाठविले । ते रणांगणीं शौर्य लढले । कलिकादी शक्तिसंघ झाले । अत्यंत क्रुद्ध त्या वेळीं ॥१२॥
अकस्मात युद्ध रंगलें । देव दैत्यांचे सैन्य झुंजले । परस्परा मारण्या उत्सुक झाले । धूळ उसळली अपरिमित ॥१३॥
सभोवार कांहीं दिसेना । सूर्याचा प्रकाश येईना । आपपरही समजेना । ऐसा आकांत माजला तें ॥१४॥
घोडे खिंकाळती । रथचक्रें धडधडती । रणदुंदुभि वाजती । दिशा सार्‍या निनादल्या ॥१५॥
शंखनादें सिंहनादें । रणांगण नाना नादें । निनादित होऊन उन्मादें । बधिरासम वीर युद्धांत ॥१६॥
शस्त्रें अस्त्रें अनेक सोडिती । वृक्ष पर्वतखंडही फेकिती । युद्ध दुर्मद ते वीर करिती । परस्परांचा प्राणनाश ॥१७॥
कोणी मेलें कोणी विद्ध झाले । रणांगणी मूर्च्छित पडले । कोणी शस्त्र विहीन बसले । शस्त्रधारी मारिती त्यां ॥१८॥
शस्त्रें उभयतांची भंगती । तेव्हां ते मल्लयुद्ध खेळती । क्रोधें परस्परां आवळती । कित्येक झाले दिङ्गमूढ ॥१९॥
तेथ धडे युद्ध करिती । हातात शस्त्रें फिरविती । आपुल्या परक्यासी मारिसी । स्वपरज्ञान वर्जित ॥२०॥
बाणांनी बाण तोडिती । खड्‌गे खड्‌गांसी भिडती । गदा गदांवरी आपटती । उभय वीरांच्या त्या वेळीं ॥२१॥
कोणी तोमर साहाय्यें लढती । कोणी परशू उगारिती । भिंदिपाल पाशांनी ओढिती । परस्परांसी जयोद्यत ॥२२॥
रथारुढ गजारुढासह लढती । गजारुढ पायदळावरी हल्ला करिती । अश्वारुढांशी तैसे लढती । संभ्रम ऐसा बहु उपजे ॥२३॥
देव दैत्यांचे युद्ध चालत । तुमुल ऐसे अत्यंत । उभयसेनेचा नाश होत । अवर्णनीय तें सारें ॥२४॥
रक्ताच्या नद्या वाहती । धुळीने त्या माखती । तेव्हां प्रकाश उजळे नभप्रांती । प्रस्परज्ञान तेणें होय ॥२५॥
जाणून दैत्य कोठें लपले । देवांनी तयांसी मारिलें । दैत्यांनीही सुरां वधिलें । क्रोधयुक्त मनें त्याचीं ॥२६॥
शक्ति तेथ बहु कुपित । दैत्यांचा संहार करित । विविध शस्त्रास्त्रांनी लढत । चिरडून टाकिलें असुरेश्वरा ॥२७॥
मेरुशीताचला समान । देव दैत्य अचल राहून । एक पदही मागे न जाऊन । परस्परांच्या वधोत्सुक ते ॥२८॥
रक्तांच्या महानद्या वाहती । देव दैत्य कितेक मरती । त्या नद्यांतून तरंगती । प्रेते, असंख्य तयांची ॥२९॥
चरबी मांसाचा चिखल होत । मांसखंड सर्वत्र दिसत । रणांगणीं रौद्र दृश्य दिसत । महामोह पसरला ॥३०॥
रणांगणीं मृतगज पडत । रथ तैसे पशू अनंत । तेणें मार्ग होय खंडित । महाघोर दृश्य तें ॥३१॥
एका क्षणीं भयभीत । देव पळून जाती त्वरित । दशदिशा ते पसरत । कोठें लपावे हया विचारें ॥३२॥
तें पाहून आश्चर्य परम । देववीरांसह अनुपम । वज्रधारी इंद्र संग्राम । करुं लागला घनघोर ॥३३॥
दैत्यांचा नाश करित । वज्राघातें चूर्ण करित । कितेक पडले मूर्च्छित । कितेक पडले मृत्युमुखीं ॥३४॥
शक्ति आदि शस्त्रापातें मारित । अग्निचंद्रयमादी असुर संघात । सुरेश्वर ते क्रोधयुक्त । दैत्यांचें सैन्य संहारिती ॥३५॥
असुरगण भयसंत्रस्त । धावूं लागले दशदिशांत । देवगण झाले हर्षयुक्त । जयजयकार करिती देवीवा ॥३६॥
महामाया जयशक्तीस वंदिती । स्तुतिगीतें तिची गाती । तेव्हां तारक क्रोधें अती । शक्रासह लढण्या आला ॥३७॥
रणभूमींत येऊन म्हणत । पुरंदरासी गर्वयुक्त । महीग्रासी तो मोहित । मदसंयुत होऊनीया ॥३८॥
अरे देवेंद्रा तूं काय लढशील । माझ्या एक बाणें विद्ध होशील । त्याची सरही तुज न येइल । सुराधिप सुरांसहित ॥३९॥
जरी बळवंत तूं असत । तरी अमरावती कां केली त्यक्त । सांग उत्तरासी त्वरित । अन्यथा वृथा मरशील ॥४०॥
ऐसें त्याचें उद्धत वचन । ऐकोनि इंद्र क्रोधायमान । भक्षूं पाहे आरक्त नयन । दानवगणासी त्या वेळीं ॥४१॥
म्हणे तारका वल्गना करिसी । आपुल्या बळाते स्तविसी । तरी आतां माझ्या पौरुषासी । पाहावें तूं रणांगणीं ॥४२॥
तुझें सैन्य संहारीन । नंतर मदोद्धता तुज वधीन । शक्तीला करुन अभिवादन । अमरावतीस जाईन मी ॥४३॥
प्रथम होतो शक्तिविहीन । म्हणोनी पराक्रमाचे अदर्शन । आता शक्तियुक्त करीन कंदन । तुझें सर्व असुरांसह ॥४४॥
दैत्येंद्रा बहुत कां बोलावें । आपुल्या पराक्रमा तूं दाखवावें । नाहींतरी पाताळात जावें । मिथ्या वल्गना कां करिशी? ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे खण्डे एकद्ण्तचरिते इंद्रतारकासमागमी नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP