खंड २ - अध्याय १९
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
गणेशाय नमः । मुद्गल कथा सांगत । दक्ष प्रेमें त्या ऐकत । आंगिरसकुळीं विप्र असत । मुनिसत्तम सर्वज्ञ ॥१॥
त्याचा पुत्र भरत होत । नृपसत्तम तो पुन्हां जन्मत । तेथेही तो संगभीत । ज्ञानयुक्त महामुनी ॥२॥
गणेशास मनीं ध्यात । मुनिसन्निध तो राहत । ऐकिलें पूर्वजन्मीं जें अद्भुत । तें गणेशज्ञान दृढ करी ॥३॥
वेदादींत जें वर्णित । गणेश माहात्म्य अतुल असत । स्तवन ऐसें तो ऐकत । तेणें पूर्वज्ञान दृढ झालें ॥४॥
संगभयें तो ब्राह्मणोत्तम । जडवत् राही उन्मन । चातुर्य सगळें उत्तमोत्तम । लपवून ठेवी जनसंगतींत ॥५॥
विवाहादी भयानें प्रकाशित । केलें जडत्व त्यानें जगांत । मूर्खासम कृति करित । बालभावें वसतसे ॥६॥
त्याचें करी उपनयन । आंगिरस मुनी प्रेमयुक्त मन । नंतर संध्यादिक कर्म पावन । शौचाचारही शिकवी तयासीं ॥७॥
वडिलांनी जें सांगितलें । तें न कदापि स्वीकारिलें । महामतीनें त्या केलें । उलटेंच सारें हेतुपुरस्सर ॥८॥
जरी पिता त्यास मारित । तथापि तो योगी भलतेंच करित । त्याचा हात धरुन करवित । आचमनादी वैदिक कर्म ॥९॥
पुन्हां पिता विचारित । तेव्हां तें वैदिक कर्म तो न स्मरत । जडमंडबुद्धीसम व्यक्त । आचार सारा तो करी ॥१०॥
म्हणोनि त्याचें नाम ठेवित । सर्वलोक ‘जड’ ऐसें जगांत । त्याच नावें हा भरत । ख्यात झाला जिथे तिथे ॥११॥
परी त्याचाही अपमान । तिरस्कारादि त्यजून । जडवत् राहिला सम मन । स्थितप्रज्ञापरे तो ॥१२॥
लोक सारे तेव्हां म्हणत । ज्ञान नसे हयास निश्चित । निंदास्तुती आदि सहन करित । सर्वही हा महामूर्ख ॥१३॥
जडत्वादि दोषें करुन । त्याचा विवाह न होऊन । परम आनंदयुक्त मन । जडभरत जाहला ॥१४॥
पुढे कालांतरें त्याचा पिता । कालवशें निधन पावतां । माता त्याची गुणयुता । सती गेली पतिव्रता ॥१५॥
त्याच्या सर्वत्र मातेस होते । नऊ पुत्र जे कार्यकर्ते । त्या भावांच्या अधीनतेचें त्यातें । दुःख जडभरतासी ॥१६॥
परी तो होता शांत । भावजयी त्याच्या मदोन्मत । अल्पही स्नेह न करित । त्याच्यावरी त्या निष्ठुर ॥१७॥
उच्छिष्ट कुत्सित अन्न त्यास देती । करपलेलें जे अती । वस्त्रादि त्यास न देती । बंधुही न बोलती त्याच्याशीं ॥१८॥
स्नेह न करिती कटु बोलती । कुलांगार त्यास म्हणती । तथापि अमृतापरी स्वचित्तीं । मानी सारें जडभरत ॥१९॥
कुत्सित शिळे जळलेलें अन्न । भक्षण करी तो प्रसन्न मन । चिंध्या अंगावरी घालून । त्यांतच आनंद मानितसे ॥२०॥
तैसें अन्नही शिळें पाकें न देत । भावजयी त्या योग्याप्रत । म्हणोनि दोन तीन दिवस राहत । एकभुक्तचि तो मुनी ॥२१॥
भुकेनें व्याकुळ होऊन । गाणपत्य तो अन्नार्थ भटके उन्मन । घरोघरीं भिक्षा मागे विचक्षण । तेव्हां त्यासीं कामें सांगती ॥२२॥
आपापाल्या कामान नेती । गुरासारखा त्या राबविती । अन्नासाठीं भावभक्ति । सारें काम तो करी ॥२३॥
तेव्हां लोक हर्षित चित्त । त्यासी अन्नवस्त्रादिक देत । तोही आनंदानें स्वीकारत । तें कळलें भावांना ॥२४॥
नंतर ते स्वगृहीं त्यास आणिती । आपुलीं कामें करुन घेती । तथापि भावजया त्यास देती । तैसेंचि कदान्न सर्वदा ॥२५॥
परी ते अमृतासमान । ऐसें भाव मुखीं दाखवून । करी शिळे पाकें भक्षण । सुधेसम तें मानूनी ॥२६॥
एकदा पिकल्या शेतांत । रक्षण करण्या त्यास ठेवित । रात्रंदिवस तो तेथ राहत । सुखदुःख सम मानून ॥२७॥
तेथ जें आश्चर्य घडलें । तें आता प्रजापति ऐक भलें । चोरांच्या स्वामीनें स्तविलें । भद्रकाळी देवीसी ॥२८॥
आज जरी विपुल द्रव्यलाभ । आम्हांसि होईल सुलभ । तरी जगन्माते तुजसी सुभग । पुरुष पशू देईन बळी ॥२९॥
त्यास तैसें द्रव्य होत प्राप्त । म्हणोनि दास आपुले पाठवित । रात्री चोर इच्छेनें येत । जेथ जडभरत रक्षण करी ॥३०॥
तेथ त्या जड भरता पाहती । त्यासीच आपुल्या जागी नेती । बांधुनी हातपाय त्याचे करिती । बळप्रयोगें फार हाल ॥३१॥
तेव्हां तो योगी तें मानित । देहप्रारब्ध मनांत । चोरांचा अधिपति करी स्वागत । पूजा अर्चा करुनियां ॥३२॥
नंतर जडभरते जेवत । मिष्टान्न विपेंद्रसत्तमा शांतचित्त । भोजन होता त्यासी नेत । वाजत गाजत देवीजवळी ॥३३॥
प्रथम महाकालीस पुजून । नंतर त्या मुनिपुंगवा पुन्हा सत्कारुन । तो चोराधिपति पुढे होऊन । ठार मारण्या सरसावला ॥३४॥
नग्न खड्ग हातीं धरित । योगिसत्तम तें पाहत । देहभावाचें मरण ओढवत । मनीं किंचितही न क्षोभला ॥३५॥
गणपतीस स्मरिलें हृदयांत । आज पडो हा देह वा चिरंजीव होत । हया देहभावांत मज गम्य नसत । गजानना नमन तुला ॥३६॥
तेव्हां देवे कोपयुक्त । गाणपत्या महाकाली निनाद करित । मूर्तींतून बाहेर अकस्मात । पडून खड्ग पकडिलें ॥३७॥
चोराधिपतीच्या हातांतून । खड्ग घेतलें हिसकावून । त्याचेंच शिर त्या खड्गानें तोडून । रक्त उत्तम प्याली तें ॥३८॥
अन्य जे चोर आले होते । त्यांनाही तलावारीनें मारुन हस्तें । आपुल्या गणांसह तेथे । क्रीडा करी महाकाली ॥३९॥
त्या गणेशस्तवनपर देवीस नमून । तो जडभरत गेला परतून । स्वेच्छाचारी महायोगी खाई भिक्षान्न । गणपांस सदैव स्मरे ॥४०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते चौरवधो नामैकोनविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP