मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय १३

खंड २ - अध्याय १३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । रवीच्या कलांशापासून संभूत । अन्य बारा सूर्य असत । बारा महिन्यांत ते रथस्थित । प्रकाशती स्वतेजानें ॥१॥
सरथ धातार्यामा मित्र । वरुण विवस्वान शक्र । पूषा पर्जन्य अंशु भग सुपात्र । त्वष्टा विष्णु हे बारा ॥२॥
देव आदित्य मुनींसह । गंधर्व अप्सरा ग्रामणींसह । सर्प राक्षसांदीच्य सह । रथसंस्थ तळपति वसंतादि क्रमें ॥३॥
पुलस्त्य पुलह अत्रि वसिष्ठ । अंगिरा भृगु भरद्वाज श्रेष्ठ । गौतम कश्यप क्रतु ज्येष्ठ । जमदग्नी कौशिक ब्रह्मवादी ॥४॥
मुनी स्तविती प्रत्यक्ष देवास । विविध छंदांनी विशेंष रथकृत रथौज रथचित्र । स्वबाहुक त्यासी मानिती ॥५॥
सुषेण सेनजित्‍ तार्क्ष्य श्रेष्ठ । अरिष्टनेमी रथजित्‍ वरिष्ठ । रथस्वन वरुन सत्यजित सुष्ट । ग्रामणी अभीषु संग्रह करिती ॥६॥
हेती प्रहेती पौरुषेय वध । सर्प व्याघ्र वात व्याध । विद्युत दिवाकर ब्रह्मोपेत विशद । यज्ञोपत तैसे अन्य ॥७॥
हे राक्षस प्रवर त्याच्या पुढती । भक्तिभावें प्रयाण करिती । वासुकी कंकनीर तक्षक वाहती । नागमुख्यक द्वादशमासीं ॥८॥
एलापत्र शंखपाल ऐरावत । धनंजय महापद्मा कर्कोटक उदात्त । कंबल अश्वतर वाहून नेत । प्रभाकरा त्या प्रेमानें ॥९॥
तुंबरु हाहा हूहू नारद । विश्वावसू उग्रसेन सुखद । वसुरुचि अर्वावसु मानद । चित्रसेन अर्णायू धृतराष्ट्र ॥१०॥
सूर्यवची हे बारा गंधर्व गायन । सूर्यापुढती करिती वादन । वसंतादी ऋतूंत नृत्य करुन । तोषविती अप्सरा त्यासी ॥११॥
घनस्तनीं रंभा पुंजिकस्थली ख्यात । मेनका सहजन्याही येत । प्रम्लोचा अनुम्लोचा धृताची भजत । विश्वाची तशी उर्वशी ॥१२॥
पूर्वचित्ती तिलोत्तमादी अप्सरा । तांडवादी नृत्यांनी भास्करा । संतोषविती भक्तिभाव खरा । ऋतु चक्रांत दाखविती ॥१३॥
ऐशियापरी दोन दोन मास । देव करिती सूर्यांत निवास । तेजोनिधीच्या आश्रयास । जातां ते होती तेजयुक्त ॥१४॥
आपुल्या शब्दरचनांनी स्तविती । मुनी तयासी भावभक्ति । गंधर्व अप्सरा उपासिती । गीत नृत्यें तयाला ॥१५॥
ग्रामणी जे अक्षभूत । ते किरण संग्रह करत । सर्प वाहून त्यासी नेत । यातुधानही उचलून नेती ॥१६॥
वालखिल्य त्यास नेती । उदयापासून अस्ताप्रती । ते तपती वर्षती तळपती । चमकती वाहती सर्जनकर ॥१७॥
भूतांचे अशुभ कर्म नाशिती । सूर्यासह हे स्वर्गीं भ्रमती । कामगती विमानीं नित्य बसती । वायुवेग जयाचा ॥१८॥
सदा वर्षती तापती । प्रजेसी आल्हाद नित्य देती । भूतमात्रांसी रक्षिती । युगक्षय जेव्हां होय ॥१९॥
हयांच्या रुपाचा आश्रय घेत । सूर्य नित्य प्रकाशत । दिवस रात्रि विभाग करित । प्रजापति हा कारणरुपें ॥२०॥
पितृदेव मनुष्यादींची । रवि करी संवृद्धि तयांची । ऐसा हा गणेशांश कालाची । विभागणी करी दिवाकर ॥२१॥
कालात्मा भगवान स्वयं भ्रमत । अन्य आठ ग्रहांसमवेत । ध्रवांसी संबद्ध ते असत । दिवाकर करें पुष्ट ते ॥२२॥
तीन चाकांचा चंद्र रथ असत । त्याचे घोडे कुंडाभ विलसत । डाव्या उजव्या बाजूस युक्त । दहा घोडे ते रात्रिकर ॥२३॥
मार्गाश्रयें रवि चालवित । नक्षत्र मंडळ अंतराळांत । र्‍हास वृद्धि समायुक्त । ध्रुवाधारें सर्वकाळ ॥२४॥
तो सोम शुक्ल पक्षांत । भास्कराच्या अतीत स्थित । कलामात्र भरे सतत । नंतर वाढे क्रमानें ॥२५॥
कृष्ण पक्षांत चंद्रास । देव प्राशन करिती सुरस । परी भास्कर तयास । नित्य संवर्धन पुन्हां करी ॥२६॥
सुषुम्नां नाम एक किरण । सोमाची तनू वाढवून । पौर्णमासी दिनी संपूर्ण । दिसते दिवस क्रमानें ॥२७॥
अर्धमास पूर्ण होत । अमृतात्मक त्या चंद्रा प्राशित । देवता सर्वही अमृतभोजनरत । ऐसा उपभोग घेत सदा ॥२८॥
पंधरावा भाग थोडा उरत । कलात्मक तो अपराण्हीं पीत । पितृगण दोन लव कला राहत । स्वधा अमृतमयी पुण्या ॥२९॥
अमावास्येच्या दिवशी निःसृत । सूर्यापासून स्वधा अमृत । संपूर्णमास तृप्ति साधत । पितर परतती आनंदें ॥३०॥
सुधादेवाच्या पानें नाश न व्हावा । सोमाचा त्या क्षय टळावा । सूर्यानिमित्त क्षयवृद्धीरुप सोसावा । चंद्रानें हा उपक्रम ॥३१॥
सोमपुत्र बुधाचा रथ ओढित । चार सिंह वायुवेगांत । भार्गवाचा सुवर्ण रथ ओढित । आठ घोडे वेगानें ॥३२॥
मंगळाचा रथ शोभन । आठ मेष ओढिती मन लावून । बृहस्पतीचा रथ सौवर्ण । आठ घोडे ओढिती ॥३३॥
शनीचा रथ लोहनिर्मित । आठ निळी गिधाडें ओढित । स्वर्भानूचा राहूचा रथ असत । कृष्ण सिंहांनी संयुक्त ॥३४॥
केतूचा रथ कबूतरें ओढिती । ऐसी नवग्रहांची महारथ चित्ती । सर्वही ध्रवांत बद्ध असती । वायूच्या लगामे आदरानें ॥३५॥
ग्रह नक्षत्र तारका सतत । ध्रुवांत सर्व निबद्ध राहत । स्वयं भ्रमण करी सर्वांस फिरवित । अनिलरश्मींनी सर्व दिशा ॥३६॥
म्हणून ध्रुवाच्या आधारें वर्तत । हे ज्योतिश्चक्रं अंतराळांत । ऐसें मुद्‌गल दक्षा प्रजापति प्रत । नवग्रहरथवर्णन करिती ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते नवग्रहरथादिवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP