खंड २ - अध्याय ६७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । ब्रह्मा अगस्तीसी सांगत । श्रीकृष्णाची कथा अद्भुत । राधा कृष्ण श्रीदामा देत । शाप तेव्हां एकमेकांसी ॥१॥
परस्परांशी शाप देऊन । खिन्न झालें त्यांचें मन । गर्वहरण होऊन । विचार करु लागले ॥२॥
श्रीकृष्ण म्हणती मित्राप्रत । गोलोकाचा राजा मी असत । प्रकतिरुप राधा वर्तत । जरी कलह कां झाला ॥३॥
सर्वाधीश मी जगतांत । तरी अपराध हा कां घडत? । कृष्ण मीं सर्व देवेश प्रभावयुत । तरी हें विघ्न कैसें आलें ॥४॥
विघ्नराज हें अथवा करित । गणपति तो आम्हांप्रत । त्याच्या अधीन हिताहित । जगताचा आधार तो ॥५॥
म्हणोनि त्यासी शरण जाईन । ब्रह्मरुप तो जाणून । स्त्रीसहित त्यास आराधीन । ऐसा विचार करी श्रीकृष्ण ॥६॥
तदनंतर स्त्रीमित्रांसहित । कृष्ण अवतरला मृत्युलोकांत । वसुदेव देवकीच्या सदनांत । मथुरेंत तो जन्म घेई ॥७॥
यादव वंशीं सुख निर्मित । कृष्ण प्रिय झाला लोकांत । राधा वृषभानूची सुता होत । गोकुळांत त्या वेळीं ॥८॥
श्रीदामा शंखचूड होत । असुर सत्तम गोकुळांत । कंस भयें कृष्ण जात । गोकुळांत तदनंतर ॥९॥
येथ राधेची भेट होत । जनार्दन झाला परम मुदित । विघ्नेशाचें भजन करित । षोडक्षाशर मंत्रे दोघेही ॥१०॥
एक पुरश्चरण तीं करीत । झालीं गणेश ध्यानीं रत । तपाचरण सोडून ध्यानांत । विशेष निमन्ग तीं झाली ॥११॥
तपाहून उग्र असे ध्यान । ऐसें शास्त्राचें वचन । तेथ अकरा वर्षे राहून । मथुरेंत परतला श्रीकृष्ण ॥१२॥
अक्रुरासह मथुरेंत । कृष्ण जेव्हां निघून जात । तदनंतर वर्षशत । राधाकृष्ण दुरावेल ॥१३॥
परम दुःखातें तें ध्यान करिती । गणनायका चित्तीं ध्याती । जाहली शांतियोगाची प्राप्ति । संतोष उपजला मानसीं ॥१४॥
गाणपत्य तीं उभय होत । ऐसी शंभर वर्षे उलटत । एकदा वैशाख पौर्णिमा असत । तेव्हां गेलीं बदरिकाश्रमीं ॥१५॥
शंभु मुख्य देव स्त्रियांसहित । गणनाथाच्या यात्रेंत । तैसे विविध मुनी येत । परमानंदे त्या क्षेत्रीं ॥१६॥
शेषादि महानाग येत । विविध नृपजनही समस्त । कपिलादि योगी जन येत । मीही गेलों त्या स्थळीं ॥१७॥
तेथ वार्षिक महोत्सव करित । गणनाथाची पूजा होत । सर्व जण उपवास करित । प्रतिपदेस होय पारणें ॥१८॥
येथ राधा कृष्ण भेटत । गणपतीचें ध्यान करित । उत्तम मंत्र तें जपत । भावसंयुक्त त्या रात्रीं ॥१९॥
नंतर गणेश प्रकट होत । चतुर्भुजधर त्यांच्या पुढयांत । साक्षात् गजवक्त्रादि युक्त । त्यास पाहूनि साष्टांग नमिती ॥२०॥
रोमांचित शरीर होत । आनंदाश्रू ओघळत । गणेश्वरासी ती स्तवित । राधाकृष्ण दोघेजण ॥२१॥
पुष्टिपते तुला नमन । शंकरसुता तुला वंदन । ब्रह्मपुत्रा देवा अभिवादन । सर्व सिद्धिप्रदा तुला ॥२२॥
स्वानंदवासी ब्रह्मपुत्रासी । सिद्धिबुद्धिपतीसी गणेशासी । हेरंबासी योगमयासी । सर्वादीसी नमन तुला ॥२३॥
सर्वेशासी सर्वज्ञासी । निर्गुणासी सगुणासी । त्यांच्या अभेदरुपासी । गजानना तुला नमन ॥२४॥
शांतिरुपासी शांतासी ।शांतिदात्यासी महोदरासी । मूषकश्रेष्ठ वाहनासी । गाणपत्यप्रिया तुज नमन ॥२५॥
अनंतरुपासी भक्त संरक्षकांसी । भक्तिप्रियासी भक्तिधिनासी । चतुर्बाहुधरासी शूर्पकर्णासी । नागयज्ञोवितीसी नमन ॥२६॥
शूरासी परशुधरासी । विष्णुपुत्रासी विनायकासी । सर्वांच्या मातापित्यासी । विप्रपुत्रा तुला नमन ॥२७॥
सर्वांचा गर्वहरण करिसी । सर्वांशी तूं सुख देसी । लंबोदरा विघ्नेशा तुजसी । ब्रह्मनायका नमन असो ॥२८॥
तुझी स्तुति करितां वेदादी कुंठित । शंभु शुकांदीसही न जमत । आम्हीं वृथा गर्वयुक्त । गर्व आमुचा नष्ट झाला ॥२९॥
साधूंचा तूं विघ्नहर्ता । त्या योगें शांतियोगाची प्राप्ति होता । ते तुज भजती तत्त्वता । असाधूंचा तूं विनाशक ॥३०॥
आम्हांसी विघ्न आलें म्हणून । केलें तुझ्या योगाचें सेवन । ढुंढे तुझा साक्षात्कार होऊन । कृत्यकृत्य आम्हीं झालों ॥३१॥
चिंतामणे तुज हृदयांत । आतां आम्हीं सतत पाहत । विघ्न तें मंगल होत । या अर्थानें गजानना ॥३२॥
सांप्रत देई तुझी भक्ति । दॄढ व्हावी जी आमुच्या चित्तीं । गर्वाची जेणें संभूती । कदापि न होय चित्तांत ॥३३॥
ऐसें बोलून नृत्य करित । धन्य धन्य आम्हीं म्हणत । प्रत्यक्ष पाहिला एकदंत । परम भाग्य आमुचें ॥३४॥
तेव्हां पुष्टिपति त्यांसी म्हणत । राधेकृष्ण ऐका भक्तियुत । करा माझी भक्ति अत्यंत । संशय न धरा मानसीं ॥३५॥
संकटीं माझें स्मरण करित । भक्त तेव्हां मीं प्रकटत । जें जें इच्छी तें तें देत । आनंद निर्मितो जीवनीं ॥३६॥
तुम्हीं रचिलेलें स्तोत्र वाचित । अथवा जो नर हें ऐकत । त्यास सर्व सिद्धि प्राप्त होत । अंतीं स्वानंद लोकप्राप्ति ॥३७॥
तुम्ही दोघे सुरेश्वर । परम भक्त माझे जगदीश्वर । तुमचें हें स्तोत्र वांछितार्थकर । निःसंशय सर्वदा ॥३८॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला तें गजानन । त्याचें सतत हृदयीं ध्यान । त्या रात्रीं तीं करिती ॥३९॥
तदनंतर गोलोकांत । राधाकृष्ण परतत । अगस्त्यमुने अखंड ऐश्वर्ययुक्त । दोघेही तीं जाहलीं ॥४०॥
म्हणोनि तूं गर्व सोडून । गणपतीसी जाई शरण । होईल तुझी वांच्छा पूर्ण । गजाननाच्या कृपेनें ॥४१॥
ब्रह्मांड त्याच्या आधारें वर्तत । सत्व त्याच्या अधीन असत । गणनाथ स्वेच्छेनें क्रीडा करित । ऐसें जाण मुनिसत्तमा ॥४२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते राधाकृष्णगोलोकप्राप्तिवर्णनं नाम सप्तषष्टितमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP