खंड २ - अध्याय २४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । ध्रुव वंशात संभूत अंग । धर्मात्मा पितृसम असत । मृत्युकन्या भार्या होत । त्या धर्मात्मा महात्म्याची ॥१॥
तिच्यापासून त्यास होत । वेन नामा सुदारुण सुत । त्या शिकविता श्रान्त । परी तो पुत्र न सुधारला ॥२॥
म्हणोनी राज्य त्यागून वनांत । राजा गेला दुखःयुक्त । तेव्हां राजाविहीन त्या देशांत । चोर हिंडू लागले ॥३॥
त्यांनी लोकांचें सर्वस्व लुटलें । प्रजाजन उद्विग्न झाले । ब्राह्मणांना ते शरण गेले । तेव्हा ब्राह्मण काय करिती ॥४॥
वैनास पितृराज्यावरी । बैसविलें त्यांनी सत्वरी । त्यानें दुर्जय चोरां मारुन महीवरी । सत्ता आपुली दृढ केली ॥५॥
वसुधातलातें कापरें भरत । ऐशिया परी तो राज्य करित । न्याय मार्ग त्यागून आचरत । स्वच्छदचारी तो वेन ॥६॥
तेणें वर्णाश्रम आचारसंयुत । जन झाले दुःखित । पुनः ते तापसजनां शरण जात । तापस निवारिती वेनातें ॥७॥
परी त्यांचे वचन ऐकून । वेन म्हणे मदोन्मत होऊन । मीच सर्वांसी पूज्य असून । मालक सार्या जगतासी ॥८॥
मुनींद्रांनो करा भजन । माझेंचि तुम्ही दृढमन । योगक्षमेकर सदा प्रसन्न । ऐसें जें या जगतांत ॥९॥
त्याचें तें वचन ऐकती । ब्राह्मण सारे संतप्त होती । शाप देउनी ठार करिती । नीतिहीन त्या नृपासी ॥१०॥
त्याचें वामांग मंथन करित । नृपार्थ दुसर्या ते समस्त । त्यापासून पापमय नर जन्मत । र्हस्वकाय श्यामवर्ण्य ॥११॥
दाढीधारी क्रूर असत । पिंगल लोचन तो दिसत । त्यास पाहून ब्राह्मण सांगत । खाली बस रे तूं क्रूरा ॥१२॥
नंतर निषादनाम पावत । त्यास ते वनीं स्थान देत । त्याच्यापासून पसरत । निषादकुळ जगामाजीं ॥१३॥
पुन्हां दक्षिणांग मंथन करिती । त्यातून पृथूची होय उत्पत्ति । महातेजस्वी तो भावभक्ति । द्विजश्रेष्ठां वंदन करी त्या वेळीं ॥१४॥
पृथु नृपवर्या अभिषेक करिती । राज्यावरी ते शुद्धमती । विष्णूचा अंश तो राजा जगतीं । विख्यात झाला स्वधर्मरत ॥१५॥
तो क्षात्रधर्माचा प्रवर्तक । त्यानें संरक्षिले लोक । ते वर्णाश्रम पाळिती निःशंक । नगरीं त्याच्या परम मोदें ॥१६॥
जेथ तेथ सत्कार होत । ऐसे चालली जीवन सुखांत । परी कालांतरें तेथ पडत । दुष्काळ अतीव असह्य ॥१७॥
लोक झाले अन्नविवर्जित । क्षुधार्त सर्वही पीडित । म्हणोनी नृपासी शरण जात । सर्वजन त्या समयीं ॥१८॥
वेनाच्या अधर्मानें होत । भूमीचें दोहन पूर्वी सतत । म्हणोनि काही देण्या असमर्थ । धर्मरुप त्या नृपासी ॥१९॥
लोकांचे दुःख ऐकून । पृथु झाला संतप्त मन । विचार करुनी धनुष्य घेऊन । श्रेष्ठ बाण जोडिला ॥२०॥
भूमीवरी सोडण्या ओढित । आकर्ण बाण तो बळवंत । बाण सोडिता भयभीत । वसुंधरा तेव्हां जाहली ॥२१॥
गोरुप घेऊन उद्विग्न । इथें तिथें करी पलायन । बाण सज्ज हातीं धरुन । यमासम नृप पाठलाग करी ॥२२॥
अन्तीं भूमी शरण जात । कर जोडोनी त्यास विनवित । थरथरा भयें कापत । मज स्त्रीस कैसें वधितोसी ॥२३॥
मी भूमिपाला वसंधुरा । गोरुप धरुनी शूरा । क्षत्रकुलोद्भवा उदारा । तुजसी शरण आलें असे ॥२४॥
भूमीचें वचन ऐकून । नृपोत्तम म्हणे तुज मारीन । जरी न मानशील माझें शासन । वसुंधरे तूं सत्वर ॥२५॥
जरी तुज जीवितासी आशा । तरी लोकांची न करी निराशा । विविध अन्न पिकवुनी दशदिशा । सर्वकाळ समुद्ध करी ॥२६॥
तेव्हा विनयपूर्वक त्यास म्हणत । मी ज्या ग्रासिल्या औषधी समस्त । त्या पुनरपी देण्या असमर्थ । पृथ्वीरुपें नृपसत्तमा ॥२७॥
म्हणोनि मी गोरुपें स्थित । स्वभावज वत्स करोनि त्वरित । सकल औषधी दुग्धरुपें तुजप्रत । देईन मी निःसंशय ॥२८॥
कोणी दोहन करणारा शोधिता । सर्वही शुभ होईल तत्त्वतां । अन्यथा महीपाला मजसी आतां । वृथा कां ठार मारिशील ॥२९॥
तिचें वचन ऐकून नृपोत्तम । धनुष्याच्या टोकानें परम । पर्वतांचे चूर्ण करुन अनुपम । समतल भूमी निर्मिली ॥३०॥
नंतर नगरादींची रचना करित । भूमीसी पुत्री मानित । पृथुनृपाची सुता ख्यात । पृथ्वी नामें जाहली ॥३१॥
मनूस पाडस कल्पून । स्वयं दोहक होऊन । षड्ररसान्नमय दुग्ध दोहन । नृपसत्तम तें करी ॥३२॥
त्यानंतर त्रिलोकवासी जन । करिती पृथ्वीचें दोहन । आपापालें अन्नमय दुग्ध पावन । मिळविती ते आदरें ॥३३॥
ब्रह्मयासी वेदरुपासी करित । वत्स् तेव्हा बृहस्पती उदात्त । दोहक होऊन दूध काढित । विगतज्वर जाहला ॥३४॥
रुद्रासी वत्स कल्पून । मालाग्नि रुद्रा दोहक करुन । दोहन केलें हरजीवन । बृहस्पतीनें त्या वेळी ॥३५॥
विष्णूसी वत्स कल्पून । यजमान दोहक मानून । यज्ञधारमय दूध काढून । कर्मरुप तो संतोषला ॥३६॥
सूर्यासी वत्स करुन । ध्रुवासी दोहक कल्पून । ज्योतिवर्णाचें जीवन । दुग्ध रुपें दोहन करी ॥३७॥
शेषांसी वत्स कल्पून । वासुकी दोहक कल्पून । दूध तें सर्पांचें अन्न। दोहून दुग्धप्रिय झाला ॥३८॥
शिवासी वत्स कल्पून । नंदिकेश्वरा गवळी करुन । विद्यात्मक दुग्ध दोहन । करी तेव्हा गतमत्सर तो ॥३९॥
ऐश्या रीतीं सर्वही काढिती । पृथुभूत भूमीचें दूध भक्ति । चराचरमय जीव ईश्वर जगतीं । प्रजापतें त्या वेळीं ॥४०॥
धरिणी प्रिय पृथु पूजित । धरिणीस पुत्रीसम मानित । ती परम हर्षे तेथ स्थित । प्रसन्न फार जाहली ॥४१॥
ऐशापरी धरित्रीचें दोहन । करुनी पृथू राजा मुदितमन । न्यायनीती राज्य करुन । समराट् एकमेव जाहला ॥४२॥
शंभर अश्वमेध यज्ञ करित । महाबळ तेव्हां दान देत । असंख्य दक्षिणा भावयुत । ऐसा महिमा तयाचा ॥४३॥
त्याच्या यज्ञीं ब्रह्मा येत । स्वयं विष्णु शंकर उपस्थित । इंद्रादी सर्व देव येत । गंधर्वादी महामते ॥४४॥
ऋषि कश्यपादी नाग । शेषप्रमुख सारे उरग । नानाविध जन सुभग । स्त्रियांसह उपस्थित ॥४५॥
पृथु शंभरावा यज्ञ करित । अश्वमेध तेव्हां होत चिंतित । इंद्र संन्यासी होऊन पळवित । यज्ञीय अश्व तयाचा ॥४६॥
पृथूच्या पुत्रें पाहिला । तपस्वी म्हणोनि सोडिला । घोडा टाकून पळाला । अंतर्धान पावे भयानें ॥४७॥
पुन्हा अस्थिधर होऊन । भस्माचा लेप काढून । यज्ञाचा घोडा नेई पळवून । राजपुत्रानें ताडिलें तया ॥४८॥
ऐसें सहावेळ घडत । पुरंदर घोडयासी पळवीत । तेव्हां पृथु पराक्रम इच्छित । हत्या त्याची करावया ॥४९॥
ब्रह्मदेवें केलें सान्त्वन । म्हणोनी महेंद्राचें न करी हनन । नव्याण्णव यज्ञ करुन । तेजस्वी तो थांबला ॥५०॥
ब्रह्मदेवें इंद्रास प्रेरिलें । तेव्हा इंद्रासी सत्य उमजलें । त्यानें पृथूसी मानिलें । शूर वीरा प्रणाम करी त्या ॥५१॥
स्कल देवांसी पृथूनें पूजिलें । तेणें ते सर्वही प्रसन्न झाले । आपापल्या स्थळीं परतले । पृथूही स्वधर्म राज्य करी ॥५२॥
ऐसें पृथु राजाचें आख्यान । सतत करी तो प्रजापालन । हें पृथु यशाचें वर्णन । पापहारक सर्वदा ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते पृत्युयशोवर्णन नाम चतुर्विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP