मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ५८

खंड २ - अध्याय ५८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । प्रल्हाद म्हणे गृत्समदाप्रत । दीनपालक सांग मजप्रत । भरुशुंडी मुनीचे सांप्रत । चरित्र पुनीत मजला तूं ॥१॥
कोणत्या तपें सोंड फुटली । भरुमध्यांतून मिरविली । मानस पूजा कैसी केली । त्यानें तें सविस्तर सांग मज ॥२॥
मुनिवराचा वृत्तांत । ऐकिला काशिराज कथेंत । तेणें चित्त आश्चर्ययुक्त । महिमा ऐकण्या सविस्तर ॥३॥
महाभाग्य त्याचे महिमान । कैसे भूमंडळीं पसरलें महान । गणेशभजनीं आसक्त परम । त्याची कथा तारक असे ॥४॥
मुद्‌दल दक्षा सांगती । ऐकोनी प्रल्हादाची उक्ती । गृत्समद महायोगी तयासे सांगती । भक्तिपात्र त्यास पाहून ॥५॥
प्रल्हादा ऐक कथा लोकपावनी । भरुशुंडीची ब्रह्मप्रदायिनी । नंदुर ग्रामीं नामा म्हणोनी । चोर पापी रहात होता ॥६॥
तो महापापपरायण असत । शस्त्रें घेऊन वनांत फिरत । जीवहिंसा बहुत करित । केवळ क्रीडा म्हणोनी ॥७॥
मार्गस्थ जनांसी पाहून । धनलोभें त्यासी मारुन । सर्वस्व त्यांचें लुटून । आपल्या घरीं परतसे ॥८॥
द्रव्यवस्त्रादि हीन । पकडता अरण्यीं ऐस जन । त्यांचे हरी क्रूरकर्मा जीवन । वधप्रिय तो सर्वदा ॥९॥
त्यांचें सर्व धन हरुन । श्रीमंत झाला तो नामा दुर्मन । द्रव्यसंचय बहुत होऊन । तो न तोषला तथापि ॥१०॥
त्याच्या पापांची संख्या नसत । ब्रह्माही असमर्थ होत । शेषही असमर्थता प्राप्त । पापांचे भय त्या वाटे ॥११॥
स्त्रिया गाई बालकांची । हत्या करी तो द्विजांची । त्याच्या पापभारें भूमीची । विकल अवस्था जाहली ॥१२॥
एकदा उत्तम पुरुष कोणी वनांत । कौवर्तकास भेटत । त्याचा वध करण्या जात । शस्त्र उगारुन आनंदे ॥१३॥
त्या दुष्टास पाहून । दूर पळे तो उत्तम जन । गव्युतिमात्र जाऊन । ग्रामीं एका शिरला तो ॥१४॥
त्याचा पाठलाग करित । कैवर्तक झाला विश्रान्त । तैसाची तो अत्यंत । दुःखित झाला मानसीं ॥१५॥
मंदगतीनें तो चालत । कुंड पाहिलें एक मार्गांत । श्रमपरिहारास्तव स्नान करित । महाखल त्या तो कुंडांत ॥१६॥
तें गणराजाचें महान । पुण्यप्रद तीर्थ पावन । त्याच्या प्रभावें पाप हरुन । विचारशक्ती जागली ॥१७॥
विचार करी स्वचित्तांत । म्हणे मीं पापें केलीं अगणित । मरणानंतर घोर नरकांत । पडणार मी निःसंशय ॥१८॥
कल्पशतें दुःखें अनंत । कैसी सहन करीन नरकांत । ऐसा ह ऐकून वृत्तान्त । प्रल्हाद विचारी गृत्समदा ॥१९॥
नाम्यानें स्नान करुन । ज्यांत झाला पावन । तें कुंड कोणतें महान । कोणाच्या तपें स्थापन झालें? ॥२०॥
तेव्हां गृत्समद प्रल्हादा सांगत । गाणपत्य तो आल्हादयुक्त । इतिहास पुरातन तुजप्रत । सांगेन मी आनंदानें ॥२१॥
सूर्य यमांचा संवाद असत । पापनाशक सुहित । विश्वकर्मा स्वकन्या अर्पित । सूर्यास संज्ञा नांवाची ॥२२॥
कर्ममयी मायारुप महाद्युती । शत वर्षे तप करिती भक्ती । विश्वकर्म्यानें तयाप्रती । वर माग म्हणतसे ॥२३॥
देवी प्रसन्न होय मागत । माझी पुत्री होई म्हणत । मी आदिमाया तथास्तु वदत । तदनुसार सुता झाली ॥२४॥
त्या संज्ञा नामक सुतेस । घेऊन सविता स्वगृही जात । तिच्यासवें सुख भोगत । चिरकाल विभावसू तो ॥२५॥
महातेज त्या सूर्या होत । तिजपासून एक कन्या दोन सुत । वैवस्वत मनु ज्येष्ठ पुत्र असत । यमराज तो पुत्र दुसरा ॥२६॥
यमुना नाम जी सुता । तीच प्रख्यात यमुना सरिता । सर्व अपत्यें स्वधर्माकरितां । आस्थायुक्त सदा होती ॥२७॥
पुढें सूर्याच्या तीक्ष्ण तेजें संतप्त । संज्ञा एक युक्ति करित । आपुल्या मायेनें छायेसे निर्मित । आपुल्या जागीं तिज ठेवी ॥२८॥
तिज सर्व सांगून । सुतद्वय सुता दाखवून । म्हणे सूर्ये विचारता मौन । छाये धरी तूं सर्वदा ॥२९॥
माझें हें कृत्य न सांगावे । छायेस म्हणे संज्ञा भावें । सूर्ये पीडिता मज कां धरावें । मौन मी सांग संज्ञे तूं? ॥३०॥
परी मी प्रयत्न करीन तुझें सर्व गृहकार्य सांभाळीन । तुझ्या निश्चयानुरुप गमन । आतां करी तूं निःशंक ॥३१॥
नंतर संज्ञा पितृगृहीं जात । तेव्हां विश्वकर्मा तिला निंदित । म्हणे पतीस सोडून मम सदनांत । प्रवेश संज्ञे करुं नको ॥३२॥
तेव्हा अश्वरुप घेऊन जात । संज्ञा राहण्या वनांत । गणपतीचें ध्यान करित । तप अविरत करुं लागे ॥३३॥
मालमंत्रें तोषवित । ती सती विघेशासी वर्षशत । गणनायक तेथ प्रकटत । पूजा करी तयांची ॥३४॥
स्तुती बहुविध करित । तेव्हा गणेश तिज म्हणत । वर माग जो ईप्सित । पुरवीन मी निःसंशय ॥३५॥
संज्ञा म्हणे माझा पती । सूर्य त्याची प्रखर दीप्ती । ती सहन न होय मज जगतीं । सौम्यतेज करी त्यातें ॥३६॥
गणाधीश तथास्तु म्हणत । म्हणे तूं होशील मायाबंधरहित । मद्‌भक्तिंत सदैव रत । इच्छित तुझें सफळ होय ॥३७॥
स्वयं सूर्य देव कोपहीन । जाईल तुजला घेऊन । ऐसें वरदान देऊन । अंतर्धान गणेश पावले ॥३८॥
त्या गणपासी ध्यात । तेथ संज्ञा होती राहत । छायेपासून प्राप्त । सुतद्वय एक कन्या रवीसी ॥३९॥
सावर्णि मनु ज्येष्ठ सुत । दुसरा शनैश्वर संभूत । तापी नामे कन्या जन्मत । तापी नदी तीच असे ॥४०॥
छाया सावत्र अपत्यांप्रत । न्यूनभानें आचरण करित । आपल्य तीन अपत्यां असत । प्रेमभावें वागवीतसे ॥४१॥
मातेसे अपराध सहन करित । मनु विचक्षण तो सुत । परी धर्मराम निषेघ करित । वारंवार मातेचा ॥४२॥
परी तो सापत्न न सोडित । आपला स्वभावद्वेष चित्तांत । तेव्हां यमधर्म मारण्या जात । पादाघातें रागानें ॥४३॥
त्याच्या अविनयें क्रोधयुक्त । जननी त्यास शाप देत । तुझ्या विरघळून क्षणांत । पडेल धरणीतलावरी ॥४४॥
तेव्हां धर्म क्रोधे आवरुन । सवित्यासन्निध जाऊन । शापाचें भय वाटून । सांगे सर्व वृत्तान्त तया ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते यमशापवर्णनं नामाष्टपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP