मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ३७

खंड २ - अध्याय ३७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दितीयापासून कश्यपासि होत । दोन परम दारुण सुत । ते घोर तप आचरित । दिव्य सहस्त्रवर्षावधि ॥१॥
त्यांच्या तपप्रभावें तुष्ट होत । ब्रह्मा त्यांसी वर देत । कोणत्याही प्राण्यापासून जगांत । मरण तुम्हांसि न येईल ॥२॥
त्यांनि जो वर मागितला । त्यांत एक दोष राहिला । म्हणोनि पुढें मृत्यु ओढवला । कैसा तें मुद्‌गल सांगती ॥३॥
ब्रह्मदेवाचा वर मिळत । तेणें दैत्य त्रिभुवन जिंकीत । हिरण्यकशिपु ज्येष्ठ असत । राज्य करी तो त्रिभुवनाचें ॥४॥
कर्ममार्गाचा द्वेष करी । देवब्राह्मणा शिक्षा करी । ऐसा तो दुष्ट राज्य करी । परस्त्रीमनलालस ॥५॥
इंद्रादि देव उपोषण करिती । ब्रह्मदेवासी नायक नेमिती । विष्णूसी शरण ते जाती । दैत्यापासून वाचावया ॥६॥
तेव्हां विष्णु रुप घेत । नरसिंहाचे अद्‌भुत । दैत्य राजाच्या नगरीं जात । क्रोध संयुत त्या वेळीं ॥७॥
घोर नाद करुनी आसंमत । भरिलें त्यानें समस्त । दैत्यगण आश्चर्य करित । हिरण्यकशिपुसी सांगत ॥८॥
दैत्यासहित लढण्या जात । तेव्हां महाबळ तो अति त्वरित । प्रल्हाद प्रमुख पुत्रही असत । तेव्हा त्याच्या सैन्यांत ॥९॥
मेरुमंदार्सम शरीर विराजित । होता तो नृसिंहआकृति तेजयुक्त । शस्त्रास्त्रे मर्मभेदी सोडित । मारिले बहु दैत्य तेणें ॥१०॥
रक्ताच्या नद्या वाहत । रणभूमींत दशदिशांत । आपुल्या प्रखर नखानें वधित । नृसिंह दैत्यासी त्वेषानें ॥११॥
त्यासी पाहुनि पूर्वसंस्कार जागृत । जाहले प्रल्हादाच्या मनांत । वैष्णवज्ञान परम पुनीत । स्फुरलें त्याच्या चितांत ॥१२॥
इतुक्यामाजीं अकस्मात । गदेचा आघात दैत्य करित । नृसिंह तेणें पडला मूर्च्छित । परी अल्पावधित सावरला ॥१३॥
गदाघातें झाला जर्जर । म्हणोनि मानसीं करी निर्धार । घेई चातुर्ये माघार । नृसिंह रणांतुनी त्या वेळीं ॥१४॥
हिरण्यकशिपु स्वगृहीं परतत । विजश्रीनें हर्षभरित । परी प्रल्हाद विष्णुभक्ती करित । भावबळें दैत्यसदनीं ॥१५॥
आपुल्या पित्यासी बोध करित । आनंदरुप विष्णूसी शरण जा म्हणत । पुत्राचें वचन ऐसें ऐकत । अत्यंत क्रुद्ध तें जाहला ॥१६॥
मुष्टिप्रहारें प्रल्हादा ताडित । शत्रूस माझ्या तू कां स्तविसी । ऐसें म्हणोनि मारित । बहु प्रकारें स्वपुत्रासी ॥१७॥
परी तो दृढभाव न सोडित । विष्णूची अधिकाधिक भक्ती करीत । तेव्हां जळीं स्थळीं अग्नींत । संकटीं टाकीत तयासी ॥१८॥
विषही स्वपुत्रासी देत । परी विष्णूकृपेनें तो वाचत । शस्त्रास्त्रें त्यासी मारित । तरी विष्णुभक्त तो मरेना ॥१९॥
ऐसें पितापुत्राचें द्वंद्व चालत । इकडे नृसिंह काय करीत । तें मुद्‌गल मुनी सांगत । दक्ष प्रजापति ऐकत असे ॥२०॥
वैकुंठीं विराजलासे सुखांत । त्या नारायणा नृसिंह भेटत । भयातुर सांगे सर्व वृत्तांत । कारण शोधी जनार्दन ॥२१॥
तू गणेशासी विसरलास । म्हणोनी रणीं हरलास । गणेशाच्या अष्टाक्षर मंत्रास । नृसिंहासी देई नारायण ॥२२॥
नृसिंहे वनांत जाऊन । आचरिलें तप अति गहन । निराहार करी ध्यान । गणेशासी मनीं आठवून ॥२३॥
ऐसें एक वर्ष तप करित । तेव्हां विघ्नपती प्रकटत । नृसिंहासी वर देत । भक्ति त्याची पाहून ॥२४॥
नृसिंह विघ्नेशासी करी वंदन । गणेशसूक्त गाई कर जोडून । म्हणे देवदेवेशा भक्ती पावन । माझ्या हृदयीं दृढ होवो ॥२५॥
हिरण्यकशिपुसि मी जिंकावें । ऐसें वरदान स्वामी द्यावें । तथास्तु म्हणोनि प्रसन्नभावें । गणेश अंतर्धान पावले ॥२६॥
नृसिंह होऊन हर्षभरित । दैत्यासी जेव्हां मारण्या जात । हिरण्यकशिपू अति क्रोधयुक्त । प्रल्हादासी मारित होता ॥२७॥
त्याच्या हातीं खड्‌ग असत । प्रल्हाद तेव्हां विष्णूस स्मरत । नृसिंह दैत्यासी ताडन करित । तेव्हां मूर्च्छित दैत्यराज ॥२८॥
परी पुनरीप सावध होऊन । हातात गदा घेऊन । सैनिकांसहित उत्सुक मन । नृसिंहा मारण्यासि धाविला ॥२९॥
तेव्हां नृसिंहाच्या शरीरांतून । असंख्य अन्य नृसिंह जन्मून । दैत्य वीरांशी लढून । धारातीर्थी पाडिती तया ॥३०॥
दिवसा रात्रीं मरण न यावें । देव मानव पशुंसी अजेय व्हावें । शस्त्रास्त्रांचेंही भय नसावें । ऐसा वर होता दैत्यराजास ॥३१॥
हें जाणोनी क्रोधसंतप्त । सायंकाळी युद्ध करित । आपल्या नखानें फाडित । नरसिंहरुपें त्या वेळीं ॥३२॥
नखें शुष्क अथवा आर्द्र नसत । त्यानें हिरण्यकशिपूस विदारित । तेव्हां दैत्यराज मृत्यू पावत । देव स्तविती नृसिंहासी ॥३३॥
नृसिंहरुप विष्णु स्मरत । गणेशास स्वचित्तांत । तेथून अंतर्धान पावत । देवही जाती स्वस्थानीं ॥३४॥
ऐसें हें नरहरीचें माहात्म्य वाचित । अथवा भक्तिभावें जो ऐकत । त्यावरी गणेश कृपा करित । सर्व सुखें मिळत तया ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीयेखंडे एकदंतचरिते नृसिंहमाहात्म्यं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP