मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ६२

खंड २ - अध्याय ६२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद प्रल्हादा सांगत । विनायकअवतार कथा पुनीत । बाळ गणांसह खेळत । काशींत विनायक भक्तप्रिय ॥१॥
गणकरुपें ज्योतिष सांगत । हेमासुर दैत्य तयाप्रत । त्यास मायाप्रभावें मारित । दैत्यपा प्रल्हादा, गजानन ॥२॥
नंतर कूपासुर कंदरासहित । विनायका मारण्या येत । त्या उभयतां आपटी त्वरित । परस्परांवरी मारी तयां ॥३॥
ब्रह्मदेवाचा वर लाभून । बलाढय झाले असुर तीन । अंभोसुर अंधक तुंग दुर्मन । पक्षीवेष धरोनि आले ॥४॥
त्या खगरुपधरांसी मारित । विनायक तेव्हां ते मुक्त होत । केवळ हस्तस्पर्शे मरत । विनायकाच्या ते असुर ॥५॥
त्यांची माता भ्रमरी राक्षसी । अदितीचे रुप घेई तिसी । विनायक मारी दुष्टेसी । जैसी वृत्ती तैसें फळ ॥६॥
त्याचा प्रभाव पाहून । विस्मित झाले सकल जन । निमंत्रिती करावया भोजन । आपुल्या घरीं ते सर्व ॥७॥
एके दिवशीं काशींत । घरोघरीं महोत्सव चालत । कश्यपाच्या भोजनार्थ भक्तियुत । सामग्री करिती सकल जन ॥८॥
तेथ काशी नगरांत । होता शुक्ल नाम एक भक्त । भिक्षा व्रत तो आचरित । त्यानें ऐकिला वृत्तांत हा ॥९॥
शुक्ल होता दारिद्रयांत । परी संतुष्ट विनायकाच्या भजनांत । विद्रुमा त्याची पत्नी असत । पतिभक्ति परायणा ॥१०॥
सर्वस्वाचें दान करुन । आपुल्या घरीं उत्सव महान । करण्या दोघे करिती यज्ञ । आंगण झाडून स्वच्छ केलें ॥११॥
भिक्षान्नाचेंच भोजन । सर्व धान्यांचें पीठ मिसळून । भाकरी करी प्रसाद म्हणून । खीर करी तांदुळांची ॥१२॥
शुक्ल ब्राह्मण दर्भ बांधित । आनंदानें गुढी उभारित । कश्यपानें करावें भोजन घरांत । म्हणोनि दोघे वाट पहाती ॥१३॥
सुकली आवळकाठी शोधिती । मुखशुद्धीस्तव ती ठेविती । नैवेद्य वैश्वदेव करुन चित्ती । ध्यान करिती विनायकाचें ॥१४॥
तिकडे राजप्रासादांत । सनक सनंदन ऋषि येत । काश्यपाच्या दर्शना असत । उत्सुक ते महात्मे ॥१५॥
नृप करी तयांचा सन्मान । बालका समवेत विनायका पाहून । ते दोघे करिती निर्भर्त्सन । नंतर गेले गंगास्नाना ॥१६॥
इकडे सर्व नगरींत । नगर जन वाट पाहत । केव्हां येईल विनायक सांप्रत । आपुल्या घरीं जेवावया ॥१७॥
श्रीमंत जनांचे घरीं असत । पंचपक्वान्नें प्रसादार्थ । परी विनायक प्रथम जात । शुक्ल ब्राह्मणाच्या घरीं ॥१८॥
मित्रांसह कुत्सित अन्न खाऊन । संतुष्ट झाला गजानन । शुक्लास देई अपार धन । नंतर घेई अनंतरुपें ॥१९॥
काशी नगरींत घरोघर । जाऊन करी आहार । त्यासमयीं सनक सनंदन भिक्षापर । पाहती त्या काश्यपातें ॥२०॥
घरोघरीं तो भ्रष्टाचार युत । विनायक ते मुनी पहात । काशी सोडून क्षुधायुत । निघून ते दोघे ॥२१॥
नंतर विनायक स्वरुप दाखवित । तेव्हां त्यांची दूर होई भ्रांत । आनंदानें शरण जात । सनक सनंदन मुनी त्यासी ॥२२॥
तयांना गाणेशक ज्ञान । शिकवून केले त्यानें महान । स्वभावें गाणपत्य होऊन । संचार करिती ते दोघे ॥२३॥
काशीराजास नव्हतें विदित । विनायकाचे कृत्य हें अद्‌भुत । शुकलाच्या घरी तो जात । विनायकासी आणण्या ॥२४॥
गणेशास पालखींत बैसवून । करी नृपति उत्सव महान । स्वगृही जाण्या निघतां विघ्न । तेव्हां एक ओढवले ॥२५॥
विद्युत्‌रुप दैत्य दोन । खालीं येती नभांतून । त्यांची शेंडी पकडून । आपटिलें परस्परांवरी ॥२६॥
नंतर दूर त्या भिरकावीत । नरांतका सांगती ते वृत्तान्त । काशी नृप राजवाडयांत । तेवढयांत प्रवेशला ॥२७॥
तिकडे नरांतक अत्यंत । वृत्त तें ऐकून क्रुद्ध होत । काशीवरी चालून जात । जन भयभीत जाहले ॥२८॥
नगरद्वार लावून घेती । काशी निवासी जात राजाप्रती । म्हणती नरांतक येत निश्चिती । संरक्षण करा आमुचें ॥२९॥
तेव्हां सर्व सैन्य सज्ज करित । काशिराजा जाई रणांगणांत । त्या दैत्यांसह युद्ध करित । दुर्दैवें पकडला शत्रूनें ॥३०॥
नंतर विनायक क्रोधयुक्त । सिद्धीस आपुल्या आज्ञा देत । तेव्हां ती महासैन्य निर्मित । काळरुप तें भयंकर ॥३१॥
त्यांतील एक नायक क्रूर । गणनायका नमून वीर । शत्रुसेना भक्षण्या सत्वर । निघाला तेव्हां त्वेषानें ॥३२॥
नरांतकासी पकडून । विनायकासमोर नेऊन । म्हणे यासी करावें शासन । आपणची श्रीगणेशा ॥३३॥
तेव्हां विनायक मुख उघडित । नरांतकासी लीलया गिळित । त्याच्यासह काशीराजाही जात । तेव्हां उदरांत विनायकाच्या ॥३४॥
परी काशीराजासी संरक्षित । त्यास दाखवी चमत्कार अद्‌भुत । आपुल्या जठरीं विश्व दाखवित । नंतर बाहेर काढला ॥३५॥
रोममार्गे बाहेर पडत । तें पाहून दैत्यराज विस्मित । लीलेने त्यासही बाहेर फेकित । कश्यपात्मज त्या वेळीं ॥३६॥
नरांतक विचार करी मनांत । ब्रह्ममय हा देव असत । याच्या हस्तें मरण येत । तरी ते सुमंगल मजलागीं ॥३७॥
तेणें मुक्तिलाभ मज होईल । ऐसा विचार करुन विमल । युद्ध करुं लागें सबल । नरांतक तो विनायकाशीं ॥३८॥
तेव्हां विराट रुप घेऊन । केलें दैत्यराजाचें हनन । त्याचें मस्तक तुटून । उडालें दूर त्या वेळीं ॥३९॥
तें शिर पडलें पुढयांत । नरांतकाची माता पाहत । जनकही होत दुःखित । पुत्रशोक भयंकर ॥४०॥
त्यांचा अन्य सुत राज्य करित । देवांतक नामा स्वर्गांत । नरांतकाचे शिर घेऊन जात । स्वर्गांत सत्वर मातापिता ॥४१॥
त्यांचा ऐकून वृत्तांत । देवांतक क्रोधसमायुक्त । काशीवरी चालून जात । तत्क्षणीं तो असुरेन्द्र ॥४२॥
महाघोर युद्ध होत । तेव्हां विनायक शौर्ये लढत । गजानन स्वरुप दाखवित । तेव्हां देवांतक काय करी ॥४३॥
झडप घालून वाम दंत । गजाननाचा तो मोडित । परी त्या भग्नदंते क्षणार्धांत । विघ्नपें त्यास मारिलें ॥४४॥
तेव्हां देव हर्षयुत । देवर्षि मोदें स्तवन करित । नृपासह प्रवेशत । काशी नगरींत विनायक ॥४५॥
राजपुत्राचा विवाह लावित । सुमुहूर्त पाहून आनंदांत । राजा विनायकासी संमानित । स्वाश्रमीं परतण्या उत्सुक तें ॥४६॥
ढुंढी विनायक काशींतून । जाणार आतां परतून । ही वार्ता शोकप्रद ऐकून । प्रजाजन जमलें क्षणार्धांत ॥४७॥
आपापलें घर सोडून । विनायका प्रार्थित उत्सुकमन । चलावें आम्हांसही घेऊन । आपुल्या सवें विनायका ॥४८॥
तेव्हां त्यांसी ज्ञान सांगत । म्हणे मी सदैव तुमच्यांत । तें समजतां शांतियुक्त । प्रजाजन घरीं परतले ॥४९॥
काशीराजासह स्वाश्रमांत । ढुंढी विनायक परतत । नंतर नृपास निरोप देत । काशीस परतला तो आनंदे ॥५०॥
तदनंतर काशी क्षेत्रांत । ढुंढी विनायकाची स्थापना करित । नृप कैसे प्रजाजन पूजित । भक्तिभावें नित्य त्यासी ॥५१॥
तिकडे आश्रमांत विनायक सांगत । आपुल्या मातापित्याप्रत । भूमिभार हरण्या अवतार घेत । कार्य पूर्ण तें मीं केलें ॥५२॥
अदिती कश्यपां विनवित । आज्ञा द्यावी जातों परत । स्वानंदलोकीं मी त्वरित । ऐकोनि दोघे गहिंवरलीं ॥५३॥
विनायक त्यांचें सांत्वन करित । सत्य ज्ञान त्यांसी देत । त्याचें मन करुनिया शांत । अंतर्धान पावे तत्क्षणीं ॥५४॥
अदिती कश्यपानें स्थापिली । गणेशाची मूर्ति भली । विनायक नामें ख्यात झाली । सुखप्रद भाविकांसी ॥५५॥
गृत्समद प्रल्हादा सांगत । मुद्‌गलांचा उपदेश ऐकत । काशीराजही सदेह जात । स्वानंदलोकीं गणेशाच्या ॥५६॥
हें सर्व विनायक चरित्र । संक्षेपें कथिलें तुजप्रत । अवतार घेऊन एकदंत । लीला बहुविध दाखवी ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद‍गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते विनायकचरितं नाम द्विषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP