मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ४२

खंड २ - अध्याय ४२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद म्हणती यंज्ञात । च्यवन अश्विनांसी बोलावित । त्यांना देण्या उद्यत । तेव्हां इंद्र त्यासी म्हणतसे ॥१॥
अश्विनद्वय हे देववैद्य । त्यांची योग्यता न यज्ञांत । म्हणोनी यज्ञभागांत । स्थान सर्वथा न द्यावें ॥२॥
परी च्यवन त्याचें न ऐकत । अश्विनांसी बोलावित । तो यज्ञांत मुख्य असत । म्हणोनी इंद्र क्रुद्ध झाला ॥३॥
त्या च्यवन मुनीस रागें सांगत । जरी यज्ञस्थलीं अश्विनद्वय येत । तरी वज्रानें मी त्यांसी त्वरित । ठार करीन निःसंशय ॥४॥
परी च्यवने तें न मानिलें । त्यानें आश्विनांसी आवाहन केलें । तेव्हां यज्ञस्थळीं आले । अश्विनीकुमार त्या वेळीं ॥५॥
इंद्रे वज्र मारण्या उगारिलें । परी च्यवनें तेव्हां त्यास रोखले । तपःप्रभावें स्तंभित केलें । वज्रहस्त त्या इंद्रासी ॥६॥
पुरंदरा स्तंभित करुन । स्वप्रभावें मद निर्मून । म्हणे करी या इंद्रास शासन । तेव्हां मद त्वेषे धावला ॥७॥
देव तैसे मुनी विस्मित । महामुनी च्यवनाचें तेज अमित । पाहून त्या मदासुरासी होत । भयभीत सारे मानसीं ॥८॥
विकराल मुख तो वीर । आकाशासी चाटू लागे दुर्धर । अंजनाद्रीसम कृष्णवर्ण असुर । मद नामा भयंकर ॥९॥
त्यासी पाहून धावत । यज्ञ सोडून देवमुनी समस्त । दशदिशांत आश्रय शोधित । मदासुर गेला इंद्रासमीप ॥१०॥
इंद्रासी ग्रासूं पाहत । तेव्हां देवराज झाला भयभीत । च्यवनासी शरण जात । प्राणभयें सुरराजा ॥११॥
तो च्यवनासी सांगत । अश्विनांसी यज्ञभागांत । मी मान्यता आतां देत । मदापासून रक्ष मला ॥१२॥
विप्रेशा हा मज ग्रासील । निःसंशय मृत्यु मज येईल । शरणागतेसी तो अमल । च्यवन अभय देता झाला ॥१३॥
तो भार्गव तपें निवारित । मदासुरासी त्वरित । यज्ञ समाप्त होता जात । परतून च्यवन पितृगहीं ॥१४॥
पत्नीसहित प्रणाम करित । योगविद श्रेष्ठा भृगूंस विनत । तोही पुत्रासी संमानित । तपःसिद्धियुक्त जो ॥१५॥
च्यवन जनकाची सेवा करित । एकदा त्यांसी भृगु सांगत । परम तत्त्ववेत्ता कृपायुक्त । ज्ञानसिद्धिस्तव स्वपुत्रासी ॥१६॥
पुत्रा तूं दुःखद कृत्य केलेंस । स्वतपें मदासुरा निर्मिलेंस । देवेंद्रा जो भय देत राक्षस । मदयुक्त कर्म करीतसे ॥१७॥
तरी योगसेवेनें त्याग मदास । ऐक माझ्या वृत्तांतास । पूर्वी मीही मदयुक्त मानस । तपोवीर्ये जें कृत्य केलें ॥१८॥
सतत तप मी आचरित । तपो बलें श्रेष्ठ झालों मुनींत । एकदा गौतमीतटीं भेटत । मुनिजन समस्त कुम्भपर्वी ॥१९॥
सिंहस्थ गुरु असता होत । वाद मोठे सर्व मुनींत । कोण श्रेष्ठ असे सर्व देवांत । ब्रह्मदेवांचे नाव घेतलें म्यां ॥२०॥
पितामहास श्रेष्ठ मी मानित । सगुण ब्रह्मरुप सर्व स्त्रष्टा असत । महात्मा जो सर्व गुणयुक्त । सर्वांत मोठा देव वाटे ॥२१॥
कोणी भिन्न देहधर शिवास मानित । कोणी विष्णूस श्रेष्ठ म्हणत । ब्रह्मा विष्णु शिवांत । कोण श्रेष्ठ हा वाद चाले ॥२२॥
तेव्हां सर्व मुनींनी मज पाठविलें । तपःसिद्धत्वें मज मानलें । परीक्षा घेण्यास तपो बळें । त्रिमूर्तीची मज पाठविती ॥२३॥
मी पितामहा श्रेष्ठासी जाणत । त्यासी भेटण्या प्रथम जात । त्याचे परीक्षा पाहण्या उद्यत । विश्वेश महासनीं बसला होता ॥२४॥
त्यास मी प्रणाम केला । परी पितामह मजवरती कोपला । मय त्या वेळीं म्हणाला । मदोन्मत्ता कां आलासी? ॥२५॥
आता तूं दुर्बुद्धे स्वगृही जावें । तेव्हां मी वदलों शोधकभावें । आपण स्वसुतेसी कोणत्या स्वभावे ।पकडलें सांगा पत्नी म्हणोनी ॥२६॥
त्या वेळी ताता दुर्बुद्धी कोणती । सुचली होती तुम्हांप्रती । ऐसी ऐकता दुरुवित । क्षुभित होऊन ते शापोद्यत ॥२७॥
तातास मी तत्क्षण घालित । साष्टांग दंडवत भक्तियुत । महाभागा क्षमा करावी त्वरित । परीक्षार्थ विप्रें मज पाठविलें ॥२८॥
पितामहा तूं सर्व भावें श्रेष्ठ । तुजहून अन्य कोण वरिष्ठ । ऐसी विविध वाक्यें स्तुतिपाठ । गाऊन गेलो कैलासा मी ॥२९॥
मज पाहून तापसातें । शिवें आलिंगन देण्यातें । येता पुढती मी त्यातें । दुर्वचन बोललों परीक्षार्थ ॥३०॥
निजभक्त सुखकारक असत । शिव परी मी त्यास म्हणत । अरे पिशाच्चेशा वर्णाश्रमवर्जित । स्पर्श मजला करुं नको ॥३१॥
नररुंडाच्या माळा घालिसी । अत्यंत अपवित्र तूं अससी । नांव शिव परी आशिव वाटसी । ज्ञात मज तुझें चरित ॥३२॥
ऐसें माझें वचन ऐकून । सदाशिव क्रोधयुक्त होऊन । उघडून आपुला तृतीय नयन । मज जाळण्या उद्युक्त झाला ॥३३॥
तेव्हां त्यासी मी स्तवित । साष्टांग दंडवत घालित । परीक्षा बघण्या केलें म्हणत । ऐसें कृत्य क्षमा करावी ॥३४॥
ब्राह्मण मी हें जाणून । शंकर आपुला आवरी ईक्षण । गेलों मी कैलासाहून । वैकुंठलोकीं तत्क्षण ॥३५॥
लक्ष्मीसहित विष्णूस पाहत । मानसी होत हर्षभरित । तोही वंदन करण्या उद्युक्त । तेव्हा निर्भर्त्सना मीं केली ॥३६॥
माझ्या पायास स्पर्श न करी । दुर्मती तूं स्त्रीवेषधारी । म्हणोनी मलिन फार अंतरीं । माझी स्त्री तूं पळविली ॥३७॥
अरे दुष्टा निंद्य कर्म । केलेंस ऐसें बहुविध वर्म । बोलून बहु निंदिला परम । परी विष्णू न कोपला ॥३८॥
करसंपुट जोडून । पादस्पर्श करण्या उद्यत होऊन । जेव्हां वाकला विनम्र होऊन । तेव्हा क्रोधें ताडिला हृदयीं ॥३९॥
जरी मी लाथ मारिली । परी ती त्यानें सहन केली । क्रोधाची छटाही न उमटली । पुनरपि पकडिला चरण माझा ॥४०॥
लत्ताप्रहार मज केलात । आपण अत्यंत श्रमलात । ऐसें म्हणोनी पाय पकडित । चेपूं लागला प्रेमभावें ॥४१॥
ते भृगुपादांकित लांछन । ब्राह्मणप्रेमें करी धारण । त्या वेळपासून लक्ष्मीरमण । निश्चय करुन मी परतली ॥४२॥
ब्राह्मण संसदेत परतत । माझा निर्णंय सांगत । कथून सर्व वृत्तान्त । नारायण श्रेष्ठ त्रिमूर्तीत ॥४३॥
जेथ क्षमा विराजत । तेथ सर्व प्रतिष्ठित । क्रमशः सर्व लाभत । क्षमायुक्त अन्तःकरणें ॥४४॥
नंतर मी वैष्णव होत । विष्णुपरायण सतत । एकदा दक्षयज्ञांत । विष्णु दैवत होता ॥४५॥
शंभूस सोडून मुख्यत्व हरीस । यज्ञकर्मांत त्या सुरस । पाहून यज्ञकर्म प्रवर्तकपदास । आनंदानें स्वीकारिलें मीं ॥४६॥
तेथ सती दग्ध होत । शंभू जाहला कोपसमन्वित । सतीचा मृत्यू ऐकतां त्वरित । गणांसमवेत येत शंभू ॥४७॥
विष्णूस जिंकून दक्षा मारिलें । यज्ञसत्र तें नाशिलें । माझें चिबुक त्यानें केले । अजाचें तेव्हां क्रोधानें ॥४८॥
नंदी मज शापित । तेणें मी वारुणी होत । तेव्हां मानसीं मी विस्मित । शंकरासी स्मरीतसे ॥४९॥
कालरुपी स्वयं शंभू असत । कालाधीन हें जग समस्त । ईश्वर हा शिव वर्णित । त्याहून श्रेष्ठ कोणी नसे ॥५०॥
ऐसा विचार करुन । करुं लागे चित्तीं ध्यान । त्या शंकराचें रात्रंदिन । शैव मी तेव्हां जाहलों ॥५१॥
भस्म अंगी लिंपित । नाना पाशुपत मार्गे भजत । शंकरासी भक्तियुक्त । पुढें ऐसें जाहलें ॥५२॥
एके दिवशी महाबल क्षेत्रांत । शैवस्थानीं यज्ञ करित । देवगणांसहित मुनींसमवेत । ब्रह्मदेव भक्तिभावें ॥५३॥
तेव्हां त्यांच्या महायज्ञांत । गणेशासी ते विसरत । उषःकालीं प्रारंभित । ज्येष्ठपत्नी वाचूनी ॥५४॥
गायत्रीसी महत्त्व देत । धर्मपत्नी तेज मानित । महासती सावित्री कोपसंयुक्त । सर्व देवांस शाप देई ॥५५॥
तुम्ही देवगण पावाल समस्त । जळरुप या पुढतीं निश्चित । तुम्हीं मज ज्येष्ठ भार्येस सोडून सांप्रत ॥५६॥
जलरुप सारे देव होत । शंभुमुख्यही समस्त । देवादिक तप करित । गणेशाचें भक्ति भावें ॥५७॥
त्यांच्या तपाने प्रसन्न होत । पुनरपि देवभाव त्यांस देत । गणेश त्यावरी कृपा करित । अंशही जळीं न राहिला ॥५८॥
तेव्हां मज जाहला ज्ञात । विघ्ननाशक गणेश पुनीत । सर्व सत्ताधारी असत । निरंकुश स्वतंत्र ॥५९॥
पुनरपि यज्ञ ध्वंसित । पुनरपी देव जलचर होत । पुन्हां भक्तिभाव संतुष्ट । देवरुप देई तयांसी ॥६०॥
सर्वत्र तो संस्थित । म्हणोनी ऐसें करी अद्‌भुत । ऐसा विचार करुन चित्तांत । झालों रत गणेशभजनीं ॥६१॥
नंतर एकदा व्यास भेटत । भाग्यवशें मजप्रत । त्या महामुनीस मीं म्हणत । आपण कर्ते वेदशाखांचे ॥६२॥
वेद पुराणींचे सार सर्वसंमत । आपणासी आहे ज्ञात । दयासिंधो सांगा तें मज त्वरित । जेणें शांती लाभेल नर ॥६३॥
तेव्हां तो महाभाग सांगत । गणेशपद मज प्रत । जें उत्तम पुराण असत । गणनाथाचें सुखप्रद ॥६४॥
नंतर योगमार्गे पुजून । गणेश्वरा सर्व भावें करुन । मदादी सर्व सोडून । शांतिलाभ मज झाला ॥६५॥
मदानें परिभ्रष्ट झालों । परीक्षा घेण्या गेलों । सर्वज्ञ मी अंती ठरलों । परीक्षेत माझ्या पुत्रा ॥६६॥
म्हणोनि तूं विघ्नेशा भजावें । अंती शांतीसी मिळवावें । सर्वत्र गणपतीसी पहावें । गाणपत्य तें होशील ॥६७॥
सर्वत्र होता मद संस्थित । आता तुझ्यांकडून होता त्यक्त । हा पापी पीडील जग समस्त । हयात मुळीं नसे ॥६८॥
मदयुक्त तपें काय केलेंस । दुःखद कर्म हें विरस । आता भक्तीनें करी भजनास । गणेशाच्या योगयुक्त ॥६९॥
ऐसें सांगून सर्वार्थकोविद । थांबला सांगून योग शांतिद । साक्षात्‍ गाणपत्य सुखद । महायशा तो प्रल्हादा ॥७०॥
ऐसें हे भृगुचरित्र वाचील । अथवा जो प्रेमें ऐकेल । तो सर्व ईप्सित लाभेल । यांत संशय मुळीं नसे ॥७१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते भृगुचरित्रं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP