मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ३६

खंड २ - अध्याय ३६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । अंगिरसाचे तीन सुत । ब्रह्मवादी होते प्रख्यात । गाणपत्य महाभाग सर्वज्ञ असत । सुखदायक सर्वांसी ॥१॥
उतथ्य प्रथम बृहस्पति दुसरा सुत । संवर्त हा तिसरा असत । संवर्त योगशास्त्री परायण होत । उतथ्य विशेषज्ञे गाणपत्य ॥२॥
अंगिरस उतथ्यास शिकवित । अल्पकाळांत तो ब्रह्मज्ञ होत । बृहस्पति क्रमानें पावत । योगभूमींत पांडित्य ॥३॥
त्या योगपालनीं तत्पर । तो स्वभावें झाला शिवभक्तिपर । तेथ स्वाधीनता पाहून सत्वर । शांतिलाभार्थ शंकरा भेटे ॥४॥
शिव त्यासी मंत्र देत । गणराजाचा षडक्षर प्रख्यात । शांतियोगाचें रुप सांगत । विस्तारपूर्वक ॥५॥
नंतर शिवासी नमून जात । दक्ष बृहस्पति तो वनांत । नित्य गणपतीचें ध्यान करित । पूजी तया विधिपूर्वक ॥६॥
गणेशाचें दर्शन व्हावें । लालसा ऐसी उदय पावे । चित्तांत त्याच्या त्यानें आघवें । जीवन झालें गणेशमय ॥७॥
तो योगी योगमार्गे होत । शांतिधर गाणपत्यांत । शिवतुल्य बृहस्पतीप्रत । गणेश तोषून प्रकटला ॥८॥
त्याच्या आश्रमीं जात । बृहस्पति त्याची पूजा करित । स्तुति करी भक्तियुक्त । तोषला गणनायक तेव्हां ॥९॥
अखंड भक्तिभावाचा वर । त्या महात्म्यासी देई सत्वर । अंतर्धान पावून उदार । गणेश गेला अपुल्या लोकीं ॥१०॥
म्हणती महायोगी बृहस्पति । तेव्हापासून या जगतीं । ब्रह्मिष्ठांत श्रेष्ठ विभूति । ऐसा ख्यात जाहला ॥११॥
गुरु प्रारंभी उपेक्षित । संवर्तासी तो संसार त्यागित । उन्मत्तापरी नग्न हिंडत । काशीत ब्रह्मध्यान करी ॥१२॥
पुढें एकदा राजा मरुत्त । बृहस्पतीसी स्वर्गीं भेटत । यज्ञांत उपाध्याय व्हा विनवीत । तेव्हां इंद्र म्हणे देवगुरुसी ॥१३॥
हा मरुत्स्पर्धक राजा असत । नका जाऊ त्याच्या यज्ञांत । आपण देवगुरु प्रख्यात । एक पक्ष घ्या कोणताही ॥१४॥
देवांचा वा मनुष्यांचा । ऐसी देवेंद्र वदला वाचा । तेव्हां पक्ष मानवाचा । सोडिला त्या बृहस्पतीनें ॥१५॥
मरुत्त परतला मनीं खिन्न । तेव्हां नारदमुनी त्यास भेटून । म्हणती काशींत जाऊन । संवर्तकासी गुरु करे तूं ॥१६॥
जडोन्मत्त स्वभाव तो मुनीश्वर । जाणतो सारें धर्माशास्त्र । दर्शनासी नेमें मुनिवर । जातसे प्रातःशंकराच्या ॥१७॥
एखादें शव घेऊन । दारांत थांब पहाटें जाऊन । तरी विमुख तो आत्म हीन । शवा पाहून परतेल ॥१८॥
ऐसें सांगून नारदमुनी । गेले तेथुनी परतोनी । मरुत्त राजा धर्मज्ञानी । करिता झाला तैसेंची ॥१९॥
काशीत जाऊन भेटत । संवर्तकास प्रभातीं अडवित । नारदोक्त युक्ति करित । योग्यासी त्या प्राथितसे ॥२०॥
नग्न स्थितींत जो हिंडत । त्या संवर्तका गुरु मानित । मरुत्त राजाचा वृत्तान्त । ऐकून मुनी द्रवला मनीं ॥२१॥
मरुत्ताची प्रार्थना मानित । यज्ञ करण्या काशीस जात । त्या राजर्षीचा उपाध्याय होत । देवगुरुसी कळलें तें ॥२२॥
बृहस्पति मरुत्तास सांगत । मी तुझा गुरु असत । माझ्या अनुजाचा संग तूम धरित । तरी फसविसी मजला तूं ॥२३॥
परी मरुत्तानें त्याचें वचन । न ऐकिलें म्हणून । बृहस्पतीची प्रेरणा लाभून । त्यावरी इंद्रे वज्र सोडिलें ॥२४॥
आपुल्या समाधीच्या बळें करित । निष्फळ व्यर्थ तो वज्राघात । तेव्हां इंद्र देवगणांसहित । संवर्तकासी शरण गेला ॥२५॥
नंतर देवगण मुनींसहित । मरुत्ताच्या यज्ञीं विराजत । त्याचा यज्ञ होता समाप्त । संवर्त गेला स्वस्थळासी ॥२६॥
समाधी तत्पर तो जाणित । जरी शांभवयोग सर्वगत । परी ब्रह्मशांतिप्रद योग प्राप्त । तयासी न जाहला ॥२७॥
म्हणोनी अंगिरसा भेटत । तेव्हां तो त्यासी विशद करित । शांतिप्रद योग परमाद्‌भुत । साक्षात्‍ गणेश हाची असे ॥२८॥
संवर्त तो योग साधित । शांतिरुपधर योगी होत । स्वानंदरुपी क्षेत्रांत । येऊन राहिला तदनंतर ॥२९॥
मयूरेशासी तेथ सेवित । भक्तिपर तो योगी संवर्त । त्याच्या कुळातले पुत्र होत । महाभाग सर्वज्ञ ॥३०॥
ते सर्वही गाणपत्य होत । दीर्घतमस्कादि प्रख्यात । त्यांचे पुत्रही अखंडित । गणेशास मनोभावें स्मरती ॥३१॥
त्यांत गौतम मुख्य असत । शांतिमार्गपरायण विख्यात । जाहला मुनिवर्गांत । ऐका दक्षा प्रजापते ॥३२॥
एकदा पृथ्वीवरती । दारुण अनावृष्टीची आपत्ति । कोसळली बारा वर्षे त्यात लोटली । संपीडित सारें जग ॥३३॥
लोकांची पीडा पाहून । दयार्द्र झालें गौतमाचें मन। शंकराचें करी स्तवन । प्रार्थी वृष्टिहेतूस्तव तया ॥३४॥
तेव्हां शंकर प्रकटून । भक्तोत्तमा त्या बोले वचन । ब्रह्मरुपी काळानें दृढ मन । ही अनावृष्टि योजिली असे ॥३५॥
त्या काळाचा प्रतिकार करित । ऐसा न कोणी ब्रह्मांडांत । त्याची योजना बदलवित । असा समर्थ कोणी नसे ॥३६॥
म्हणोनी अभिमान सोडून । मुनिसत्तमा करी सहन । काळाचें हें कृत्य महान । गौतम ऐकून खिन्न झाला ॥३७॥
शिवाचें ते वचन ऐकून । गौतमा बहु दुःख वाटून । तैसाचि विस्मय मुनीं उत्पन्न । म्हणे तेव्हां तो शिवासी ॥३८॥
नाथा हें काय सांगसी । तूं सर्वसंमत ईश अससी । माझी प्रार्थना न ऐकसी । तरी देहत्याग करीन मी ॥३९॥
गौतमाचा तो अभिमान । पाहून शंभू विस्मित मन । त्याचा सात्विक भाव जाणून । सांगे मुनिसत्तमा गौतमासी ॥४०॥
गौतमा वृथा कां देह त्यजिसी । विनायका कां तूं न भजसी । त्यासी भक्ति करणारासी । मनोवांछित प्राप्त होतें ॥४१॥
याचा नायक कोणी नसत । म्हणोनि नाय्क विहीन असत । सर्वश्रेष्ठ नायक विश्वांत । प्रख्यात विनायक नामानें ॥४२॥
आम्हीं त्याची आज्ञा पाळतों । वेहमार्गासी अनुसरतों । वेदमार्गापासून जरी होतो । भ्रष्ट तरी तो दंड करी ॥४३॥
विघ्नें निर्मित दूर करित । म्हणोनि हा विघ्नराज ख्यात । त्यासी शरण जा तूं त्वरित । गौतमा तेणें इष्टलाभ ॥४४॥
ऐसें बोलून गौतमास देत । षडक्षर मंत्र गणेशाचा पुनीत । मंत्रराज त्यास सांगत । गौतमें तो स्वीकारिला ॥४५॥
शंकरासी प्रणाम करुन । तप करी वनीं जाऊन । महा उग्र समाधि साधन । करुन तोषवी विघ्नपासी ॥४६॥
एक वर्ष ऐसें जात । त्याच्या तपानें संतोष पावत । ढुंढी वर देण्यास येत । गौतमास सुख त्या वेळीं ॥४७॥
होऊन मनीं हर्षित । पुनःपुन्हा त्यास प्रणाम करित । अथर्वशीर्ष त्यास स्तवित । गणनायका गजाननासी ॥४८॥
तेव्हां बोले गजानन । गौतमा वांछित करी कथन । तेव्हा गौतम बोले वचन । भक्ति दृढ करी माझी ॥४९॥
संपूर्ण गाणपत्य मजला करी । दुष्काळाचें दुःख हरी । प्राणिमात्रांते सुखी करी । हेंच वरदान मज द्यावें ॥५०॥
गणाध्यक्ष त्यासी म्हणती । मुनिसत्तमा तुझ्या जें जें चित्तीं । तें तें सफल होईल निश्चिती । आश्रम तुझा सुख पावेल ॥५१॥
तुझ्या आश्रमाची ख्याती । ऐसी होईल जगतीं । सायंकाळी बीज पेरिती । प्रातःकाळी तें पिकेल ॥५२॥
त्या धान्यानें महामुनींना । पोसावें तूं अतिथिजनां । तुझ्या आश्रमांत लोकांना । सवृष्टाचे फळ मिळेल ॥५३॥
नित्य प्रमुदित ते होतील । दुःखें सारीं हरतील । माझी भक्ति दृढ होईल । तुझ्या मनांत सर्वदा ॥५४॥
योगशांतिश्वर तूं होईल । माझ्या प्रसादें सर्व लाभेल । ऐसें बोलून वचन अमल । गणेश स्वानंदलोकीं गेले ॥५५॥
त्या दिवासापासून । गौतम गाणपत्य झाला महान । आपुल्या आश्रमांत जाऊन । गणेशआज्ञा पाळी तो ॥५६॥
अनावृष्टीचें भय गेलें । सर्व जन संतुष्ट झाले । नाना दिशांतून जे आले । त्या सर्वांपोशित गौतम ॥५७॥
ऐसीं बारा वर्षें लोटत । धान्यसमृद्धी गौतमाश्रमांत । पुढें अनावृष्टि संपून वृष्टि होत । सर्वत्र दुःखहारिणी तें ॥५८॥
तेव्हा सर्व मुनिगण विचार करिती । विपरीत बुद्धि त्यांची निर्मिती । गौतमें पौषिलें आम्हांस जगती । हयांत संशय काहीं नसे ॥५९॥
परी तेणें सर्वांत । गौतमास श्रेष्ठत्व लाभेल जगांत । त्याचा उत्कर्ष नाश कैसा होत । याचा विचार करावा ॥६०॥
ते द्विजोत्तम झाले अधम । मायेची गाय निर्मून । गौतमाच्या समीप नेऊन । ठेविती ती हेतूनें ॥६१॥
ती मायावी गाय खात । हविर्द्रव्य गौतमाचें क्षुधित । गौतम स्वहतें हाकलित । हळुवारपणें त्या गायीस ॥६२॥
परी त्याचा स्पर्श होत । तत्क्षणीं गाय मरुन पडत । घरांत अकस्मात । हाहाकार सर्वत्र जाहला ॥६३॥
तेव्हा सर्व ब्राह्मण म्हणत । छद्मीपणें गौतमाप्रत । गोहत्या घडली पाप अत्यंत । आता तुजसी लागलें ॥६४॥
आम्हीं जातों आश्रम सोडून । पाप्याचा संग दुःखद म्हणून । तेव्हां गौतमें तप करुन । प्रार्थिलें सुरनदी गंगेसी ॥६५॥
स्वर्गांतून गंगा अवतरत । त्र्यंबकाच्या जटाभारांत । पुढें वाहे जगतांत । गंगास्नानें पावित्र्य लाभे ॥६६॥
गौतम गंगाजळांत । स्नान भक्तिभावें करित । गोवधादि पापें क्षणांत । धुऊनी जाती स्नानमात्रें ॥६७॥
नंतर एकदा ध्यानशित । गौतममुनीच्या चित्तांत । विचार उपजला गोवधसंबंधांत । तें कपट द्विजांचें उमजला तो ॥६८॥
छळणूक माझी विप्रें केली । मायावी धेनू निर्मिली । त्या करणीची पाहिजे स्वीकारली । आता शिक्षा तयांनी ॥६९॥
ज्या विप्रांनीं हें कृत केलें । क्रोधें तयांसी गौतमें शापिलें । तेणें ते सर्वही झाले । वेदबाहय पातकी ॥७०॥
तेव्हां ते शापें भ्रांत । महर्षि झाले अति पीडित । शंकरासी शरण जात । शंकर स्मरे विष्णूसी ॥७१॥
महाविष्णूंसी विचारित । द्विजांचा शाप कैसा फिटत । तेव्हां हरि मार्ग सांगत । हरासी जो हितकारक ॥७२॥
वेदबाहय द्विजांचें कर्म । निरर्थक तें व्यर्थ अधम । त्यांसी गति न मिळे परी अधर्म । देहांतीही न सुरे ॥७३॥
म्हणोनी त्यांच्या हितास्तव । ग्रंथ रचावे सदाशिवा अपूर्व । जेणें मोह होऊन संभव । नरकलोकांत ते पडण्याचा ॥७४॥
नंतर शिवानें केलें प्रकाशित । वामाचार तंत्रग्रंथ जगांत । विष्णू बौद्धशास्त्र रचित । मोहदायक जें सर्वांसी ॥७५॥
ऋषींनीही शास्त्रें रचिलीं । कापालादि नावें ख्यात झालीं । त्यांची फळें जीं लाभलीं । दिली तीं कृतघ्न ब्राह्मणां ॥७६॥
शंभू आणि विष्णु करती । त्या ब्राह्मणांचे हित जगतीं । परी अन्य नर जे सेविती । त्या शास्त्रांसी ते नष्ट होत ॥७७॥
ऐशा शास्त्रांची सेवा करिती । ते अंती नरकांत जाती । इहलोकींही दुःख भोगिती । शास्त्राधार सोडल्यामुळे ॥७८॥
ते कृतघ्न पापयुक्त । कालांतरें नष्ट होत । कलियुगांग जन्म घेत । पापें करिती बहुविध ॥७९॥
त्यांच्या मार्गांत आसक्त । ते पडतील रौरव नरकांत । परी जन सर्वही कृतयुगांत । शुद्ध होतील पुनरपि ॥८०॥
म्हणोनी कृतघ्न मुनींस्तव रचिलीं । तीं शास्त्रें निंद्य झालीं । धार्मिकांनी ती पाहिजे त्यागिलीं । आपुल्या हितार्थ सर्वदा ॥८१॥
जें शास्त्र वेदाधारें युक्त । तेंचि जगती सुख देत । ज्यासी वेदाधार नसत । तें शास्त्र मोहक नरकप्रद ॥८२॥
कलिदोष विवर्जित । ऐशा मानवें त्या शास्त्रांत । होऊं नये आसक्त । गौतमशापें भयंकर जीं ॥८३॥
कलियुगांत ते महर्षि जन्मत । पापी ते नवनवीं शास्त्रें सांगत । ऐशा वेदबाहय शास्त्रांत । विश्वास कदापि न ठेवावा ॥८४॥
ऐसे हे गौतम माहात्म्य जो ऐकत । अथवा जो शुद्ध मनें वाचित । त्यासी इहपरत्र सुख लाभत । ऐसें मुद्‍गल सांगती ॥८५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते गौतमचरितं नाम षट्‌त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP