मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ३

खंड २ - अध्याय ३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्ष विचारी मुद्‌गलासी । नारायणें कैसें बोधिलें नारदासी । तें सांगावें योगींद्रा मजसी । कथामृतें मी अद्यापि अतृप्त ॥१॥
मुद्‌गल दक्षासी सांगती । एकदा नारद शंकरास भेटती । आपुल्या पर्यटनांत ते पाहती । शंकर पूजिति गणेशास तें ॥२॥
चिंतामणीची मूर्ति स्थापिली । रत्नखचित शुंडा दंडयुक्त भली । शंकरें भावभक्तीनें पूजिली । पाहून नारद विस्मित झाला ॥३॥
त्यास नमस्कार करित । परतूनी वैकुंठा जात । विष्णूसी विनयें प्रणाम करित । भक्ति संयुक्त विचारी ॥४॥
नारायणा तुज नमन । तूं साक्षात्‍ जगज्जीवन । संशय माझा दूर करुन । भक्ती माझी दृढ करी ॥५॥
गेलो होतों कैलासांत । शंकरा भेटण्या उत्सुक मनांत । तेथ तोही गणेशमूर्ति पूजित । महाभक्तीनें रोमांचयुत ॥६॥
आनंदाश्रू प्रवाह वाहत । प्रेमानें तो परिप्लुत । ऐश्या ध्यानस्थ शंकरा पाहत । मौन तेव्हां मी धरिलें ॥७॥
त्याला प्रणाम करुन । महाविष्णो आली तुज शरण । तूही गणराजाचा नाममंत्र महान । जपतोसी सर्वदा ॥८॥
शंकराहून कांहीं अन्य अव्यक्त । ब्रह्म नसें जगात । विकारहीन सर्वसिद्धिप्रद ख्यात । ऐसा महादेव गणेशा भजे ॥९॥
तूं नारायण सदानंद स्वरुप । सर्वात्मा महाशक्ति विराटरुप । ऐसे असतां स्मरसी योगप । गणेश्वर कोण तो? ॥१०॥
तूं त्यासीं कां पूजित । विश्वनाथ शंभूही कां उपासात । हा संशय केशवा त्वरित । दूर करावा सर्वज्ञा ॥११॥
रमानाथा तुज मी शरण । शिष्यभावें हात जोडून । मुद्‌गल म्हणती नारदवचन ऐकून । केशव झाले संतुष्ट ॥१२॥
नारदासी गणेशभक्तीसी । पात्र पाहोनी त्यांच्या मनासी । आनंद वाटून ते तयासी । म्हणति नारद ऐक आतां ॥१३॥
मी जें तुज सांगत । तें वाक्य संशयातीत । योगशांतिस्वरुप असत । गणेश हा निःसंशय ॥१४॥
सिद्धिबुद्धिपति स्थित । स्वानंदाख्य पुरीं साक्षात । त्या भक्तिभावें होत । आम्हीं सिद्धिदाते जगीं ॥१५॥
विनायक तो एक असत । आमुचा नायक प्रख्यात । त्यासी भक्तियुक्त पुनीत । योगशांतीस्तव आदरें ॥१६॥
एकदा मीही कैलासांत । गेलो होतों अवचित । तेथ कैलासीं शिवालयांत । शिव गणेशपूजा करी ॥१७॥
तें पाहून विस्मित । ती नित्यविधि पूजा संपत । तेव्हा आश्चर्यं त्या विचारित । तूं साक्षात सदाशिव ॥१८॥
विघ्नप निर्विकार मोहहीन । अव्यक्त ब्रह्म तोचि महान । ब्रह्मधिपतिसंज्ञ पावन । ऐसे कां म्हणतोसी ॥१९॥
कोण तो गणेश्वर नाम देव । सांग शंभो सर्वज्ञ तूंही देव । मी तुझा शिष्य सर्वथैव । संशय हरोनि तारी मज ॥२०॥
शिव सांगती तेव्हां मजसी । विष्णू तूं रहस्य विचारिसी । शांतिद योगसेवेनें तें भक्तासी । प्राप्त होय निश्चित ॥२१॥
योगपूर्ण गणेशनामें ख्यात । ब्रह्मभूयपदप्रद विश्वांत । पंचधा चित्तवृत्ति तीस म्हणत । बुद्धि ऐसें पंडितजना ॥२२॥
पंचभेदें सर्व सेवन करिते । परा प्रकृति समुदितचितें । मोहप्रद सिद्धि होते । नाना भरांत प्रकाशिका जी ॥२३॥
त्या सिद्धीस्तव चित्त । पंचधा ज्ञानयुक्त होत । धर्मार्थकाममोक्षाची सिद्धि जगांत । प्रत्यक्ष ब्रह्मभूयकरी ॥२४॥
ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । त्यास कैसी भरांति बाधत । धर्मार्थकाममोक्षांत । ब्रह्मभूत विभू जो ॥२५॥
ज्याचें चित्त पंचविध नसत । तेव्हां तो योगी होय निश्चित । गणेशअद्वैत त्यास लाभत । ऐसें विष्णो जाणावें ॥२६॥
संप्रज्ञात समाधिस्थ ‘ग’ कार । असंप्रज्ञातरुप णकार । त्यांचा स्वामी गणेश शांतियोगधर । वेदवादी बुध म्हणती ॥२७॥
नेतिरुप मी अव्यक्त । समात्मक तूं उक्त । जेथ तेथ भवात्मक । आपण सारे दिसतसों ॥२८॥
भवप्रत्यययोगस्थ । गणेश पंचधा होत । तो मायामय ऐसा वर्णित । वेदार्दीत केशवा ॥२९॥
मायाहीन गणेशान । उपायप्रत्ययात्मक महान । साक्षात्‍ गणेशरुपीं पावन । मायायुक्तिवियुक्तता नसे ॥३०॥
म्हणोनि तो शांतियोगेंच लाभत । न अन्यथा कोणत्या योगांत । सदा गणेश मी ब्रह्मपति विलसत । हा गाणपत्य योग असे ॥३१॥
याच विधीनें गणेश ज्ञान । होतसे त्यजी पंचविध चित्त तू सुजाण । चिंतामणि तू स्वयें होऊन । अनुभव आनंद सर्वदा ॥३२॥
ऐसें बोलू न महादेव अन्तर्धान । पावले परी तें ज्ञान । गणेशाचें अपूर्व पावन । ठसलें माझ्या हृदयांत ॥३३॥
नारदा तें तुज आज सांगितलें । गणेश आमुचे पददाते भले । ब्रह्मभूयप्रद कुलदेव शोभले । म्हणूनि आम्हीं भजतों त्यासी ॥३४॥
मुद्‌ग पुढिल कथाभाग सांगती । विष्णूस नमुनी नारद जाती । तपोवनांत ते आचरती । योगाभ्यास एकमनें ॥३५॥
गणेशातें मनीं ध्यात । उत्तम मंत्र मुखीं जपत । दहा वर्षांनी प्रसन्न होत । गणेश त्या मुनीवरी ॥३६॥
त्यातें समक्ष पाहून । विस्मित नारदाचें मन । गणपतीस कर जोडून । नमन करुनी स्तुति करी ॥३७॥
गणनाथासी वेदांतगोचरासी । सर्व विघ्नविनाशकासी । मनोवाणीविहीनासी । तज्ज्ञांसी गम्य ब्रह्मरुपा ॥३८॥
मनोवाणीमयासी । सिद्धिबुद्धिपतीसी ब्रह्मशानासी । नमस्कार ब्रह्मसंस्थितासी । प्रणाम तुजला हेरंबा ॥३९॥
तुझ्या दर्शनें मीं कृतकृत्य झालों । तुझ्या भक्तींत रमलों । तुझी पूजा करुन झालों । गणेशाना दास तुझा ॥४०॥
रोमांच उठलें शरीरावरती । नारदासी ऐसी भावभक्ति । पुनरपि स्तुतिस्तोत्र गाती । गणेशा तुला नमन असो ॥४१॥
विघ्नराजासी भक्तविघ्नहरासी । अभक्तां विघ्नकर्त्यासी । अमेयमाया युक्तासी । योगरुपा नमन तुला ॥४२॥
योग्यांसी मोहदायकासी । विनायकासी सर्वेशासी । चिंतामणीसी चंद्रमौलीसी । अनंत महिमाधरा नमन ॥४३॥
एकदंतासी परेशासी । मायिका मोहदायकासी । परात्परासी देवासी । निर्गुणा तुला नमन असो ॥४४॥
गुणाकारासी साक्षीसी । महामूषक वाहनासी । मूषकध्वजधारकासी । अनादीसी नमन असो ॥४५॥
ज्येष्ठराजासी ढुंढासी । हर्त्यासी तैसें कर्त्यासी । सदा संरक्षकासी तुजसी । नानाभेदमया नमन ॥४६॥
तुझ्या दर्शनाचें सुधापान । करी माझ्या भ्रान्तिज मारणाचें हनन । भिन्नभाव मावळून । गणेश तूं केलेंस मला ॥४७॥
तुझ्याविन कांहीं न दिसत । गणनायका तूंच सर्वांत । शांतिद योगाचा आश्रय घेत । तव कृपाप्रसादें यावेळीं ॥४८॥
गणाधीशा परा भक्ति । देई तव पादपद्मीं प्रीति । मज गाणपत्य करी चित्तीं । प्रेम सदा तुझें असो ॥४९॥
ऐसें बोलून नारद शान्त । जाहला तेव्हां गणेश सांगत । माझी भक्ति अत्यन्त । स्थिर होईल हृदयीं तुझ्या ॥५०॥
योगापासून च्युती । महामुने कदापी होणार ना जगतीं । सदा योगींद्र पूज्य प्रीती । सर्वमान्य तूं होशील ॥५१॥
तूं रचिलेलें हे स्तवन वाचील । अथवा जो हें ऐकेल । त्यासी शांतियोगप्रद हें होईल । भुक्तिमुक्ति प्रदायक ॥५२॥
ऐसा वर देऊन । नारदाच्या हृदयीं लीन । तेव्हां झाला गजानन । सर्वदा स्वचित्तीं पाही तया ॥५३॥
ऐसे हें नारदीय आख्यान । कथिलें तुज परम पावन । हें वाचता ऐकता रममाण । होतां सद्‌गति लाभेल ॥५४॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते नारदभक्तिवर्णन नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP