मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ६१

खंड २ - अध्याय ६१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढें सांगत । भरुशुंडी नित्य पूजा करित । बाह्य तैसी मानसी पूजा अविरत । गणेशाची यथाविधी ॥१॥
तूं जी मानसी पूजा विचारिली । ती आता सांगतों भली । ती करिता स्वल्पकाळी । गाणपत्य नर होईल ॥२॥
असुरोत्तमा प्रल्हादा जगांत । चतुर्धा मानस पूजा ज्ञात । साधारा द्विविधा असत । निराधाराही द्विविधा ॥३॥
मूर्ती गणेशाची हृदयांत । ध्याऊन उपचार सर्व अर्पित । मनानें देवासी पूजित । जाणावी पूजा तो साधारा ॥४॥
अन्या एकाग्रचित्तें ठेवित । सर्वत्र एकात्म भावना सतत । त्यायोगें भोगादी पूजन करित । ती जाण दुसरी साधार पूजा ॥५॥
एकात्म स्वरुपाचा आधार । लाभता ती पूजा साधार । सर्वात्म वर्जित निरोधकर । चित्तवृत्तीचा जयांत ॥६॥
मनोवाणीमय सर्व अर्पित । उपचार तेंच पूजन असत । प्रल्हादा पूजा ती निश्चित्त । निराधारा गणेशाची ॥७॥
चित्ताच्या पाचभूमींचा लय । करोनि समा स्थितीचा उदय । तेथ शांतिस्वरुप अभय । योगाकारें दिसत असे ॥८॥
योगांत विधिनिशेधादि समर्पित । उपचार तेच गणेशपूजेंत । शांतियोगें निराधारा म्हणत । योगीजन ह्या पूजेस ॥९॥
ऐसे चतुर्धा मानस पूजन । प्रल्हादा केलें भरुशुंडीने पावन । काशींत पावलें तें तत्क्षण । विनायकासी भक्तिभावें ॥१०॥
हें भरुशुंडीचें चरित्र वाचित । जो नरोत्तम अथवा ऐकत । दुसर्‍यांसी वा ऐकवित । त्यास स्वानंदलोक लाभे ॥११॥
जें जें तो वांच्छित । तें तें सर्व त्यास प्राप्त । महापुण्यकारक पुनीत । सांगितलें तुज हें कथानक ॥१२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते भरुशुंडिचरित नामैकषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP