मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय २२

खंड २ - अध्याय २२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल जडभरतकथा पुढें सांगती । तो योगी फिरे महीतलावरतीं । दैवयोगें मयूरेशक्षेत्रीं भक्ति । जडली त्या अंगिरसाची ॥१॥
तेथ पूर्वावतार गणेशाचा पाहत । जाणून मूढवत्‍ तेथ स्थित । अविरत गणेशाचें ध्यान करित । वर्षभरी तो अनन्य चित्तें ॥२॥
तेव्हा त्याच्या दर्शनार्थ येत । गणेश मूषकारुध प्रेमयुक्त । सिद्धिबुद्धीनीं तो समन्वित । त्यास जडभरत प्रणाम करी ॥३॥
कर जोडून करी स्तवन । रोमांचित काया अश्रूपूर्ण नयन । भक्तिभावीं निमज्जित मन । स्तुतिस्तोत्र तो गात असे ॥४॥
सिद्धिपतीसी भक्तभयभंजनासी । भक्तप्रियासी भक्तभक्तासी । बुद्धिपतीसी बुद्धिदात्यासी । सर्वविद्याकलात्म्यासी नमन ॥५॥
नाना विहारयुक्तासी । अनंतरुपासी अमेयासी । सदा योगशांतिस्थितासी । नमन माझें पुनःपुन्हां ॥६॥
धन्य मीं कृतकृत्य जगांत । गजाननाचे दर्शन पावत । वेदांदीसी जें न गोचर असत । कृपाप्रसादें सहज लाभलें तें ॥७॥
मीं काय केलें व्रत महान । म्हणोनि झालास मजवरी प्रसन्न । माझ्या भेटीस आलास धावून । भक्तिसम कांहीं प्रिय न तुज ॥८॥
हें मज आता समजत । हृदयीं तुझें ध्यान भक्तीनें करीत । जडासम होतों मी संस्थित । तूम मोहित माझ्या भक्तीनें ॥९॥
जगीं भक्तिसम अन्य न दिसत । तैसेंचि नसे ऐकिवांत । जिनें तू शांतियोग स्थित । मोहित होऊन आलास झणीं ॥१०॥
तुझ्या अंशापासून उत्पन्न । ब्रह्मनायका जातमात्र सानमहान । गणेशा काय देऊं नैवेद्य म्हणून । जेणें तुष्ट होशील तूं? ॥११॥
मीं तुज नमन करुन अर्पित । माझा हा देह भक्तिप्रेरित । ऐसा वर दे जेणें तृप्त । पूर्णांशाने होईन मीं ॥१२॥
तुझा चरणीं दृढ भक्ति । अव्यभिचारी जडावी प्रीति । दयासिंधो अन्य इच्छा न चित्तीं । दीननाथा गजानना ॥१३॥
ऐसें बोलून गणाध्यक्षा नमत । प्रेमानें तो योगींद्र नाचत । गणाधिप त्यास म्हणत । मुनिसत्तमा तृप्त होय तुझी इच्छा ॥१४॥
माझी भक्ति दृढ चित्तांत । अव्यभिचारें तुझ्या नांदत । तूं रचिलेलें हें स्तोत्र जगांत । होईल योगशांतिप्रद ॥१५॥
मज प्रीतिकर तें होईल । महाभागा सर्व इच्छित त्यास मिळेल । जो हें स्तोत्र वाचील । भक्तिभावें वा ऐकेल ॥१६॥
प्रजापते ऐसें बोलून । गणनाथ पावला अन्तर्धान । तो मुनी भक्तिपूर्ण मन । तिथेंच उभा राहिला ॥१७॥
अंतीं गणेशरुप होत । त्याची गुहा अद्यापी असत । गणेशोत्तर भागीं संमुख दिसत । एक कास ती दूर ॥१८॥
जडभरत अंगिरसाचें स्थान । तेंही तेथ पावन । त्याचें जे मानव घेती दर्शन । त्यांसी शाश्वत मुक्ति मिळे ॥१९॥
ऐसे दुसरे धर्मरत । झाले प्रियव्रत कुळांत । सर्वधर्मज्ञ नानादेव परायण असत । ते सारे भक्तियुक्त ॥२०॥
ऐसें हें परम अद्‍भुत । कथिलें भरताचें चरित्र तुजप्रत । ऐकता वाचितां भावयुक्त । भुक्तिमुक्तिप्रद असें ॥२१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते जाडभरतचरित नाम द्वाविंशोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP