खंड २ - अध्याय ४८
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढें सांगत । देवेंद्र ऐसें बोलून त्वरित । रणमंडळीं शरवृष्टी करी अविरत । तारकासुर सैन्यावरी ॥१॥
मंत्रित बाणाच्या प्रभावें होत । दैत्य संघात पीडित संत्रस्त । दैत्या सेनानायक सरसावत । देवसेनेवरी बाण सोडिती ॥२॥
देववीर अनेक हत । अनेक छिन्नांग रणीं पतित । मिळे तेथे पळून जात । भयभीत देवगण ॥३॥
प्रलयकाळीं त्राता नसत । प्रजेसी जेवी जगांत । तैसी देवांची स्थिति होत । संरक्षक कोणी नसे ॥४॥
पुनरपी देव धीर धरित । दैत्यांवरी बाणवर्षाव करित । तेव्हां राक्षस मरती बहुत । दैत्याधिप पुढे सरसावला ॥५॥
तारकें सुदृढ बाण ओढला । तो प्रज्वलित होऊन वेगें गेला । इंद्राच्या हृदयावरी पडला । तेणें मूर्च्छित झाला तो ॥६॥
परी क्षणानंतर सावध होत । वज्र घेई हातांत । दैत्यपुंगवा तारका ताडित । पडला तो धरापृष्ठीं ॥७॥
वरुण वन्ही वायु धर्म मारित । अनेक दैत्यांसी रणांत । हाहाकार तेव्हा माजत । दैत्यसेनेंत सर्वत्र ॥८॥
परी शुक्राचार्ये सावध केले । तारकादे असुर जे विद्ध झाले । संजीवनी विद्येचे झाले । प्रात्यक्षिक त्या वेळीं ॥९॥
तारक असुरांसहित । क्षणीं उठला रणभूमींत । अग्निमंत्रांने युक्त । ऐसा बाण सोडिला तेणें ॥१०॥
देवसेनेवरी तो पडत । तेव्हां एक अग्निपुरुष प्रकटत । तो देवांचे भक्षण करित । महाबळवंत प्रलयाग्निसम ॥११॥
अग्निज्वाला सर्वत्र पसरत । मेरु मंदारासम सर्वत्र संचरत । देवसंघासी जाळित । भयानक तो पुरुष ॥१२॥
हाहाकार माजला देवसैन्यांत । देव दशदिशा पळत । परी त्यांचा पाठलाग करित । आदि पुरुष त्यांसी भक्षण्या ॥१३॥
तेव्हा क्रोधसंतप्त । महेंद्र वारुणास्त्र सोडित । तेणें पर्जन्यवृष्टि होत । महावन्हि शांत झाला ॥१४॥
त्या अस्त्रानें अग्निपुरुष पडत । रणभूमीवरी पराजित । देवगण सावधान होत । दैत्यां संकट अतिवृष्टीचें ॥१५॥
मेघगर्जना भयंकर । वीज चमके सर्वत्र । विद्युज्ज्वालांनी दग्ध असुर । कालौघांतही वाहून गेले ॥१६॥
त्या असुरांचे रक्षण करित । तारक वायव्यास्त्र सोडित । मेघ पळाले दशदिशांत । देव सेना उडूं लागली ॥१७॥
पाला पाचोळा उडत । तैसे देवसैन्य समरीं पांगत । तारकासुर भयानक सरसावत । खड्गें हाणी इंद्रासी ॥१८॥
खड्गाचा होता आघात । देवेंद्र पडला मूर्च्छित । तेव्हां आपुल्या सेनेसहित । तारक स्वगृहीं परतला ॥१९॥
मदासुरासी मागें ठेवित । तो मूर्च्छित देवेंद्रा बोधित । पाश आवळले समंतात । अनाथ झाले देवगण ॥२०॥
यमास गदाघातें विद्ध करुन । तारक गेला परतून । असुरसेना विजयें प्रसन्न । देव पकडिले तयांनी ॥२१॥
अनाथ देवसैन्य पळत । भयाकुल आसमंतात । कोणी मृत कोणी मूर्च्छित । ऐसी स्थिती देवांची ॥२२॥
दैत्येंद्रासी विजय मिळाला । त्यांनी आनंदें घोष केला । देवगणांनी आश्रय घेतला । शिवशंकरांचा त्यावेळीं ॥२३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते इंद्रपराजयो नामाष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP