खंड २ - अध्याय ५२
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । ऐसी दीनवाणी प्रार्थना ऐकत । तेव्हां सनत्कुमार सांगत । आनंददायक वृत्तान्त । देवांप्रती त्या समयीं ॥१॥
मदासुर विनाशाचा उपाय सांगत । ऐका सुरेश्वरांनो एकचित्त । गणेशा पूजावें भक्तियुक्त । विनयार्द्रचित्तें समस्तांनी ॥२॥
तो मदासुराचें करील हनन । ऐसें सनत्कुमाराचें वचन । ऐकतां हर्षोत्फुल्ल मन । जाहलें देवर्षिसत्तमांचें ॥३॥
त्यास प्रणाम करुन । भक्तीनें मान लववून । देवर्षी म्हणती पूजन । कैसें करावें गणेशाचें ॥४॥
त्याचा उपाय सांगावा । आम्हांसी आपण धीर द्यावा । यथातथ्य तो कथन करावा । पूजाविधि सत्वर ॥५॥
ऐसें महायोग्यासी विचारिती । देवगण मुनिगण उभय प्रार्थिती । तेव्हां आराधनेची रीती । गाण पत्य तो सांगत ॥६॥
महायश तो कथित । एकाक्षर मंत्रें पूजावें यथायुक्त । गणनायक जो हृदयीं निवसत । तेणें संतुष्ट तो होय ॥७॥
त्याचें ध्यान कैसें करावे । तें आता ऐकावं बरवें । तैसें करुन तोषवावें । श्रीगजाननासी सर्वांनीं ॥८॥
एकदंत चतुर्बाहुधर । गजवक्त्र महोदर । सिद्धिबुद्धियुक्त देववर । मूषकारुढ मनोहर ॥९॥
ज्याच्या नाभीवरी शेष असत । परशुकमल अभय करांत । प्रसन्नवदनांबुज भक्तांप्रत । नित्य वरप्रद जगतांत ॥१०॥
अभक्तांचा संहार करित । ऐसा जो प्रभू मूर्तोमंत । त्यासी ध्यावें हृदयांत । सेवा करा एकदंताची ॥११॥
सर्वांच्या हृदयीं हा निवसत । बुद्धिप्रेरक तो असत । स्वयं बुद्धिपती साक्षात । साक्षात् आत्मा प्राणिमात्रांचा ॥१२॥
‘एक’ हया शब्दानें माया ज्ञात । देहरुपा जी विलसत । सत्तात्मक ‘दंत’ शब्द उक्त । यात संशय कांहीं नसे ॥१३॥
मायेचा हा धारक संस्थित । सत्तामात्र एकदंत । गणेशान म्हणती वेदपंडित । सर्व सत्ताधरी जी ॥१४॥
परिपूर्ण गजानन एकदंत । त्याची सेवा भक्तिभावयुत । करितां होईल सुख प्राप्त । जय हेरंब एकदन्त ॥१५॥
ऐसें बोलून सनत्कुमार । हेरंबमंत्रांचा करी उच्चार । देवगण दीक्षा घेऊन घोर । तप करण्या सिद्ध झाले ॥१६॥
एकाक्षर विधानें तोषविती । एकदंप्ताचा मंत्र जपती । पत्र भक्षण वा वायुभक्षण करिती । जळ पिऊनही राहती ॥१७॥
कधी राहती निराहार । कधी घेती कंदमूल फलाहार । कधी जपहोमपर । नाना तपें आचरती ॥१८॥
गणनायका उपासिती । ऐसी शंभर वर्षे जाती । तेव्हां गजानन प्रसन्नमती । प्रकटले वर द्यावया ॥१९॥
गजानन देवमुनींसी म्हणत । वर मागा मीं तुष्ट असत । त्याचें वचन ऐकून हर्षित । देव ऋषि सर्व झाले ॥२०॥
जे होते धानस्थित । त्यांनी उघडिले नयन त्वरित । तेव्हां आपुल्य पुढयांत । पाहती ते गजाननासी ॥२१॥
मूषकवाहना त्यास पाहून । त्यांनी केलें विनम्र वंदन । भक्तिभावें केलें पूजन । देव देवेंद्र मुनींनी ॥२२॥
यथाविधि पूजा करुन । आपुले दोन्हीं कर जोडून । एकदंताचें करिती स्तवन । भक्तिनमर प्रेमानें ॥२३॥
गजवक्त्रासी गणेशासी । अनंत आनंद भोक्त्यासी । ब्रह्मासी ब्रह्मरुपासी । आदिमध्यांतहीना नमन ॥२४॥
चराचरमयासी । अनंत उदरसंस्थासी । शेष ज्याचें नाभिभूषण त्यासी । नमो नमः अत्यादरें ॥२५॥
कर्त्यांस संरक्षकास संहर्त्यास । त्रिगुणांच्या अधीश्वरास । सर्वसत्ताधारास निर्गुणास । सिद्धिबुद्धीपतीला नमन ॥२६॥
सिद्धिबुद्धिप्रदासी । ब्रह्मभूतासी देवेशासी । सगुणासी परशुधरासी । कमलालंकारासी नमन ॥२७॥
पाश अभय धरासी । महोदरासी मूषकारुढ देवासी । मूषकध्वजासी आदिपूज्यासी । सर्वपूज्यासी नमो नमः ॥२८॥
सर्वांसी गुणसंयुक्त कायासी । निर्गुणात्मक मस्तकासी । त्यांच्या अभेदरुपासी । एकदंता तुला नमन ॥२९॥
वेदांतगोचरासी योगाधीशासी । वेदांतें लभ्यकायासी । ब्रह्माधीशासी नानावतारभेदासी । शांतिदासी नमो नमः ॥३०॥
अपार गुणधारासी । अनंतमाया प्रचालकासी । नमो नमः गजाननासी । गणनायका तुज नमन ॥३१॥
धन्य आम्हीं धन्य समस्त । ज्यांनी पाहिला एकदन्त । ब्रह्मभूयमय साक्षात । प्रत्यक्ष आमुच्या पुढयांत ॥३२॥
ऐसी स्तुति हर्षयुत । करुन नाचती भक्तियुक्त । त्यांच्या नेत्रांतून ओघळत । आनंदाश्रू त्या वेळीं ॥३३॥
अंगावरीं रोमांच फुलत । त्यांसी ढुंढी तेव्हां म्हणत । एकदंत प्रेमयुक्त । वर मागा देवेशांनो ॥३४॥
मुनीशांनो यथा ईप्सित । सांगा सारे भयमुक्त । दुर्लभ असलें तरी समस्त । देईन तुमचे मनोवांछित ॥३५॥
तुम्हीं रचिलेलें स्तोत्र असत । मजला प्रिय सदा जगतांत । तें ऐकता वाचिता निश्चित । सर्व इच्छा पुरतील ॥३६॥
नानासिद्धिप्रद हें होईल । शत्रूंचा विनाश करील । स्वानंद प्रदायक देईल । पुत्रपौत्रादिक सर्व कांहीं ॥३७॥
गृत्समद कथा पुढे सांगत । सुरषीं हें ऐकून प्रमुदित । विनम्रभावें प्रणाम करित । भक्तिभावपूर्ण म्हणती ॥३८॥
जरी संतुष्ट झालासी । सर्वेशा एकदंता आम्हांसी । महाप्रभो तरी महासुरासी । दुष्टासी आपण मारावें ॥३९॥
स्थानभ्ररष्ट देवेश झाले । मुनीश्वर कर्मभरष्टता पावले । जगन्नाथा म्हणून विनविलें । ठार करी त्या असुरासी ॥४०॥
तुझी अचल भक्ति लाभावी । मानदा जेणें खंडित व्हावी । संसारमाया आघवी । ऐसी प्रार्थना पुरवावी ॥४१॥
ऐसें देवमुनि वचन । ऐकून ‘तथास्तु’ म्हणे गजानन । नंतर पावला अंतर्धान । प्रतापवंत एकदंत ॥४२॥
महर्षि नंतर स्थापना करिती । महाभाग ते क्षेत्रीं पूजिती । विघ्नप गजाननाची मूर्ति । आग्नेय दिशेला विख्यात ॥४३॥
एकदंताचें तें क्षेत्र होत । सर्वसिद्धिदायक पुनीत । तेथेच देवदेवेंद्र मुनी संस्थित । सेवा करण्या पूर्ण भावें ॥४४॥
आपुल्या अधिकारें कलांशांत । त्या वैघ्नप क्षेत्रात । त्या विघ्नप मूर्तीच्या दर्शनें लाभत । प्राणिमात्र मनोवांचित ॥४५॥
त्या क्षेत्रीं मरण उत्तम । प्रल्हादा मानिती निर्मम । महिमा वर्णनातीत मनोरम । अशक्य असे वर्णावया ॥४६॥
वर्षकोटी शत वर्णन केलें । तरी ते अपूर्ण होणार असले । म्हणोनी सार हें सांगितलें । प्रल्हादा मीं तुजलागीं ॥४७॥
तेथ विशेष सिद्धि लाभून । देवर्षि अमल होऊन । कृतकृत्यता पावून । विजयी अन्तीं ते झाले ॥४८॥
धन्य जन्म मानवांचा वाटत । ज्यांनी पाहिला एकदंत । जन्ममृत्यूभय नष्ट होत । ईप्सित अर्थलाभ कृपाप्रसादें ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते एकदंतप्रसन्नप्रभावो नाम द्विपंचाशत्तमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP