खंड २ - अध्याय ५६
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद्गलासी सांप्रत । प्रल्हादे जेव्हां मदासुर चरित्र ऐकून । तदनंतर तो काय करित । योगींद्रा तें मज सांगावें ॥१॥
हें ऐकता कथामृत । हर्ष उपजला मम चित्तांत । यांत संदेह कांहीं नसत । तृप्ति कधींही न होईल ॥२॥
सूत मुनींसी सांगत । ऐकोनी दक्षाचें वचन हर्षित । मुद्गल त्या महाभागा म्हणत । तत्त्व ऐक आतां तूं ॥३॥
धन्य दक्षा तूं अससी । सारज्ञा म्हणोनी वांछिसी । गणेशकथा श्रवणासी । ऐकतां तुष्ट होशील ॥४॥
कथानक सांगतों पुढतीं । मदासुराची झाली शांती । प्रल्हाद करी विनंती । तेव्हां गृत्समद मुनींना ॥५॥
प्रल्हाद म्हणे मुनींप्रत । विनयपूर्ण स्वरांत । माझें महद्भाग्य असत । एकदंत माहात्म्य ऐकिलें ॥६॥
तरी अद्यापी न तृप्त । ऐकून ज्ञानप्रद चरित । म्हणोनी पुनरपी सांगा पुनीत । गणेशचरित्र मजलागीं ॥७॥
कश्यपाच्या घरीं येत । पुत्ररुपें केव्हां भगवंत । दैत्य मारिले मदोन्मत्त । देवान्तक नरात्नक ॥८॥
शिवपुत्र होऊन मारित । दुर्मति दानवा त्वरित । सर्वज्ञा कृपानिधे मजप्रत । हें विस्तारें सांगावें ॥९॥
कापिल रुप घेऊन । कैसें केलें गणासुराचें हनन । हें सर्व एकदंतचरित महान । सांगावें मज महामुने ॥१०॥
आपणासारखे महाभाग संस्थित । नौकारुपें संसाराब्धींत । बुडत्या नरासी तारण्या सतत । प्रयत्न करिती ते महात्मे ॥११॥
ऐसें प्रल्हाद विचारित । तेव्हां महायोगी गृत्समद सांगत । भावयुक्त ऐक पुनीत । सुखद समस्त वृत्तान्त ॥१२॥
दैत्य होता कृतयुगांत । रौद्र केतू गौड देशांत । गौड नामक नगरांत । तपोधन थोर एक ॥१३॥
त्याची पत्नी रुपशालिनी । महाभागा ती मानिनी । शारदा नामें गर्भवती होउनी । कालांतरें प्रसूत झाली ॥१४॥
तिने जुळ्या पुत्रांसी जन्म दिला । मातापित्यांसी मोद झाला । देवांतक नरांतक नामें ख्यातीला ।पावले ते बंधुद्वय ॥१५॥
भीतीप्रद लोकांसी वाटत । जरी ब्राह्मणपुत्र ते असत । एकदा नारदमुनी तयांप्रत । शिवपंचाक्षर मंत्र देती ॥१६॥
त्या मंत्राचा जप अविरत । ते दोघे परम तपें आचरित । वर लाभून अजिंक्य होत । जिंकिले चराचर तयांनी ॥१७॥
पृथ्वीवरी कर्मनाश करिती । स्वाहा स्वधा विध्वंसिती । वषट्कार बंद करिती । देव तेव्हा क्षुधातुषार्त ॥१८॥
त्या सर्वांनी एकदंत । प्रार्थिला तो प्रतापयुक्त । त्यांच्या उग्रतपें संतुष्ट होत । वर देतसे देवांसी ॥१९॥
कश्यपाचा पुत्र होईन । दैत्यवधार्थ प्रकटेन । ऐसे देऊन आश्वासन । अन्तर्धान पावले गणेश ॥२०॥
त्यानंतर देवजननी अदिती म्हणत । कश्यपासी हस्ययुक्त । इंद्र विष्णु सूर्य सुत । जाहले माझे आजवरी ॥२१॥
आता ब्रह्म कैसें होईल सुत । माझा तें सांगा त्वरित । जेणें निश्चल होईल चित्त । निःसंशय जगामाजीं ॥२२॥
त्याची सेवा करण्या इच्छित । त्याचा उपाय सांगा मजप्रत । प्रार्थना ऐकून तेव्हां देत । गणेशमंत्र स्वपत्नीसी ॥२३॥
अष्टाक्षर मंत्रें आराधित । अदिती एकदंत प्रभूस पूजित । ऐशीं सहस्त्र वर्षे लोटत । तेव्हां प्रकटले एकदंत ॥२४॥
वर मागण्या तिज सांगत । म्हणे व्हावें माझा सुत । तथास्तु म्हणे सुप्रीत । वचन आपुलें पूर्ण केलें ॥२५॥
अदितीस कश्यपापासून । पुत्र नंतर झाला महान । मायाप्रभावें विघ्नेश क्रीडन । करी प्राकृत जनांपरी ॥२६॥
एकदा बाळ विघ्नेशासी गिळीत । राक्षसी विरजा क्षणार्धांत । तिचें पोट फाडून बाहेर पडत । मरुन पडली ती राक्षसी ॥२७॥
धुंधुरनामें उद्धत । दोन दैत्य शुकरुप घेत । बाल विनायक त्यांसी पकडित । आपटोनी मारी शिळेवरी ॥२८॥
कोणे ऐक दिवशीं अदिती जात । नदीवरी स्नानार्थ त्या बाळासहित । मगरुपी गंधर्व पकडित । विनायकाचे पाय तेव्हां ॥२९॥
करुन हवेंत उड्डाण । घेतले त्या मगराचे प्रमाण । शापमुक्त गंधर्व तत्क्षण । प्रणाम करी विनायकासी ॥३०॥
शापमुक्त गंधर्व जात । तत्क्षणीं स्वर्गलोकी परत । तदनंतर विनायकावरी येत । संकटें बहुविध बालपणीं ॥३१॥
मुंज करिती विनायकाची । राक्षसा घाई आलिंगनाची । पांच राक्षस बाळाची । भेट घेती प्रेमभरें ॥३२॥
त्यास कडकडून आलिंगिती । मारुन टाकण्याची ती युक्ति । परी क्षणांत तेची पावती । निधन विनायकशक्तीनें ॥३३॥
व्रतबंधकर्म पूर्ण होत । तेव्हां ब्रह्मविष्णू आदी नमित । देव वसिष्ठादी मुनींसहित । भक्तिभावें विनायकांसी ॥३४॥
परी मदोन्मत्त इंद्र न नमत । तेव्हां कश्यप त्यास आज्ञा करित । बलपरीक्षा पहावया प्रेरित । प्रभंजनासी इंद्र झणीं ॥३५॥
प्रभंजन वायूचें कांहीं न चालत । तेव्हां अग्नीस जाळण्या पाठवित । तें त्या अग्नीसी गिळून टाकित । बाळ विनायक लीलेनें ॥३६॥
महेंद्र झाला मनीं विस्मित । त्या वेळ एक अद्भुत घडत । श्वास प्रभावें उदरांत । ओढून घेतलें देवेंद्रासी ॥३७॥
बाळ विनायकाच्या उदरीं पहात । इंद्र देवेंद्र विश्व समस्त । ऐसी नाना ब्रह्मांडे दिसत । गर्व हरण जाहलें त्याचें ॥३८॥
उदरांतून बाहेर येण्या झटत । परी शंभर वर्षे मार्ग न मिळत । तेव्हां विनायकासी प्रार्थित । प्रसन्न जाहला गजानन ॥३९॥
उच्छ्वासमार्गें बाहेर सोडित । ऐसें कौतुक महेंद्र पाहत । कालोद्भवा जें आश्चर्य वाटत । तें ऐक आता महा असुरा ॥४०॥
विनायकाच्या जठरांत । जरी राहिला वर्षे शत । बाह्य जगांत जेव्हां येत । एक क्षण तें जाहला ॥४१॥
नंतर त्यासी करी वंदन । विविध प्रकारें स्तवून । साधुभावें करी भजन । भक्तिपूर्वक आदरें ॥४२॥
पुढें एकदा काशी नृप येत । कश्यपाच्या सदनाप्रत । आपुल्या पुत्रविवाहार्थ नेऊं इच्छित । उपाध्याय म्हणोनी ॥४३॥
परी मुनी तो यज्ञांत । झाला होता रुद्ध गृहांत । म्हणोनी विनायका पाठवित । काशीराजा सवें तें ॥४४॥
विधिज्ञ विनायक उपाध्याय । त्यास घेऊनी नृप जाय । परी मार्गीं धूम्राक्षाचे भक्षावय भय । अति रौद्र येत असे ॥४५॥
त्या दैत्येशा विनायक मारित । सूर्यास्त्रें अति त्वरित । त्याचे दोन सुत तेव्हां येत । विनायकासी भक्षावया ॥४६॥
जघन मनु नावें महादीर । परी विनायकाच्या निःश्वासें दूर । आकाशांत उडाले सत्वर । पडले नरांतकसदनीं ॥४७॥
त्यांनी सांगितला जो वृत्तान्त । तो ऐकून नरांतक संत्रस्त । पांचशे राक्षसां पाठवित । विनायकासी मारावया ॥४८॥
ते राक्षस महावीर । गणेशासमीप जाती उग्र । परी केवळ हुंकारें होत भयातुर । विनायकाच्या असुर ते ॥४९॥
ऐशियापरी राक्षस मेले । मार्ग सारे निष्कंटक झाले । काशीपुरांत प्रवेशले । विनायकासह काशीनृप ॥५०॥
गणपाचे त्या पूजन करिती । मुद्गल विप्र उपदेशिती । काशिराज आदरें स्तविती । विनायकासी त्या समयीं ॥५१॥
काशीवासी सर्व जन । करिती गणेशाचें ध्यान । महिमा मुद्गलापासून । जाणून विचक्षण ते सारे ॥५२॥
कश्यपाचा सुत होऊन । काशीनृपाच्या नगरींत येऊन । राजपुत्राच्या विवाहांत पावन । उपाध्यापद भूषवील ॥५३॥
त्या वेळीं दैत्यांचा वध करील । दर्शनमात्रें तोषवील । योगांत प्रावीण्य लाभेल । काशीनिवासी सर्वांना ॥५४॥
ऐसें मुद्गले सांगितले होतें । ते आठविती सकल जाणते । विनायक देवा पूजिती स्वचित्ते ।असंख्य येती दर्शना ॥५५॥
पित्यास भात्यास पतीस । न भितां सर्व स्त्रिया दर्शनास । भक्तिपरायण त्या समायास । धांवल्या विनायका समीप ॥५६॥
विनायकप्रवेशाचा महोत्सव होत । तेथ एक नारी रक्षक रोधित । देहपात तिचा होत । ताळू तत्क्षणीं फुटोनी ॥५७॥
सर्वप्रथम विनायका प्रत । जीवात्मा तिचा जात । त्याच्या देहांत लीन होत । भक्तिसमन्वित ती नारी ॥५८॥
जेथ प्रजानन विनायका पूजिती । तेथ बाळासी असुरद्वय फिरती । परी दोन करें चूर्ण करिती । विनायक त्यांचे लीलेनें ॥५९॥
दहा योजनें फेकून देती । नगर लोक विस्मित चित्तीं । पुढें पाषाणरुपें उपस्थिति । जाहली एका दैत्याची ॥६०॥
एक मूठ त्यावरी मारित । तेव्हां तो पाषाण भंगत । महा असुर मृत्यु पावत । ऐसें बाळ विनायकाचें ॥६१॥
चक्रवातरुपें दोन असुर । येती नेण्या बालका दूर । पकडून त्यांची शिखा सत्वर । आपटिले एकमेकांवरी ॥६२॥
नंतर काशीराज त्यास नेत । आपुल्या गृहीं भक्तियुक्त । विधिपूर्वक पूजित । मनोभावें स्थापन करी ॥६३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते विनायककाशीप्रवेशो नाम षट्पंचाशत्तमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP