मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ४६

खंड २ - अध्याय ४६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । कैलासांत मदासुर राहत । कांही समय भोत भोगित । परम दुर्लभ जे असत । दैत्यवीरांसमवेत ॥१॥
तदनंतर त्रिपुरासुरादी मदयुक्त । देवांच्या नाशार्थ उद्युक्त । म्हणती मदासुरासी वचन हित । महाभागा आमुचें ऐका ॥२॥
शंभुमुख्य सर्व देव गेले । शक्तिलोकी सुखें राहिले । शक्तीनें त्या विशेष मानिलें । भयहीन ते सर्वही ॥३॥
देव आपुले शत्रू असती । दैत्यांच्या हननीं निश्चितमती । त्याचें बळ वाढून होती । शक्तिलोकीं ते समर्थ ॥४॥
हिरण्याक्षादी सर्व मारिले । छिद्र पाहून देवांनी भले । आपुले प्रख्यात वैरी झाले । देव सारे हे सर्व जाणती ॥५॥
आमुची शक्ति पक्षपाती । तीही देवांची हितकर्ती । म्हणोनी शक्तिलोकीं झटिती । चाल करावी निःसंशय ॥६॥
तेथ जाऊन अमर सर्व । ठार मारुंया जे करिती गर्व । दैत्यांचे वचन ऐकून मदासुर । म्हणे विनयपूर्वक ॥७॥
त्रिपुरादींनो ऐका हित । शक्तिप्रसाद संभूत । माझें सफल ऐश्वर्य असत । इष्ट देवी पूजनीय ती ॥८॥
तिचें भजन मी करित । विशेष भक्तिभावें जगांत । म्हणोनि तिचें करावें हित । सकलांनी तुम्ही सर्वदा ॥९॥
देव तीस शरण गेले । हें जरी सर्व सत्य असलें । माझ्या दासभावें झालें । आदरें शक्तिचित्त यंत्रित ॥१०॥
म्हणोनी देवपक्षपात । करोनी न आली त्वरित । आमुचा वध करण्या उद्युक्त । महामाया हें जाणावें ॥११॥
जे तिच्या भजनीं आसक्त । ते मज माननीय वाटत । तिच्यासवें वैरभाव जगतांत । करुं नका असुरहो ॥१२॥
मदासुराचें वचन ऐकून । दैत्यप म्हणती क्रुद्ध होऊन । मदोत्सिक्त उन्मन । देवांच्या वधास उत्सुक ॥१३॥
दैत्येश म्हणती आठवावें । मागील वृत्त जें जाहलें । हिरण्यकशिपूचे आघवें । ज्यास मिळाला ब्रह्मवर ॥१४॥
अनेक दैत्येश देवशत्रू झाले । देवपक्ष सोडून गेले । आपल्या धर्मीं रत झाले । ऐसी साक्ष इतिहासीं ॥१५॥
कश्यपाचे दोन सुत । देवांचा पक्ष सोडित । देवसंहारांत रमत । तैसेचि आपण करावें ॥१६॥
देवांचे मूळ उपटावें । वेदांतही वैर स्वभावें । सुरासुरांचे पहावें । कथिलें असे सर्वत्र ॥१७॥
आपण सारे भक्तियुक्त । जाऊंया शक्तिलोकांत । शक्तीच्या सान्निध्यांत । देवांचें निदलिन करुंया ॥१८॥
महामाया शक्ति घेईल । जरी आमुचा पक्ष सबळ । ती पूजनीय आम्हां होईल । कुलदेवता दैत्यांची ॥१९॥
अन्यथा युद्ध करुं निश्चित । त्या शक्तीसमवेत । शत्रुपक्षाश्रित जरी होत । तरी त्यांत दोष नसे ॥२०॥
दैत्येशांचें तें वचन । मदासुरा मान्य होऊन । तात्काल करी निर्गमन । शक्तिलोकीं मदासुर ॥२१॥
शक्तीकडे दूत पाठवित । तारक नामक दुर्मति त्वरित । म्हणे महाबळा जाई देवीप्रत । सामवचन प्रथम करी ॥२२॥
महामायेसी संदेश देत । प्रणाम करुन दूत निघत । तारक शक्तिसान्निध्यांत । जातां देवें सन्मानिला ॥२३॥
महामायेस नमन करुन । त्या शक्तीपुढती हात जोडून । तारक तिजला म्हणे वचन । सामयुक्त त्या वेळीं ॥२४॥
ऐक शक्ते महामाये आला । मदासुर तुझ्या दर्शनाला । माते त्यानें पाठविला । दूत म्हणोनी मजला येथ ॥२५॥
मानदे शक्ती त्याचें वचन । जगदंबिके भावज्ञे घे ऐकून । भक्तिसंयुक्त जें केलें कथन । त्वदीय भक्तें विनमर भावें ॥२६॥
तूं आमची कुलदेवी असत । यात संशय अल्पही नसत । आम्ही सारे असुर विनत । तुझे सेवक या जगीं ॥२७॥
जेथ असुर विराजत । तेथ सुर हतप्रभ होत । हयांत संदेह कांहीं नसत । स्वभावें शत्रू उभय असती ॥२८॥
म्हणोनी देवांचा त्याग करुन । असुरांचा घे सन्मान । आमुचे शत्रू ते मानून । शत्रू आपुलें तूं देवी ॥२९॥
आम्हीं तुज करु वंदन । देवांचे करु हनन । त्यांसी त्वरित सोडून । आमुचा पक्ष भूषवावा ॥३०॥
एका पक्षाचा आश्रय घ्यावा । जगदंबिके मथितार्थ जाणावा । असुरांचा वा सुरांचा स्वीकारावा । भक्तिभाव एकमेव ॥३१॥
ऐसें हें कथिलें मदासुर वचन । करी तूं भक्त राजाचें पालन । गृत्समद सांगे पुढिल वृत्त प्रसन्न । क्रोध संतप्त देवी तें ॥३२॥
मदाचें क्रूरवचन । तारकें केलें जें कथन । तें ऐकून कोपे तत्क्षण । महासुरा त्या सांगत ॥३३॥
माझे नांव जगदंबा ख्यात । वेदांनी केलें प्रकाशित । तरी मी एक पक्षाचा आश्रय घेत । हें कैसे संभावेलं ॥३४॥
जैसे देव तैसे असुर असत । मान्य मजला जगतांत । देव दैत्यें स्वधर्मरत । वर्तावें सर्वदा महासुरा ॥३५॥
दैत्यांनी आनंदे पाताळांत । राज्य करावें देवांनी स्वर्गांत । याच्या विपरीत जे आचरित । त्यांसी संक्रुद्ध मीं ठार करीन ॥३६॥
म्हणून माझ्या आज्ञेनें जावें । पाताळ लोकांत राज्य करावें । असुरांचे यात हित व्हावे । ऐसी माझी आज्ञा असे ॥३७॥
शक्तीचें हें वचन ऐकत । महासुर तारक भय रहित । तेव्हां बोले संतप्त । शक्ती गर्व तूं करुं नको ॥३८॥
आमुच्या तपें उत्कृष्टत्व पावलों । मनीं हें निश्चित उमजलों । शत्रुपक्षाश्रिते झालों । सावध आम्हीं असुर आतां ॥३९॥
जगदंबिके तूं जगें निर्मित । कर्माधीन ही कृति असत । जैसें कर्म तैसें फळ लाभत । तूं तेथ काय करणार? ॥४०॥
स्वकर्में प्रतापी मदासुर । दैत्यराज झाला थोर । ब्रह्मांडाचा अधिपति समग्र । देवांचें तो हनन करील ॥४१॥
युद्धास सज्ज हो देवी त्वरित । सर्व देवांसमवेत । जगन्मये मी असुरांसहित । परततों मी मदसंनिध ॥४२॥
ऐसें बोलून क्रोधसंयुत । महाशक्तीसी, परत जात । शक्तिलोकांतून तो उद्धत । तारक मदासुराजवळी ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्‍गल महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते तारकासुरसामवर्णनं नाम षट्‌चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP