मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय २९

खंड २ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । तृणबिंदु राजाची सुता । एलवेलिका नामें ख्याता । पुलस्त्यास ती विनयसंयुता । देता झाला विवाहांत ॥१॥
विश्रवा नामा मुनिसत्तम । पुलस्त्यापासून सुत अनुपम । त्या विश्रवाच्या पत्नी उत्तम । सुरुप सुंदर चार होत्या ॥२॥
पुष्कोत्कटा, राका, कैकसी । देववर्णिनी भूषण त्यासी । ती देई जन्म वैश्रवणासी । ज्येष्ठ पुत्र तो प्रख्यात ॥३॥
कैकसी रावणासी जन्म देत । तैसेच कुंभकर्ण बिभीषण तिचे सुत । शूर्पणखा ही पुत्री प्रख्यात । ऐसी चारे अपत्यें तिला ॥४॥
कैकसीचे तीनही सुत । होते अत्यंत प्रतापयुक्त । दहा सहस्त्र वर्षे आचरित । उग्र तप ते सर्वही ॥५॥
ब्रह्मदेवाचें स्मरण करिती । सदैव त्यासी ते पूजिती । तेव्हां प्रकट होऊनि त्यांच्या पुढती । म्हणे वरदान मागावें ॥६॥
रावण तेव्हां मागत । त्रिभुवन राज्य कंटकरहित । मरण न यावें म्हणे जगांत । देवासुरांपासूनि ॥७॥
कपि मानुषानें तो विसरला । म्हणोनि पुढती घात झाला । कुंभकर्णही मोहें वदला । द्यावें मज निद्रापद ॥८॥
षण्मास तो होई निद्रित । ब्रह्मदेवाचा वर लाभत । बिभीष्ण धर्मात्मा मागत । विष्णुभक्ति दृढ व्हावी ॥९॥
त्यांना ऐसे वर देऊन । ब्रह्मा निजलोकीं गेला परतून । नंतर प्रबळ झाले राक्षसगण । त्रैलोक्यांत बलवंत ॥१०॥
रावणें त्रिभुवन जिंकिलें । साठ लक्ष वर्षे राज्य केलें । तदनंतर रामें त्यास मारिलें । कुंभकर्णही रणीं वधिला ॥११॥
बिभीषणासी राज्य दिलें । राघवें प्रजाजन तोषविले । वैश्रवणानें तप केलें । गणेशाचें भक्तिभावें ॥१२॥
एकाक्षर विधानें विघ्नपा पूजित । ऐसी दशसहस्त्र वर्षे लोटत । तेव्हां गजानन प्रसन्न होत । स्वचरणीं भक्ति दृढ केली ॥१३॥
त्यास शंकराचा मित्र करित । उत्तर दिशेचा स्वामी नेमित । धनपाल नामें प्रख्यात । देवांत तो कुबेर नामें ॥१४॥
विश्रवापासून पुष्पोत्कटेस होत । महोदर महापार्श्व, प्रहस्त । खर नामक चार सुत । कुंभीनसी नामा पुत्री ॥१५॥
त्रिशिरस्क दूषण विद्युत जिव्ह । महाकाल हे बलयुक्त सर्व । राकेचे पुत्र करिती गर्व । दक्षा ऐसी कथा से ॥१६॥
ऐसे हे दहा राक्षस असत । क्रूरकर्मी पौलस्त्यकुळांत । पुरुषश्रेष्ठ महाबलवंत । राक्षसांत विख्यात ॥१७॥
पुलहाचे पुत्र सर्प मृग । पिशाच्चें भूतगण शूकर उरग । वैवस्वतांतरीं क्रतु मुनी सुभग । एकटा अपत्यहीन होता ॥१८॥
मरिचीचा कश्यप सुत । तो झाला प्रजापति जगांत । भृगूचा पुत्र शुक्र होत । दैत्याचार्य मेधावी ॥१९॥
स्वाध्याय निरत शैव मार्गरत । तो महायश काव्यनामें ख्यात । शंकरासी पूजी अविरत । एकदा गेला कैलासीं ॥२०॥
शंकरासी तो प्रार्थित । शांतीलाभ व्हावा मजप्रत । तेव्हां त्यासी बोध करीत । गणेशभक्ति करी म्हणे ॥२१॥
शुक्र गणेसातें पूजित । क्रमानें शांतिलाभ त्यास होत । गाणपत्य एकनिष्ठ जगांत । ऐसी ख्याती तयासी ॥२२॥
अत्रीचा पुत्र सोम । अमृतरुप तो निरुपम । अरुंधतीस पुत्र अभिराम । वसिष्ठापासूनि शक्तिनामा ॥२३॥
त्यापासून पराशर जन्मत । तपोनिधि जो शंकरा पूजित । वसिष्ठापितामहासी विचारित । शांतिलाभार्थ उपाय ॥२४॥
योगशास्त्रज्ञ अर्निदित । स्वकर्मकुशल जे शांत । त्या वसिष्ठ मुनींसी म्हणत । पराशर नम्रभावें ॥२५॥
शिव हा मोहहीन असत । अव्यय अकर्ता प्रख्यात । ऐशा निर्मोहासी मोह वाटत । ऐशा भ्रम कैसा उपजे ॥२६॥
पराशराचें वचन ऐकून । वसिष्ठ सांगती हर्षयुक्त मन । शांतियोग सनातन । आपुल्या पौत्रांसी तेधवां ॥२७॥
ऐक बाळा तुज सांगेन । ब्रह्मदेवें मज कथिला महान । तो शांतिकर योगपावन । जेणें सौख्य तुज लाभेल ॥२८॥
एकदां मी होतो अशांत । शांतिलाभार्थ संचार करित । परी ती न मिळे मज जगतांत । तेव्हा गेलों ब्रह्मलोकी ॥२९॥
परमेष्ठे ब्रह्मा पूजा करित । गणेशमूर्तीची भक्तियुत । त्या वेळी पाहिला ब्रह्मलोकांत । वंदन केलें गणेशासी ॥३०॥
पूजाविधि संपवून । ब्रह्मदेवें केलें सभेंत आगमन । तेव्हां त्यासी वंदन करुन । विनीतभावें विचारिलें मीं ॥३१॥
तुझ्यापासुनी सर्व प्राणिजात । जन्म घेता जगतांत । नाथा तुझ्यांत विलीन होत । तुझ्याहून श्रेष्ठ अन्य नसे ॥३२॥
ऐसें असोनी आपण पूजिता । अन्य कोणासी श्रेष्ठ मानिता । मी बहुत वर्षे हिंडलों तत्त्वता । परी शांति मज न लाभली ॥३३॥
माझें वचन ऐकून । ब्रह्या हर्षयुक्त मन । मजसी सुपात्र मानून । पितामहें तेव्हा सांगितलें ॥३४॥
ऐक पुत्रा महाभागा विश्वांत । गणेश योगशांतिद असत । आमुचा सर्वांचा कुलदेव निश्चित । तोच आमुचा उगम असे ॥३५॥
त्याच्यामुळे आम्ही सुस्थित । अतीं लीन त्याच्यांत । सर्वसिद्धिप्रदात्या त्या भजत । निरंतर भक्तिभावें ॥३६॥
म्हणोनि गणेशा प्रथम पूजितों । माता पिता त्यासची मानिर्तो । ज्येष्ठराज वेद म्हणती तो । तेणें ज्येष्ठ सर्वांहून ॥३७॥
जो आधी तोच अंती । ऐसी असे शास्त्रोक्ति । म्हणोनी त्यांच्यातचि अंतीं । लीन आपण होणार ॥३८॥
मध्यकाळीं तोचि निवसत । नानाविध कलांशाने जगांत । आम्ही सर्वही अंशजात । त्याचेचि असो पुत्रका ॥३९॥
शांति लाभावी ऐसें इच्छिसी । संक्षेपें युक्ति सांगतो तुजसी । पंचधा चित्तवृत्ति जरी त्यागिसी । तरी शांत होशील तूं ॥४०॥
क्षिप्त मूढ विक्षिप्त । एकाग्र निरीक्षक चित्त । चिंतामणी प्रकाशित करित । अभेदयोगें भ्रांतिनाशा ॥४१॥
मीं गणेशरुप असोन । तरी संयोग अयोगाची खूण । मी गणेशच होता उरेल  भरांतिभाव कोणताही ॥४२॥
जगतासी सुब्रह्म म्हणती । ऐश्वर्य अतुल बुध वर्णिती । जाण ती भरांतिदायक जगतीं। सिद्धि जगतीं पुत्रका ॥४३॥
जगत्‍ ब्रह्ममयाकार । बुद्धि शास्त्रांत वर्णिली प्रखर । पंचधा चित्तरुपा तीच संसार । निःसंशय जाण तूं ॥४४॥
त्या सिद्धिबुद्धीचें प्रकाशक । गणेशाचें बिंब निष्कलंक । हया दोन मायांनी मोहित एक । हृदयांत स्थित तदाकार ॥४५॥
बिंबभाव तू सोडशील । तेव्हां शांती तुज लाभेल । त्या वेळीं चित्त ऐश्वर्य मोह विमल । बिंब तुजला न दिसेल ॥४६॥
ऐसे स्वयं मज सांगून । पितामहें धरिलें मौन । मीं त्यास प्रणाम करुन । प्रदक्षिणा करुनी परतलों ॥४७॥
वनांत जाऊन तप उत्तम । एकाक्षर मंत्रें उत्तमोत्तम । जपपारायणें गजानना अनुपम । उपासिलें भक्तिभावें ॥४८॥
क्रमानें योगभूमीची भरांती । त्यागून बाणली अनुभूती । चिंतामणि मीच ही चित्तीं । शांतियोगधारण केलें ॥४९॥
तथापि गणराजांचे मंत्रध्यान । उग्रतपश्चर्या करुन । करितां वर्षशते एक मन । प्रकटला मूषकारुढ गजानन ॥५०॥
त्याच्या दर्शनें मज लाभत । योगशांति अत्युद्‌भुत । झालों संतुष्ट मनांत । गणेशसायुज्य लाभलें ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते वसिष्ठपोवर्णन नाम एकोणत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP