खंड २ - अध्याय ४३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढे सांगत । भृगूचें वचन ऐकून होत । च्यवन ते अति लज्जित । प्रणाम करी भक्तीनें ॥१॥
ओंजळ करांची जोडून । च्यवन म्हणे विनीतवचन । क्षमा करा केलें सर्जन । मदासुराचें अज्ञानाने ॥२॥
अश्विन होते सोमभागहीन । तयांसी केलें भाग संपन्न । आता गणानाथाचें ज्ञान । सांगा मजला जें शांतिप्रद ॥३॥
मदादिक तेणें सोडून । शांत मनीं मी होईन । त्याचे हें वचन ऐकून । भृगू त्यासी सांगतसे ॥४॥
गणेश नामक योग सांगत । गणेश ब्रह्मरुप हा असत । पूर्ण शांतिमय ख्यात । भेदाभेदयोग लाभे ॥५॥
मायामय हें सर्व असत । भेदाभेदमय जगांत । गणेश्वरत्वें जेव्हा त्यागित । तेव्हां चित्त कैसें संभवेल ॥६॥
पाच चित्तवृत्तींचा नाश होत । यात संदेह नसत । योगशांतिमय पुनीत । म्हणोनी गणराजा त्या भजावें ॥७॥
योगाच्या सेवनें भजत । माझ्या उपदेशासी अनुसरित । विधान सर्वही आचरितां । शांतियुक्त नर होय ॥८॥
ऐसें सांगून थांबत । भृगु शांतिसमन्वित । त्यास प्रणाम करुन जात । च्यवन परम आदरें ॥९॥
वनीं जाऊन तप करित । योगप्रदायक उदात्त । चित्तभूमींची शुद्धि साधित । क्रमानें तो तपोबळें ॥१०॥
शम तैसाचि दम सेवित । भूमिनाशनें सर्व प्राप्त । सुलभ ब्रह्मविचारें होत । शांतियोग तो आचरी ॥११॥
तेणें तदाकार राहत । गणेशाचे नित्य भजत । गाणपत्य स्वभावें होत । गणेश तेव्हां प्रसन्न झाला ॥१२॥
त्यासी दर्शन देण्या जात । मूषकावरी तो बसत । चतुर्बाहुधर महोदर दिसत । गजानन तो प्रतापी ॥१३॥
त्यास पाहून दंडवत । च्यवन मुनी प्रणाम करित । विधिपूर्वक पूजित । नंतर स्तुतिस्तोत्र गाई ॥१४॥
हेरंब उपनिषदें स्तवित । गणनायक प्रसन्न होत । उत्तम वर त्यास देत । म्हणे विप्रेंद्रा ऐक तूं ॥१५॥
जें जें मनी इच्छिसील । तें तें सर्व लाभशील । योगशांति त्वभावें अमल । मानदा सदा राहशील ॥१६॥
माझ्या चरणीं दृढ भक्ति । जडून तुज सुखप्राप्ति । स्मरशील तेव्हां तुज पुढती । प्रकटेन मी सत्वर ॥१७॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला प्रभु गजानन । च्यवनें केली स्थापन । चतुर्भुजा गणेशमूर्ति ॥१८॥
त्या दिवसापासून राहत । च्यवनाश्रमीं गणेश सतत । त्याच्या दर्शने स्मरणें लाभत । तत्काळ भुक्ति तैशी मुक्ती ॥१९॥
हे सर्व तुज पुण्य आख्यान । च्यवनाचें सांगितले महान । जें सर्व दोषाचें करी हनन । नाना सिद्धिफळप्रद ॥२०॥
ओमिति श्रीमदान्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते च्यवनमाहात्म्यं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP