मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
स्वभावपरीक्षेची आधुनिक रीती

स्वभावपरीक्षेची आधुनिक रीती

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वराच्या स्वभावाची परीक्षा करण्याची ती त्याच्या घरच्या माणसांच्या सांगण्यावर भरंवसा ठेवून केली असे मानणे हा खरा व्यावहारिक मार्ग नव्हे. ती करण्यास त्याचे स्नेहीसोबती कोणी असतील त्यांकडे, अगर त्याच्या शाळागुरूंकडे, व त्याचे नेहमी हिंडणे सवरणे ज्या बाजूकडे अगर ज्या लोकांकडे होत असेल अशा बाजूस अथवा लोकांपाशी चौकशी केली पाहिजे; व तीही मुद्दाम त्याच्या भावी विवाहाच्या उद्देशाने करण्यात येत आहे असा कोणाच्याही मनात संशय येऊ देता कामा नये. सांप्रतकाळी पुरुषाच्या बाळपणाच्या विवाहाची चाल निदान मोठमोठ्या शहरांतून थोडी थोडी मोडत चालली आहे, तथापि लहान गावांतून व खेड्यापाड्यांतून तिचा जोर कमी झालेला नाही.
गरीब प्रतीच्या घराण्यांतूनसुद्धा या चालीचे स्तोम अनेक प्रसंगी दृष्टीस पडते; व लहानपणी मुलांमुलींचे जोडपे राम व सीता यांसारखे दिसते या समजुतीने, अगर सासूबाईस आपल्या हाताखाली सून राबविण्याई हौस असते ती पूर्ण करण्याच्या हेतूने, अगर घरच्या वृद्ध मंडळीच्या डोळ्यांदेखत एकदाचे लहान वयाच्या मुलाच्या दोन हातांचे चार हात करून दिले म्हणजे कुटुंबातील माणसांस आपण कृतकृत्य झालो असे वाटत असते या कारणाने, असे विवाह अनेक प्रसंगी घडतात. क्वचित्प्रसंगी असे विवाह होण्याचा योग न आल्याचे दृष्टीस पडले, तर येथे दारिद्र्य किंवा इतर प्रकारचा काही तरी आपत्ती आडवी आली असली पाहिजे असेही निश्चयाने अनुमान करण्यास हरकत नसते. ही वर्णिलेली स्थिती प्राय: सर्वत्र झाली असल्यामुळे वराच्या गुणांची चौकशी विवाहोद्देशाने करण्यात येत आहे असे जर कोणी बेसावधपणे भासविले, तर लग्न जुळण्याच्या कामी मोडता न घालणे यातच पुण्य समजणारे गावचे लोक व शेजारीपाजारी हे खर्‍याखोट्याचे विधिनिषेध न बाळगता जेणेकरून लग्न जुळून येईल अशा प्रकारे भर देण्याचे काम बेधडक करीत असतात.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP