ईश्वराने प्रत्येक प्राण्याच्या अंगी कमीजास्ती प्रमाणाने बुद्धी ठेविली असते, व तिची स्वरूपे अनेक असून ती सर्वच एकसयावच्छेदेकरून प्रकट होणारी नसतात. ती प्रकट अगर परिस्फ़ुट होणे हे प्रसंगावर आणि अनुकूल परिस्थितिविशेषावर अवलंबून असते. प्रतिकूल असेल तर अंगी बुद्धीचे बीज विद्यमान असूनही त्याचा विकास आयते वेळी होत नाही. ‘ पश्चाद्बुद्धिर्बाह्मण: ’ म्हणजे ब्राह्मणाला मागून अक्कल सुचते, असा मराठी भाषेत एक प्रसिद्ध विनोद आहे, त्याचा अर्थ असा आहे की, खर्या पराक्रमाच्या वएळी त्याची अक्कल गुंग होऊन जाते, व नुकसान व्हावयाचे ते अगोदर होऊन गेल्यावर, अशी युक्ती करावयास पाहिजे होती, तमुक प्रकारे बोलले पाहिजे होते, इत्यादी प्रकारच्या रिकाम्या शिळोप्याच्या वेळच्या युक्ती त्याला मागाहून सुचत असतात.
हा विनोद खराखोटा कसाही असो, त्यातील सारांशाचा प्रकृतोपयोगी भाग पाहू गेल्यास, कोणाच्याही बुद्धीचा उदय सर्वकाळ असतोच असतो असा व्यापक नियम मानिता येत नाही एवढाच काय तो आहे. बुद्धीचा उदय असतो तसा र्हासही असतो, यामुळे मूळच्या अनुद्भूत शक्ती प्रकट होतात, अगर अगोदर असलेल्या शक्तींचा आयते वेळी लोप होतो, असे जगात अनेक प्रसंगी अनुभवास येते. लहाणपणी बुद्धीने जड वाटलेला मनुष्य उत्तर वयात अत्यंत तीव्र बुद्धीचा शोधक ठरतो; व लहानपणी ज्यास जग तरतरीत समजत होते, तोच मनुष्य कालान्तराने बुद्धिहीन म्हणण्याची पाळी येते. बुद्धिमत्तेच्या उदयाचा व अस्ताचा हा असा प्रकार आहे, तरी तिजबद्दलचे व्यवहारापुरते अनुमान करिता येण्यास काहीच साधन नाही असे मात्र नाही. ते साधन म्हणजे अनुभव हे होय.
प्राचीनकाळच्या पद्धतीप्रमाणे गुरुगृहीत बटूची बारा वर्षे जात, यामुळे गुरू व त्याचा शिष्यवर्ग यांजकडे चौकशी केली असता कोणाही शिष्यविशेषाच्या बुद्धीबद्दल अनुमान करिता येत असे. अर्वाचीन काळी ती पद्धती सुटली आहे; तथापि शाळा, कॉलेज, बोर्डिंग संस्था, इत्यादी ठिकाणी विद्यार्थांचा संबंध असतो. यामुळे या संस्थांच्या चालकांकडे शोध केला असता मुलाबद्दलची माहीती मिळण्यास अडचण पडत नाही. फ़ार कशाला, आजमितीस हायस्कुलांतील वरच्या वरच्या वर्गांचे गुरू कॉलेजातील हिंदुधर्मी प्रोफ़ेसर अगर फ़ेलो मंडळी, व बोर्डिंग स्कूलांचे अधिकारीमंडळ, यांची झडतीच घेण्याचा कोणी प्रयत्न करी, तर त्यास या मंडळीपैकी शेकडा दहा पच लोकांपाशी तरी विवाहाच्या स्थळांच्या माहितीचे सायसंगीत रजिस्टर ( नोंदणी ) असल्याचेही अनुभवास आल्यावाचून राहणार नाही !!