स्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कन्या जन्मल्यापासून पहिली दोन वर्षे सोमाकडे तिचे पतित्व असते, त्यांच्या पुढील दोन वर्षे पतित्वाचा अधिकार गंधर्वाकडे जातो, व नंतरच्या दोन वर्षांत अग्नी तिचे पतित्व भोगितो. अशा प्रकारे जन्मापासून पहिल्या सहा वर्षांत कन्येला तीन पती होतात, व चौथ्याने तिला मनुष्यजातीचा पती प्राप्त होतो, असे सर्व स्मृतिग्रंथांतून सामान्यत: वर्णन केलेले आढळते, व त्यावरून स्त्रीजातीचे वय मनुष्यजातीशी विवाह होताना सहा वर्षांचे मानिता येईल असा अर्थ निबंधग्रंथांतून सर्वत्र स्वीकारण्यात आला आहे. तरी पण लग्नकाळी स्त्रीजाती एवढ्याच वयाची असावी असे सांगण्यार्या स्मृतिग्रंथांची संख्या फ़ार थोडी असून बहुतेक स्त्रीजातीचा विवाहकाल यापुढे काही वर्षे पावेतो लोटण्यात आलेला आहे. स्त्रीजातीस आठ वर्षे पुरी झाली म्हणजे तिला ‘ गौरी ’ ही संज्ञा प्राप्त होते, नऊ वर्षे झाली असता ‘ रोहिणी ’, दहा वर्षांच्या अखेरीस ‘ कन्या ’ व त्यानंतर ‘ रजस्वला ’ अशा संज्ञा तिलाक्रमाने मिळत जातात असे सांगून ‘ रजस्वला ’ संज्ञेच्या प्राप्तीपासून रजोदर्शन होईपावेतोच्या कालात दरम्यान केव्हा तरी तिने विवाहस्थितीत शिरावे, असा सामान्यत: सर्व ग्रंथांचा आशय आहे. रजोदर्शनास पात्र झालेल्या स्त्रीस ‘ नग्निका ’ अशीही आणखी निराळी संज्ञा असून पुरुषांनी अशा प्रकारची स्त्री वरावी असेही स्मृतिग्रंथकारांचे सांगणे आहे. साक्षात ऋतुकाल स्त्रेच्या प्रकृतीच्या मानावर अवलंबून राहणार हे उघड आहे; तथापि साधारन प्रमाण पाहू जाता वयाचे बारावे वर्ष उलटून जाण्याच्या सुमारास स्त्रियांचा ऋतुकाल मानण्यास हरकत नाही. वैद्यकशास्त्राचा सिद्धान्तही प्राय: हाच आहे, व हा सिद्धान्त कबूल केला असता पुढील मनुवचनावरून स्मृतिकारांच्या मते स्त्रीविवाहाचा योग्य काल हाच असल्याचे दिसून येईल:
प्रायच्छेनग्निकां कन्यामृतुकालभयान्वित: ।
ऋतुमत्यां हि तिष्ठंत्यामेनो दातारमृच्छति ॥
या वचनात ऋतुप्राप्तीपूर्वी कन्येचे दान व्हावे, व ते न झाल्यास तिचे दान करणार्या पित्रादिकांस पातक लागते, असे सांगितले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP