या दोन गुणांच्या आवश्यकतेबद्दल विशेष काही लिहिण्याची जरुरी नाही. कारण ती जरुरी प्राय: सर्वत्र मान्य असून तिच्याबद्दलची चौकशी प्रत्येक कन्यापालक राहात नाही. ‘ प्राय: ’ असे म्हणण्याचे कारण इतकेच की, कन्येच्या खर्या हिताची पर्वा न करिता आपस्वार्थीपणाचा अंगीकार करणारे जे कोणी असतात, त्यांना वराची संपत्ती, त्या संपत्तीतून आपणास तात्कालिक होऊ शकणारी प्राप्ती, व पुढेमागे वराच्या संपत्तीचा ताबा आपणास मिळण्याची शक्यता, इत्यादी गोष्टींकडेच काय ते लक्ष पुरविणे अगत्याचे वाटत असते. उलट वरापाशी संपत्ती असावी, म्हणजे मग तो कितीही उतारवयाचा असो, व त्याच्यापाशी शिरोलेखांतील गुण मुळीच नसोत, त्याची चिंता ते बाळगीत नाहीत. जगात अशा प्रकारच्या अधम वृत्तीचे लोक आढळतात. तथापि बाह्यात्कारी त्यांना या गुणांच्या आवश्यकतेबद्दल जर कोणी प्रश्न केला, तर हे गुण पाहावयास नकोत असे उघडपणे सांगण्यास त्यांचीही प्रवृत्ती सहसा होय नाही. मनुष्य संसारात पडावयाचा म्हटला म्हणजे त्यांच्या अंगी जगाअचे व्यवहार जाणण्याची व त्यांचा योग्य उपयोग करून घेण्याची शक्ती असलीच पाहिजे, व ती तशी मूळची असेल तरच तिचा अनुभवाच्या योगाने विकास होऊन ती संसारोपयोगी होते. अशी शक्ती ज्यांच्या अंगी नसेल ते लोक मूर्ख, ठोंब्ये इत्यादी संज्ञा पावतात, व लोकसमाजही त्यांच्याशी या संज्ञांच्या अर्थानुसार वर्तन करून त्याचा स्वत:ला मात्र फ़ायदा करून घेतात. ही शक्ती अंगी असणे याचेच नाव ‘ बुद्धिमत्ता ’ नव्हे. मनुष्य साक्षर असो वा नसो, त्याला लिहिता वाचताहई न येवो, त्याच्या कुटुंबाच्या निर्वाहाचे साधन असो वा नसो, व्यवसाय असेल, त्या व्यवसायाची अंगे व उपांगे यांचे ज्ञान असणे याचे नाव खरी विद्वत्ता, व लिहिता वाचता येणे हे तिचा व्यवहारात उपयोग करण्याचे केवळ उपांगसाधन होय. खरा उपयोग म्हणजे काय, तो कशात आहे, व करून घ्यावा कसा, हे जाणण्यास बुद्धीची अपेक्षा असते. बुद्धी ही विद्वत्तेची जननी होय. विद्वत्ता प्रयत्नसाध्य आहे, तशी बुद्धी प्रयत्नाने मिळणारी वस्तू नसून ती बीजरूपाने का होईना, पण मूळची अंगी असावी लागते.
मूल जन्मल्यावर पिता त्याचे जातकर्म करिता व मौंजीबंधन होते. जातकर्म व मौंजीबंधन ही दोन्ही कृत्ये धर्मशास्त्रानुसार संस्काररूपाने करावयाची असतात, व प्रत्येक कृत्याच्या पोटी ‘ मेधाजनन ’ या नावाचे एक विशेष कर्म करावे लागते. या कर्माचा उद्देश ‘ मेधा ’ म्हणजे बुद्धी हिचे जनन म्हणजे उत्पत्ती करण्याचा असतो. अर्थात ‘ जनन ’ शब्दावरून बुद्धी उत्पन्न करिता येते अशी कल्पना कोणाच्या मनात येईल; परंतु वस्तुत: ती मनात आणण्याचे काही कारण नाही. सांप्रत काळी आपण धर्मसंबंधाची म्हणून जी काही कर्मे करितो, त्यांचे मूळचे तात्त्विक अर्थ अत्यंत प्रौढ व उदात्त होते. परंतु दुर्दैवाने ते अर्थ एका बाजूस राहून आपण आपल्या कर्मांच्या ढोंगी स्वरूपाखाली त्यांची नुसती थट्टा करीत असतो, ही गोष्ट प्रत्येक विचारी मनुष्यास माहीत आहे; व तो मनुष्य सांप्रतची मेधाजननपद्धती हीदेखील एक थट्टाच आहे हे पूर्णपणे जाणतो.
‘ जनन ’ या शब्दाचा नुसता धात्वर्थ जरी ‘ नवीन उत्पत्ती ’ असा भासला, तरी बाळपणच्या सौम्य जोपासनेने व पुढे कडक शिक्षणपद्धतीने मुलाच्या अंगी मूळच्याच असलेल्या बुद्धीचा विकास करणे हाच या ठिकाणी खरा अर्थ समजणे इष्ट आहे. बुद्धीच्या विकासास ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. लहानपणी मुलाची नीट काळजी घेतली नाही, तर मुलाच्या बुद्धीस योग्य वळण लागत नाही, व पुढे त्याचे शिक्षण घेण्याचे वय झाले असता तर त याच्या वर्तनाला मातापितरे व गुरू यांच्याकडून आळा घालण्यात आला नाही, तर मुलाच्या पुढील जाते हा सर्वत्र अनुभव आहेच.