शकुन अनेक प्रकारचे होतात, व त्यांची फ़ळे शुभ अगर अशुभ असतात. सूर्य, चंद्र, नक्षत्रे इ. आकाशसंचारी तेजे, प्रत्यक्ष भूमीवरील उंच, सखल, किंवा गमनरूपाने, तर इतर वेळी प्रदेश, अशा सर्व ठिकाणी शकुन होऊ शकतात. ते केव्हा केव्हा गमनरूपाने, तर इतर वेळी स्थिरतेच्या रूपाने; कधी कधी शान्ततेच्या रूपाने, तर अन्य समयी निरनिराळ्या सौम्य, कर्कश, आनंदजनक, दु:खोत्पादक, उदासीनतादायक इत्यादी तर्हेचे असतात. कित्येक शकुन सर्वकाळ सर्व ऋतूंत अनुभवास येणारे नसून, ऋतुविशेषांवर व स्थानविशेषांवर त्यांचे महत्त्व अवलंबून असते. काहींचा अनुभव डाव्या अंगाने, तर काहींचा उजव्या अंगाने, व कित्येकांचा पुढल्या बाजूने अगर मागल्या बाजूने घडतो. कित्येकांचे नुसते दर्शन किंवा नुसते नामोच्चारणही शुभ किंवा अशुभ असते. अशा अनेक प्रकारच्या फ़ळांवरून शकुनांचे आणखी एक निराळे वर्गीकरण पुढील संज्ञांनी बृहत्संहिता (अ. ८६ श्लोक १५ ) ग्रंथात केले आहे : ( १ ) दैवदीप्त, ( २ ) क्रियादिप्त, ( ३ ) तिथिदीप्त, ( ४ ) नक्षत्रदीप्त, ( ५ ) क्षणदीप्त, ( ६ ) वातदीप्त, ( ७ ) अर्कदीप्त, ( ८ ) गतिदीप्त, ( ९ ) स्थानदीप्त, ( १० ) भावदीप्त, ( ११ ) स्वरदीप्त, ( १२ ) चेष्टादीप्त. या प्रत्येक वर्गाचे स्वरूप पाल्हाळाने सांगणे हा या पुस्तकाचा विषय नसल्यामुळे त्याचे सामान्य दिग्दर्शन आता केले तेवढे पुरे होईल.