शिपाईबाण्याचा निषेध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मूळ कात्यायनवचनात ‘ शिपाई बाण्या ’ चा या अर्थी ‘ शूर ’ असा शब्द आला आहे, व शहाण्या मनुष्याने आपली कन्या शूरास न देण्याविषयी सांगितले आहे. या निषेधाचा अर्थ त्या ऋषीच्या मते साक्षात शूरपणाचा निषेध व भित्रेपणाचा आदर करण्याचा असेल असे मानणे साहसाचे होईल. कारण क्षत्रियवर्णाच्या कन्येचा विवाह व्हावयाचा असता वराच्या अंगी ‘ शूरत्व ’ असणे हा अवगुण असे मानण्याचा त्या ऋषीचा हेतू असेल असे संभवत नाही. शूरत्व हा गुण अंगी असणे वाईट असे कोणीही विचारी मनुष्य म्हणू शकणार नाही; परंतु हा गुण अंगी आहे एवढ्यासाठी त्याचा सर्वकाळ दुरुपयोग करीत राहणे हे मात्र प्रशस्त होणार नाही; कोणीही झाला तरी आपली कन्या वरास दीतो, तो तिचा संसार चांगला व्हावा व तिला सर्वकाळ पतिसुख मिळावे, या हेतूने देतो, अर्थात कोणी मनुष्य आपल्या अंगच्या गुर्मीचा जर पदोपदी भांडणे-तंटे उपस्थित करून त्यात पराक्रम दाखविण्याच्या कामी दुरुपयोग करणरा असेल; अथवा क्रूर श्वापदांच्या शिकारी करण्याच्या नादास लागून आपला जीव नेहमी धोक्यात घालणारा असेल तर अशा पुरुषाच्या गळात जाणूनबुजून आपली कन्या अडकाविण्यास कोणी कबूल होईल असे सहसा घडावयाचे नाही; व एवढ्याकरिताच ‘ शूर ’ पुरुषाचा निषेध सांगताना त्या ऋषीने ‘ शहाण्या पुरुषा ’ ने या अर्थाचा द्योतक ‘ बुधै: ’ हा शब्दही योजिला आहे असे मानणे अधिक साहजिक दिसते. कदाचित उठल्यासुटल्या बायकोच्या नथेतून तीर मारतो असए म्हणणारे कित्येक फ़ाकडे शिपाई असतात. त्यास उद्देशूनही या शब्दाचा अर्थ ओढाताणीने लाविता येईल, परंतु तितकी खटपट करणे अगत्याचे नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP