रूप चांगले मनोहर असणे ही ईश्वरी देणगी आहे, व ती फ़ार थोड्या व्यक्तींच्या वाट्यास आलेली असते. व्यवहारात या देणगीची वाण स्त्रीजातीस जितकी नडते तितकी पुरुष जातीस नडत नाही; कारण कन्येकरिता स्थळ पाहण्याचे ते तिच्या खर्या भावी कल्याणाकडे दृष्टी देऊन पाहावयाचे, व त्यात स्वत:च्या रिकाम्या हौसेचा अगर अप्पलपोटेपणाचा भाग येऊ द्यावयाचा नाही, या गोष्टीकडे लक्ष पुरविणारे पालक सांप्रतच्या स्थितीत फ़ार विरळा दृष्टीस पडतात. पोटी कन्या असणे म्हणजे गळ्यात अडकविलेले एक मोठे अवजड ओझे आहे हीच जर मुळात लोकसमाजाची साधारण समजूत, तर हे ओझे निघून जाईल तितक्या तर्हेने ते काढून टाकण्याकडे लोकांची प्रवृत्ती व्हावी हे साहजिक आहे. तशातून कन्या देऊन टाकण्याच्या बाबतीत स्वत:चा थोडाबहुत तरी फ़ायदा होण्याचा संभव आहे असा जेथे प्रकार असेल, त्या ठिकाणी तर कन्येच्या हिताची गोष्ट पाहण्याचे मनात येणे हे सहसा दुर्घटच होय. सुदैवाने या स्थितीस अपवादही केव्हा केव्हा होतात, व त्या प्रसंगी मुलीच्या नेत्रांस व मनास आनंद वाटेल, निदान तिला भीती वाटणार नाही, किंवा मनास किळस वाटणार नाही, इतक्या बेताची वरयोजना करण्याकडे आईबापांचे लक्ष असते. वराचे डोळे सदा तारवटलेले व लाल धुंद, किंवा ते वर बटबटीत आलेले, किंवा पिचके; तोंडावर देवीचे वण; दात लांब व बाहेर आलेले, आंधळेपणा, खुळेपणा, बहिरेपणा इत्यादी शारीरिक व्यंगे; या किंवा अशाच प्रकारच्या इतर कित्येक गोष्टी वराच्या अंगी दृष्टीस पडत असता वधूस सुख प्राप्त व्हावयाचे नाही. यासाठी अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न सदर आईबापांकडून होतो. तसेच वधूच्या शरीराची काठी उंच अगर ठेंगणी जशी असेल तशा बेताने वराच्या उंचपणाकडे अगर ठेंगणेपणा. कडेही लक्ष पुरविण्यात येते. अशा बाबतीत अमुकच गोष्टी पाहाव्या व तमुक गोष्टी पाहण्याचे कारण नाही असा सामान्य नियम सांगता येने दुर्घट आहे. प्रत्येक प्रसंगी वधूवरांची परस्परसापेक्ष स्थिती ज्या मानाची असेल, त्या मानाकडे साधेल तोपावेतो लक्ष पुरवावे, व शक्य असेल तोपर्यंत वधूवरांनी एकमेकांचा कंटाळा करावा अगर एकमेकांची भीती एकमेकांस वाटेल असा प्रकार असू नये, अशाविषयी खबरदारी घेतली जावी एवढेच काय ते, - याहून अधिक स्पष्ट असे काही सांगता येण्याजोगे नाही. वर किंवा वधू यांपैकी एक जण अति तेज:पुंज व दुसरे मनुष्य त्या मानाने अगदी कलाहीन वाटणारे असा प्रकार सहसा नसावा. अंगी चांगले रूप वास करीत असूनही केवळ शरीराच्या कान्तीच्या बाबतीत मात्र आता सांगितल्या प्रकारचा विलक्षण फ़रक असला, तर तोही भावी वरवधूंच्या सुखास कारणीभूत होऊ शकत नाही, यासाठी असे प्रसंग बनेल तोपावेतो टाळिलेच पाहिजेत. महाभारतात सावित्रीचे उपाख्यान वर्णिले आहे, त्यात सावित्रीची देहकान्ती अत्यंत तेजस्वी, यामुळे अतिशय सुंदर राजपुत्रही तिच्या तेजापुढे दिपून जात असे वर्णिल्याचे सर्वत्र प्रसिद्धच आहे.