वरील कलमात स्त्रीजातीवर येऊ शकणारी जी आपत्ती वर्णिली आहे, तीत स्त्रियांच्या वैधव्यस्थितीचा संबंध स्पष्ट आहे. ही स्थिती प्राप्त होणे अगर न होणे ही गोष्ट मनुष्याच्या सत्तेच्या बाहेरची आहे, व यासाठी त्या स्थितीच्या प्राप्तीची भीती लक्षात आणून वराच्या गृहस्थितीबद्दल अगाऊ प्राप्त झाली नाही, व स्त्रीचे सुवासिनीत्व कायम राहिले, तरी त्या सुवासिनीत्वाच्या स्थितीतदेखील या शोधाचे महत्त्व निराळ्या कारणाने असू शकते. हे कारण संततीचा व विशेषत: पुत्रसंततीचा अभाव हे होय. आमच्या आर्यमंडळात मरणोत्तर श्राद्धी पिंड मिळण्याचे महत्त्व फ़ार मानिले जाते; व त्या पिंडाचा मुख्य अधिकार पुत्रसंततीकडे येणारा असून ती संतती कुलाचे नाव पुढे चालविणारीही होते, यामुळे प्रत्येक मनुष्य बहुधा पुत्रप्राप्तीकरिता आतुर झालेला असतो. स्त्रीपुरुषांच्या संमेलनानंतर या प्राप्तीची प्रत्येक मन्य्ष्य आशा करीत राहतो; परंतु पुष्कळ प्रसंगी या आशेची निराशाही होते. आशा कायम आहे तोपर्यंत पुरुष व स्त्रिया यांचा प्रेमसंबंध चालतो; परंतु जर का पुरुषास या निराशेने पछाडले, तर मात्र त्याचा परिणाम भोगण्याची पाळी बिचार्या स्त्रीजातीकडे येते. प्रारंभी प्रारंभी फ़ार तर प्रेमसंबंध दूरावतो, परंतु पुढे पुढे पतीच्या मनात तिरस्कारबुद्धीचा संचार होऊन तो पत्नीस हिणवू लागतो, व तिला अनेक प्रकारांनी छळितो. एकीकडून पतीचा छळ व दुसरीकडून आसपासच्या इतर लोकांकडून हिणावून घेणे, या दोहोंच्या कचाट्यात ती बिचारी सापडते; व व्रतेवैकल्ये, उपासतापास; तुळशी, पिंपळ वगैरे झाडाभोवती खेटे; नवससायास, देवदेवऋषी, अंगारेधुपारे, इत्यादी प्रकारांकडे तिचे मन साहजिक धावते. तिचे मन विद्येने सुसंस्कृत झालेले नसल्यामुळे तिला या प्रकाराचा पोकळपणा कळत नाही; व तिचे संसारातून मन उठल्यासारखे होऊन या प्रकारांचे आचरण करणे हेच तिला आपले आद्य कर्तव्य आहे असे वाटू लागते. या कामी तिला पतीचे आनुकूल्य मिळाले तर तिचे काही दिवस कसेबसे तरी निभावतात; परंतु ते जर का न मिळाले, तर मात्र तिच्या दु:खाची परमावधी होण्याची स्थिती जवळ येऊ लागते. घरसंसारात तिचे मन न राहिल्याने घरातील कामकाजांची थोडीबहुत हेळसांड होऊ लागून तिला नवर्याकडून व घरातील इतर मंडळीकडून अनेक प्रकारचा जाच होण्यास सुरुवात होते. स्त्रीजातीला ‘ वांझ ’ म्हणून घेण्याची मोठी चीड असते, व या वेळी तर जिकडून तिकडून याच शब्दाची पुष्पांजली तिच्या मस्तकावर पदोपदी पडू लागून तिला सळो की पळो असे वाटू लागते. तशातून आमच्या लोकांतील सामाजिक नियमांनी पुरुषवर्गाला एकसमयावच्छेदेकरून अनेक स्त्रिया करण्याची मोकळीक ठेविली असल्यामुळे आजूबाजूच्या मंडळीकडून नवर्याला नवीन लग्नसंबंध जोडण्याच्या सूचना होण्यास प्रारंभ होतो. अशा प्रसंगी पुरुष विचारी असला तर तो लग्न करण्याच्या कल्पनेस बाजूस ठेवितो, परंतु जगात असा प्रकार सहसा होत नाही. पुनर्लग्नाचीही चर्चा घरात उघडपणे होऊ लागते, व बिचार्या स्त्रीस ती निमूटपणे ऐकावी लागून तिच्या हृदयावर हा नवीन धोंडा कोसळून पडल्यासारखी तिची स्थिती होते. पुरुषाने स्त्रीचे नाव घेण्याचे बहुधा अशा प्रसंगी टाकिलेलेच असते; परंतु अनेकदा असे घडते की, त्याला स्त्री डोळ्यांसमोर असणेही दुर्विषह वाटते, व तो तिला टाकून तिची माहेराकडे रवानगी करितो. ‘ वांझ ’ हा शब्द बायकांना ज्याप्रमाणे अवघड वाटतो, त्याचप्रमाणे ‘ सवत ’ हा शब्दही त्यांना अतिशय जाचतो. तशातून ही सवत त्या बिचारीच्या छातीवर आनून उभी करावयाची इत्यादी प्रकारची घालून पाडून बोलणी जिकडून तिकडून चालू असतातच. कसेही असो; अशा प्रकारच्या कष्टदायक स्थितीत दिवस कंठण्याची पाळी तिला येते व ती माहेरी जावो अगर न जावो, तिची फ़ार दैना होते. ही अशी स्थिती व्हावी अशी कोणीही कन्यापालक इच्छा करणार नाही, व करीतही नाही, हे खरे; तथापि दुर्दैवाने तशी पाळी आलीच, तर निदान तिच्या गुजार्याची काही तरी स्वतंत्र सोय असणे हे केवळ अगतिकच होय. अर्थात ही सोयही विवाहकृत्य ठरविण्याच्या पूर्वी मनात आणणे हे कन्यादात्याच्या अवश्य कर्तव्यांपैकीच एक आहे, यात संशय नाही.