विवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वराचे वय वधूच्या वयापेक्षा अधिक असावे असे मोघम अनुमान मागे क. ५३ येथे लिहिले आहे; परंतु ते लिहिताना ते किती वर्षाचे असावे, किंवा वधूच्या मानाने किती वर्षांनी अधिक असले पाहिजे, अशाविषयीचा उल्लेख झालेला नाही. वर्णव्यवस्थेच्या दृष्टीने ब्राह्मणाचा उपनयनकाल ८ व्या वर्षी, क्षत्रियाचा ११ व्या वर्षी, व वैश्याचा १२ व्या वर्षी समजावा, असा स्मृतिशास्त्राचा सिद्धान्त आहे; व गुरुगृही वेदग्रहणाच्या हेतूने उपनीत पुरुषाने राहण्याची कमीत कमी कालमर्यादा बारा वर्षांची मानिली आहे. यावरून विचार करू गेल्यास ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांचे विवाहकाल अनुक्रमे २०, २३ व २४ वर्षांपेक्षा कमी नसले पाहिजेत असे साहजिक अनुमान निघू शकते. याप्रमाणे पुरुषाच्या वयाची वर्षे भरली असता त्याने विवाह केलाच पाहिजे असा शास्त्राचा निर्बंध नसून तो ऐच्छिक असल्याचे मागे क. ५१ येथे स्पष्ट दर्शविलेच आहे. तशातून एका वेदाचे ग्रहण पुरे होऊन गेल्यावर वेदग्रहीत्याची इच्छा निराळ्या वेदाचे ग्रहण करण्याविषयी होईल, तर त्याने पुन्हा दुसर्याने उपनयनसंस्कार करून घेऊन नवीन वेदाच्या ग्रहणासाठी दुसर्याने गुरूच्या गृही ब्रह्मचर्याच्या नियमांचा आश्रय करून राहावे; व हाच क्रम आणखी पुढे निराळे वेद शिकावयाचे असल्यास प्रत्येक वेळी पुढेही चालवावा, अशाविषयी शास्त्रग्रंथांचा आशय स्पष्ट आहे. अर्थात चारी वेदांचे ग्रहण करण्याचे जर कोणी मनात आणिले, तर त्याच्या विवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा प्रत्येक वेदाच्या वेळी बारा बारा वर्षांनी खुशाल वाढविता येतील; म्हणजे चौथ्या वेदाच्या परिसमाप्तीचा काल वर्णभेदाने कमीत कमी ५६, ५९, ६० या वर्षांपर्यंतही लांबू शकेल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP